सीमेपलीकडचे आतंकवादी, तसेच युपी-बिहारी घुसखोरांमुळे राष्ट्र व महाराष्ट्र बेजार झाला आहे, लाचखोर सरकारी यंत्रणेपुढे सामान्य माणूस हतबल आहे, हरामखोर नेत्यांमुळे सगळेच भरडून निघत आहेत. या सर्व खोरांना आता अजून एक जमात सामील झाली आहे आहे ती म्हणजे मोबाईलखोर ! मोबाईलचे रूपयातले मूल्य जरी कमी झाले आहे तरी त्याचे उपद्रवमुल्य जबर वाढले आहे ! या कंपन्यांच्या गळाकापू स्पर्धेपायी अनेक वैविध्ये असणारी मोबाईल उपकरणे कमी किमतीत बाजारात आणली गेली व “माकडाच्या हाती कोलीत” असा प्रकार त्यात स्पीकरची सुविधा दिल्यावर झाला ! आज सामान्य लोकलकरांना या मोबाईल स्पीकरचा ठणठणाट सहन करीत प्रवासाचे दिव्य करावे लागत आहे. तसे तक्रार केल्यास “सहप्रवाशांना उपद्रव” या कलमाखाली मोबाइलवर गाणी वाजवणार्यावर कारवाई पोलिस करू शकतात पण लोकलमधली गर्दी बघता हे व्यवहारात शक्य नाही. गर्दीत कधी कधी तर कोणाचा मोबाईल कोकलत आहे हेच कळत नाही. (अर्थात अशक्यही नाही !). काही मिनिटे वाट बघून मी स्वत: मात्र अशा खोरांना हीसका दाखवितो, एकाने आवाज दिला की अनेक त्रस्त लोक त्या आवाजात आवाज मिसळून मोबाईलखोराला स्पीकर बंद करण्यास भाग पाडतात पण पुढाकार कोणी घ्यायचा यातच शेवटचा थांबा येतो किंवा दरम्यानच्या काळात तो उपद्रवी उतरून सुद्धा गेलेला असतो. मी नमनालाच शिवी हासडून मोबाइलखोराला गार करतो पण सगळ्यांनाच हे जमेल असे नाही, तसे मला सुद्धा ताकदीचा अंदाज घेवून केव्हा केव्हा कानात नुसता इयरफोन घालून स्वत:चा बचाव करावा लागतो ! तुम्हाला गाणे ऐकायचे नसेल वा दूसर्या कोणाचे खपवून घ्यायचे नसेल तर नुसता इयरफोन कानात घालून बसावे, लोकलच्या तिकिटात विमानप्रवासाचा आनंद मिळतो ! तसे उदारपणे आपला इयरफोन त्या मोबाइलखोराला तुम्ही तात्पुरता ऑफर सुद्धा करू शकता.
अर्थात “सांगताही येत नाही, सहनही होत नाही” अशा संभ्रमात पडू नका. खाली दिलेले काही उपाय गांधीवादी आहेत व आपापल्या वकुबा प्रमाणे करून बघायला हरकत नाही, अर्थात विपरीत परीणाम झाल्यास मी जबाबदार नाही !
तुम्ही जर खिडकीजवळ बसला असाल व तुमच्या बाजुला कोणाचा मोबाईल कोकलत असेल तर “बघु कोणते मॉडेल आहे” असे म्हणत त्याचा मोबाइल हातात घ्या, लगेच तो खिडकीबाहेर ठेवा, माझ्या अंगाला जरी हात लावलास तरी मोबाईल खिडकीबाहेर पडेल हे त्याला नम्रपणे सांगा व कुर्ल्याला(च) उतरून गाडी सुरू होताना बाहेरून मोबाइल ताब्यात घेण्याची नम्र विनंती करा. तुमचा मोबाइल जर हजार बाराशेचा असेल व समोरच्याचा जर भारी असेल तर हा उपाय लय भारी सिद्ध होतो !
“आयला कसली भारी गाणी आहेत हो तुमच्याकडे “ अशी साखरपेरणी करीत त्या मोबाइलखोराला लोकलच्या टफावर चढवा. लगेच नीलदंत तंत्राचा वापर करून ती गाणी मला पण हवीत असा हट्ट धरा. अर्थात गाणी आपसूकच बंद करून तो ती गाणी मोठ्या उत्साहाने तुम्हाला सेंड करू लागतो ! याने एकतर प्रवास तरी शांततेत संपतो वा त्याची बॅटरी तरी संपते ! सुंठीवाचून गेला की नाही खोकला ?!
