मुंबई बंदर, पगारा व्यतिरीक्त अनेक खर्चाचा अंशत: परतावा आम्हाला देत असते. अर्थात त्याची प्रक्रीया एवढी किचकट असते की ’भीक नको , पण कुत्रे आवर’ असा प्रत्यय ते घेताना येतो व आमच्या गोदी विभागातले अनेक जण त्या फंदात पडतच नाहीत. दोन वर्षातुन एकदा आम्हाला चष्मा घेण्यासाठी १००० रूपये किंवा प्रत्यक्ष आलेला खर्च यात जे कमी असेल त्या रकमेचा परतावा मिळतो पण त्यासाठी आमच्या किंवा सरकारी रूग्णालयात जावूनच नंबर काढावा लागतो ! अर्थात यात पुर्ण दिवस वाया जातो म्हणून कोणी त्या भानगडीत पडत नाही. काही वर्षापुर्वी मला कोणीतरी सांगितले की सेंट जॉर्ज रूग्णालयातला एक शिपाई १० रूपये दिले की तुम्हाला डोळ्याचा नंबर काढल्याचे (हव्या त्या नंबराचे !) सर्टीफिकेट देतो. हे रूग्णालय आमच्या कार्यालयाच्या बरोबर समोरच असल्याने आम्ही सगळे सहकारी तिकडे गेलो व १० रूपये मोजून प्रत्यक्षात कोणतीही तपासणी न करता ते प्रमाणपत्र घेतले होते ! पुढची प्रक्रीया होती चष्मा बनविल्याचा कॅश मेमो त्या प्रमाणपत्राला जोडून अर्ज सादर करायची. अर्थात अशी खोटी बिल सुद्धा बनवून देणारे अनेक दूकानदार होते पण मी त्या भानगडीत न पडता एका दूकानात जावून खरेच नंबर तपासला तेव्हा तो अगदीच नगण्य होता व चष्मा लावायची मला काहीही गरज नव्हती. मी तो नाद मग सोडून दिला.
अध्यक्षांचा मदतनीस म्हणून काम सुरू केल्यावर मात्र सततच्या संगणक वापराने डोळे व डोके दुखू लागले. चाळीशी लागल्याची सर्व लक्षणे दिसत होती पण कामाच्या रामरगाड्यात रूग्णालयात जावून दिवस वाया घालविणे कसे जमणार ? पण आता मी अध्यक्षांचा पीए होतो नाही का ! फक्त एक फोन करून डोळ्याच्या डॉक्टरची भेटीची वेळ ठरविली व इतर कोणतेही सोपस्कार न होता मला तपासणी करून नंबर काढून मिळाला व तसे आवश्यक प्रमाणपत्र सुद्धा मिळाले. या वेळी मात्र नंबर चांगलाच वाढला होता व जवळचा व लांबचा असे दोन्ही दोष निर्माण झाल्याने चष्मा रोज वापरावाच लागणार होता. क्लेम मिळणार होता जास्तीत जास्त हजार रूपयाचा पण माझे खर्च झाले १५०० रूपये ! बायफोकलने मला खूपच ताप झाला. कार्यालयात बसण्याच्या रचनेप्रमाणे संगणकाचा पडदा माझ्यापासून दिड फूट लांब होता, की- बोर्ड खाली दोन फूट अंतरावर व नोंदी करायचे रजिस्टर एक फूटावर ! हे त्रांगडे मला चांगलेच त्रास देवू लागले. इकडून तिकडे नजर फिरविताना आधी सगळेच धूसर दिसायचे व काही सेकंदाने नजर बसायची ! पायर्या उतरताना भयंकर गोंधळ उडू लागला. पायरी किती खोल आहे याचा अंदाजच यायचा नाही. असेच एकदा घाई- घाईत कार्यालयाच्या बाहेर पडताना, पायरीचा अंदाज न आल्याने माझा पाय मुरगळला व मी चांगलाच आदळलो ! लगेच काही कळले नाही पण पनवेलला पोहचेपर्यंत पाय हत्तीसारखा सूजला होता. या स्थितीत स्टेशनचा जिना चढून तिसर्या मजल्यावरच्या घरात कसा पोहचलो माझे मलाच माहीत ! सकाळी उठलो तेव्हा मुरगळलेला पाय मी जमिनीला टेकवू सुद्धा शकत नव्हतो. ही अवस्था दोन दिवस होती ! संपूर्ण बरा व्हायला तब्बल महिना लागला पण १० दिवसाच्या रजेनंतर एका पायाने कामावर जायला लागलो होतो. मधल्या काळात अध्यक्षांच्या पीएचा पाय घसरला, पायरी विसरला , पायरी समजली , पायरी ओळखा --- असे अनेक पीजे मित्रमंडळीनी पसरवले होतेच ! चष्म्याचे हजारभर रूपये मिळाले पण १० दिवसाची रजा वाया गेली, ओवरटाइम बुडाला, क्ष-किरण तसासणी, फिजीओथेरपी व मलमे यावर हजारभर रूपये खर्च झाले ! लेने के देने पडले ! पण हे एवढ्यावरच थांबले नाही. असला अपघात परत होवू नये म्हणून डॉक्टरी सल्ल्याने मी दोन चष्मे बनवून घेतले, एक जवळचे बघायला व एक लांबचे बघायला. त्याचा दोन्हींचा खर्च आला पत्येकी एक हजार ! एक काढून दूसरा चष्मा लावताना धांदरटपणाने त्याच्या काचा सुद्धा अनेकदा फूटल्या व तो बदलायचा खर्च वेगळाच !
