काल दिल्लीत एका तरूणाने केंद्रीय मंत्री व हेवीवेट नेते श्री. शरद पवार यांच्या थोबाडीत मारली. अर्थात पवारांना काही लागलेच नाही ! तो तरूण माथेफीरू होता एवढेच सांगून त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकला ! राजकारणी किती संवेदनाशून्य झाले आहेत त्यासाठी हे एक चांगले उदाहरण आहे ! तुम्ही हात जोडा, जोड्याने मारा वा तोंडात मारा, हम नही सुधरेंगे ! गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांना एका थपडीने काय होणार हो ? एकसे मेरा क्या होगा ? मिडीया नसता तर मुळात कोणी थोबाडीत मारलीच नाही असा खुलासा झाला असता ! त्या तरूणाने पवारांच्या कृषी-धोरणाचे कौतुक म्हणून गालगुच्चा घेतला असता असेही छापून आले असते ! असो !
पप्पु कलानीला पोलिस कोठडीत होणार्या मारहाणीने (की नुसत्या कल्पनेने ?) कळवळणारे तसेच दंगल पांगविताना पोलिसांच्या गोळीबारात मुस्लीमच कसे मरतात म्हणून मातम करणार्या पवारांनी खरेतर त्या तरूणाला सुद्धा समजून घ्यायला पाहिजे होते. अगदी दुसरा गाल पुढे करा असे मी म्हणणार नाही पण “बाबा का माझ्यावर हात उचललास ? काय दु:ख आहे तुझे ? इतके तरी विचारायची संवेदनाशीलता दाखवायला हवी होती. पवार मात्र त्या तरूणाला माथेफिरू ठरवून मोकळे झाले ! अशा प्रकारचा हल्ला कोणत्याही परिस्थीतीत, कोणाहीवर होणे 100 % निषेधार्ह पण अगदी 99.99% लोकांना हा प्रकार भलताच आवडला हे नक्की ! काल जाताना व आज येताना याच प्रकरणाची चर्चा लोकलमध्ये रंगली होती व सर्वांनाच पवारांचे थोबाड फोडले याचा आनंद झाला होता ! लोकांची प्रवृती आसुरी झाली आहे की राजकारणी माणसे लोकांच्या मनातुन पार उतरली आहेत ? संसदेवर हल्ला झाला तेव्हासुद्धा सगळे खासदार मारले गेले असते तर बरेच झाले असते अशा उघड प्रतिक्रीया व्यक्त होत होत्याच.
जे पेरले ते उगविले ! याच पवारांनी काही वर्षापुर्वी क्रिडा पत्रकार श्री. वि.वि.करमरकर यांच्यावर त्यांच्या अनुयायांनी केलेल्या हल्ल्याचे समर्थन केले होते. पुण्यातील बालेवाडी संकुलाच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात तेव्हा करमरकरांनी म.टा.त लेखमाला प्रसिद्ध केली होती, त्याचा हा राग होता. त्याही अलिकडे संभाजी ब्रिगेडच्या गुंडानी पुण्यातील भांडारकर संस्थेवर हल्ला करून तिची मोडतोड केली, अमूल्य ग्रंथसंपदेची होळी केली तेव्हाही त्या गुंडगिरीचे पवारांनी अप्रत्यक्ष समर्थनच केले होते ! गंमत म्हणजे तेलगी प्रकरणात छगन भुजबळ आकंठ रुतलेले असताना त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत होती. त्याच सुमारास भुजबळांची पत्रकार परिषद संपल्यावर एका पत्रकारावर हल्ला झाला व त्याचे निमित्त करून पवारांनी भुजबळांचा तडकाफडकी राजीनामा घेतला होता ! पवारांवर हल्ला झाल्यामुळे पवारांचे चेले चिडले आहेत पण या गोष्टींची आठवण त्यांना असेल का ?
1 % राजकारण व 99 % समाजकारण असे धोरण राबवून पवारांनी राजकारणात पाय रोवले. पंतप्रधान बनायची कुवत प्रमोद महाजनांपेक्षा त्यांच्यात नक्की जास्त होती. दुर्दैवाने सत्ता सुंदरीच्या मोहाने ते आंधळे झाले व त्यांच्या पतनाला कोणताही बंध उरला नाही. निवडणुका जिंकायच्या म्हणून त्यांनी भाई ठाकूर व कलानी सारखे गुंड निवडून आणले. पवार गॉडफादर झाले ! दिल्लीत पवारांचे मन कधी रमलेच नाही ! त्यांच्याच मर्जीने मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या सुधाकर नाईक यांनी जेव्हा ठाकूर - कलानी कंपनीच्या मुसक्या बांधल्या तेव्हा कलानीला पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे वळ पवारांच्या पाठीवर उमटले ! किती ही संवेदनाशीलता ! लगेच त्यांनी दिल्लीवरून कळवळून सांगावा धाडला की कलनीला मारू नका ! पुढे सुधाकर नाइकांनाच शह देण्यासाठी मुंबईतली दंगल त्यांनी भडकत ठेवली. कर्तव्य कठोर पोलिस अधिकारी बापट यांना गोळीबारात मुस्लिमच कसे मरतात असा सवाल करून एका रात्रीत घरी बसवले गेले, त्याही आधी दंगलीला आळा घालण्यास लष्कर पाठवायच्या निर्णायावर बराच वेळ घेतला होताच ! जळेना का मुंबई, मरेनात का लोक ? माझी सत्तेची पोळी भाजली म्हणजे झाले ! सेना-भाजपाचा प्रचार जोशी-महाजन करीत होते म्हणून सहिष्णूतेचा बुरखा पांघरणारे पवार प्रचार सभेत “जोशी महाजनांचे राज्य येवू देणार का ? असा उघड चिथावणीखोर जातिय प्रचार करीत होते ! भाजपामधले मुंढे, खडसे, तावडे तेव्हा त्यांना दिसत नव्हते ! स्वत: पवारांचा सध्याचा राष्ट्रवादी पक्ष किती राष्ट्रवादी आहे ? राष्ट्र सोडा , किती महाराष्ट्रवादी आहे ? मराठावादी, त्यातही 96 कुळ्यांचा पक्ष असेच राष्ट्रवादीचे सध्याचे स्वरूप आहे !
येनकेन प्रकारेण सत्तेत राहणे ही एकमेव महत्वाकांशा त्यांनी जोपासली ! त्यासाठी कपडे बदलावे तसे पक्ष व निष्ठा बदलल्या. अनेकांच्या पाठीत खंजीर खुपसला. मुस्लिम मतांसाठी सुंता फक्त करायची बाकी ठेवली. दलित मते हवीत म्हणून आठवल्यांना सत्तेचे गाजर दाखवून झुलवले व वापरून सोडून दिले. सोनिया गांधी इटालियन म्हणून त्यांची साथ सोडली तेव्हा मोठा राणा भीमदेवी थाट आणला होता पण मग सत्ता हवी म्हणून तेवढ्याच निलाजरेपणे हातावर घड्याळ बांधून मोकळे झाले. त्यांच्या मागच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत ना शेतकरी आनंदी झाला ना ग्राहक, दलालांचे मात्र फावले ! महागाई आभाळाला भिडली ! सामान्य माणसाचे पार पेकाट मोडले ! कडधान्यांच्या किमती कडाडल्या, सामान्यांच्या जगणे हराम झाले पण तोपर्यंत पवारांची कातडी पार गेंड्याची झालेली होती. कलानीला मारतात म्हणून कळवळणारे पवार , महागाईने भरडलेल्या जनतेला मात्र काही दिलास देत नव्हतेच उलट गरिबाला ज्वारी, बाजरी स्वस्तात कशाला विकता ? ती गाळा व त्याची दारू बनवा दारू , पैका मिळेल पैका असे सांगत होते. लोकांची क्रयशक्ती वाढली आहे, ते खा खा खात सुटले आहेत व म्हणून किमती वाढतात असे महागाईचे निलाजरे समर्थनच त्यांनी केले होते. वा रे जाणता राजा !
आगलाव्या पत्रकारांनी पवारांचे थोबाड फुटले म्हणून तुम्हाला काय वाटते असा प्रश्न अण्णांना केला त्यावर म्हणे अण्णांनी “एकच लगावली का ?” असे आधी विचारून मग सारवासारव केली अशी बातमी छापली आहे. पवारांनी सुद्धा त्यावर खोचक प्रतिक्रीया दिली आहे. अण्णा अनेक वर्षे समाजकारणात आहेत व राजकारण्यांना ते अगदी जवळून ओळखतात. राजकारण्यांबाबतीत ते संवेदनाशून्य बनणे अगदी स्वाभाविक आहे. असे जर अण्णा खरेच बोलले असतील तर त्यांना म्हणायचे असेल की एकाने काय यांचे थोबाड फुटणार आहे आणि जरी थोबाड फुटले तरी ते फुटलेच नाही असे सुजलेल्या गालाने ते सांगणारच आहेत. हे बनेल राजकारणी कशानेही सुधारणार नाहीत, अंतर्मुख तर कधी होणारच नाहीत ! कितीही थोबाडीत मारल्या तरी यांचे थोबाड काही फुटणार नाही !
७ टिप्पण्या:
अत्यंत मुद्देसूद लेखन
१००% सहमत. ह्या घटनेचं कोणालाच वाईट वाटलेलं नाही.
पण ठाकरे म्हणाले ' हा हल्ला महाराष्ट्र सहन करणार नाही'. म्हणजे त्यांना 'पवार म्हणजेच महाराष्ट्र' असं वाटतं का?
मग मुंबईवरचा हल्ला का सहन केलात? शेतकऱ्यांच्या आत्महत्या का सहन केल्यात?
जोशी, महाजन, बापट, करमरकर यांचाच तुम्हाला इतका कळवळा का?
शरद पवारांवर आजवर अनेक जणांनी वाचालपणे बरेच आरोप केले.किती जण ते पुरायाव्यानिशी सिद्ध करू शकले?
आणि अण्णांची वकिली तुम्ही का करताय? त्यांच्या so called गांधीगिरीचा बुरखा कालच्या विधानाने पुरता फाटला आहे.
एका थपडेवर एवढा गदारोळ समर्थक वा विरोधकानी करण्याचे कारण समजू शकत नाही.
बरोबरच आहे.. एक थप्पड खावून पवार सुधारणार थोडेच आहेत..
आज सर्वे मराठी माणसाचा अपमान असे भाष्य करत आहेत...
शरद पवार चा अभिमान वाटावा असे कोणतच सत्कृत्य त्याने केलेले नाही....
फक्त आपली संपत्ती जमवली आणि त्याचा मतदारसंघ बारामती चा विकास केला तेवढेच...
बाकी उभा महाराष्ट्र पवारांना दिसला नाही...
का फक्त स्वताचा आर्थिक विकास करण्यात गुंतले आहेत...
मी त्या तरुणाचे पूर्ण समर्थन करतो....
आणि तुमचा लेखसुद्धा खूप अप्रतिम आहे...
आणि अण्णा बोल ले ते पण बरोबच म्हणाले...एकाच मारली काय....
हीच ८०% मराठी माणसांची समजूत आहे
बरोबरच आहे.. एक थप्पड खावून पवार सुधारणार थोडेच आहेत..
आज सर्वे मराठी माणसाचा अपमान असे भाष्य करत आहेत...
शरद पवार चा अभिमान वाटावा असे कोणतच सत्कृत्य त्याने केलेले नाही....
फक्त आपली संपत्ती जमवली आणि त्याचा मतदारसंघ बारामती चा विकास केला तेवढेच...
बाकी उभा महाराष्ट्र पवारांना दिसला नाही...
का फक्त स्वताचा आर्थिक विकास करण्यात गुंतले आहेत...
मी त्या तरुणाचे पूर्ण समर्थन करतो....
आणि तुमचा लेखसुद्धा खूप अप्रतिम आहे...
आणि अण्णा बोल ले ते पण बरोबच म्हणाले...एकाच मारली काय....
हीच ८०% मराठी माणसांची समजूत आहे
स्वतःला "महात्मा" हि बिरूद लावून घ्यायचे आणि कुणाला चाबकाने फोडायची भाषा करायची तर कुणाला "एकच थप्पड का मारली का?..." असे विचारायचे.
एकीकडे सरकारची भूमिका दुट्टपीपणाची आहे म्हणायचे आणि स्वतः अशा कोलांट्याउड्या मारायच्या...
हा कुठला गांधीवाद?
... आणि एक विशिष्ट वर्ग शरद पवारांचा नेहमीच विरोध करत आला आहे.
हा विरोध त्यांचे आडनाव 'पवार' ऐवजी 'जोशी-महाजन' असता तर झाला असता का?
टिप्पणी पोस्ट करा