“अरे ही गाणी डुप्लिकेट आहेत, बहुदा कोणा ऑर्केस्ट्रामधल्या कलाकाराच्या आवाजातली आहेत, तुला कोणीतरी xx बनविले” असे म्हणा किंवा “आवाज एवढा दणदणीत वाटत नाही, स्पीकर बिघडला की काय ? सेकंडचा साला हाच प्रोब्लेम आहे” हे शेरे सुद्धा असरदार शाबित होतात. कधी अंबानीचा बाप काढून “याच्या बापाचं स्वप्न खरेच साकार झाले, कोणीही आजकाल मोबाईल घेतो, अडाणी माणसाला कसे समजणार इयरफोन काय प्रकार असतो ते ?” अशी खंत व्यक्त करावी. न चालणारे पाच, दहा, चार वा आठ आण्याचे नाणे काढून मोबाइलखोराच्या हातावर ठेवल्यास त्या बिचार्याची अवस्था “जोर का झटका धीरे से लगे” अशी होते, अर्थात मधल्या काळात तुमचे स्टेशन मात्र यायला हवे !
समजा जर कोणी जुनी गाणी वाजवित असेल तर “काय लेका सैगलची / बाबा आदमके जमानेकी / रडकी गाणी ऐकतोस, जरा उडती गाणी लाव की” असा टोमणा मारावा किंवा vice-versa ! तसे टोमणे बर्याच प्रकारे मारता येतात पण मोबाईलखोरांचा बुद्ध्यांक बुद्धयाच कमी असतो हे ध्यानी घ्यावे. “आयला तुझा मोबाइल वाजतोय होय, मला वाटले कोणी भिकारीच गाणी गात भीक मागत आहे !” हे किंवा “घेतलास ना सेकंड हॅन्ड / चायनामेड ? थोडी पदरमोड केली असतीस तर branded मिळाला असता, त्याच्या बरोबर इयरफोन फूकट मिळतो” असे हळहळायचे. जर त्याने रफीची गाणी लावली असतील तर किशोरकुमार वाजवायची फर्माईश करायची, हे गाणी आहे का ? ते गाणे आहे का ? तुला माझ्याकडची गाणी देवू का ? अशी विचारणा सतत करून त्याचा गोंधळ उडवून देण्यात सुद्धा मजा येते. कधी तुझ्याकडे अजून कोणती आहेत बघू असे म्हणत त्याच्या मोबाइलचा ताबा आपल्याकडे घ्यायचा. हिन्दी गाणी लावली असतील तर मराठी वाजव असा आवाज दिल्यास मोबाइखोराची मोलती बंद होते असा सॉलिड अनुभव आहे !
अर्थात तुमच्याकडे डबा दणदणवून टाकणारा स्पीकर फोन असल्यास खूपच गमती जमती करता येतात. त्याने जे गाणे लावले असेल त्याच्या नेमक्या उलट मूडचे गाणे त्याच्यापेक्षा मोठ्या आवाजात लावल्यास काही काळ गोंधळ उडतो व पब्लिकच “दोनो भी अपना अपना स्पीकर बंद करो” असा निवाडा देते. मी एकदा असा प्रयोग केल्यावर मात्र भलताच रीझल्ट मिळाला होता. झाले असे की एकजण नवीन गाणे वाजवित होता. त्याला गप्प करण्यासाठी मी माझ्या मोबाइलचा स्पीकर ऑन करून “चढता सूरज धीरे धीरे” ही एवरग्रीन कव्वाली चालू केली. आवाज अगदी टीपेला पोचल्यावर पब्लिकचा माझ्या भोवती गराडाच पडला. तो सुद्धा आपला मोबाइल थंड करून कानात प्राण आणून कव्वाली ऐकू लागला. त्या कव्वालीच्या प्रत्येक कडव्याला मैफलीत मिळते तशी दाद मिळू लागली ! गाणे संपल्यावर “वन्स मोर”चा जल्लोष झाला. मला झक मारीत ते गाणे पुन्हा वाजवावे लागले. माहौल एकदम बदलून गेला, डब्यात एकदम पिन ड्रॉप सायलेन्स ! जो तो त्या गाण्यात अगदी तल्लीन झाला. पनवेल येईपर्यंत त्या गाण्याची आवर्तने चालू होती. पनवेल स्थानकात उतरल्यावर पुढची 10 मिनीटे – अर्थात बॅटरीचे शेवटचे टोक उरे पर्यंत मी लोकांना ते गाणे ब्ल्युटूथने पाठवित होतो !
हे लिहीताना उगाच डोक्यात भुंगा शिरला, म्हणजे “लोकांना खरेच ते गाणे आवडले होते की …………….?”
1 टिप्पणी:
हाहाहा.. आयडियाच्या (मोबाईलवाला आयडिया नव्हे ;) ) कल्पना झक्कास !!
शेवट तर भारीच :)
टिप्पणी पोस्ट करा