अशी दोन वर्षे धडपडत गेल्यावर परत नव्याने क्लेम लागू झाला. या वेळी आधी पनवेलमधीलच प्रख्यात नेत्र-तज्ज्ञाकडून नंबर काढून घेतला व आधी वेळ ठरवून आमच्या रूग्णालयात गेलो. तिकडे काढलेला नंबर काही वेगळाच निघाला पण तरीही मी खाजगी तपासणी करून घेतलेल्या नंबरा प्रमाणेच प्रमाणपत्र घेतले. चष्मा बनवायला दूकानात दोन दिवसाच्या अंतराने गेलो तेव्हा दूकानदाराने तपासणी करून तिसराच नंबर दिला तेव्हा मात्र माझ्या डोळ्यासमोर काजवेच चमकले ! आता चष्मा कोणत्या नंबराप्रमाणे बनवायचा ? शेवटी दूकानदाराने परत तपासणी करून त्याने काढलेल्या नंबराप्रमाणेच चष्मा बनवायचे ठरले. दोन फ्रेम होत्याच तेव्हा त्यानांच नवीन नंबराच्या काचा लावून दे असे दूकानदाराला सांगताच त्याने माझ्यापुढे प्रोग्रेसिव लेन्सचा प्रस्ताव ठेवला. या लेन्स म्हणे जशी आपली नजर फिरते त्याप्रमाणे आपोआपच अॅचडजस्ट होतात. याचा खर्च मात्र येणार होता फक्त २५०० रूपये ! अर्थात जुन्या फ्रेम नव्या प्रोग्रेसिव लेन्सला सूट होत नसल्याने नव्या फ्रेमसकट हा खर्च होता. अर्थात सोय चांगली असल्याने मी त्याला देकार दिला.
चष्मा बनल्यावर मी तो दूकानात घालून बघितला तेव्हा मला थ्री डी चित्रपट बघत असल्याचा भास झाला ! डोके नुसते गरगरू लागले ! ना जवळचे नीट दिसते होते ना लांबचे ! खोलीचा अंदाज तर बिलकूलच येत नव्हता ! दूकानदाराने मात्र सवय नाही म्हणून असे होते , रोज वापरा, काही दिवसाने तुम्हाला सवय होइल असे सांगून माझी बोळवण केली ! दिवस कसले, काही महिने झाले तरी मला काही त्याची सवय झालेली नाही ! जवळचेही दिसत नाही, लांबचेही दिसत नाही, पायर्या उतरताना चाचपडणे काही थांबत नाही ! ’ते’ दूकान शोधतो आहे पण चष्मा काढल्यावर ते दिसत नाही व लावल्यावर ’हेच ते दूकान’ म्हणून ओळखता येत नाही. डोंगर दुरूनसुद्धा साजरे दिसत नाहीत. एखादी सुंदरी (तसे हल्ली जगात सुंदर असे माझ्या दृष्टीने काही उरलेलेच नाही म्हणा ! ) जवळून गेली तरी मान मोडेपर्यंत बघायचे कष्ट मी हल्ली घेत नाही त्यामुळे सौ मात्र भलतीच खुष आहे !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा