मंगळवार, २८ जून, २०११

मोबाइल संगीतातील तंत्रसाधना !

मोबाइल संगीतातील तंत्रसाधना !

संगीताचा आस्वाद घेणे कधी काळी खिशात पैका खुळखुळत असेल तरच शक्य होते. आकाशवाणीने व मग दूरदर्शनने आम आदमीला कानसेन बनविले पण त्यालाही काही मर्यादा होत्याच. संगीताचा घरबसल्या व हवे तेव्हा आस्वाद घेण्याची जी साधने होती ती मध्यमवर्गीयाच्या आवाक्याबाहेरच होती. ग्रामोफोन, कॅसेट प्लेयर, वॉकमन व एम.पी. 3 प्लेयर , आय-पॉड या प्रवासात संगीत अभिजनांपासून जनांपर्यंत सर्वत्र झिरपायला लागले. नेट वर सुरवातीला एम.पी. 3 गाणी अगदी सहज उपलब्ध होती पण ती वाजविण्यासाठी लागणारी उपकरणे परवडण्याजोगी नव्हती. स्वामीत्व कायद्याचा बडगा उगारला गेल्याने , एम.पी. 3 माध्यमातुन संगीत उपलब्ध करून देणार्या अनेक साइटस भूमिगत झाल्या ! म्हणजे दात होते तेव्हा चणे खायला पैसे नव्हते व आता दात पडल्यावर चणे खायची ऐपत आहे अशी स्थिती संगीताचे वेडे असलेल्यांची झाली. जुनी गाणी मिळत नाहीत व रिमिक्सचा मारा मात्र चालूच आहे. एम.पी.3 या प्रकारातली जुनी मराठी गाणी अनेक साइटसवर उपलब्ध आहेत पण ती फक्त ऐकायला मिळतात, उतरवून घेता येत नाहीत ! काही वेब-साइटस गाणी ऐकायची असतील तर नोंदणी करायची सक्ती करतात, तर काही वेब-साइट्स गाण्याची काही सेकंदाची झलक ऐकवून दामाजी काढा असे बजावतात !


 

मला स्वत:ला जुनी मराठी व हिंदी गाणी खूप आवडतात व ही गाणी मोबाइलवर ऐकत पनवेल-मुंबई-पनवेल हा रोजचा प्रवास अगदी सुरेल होतो ! एम.पी.3 प्लेयर असलेला मोबाइल व गाणी साठविण्यासाठी 2 जीबीचे मेमरी कार्ड घेणे सोपे आहे पण त्यात गाणी, ती ही आपल्याला आवडणारी , भरण्यासाठी पचंड खटपट मला करावी लागली. शोधा म्हणजे नेटवर काहीही सापडेल ! अनेक तास नेटावर नेट लावून भ्रमंती केल्यावर जे काही हाती गवसले ते या लेखात संकलित करीत आहे.

  • कुलटोड, ( www.cooltoad.com , नोंदणी आवश्यक ) इस्निप्स ( www.esnips.com नोंदणीची गरज नाही पण त्यांचा डाउनलोडर वापरावा लागतो. ) या साइटसवर अजूनही असंख्य मराठी जुनी गाणी आहेत. अजूनही कुलटोड वरून सर्च करून तुम्ही सहज हवे ते गाणे उतरवू शकता पण बाकी वेब-साइटस तुम्हाला फक्त गाणे ऐकायची सवलत देतात. उदा. www.in.com, www.raaga.com . www.aathavanitli-gani.com ही वेब-साइट संपूर्ण मराठीत आहे, गाण्यांचे बोल सुद्धा दिलेले आहेत, दी बेस्ट !
  • आडमुठ्या वेब-साइट्ना वठणीवर आणणारा उपाय आहे तो म्हणजे इंटरनेट डाउनलोड मॅनेजर ( आय.डी.एम ) हे सॉफ़्टवेयर वापरणे. हा प्रोग्राम वापरल्यास गाणे ऐकत असतानाच ते तुम्हाला उतरवता येते ! आय.डी.एम. ची अजून एक कमाल म्हणजे त्यात असलेला "साईट ग्रॅबर" हा पर्याय ! हा पर्याय वापरून तुम्ही एखाद्या साइटसवर असलेली सर्वच्या सर्व एम.पी.3 गाणी (किंवा त्या वेब साइटसवरील हवे असलेले काहीही ! ) एका झटक्यात उतरवून घेवू शकता ! यात तुम्ही वेळ सुद्धा सेट करू शकता. म्हणजे आधी लिंक उतरवून घ्यायच्या व रात्री जेव्हा नेटचा स्पीड कमाल मिळतो ती वेळ सेट करून ठेवायची. ठरवलेल्या वेळी उतरवून घेण्याचे काम चालू होते. संगणकाचा मॉनिटर स्वीच ऑफ करून ठेवायचा. वीज व वेळ दोन्हीची बचत होते. काम आटोपल्यावर सांगितले असेल तर बापडा संगणक बंद सुद्धा करतो ! जबराट आहे हे सॉफ्टवेयर !
  • यु-ट्यूब ( www.youtube.com ) वर सुद्धा अनेक मराठी गाणी आहेत. एरवी ती तुम्हाला फक्त ऐकता येतील पण आय.डी.एम असेल तर तुम्हाला ती flv मध्ये उतरविता येतील.
  • मायाजालावर flv चे mp3 मध्ये परिवर्तन करणारा प्रोग्रॅम सुद्धा आहे !
  • मायाजालावर मिळणारी गाणी 128 ते 320 या बीटरेटने ( Bit Rate in Kbps ) साठविलेली असतात. साधारण 3 मिनिटाचे एक गाणे 3 ते 4 एम.बी. एवढी जागा व्यापते. हेच गाणे जर 64 केबीपीएस बीट रेट मध्ये परावर्तित केले तर दीड ते दोन एम.बी. एवढीच जागा व्यापेल ! म्हणजेच नेहमीपेक्षा दुप्पट गाणी तुम्ही तेवढ्याच जागेत बसवू शकाल ! अर्थात दर्जाशी थोडी तडजोड करावी लागेल पण इयरफोन कानाला लावून गाणी ऐकत असाल तर तेवढे तुम्हाला जाणवणारही नाही !
  • तुमच्या कडे गाण्यांच्या सीडी असतील तर त्यातली गाणी सुद्धा तुम्ही सहज एम.पी.3 मध्ये बदलू शकता. त्यासाठी Audio Grabber नावाचा प्रोग्राम उपलब्ध आहे.
  • संगणकावर गाणी ऐकताना तुम्हाला तुमच्या आवडीच्या गाण्यांची यादी बनवून (प्ले-लिस्ट) ऐकायची सोय असते पण अनेकदा तुमच्या मोबाइलमध्ये ही सोय नसते. काही मोबाइल गाण्याच्या एम.पी.3 टॅग प्रमाणे वर्गवारी करतात (ऑटो लिस्ट जनरेशन ) पण त्यासाठी मूळात गायकाचे नाव, अल्बमचे नाव, जातकुळी (Genre) इत्यादी माहिती फाइलीत साठविलेली हवी. समजा मला लावण्यांची एक यादी बनवायची आहे व माझ्या मोबाइलमध्ये स्वत:च्या आवडीप्रमाणे यादी बनवायचा पर्याय नसेल तर काय ? यावर सुद्धा उपाय आहे तो म्हणजे एम.पी.3 टॅग एडीटर ! याचा वापर करून तुम्ही गाण्याचे टॅग बदलू शकता केव्हा नसतील तर टाकू शकता. तुम्ही हवे असलेले टॅग टाकून घेतलेत जसे गायक, संगीतकार, गीतकार, चित्रपट, गाण्याचा प्रकार की मग तुमचा मोबाइल त्या प्रमाणे यादी बनवून देइल. अनेकदा मोबाइल वर गाण्यांची यादी बघताना फाइल गाण्याच्या नावाने सेव केली असली तरीही गाण्याचे नाव न दिसता "ट्रॅक 1" असे काही दिसते. त्यामुळे गाणे कोणते आहे तेच कळत नाही ! गाण्याच्या टॅग मध्ये टायटल या प्रकारात जी माहिती साठविलेली असते तीच तुमचा मोबाइल दाखवित असतो. टॅग एडीटर वापरून तुम्हाला या समस्येवर सुद्धा मात करता येते. गाण्याच्या नावाप्रमाणे फाइल असेल तर एका क्लिकसरशी तुम्ही ते नाव टायटलमध्ये अपडेट करू शकता ! टायटल असेल पण फाइल नाव मात्र वेगळेच काही, जसे फाइल 1, 2 असे असेल तर हाच प्रोग्राम वापरून तुम्हाला एका झटक्यात सर्व फाइल टायटल प्रमाणे रीनेम करता येतात.


 

यात नमूद केलेली सर्व सॉफ्टवेयर मायाजालावर अगदी मोफत उपलब्ध आहेत व याचा वापर करताना एकाच वेळी अनेक फाइल हाताळता येतात (बॅच मोड ) . या सगळ्यांच्या लिंक मी देत आहे सोबत "मीडीया फायर" या फाइल शेयरींग वेब-साइटवर असलेला जुन्या , सुमधुर मराठी गाण्यांच्या खजिन्याची किल्ली ( लिंक्स किंवा दुवे ) मी तुम्हाला देत आहे.

मराठी गाण्यांच्या लिंक्स

अभंगवाणी

गीतरामायणातील निवडक गाणी (बाबुंजीच्या निवेदनासह )

बेधुंदगीते.

भावगीते

देशभक्तीपर गीते.

नाट्यसंगीत

लोकगीते

निसर्गगीते

तमाशा/लावण्या

प्रेमगीत

विरहगीत

भावगीते

भक्तीगीते

संकीर्ण

लेखात उल्लेख असलेली सर्व सॉफ्टवेयर उतरविण्यासाठीची लिंक.

महत्वाची सूचना :- या लेखातील माहीतीचा वापर ज्याने त्याने आपल्या जोखमीवर करायचा आहे. मायाजालात मिळालेल्या लिंक मी फक्त देत आहे. या बाबत कोणत्याही प्रकारे मला जबाबदार धरता येणार नाही. धन्यवाद !

1 टिप्पणी:

धोंडोपंत म्हणाले...

वा पंत वा,

फार मोठा खजिना उघडून दिलात.

धन्यवाद

धोंडोपंत