चमत्कार हा शब्दच माझ्या डोक्यात जातो. दगडातला देव मी केव्हाच टाकून दिला आहे. आजकालच्या काळात बोकाळलेल्या बुवा/बाबा बाजीला माझा तीव्र विरोध आहे ! समाजाला नागविणार्या बुवा/बाबांना तुरूंगात टाका ही माझी ठाम भूमिका आहे. पण याचा अर्थ मी देव मानत नाही असा नाही. देवळात मी जात नाही कारण देवाकडे काय मागायचे हाच मला प्रश्न पडतो. माझ्या व्यक्तिगत गरजा खूपच कमी आहेत. कोणापुढे हात पसरायची वेळ आजवर आली नाही ही त्या देवाची दयाच म्हणायची ! देवाचे सुद्धा माझ्यावाचून काही अडत नाही, तो त्याच्या जागी सुखी आहे मी माझ्या जागी ! बरे चालले आहे आमचे ! देव मला थेट दर्शन देइल असेही काही संभवत नाही, पण त्याची प्रचिती मात्र तो एखादवेळी देत असावा. मागच्याच आठवड्यात राजमाची ट्रेकला गेलो होतो, तेव्हा आलेला अनुभव जसाच्या तसा कथन करीत आहे.
लोणावळा ते उंदेवाडी अशी साधारण 20 कि.मीची पायपीट चालू होती. वाटेत एक नाला लागला. त्या नाल्याकाठी रस्ता दुरूस्तीचे काम करणारे कामगार विश्रांती घेत होते. नाल्याचे पाणी तोंडावर मारून थोडे ताजेतवाने झालो. फोटोसेशन चालू होतेच. तिकडेच एक कुत्रा निवांत बसलेला होता. मी त्याचाही एक फोटो काढला. मागचा ग्रूप आल्यावर आम्ही सगळे मार्गस्थ झालो. तो कुत्रा सुद्धा आमच्या बरोबर चालू लागला. मग लक्षात आले की तो फक्त माझ्याच मागे येत आहे. मी थांबलो की तो सुद्धा थांबत आहे ! मित्र गमतीने मला म्हणू लागले की तो त्याचा फोटो काढला म्हणून तुझ्यावर प्रसन्न झाला आहे ! एकाने त्याला बिस्किटे देवू केली ती सुद्धा त्याने घेतली नाहीत तेव्हा मात्र आमच्यात अनेक तर्क लढविले जावू लागले, कारण खायला दिल्यावर कुत्रा ते घेत नाही असा प्रसंग आधी कोणी बघितलाच नव्हता ! उंदेवाडीत आम्ही मुक्कामाच्या घरी आलो तिकडे सुद्धा तो कुत्रा बाहेर बसून राहिला. आश्चर्य म्हणजे गावातल्या एकाही कुत्र्याने त्याच्यावर ह्ल्लाबोल केला नाही !
थोडी विश्रांती घेवून आम्ही श्रीवर्धन बालेकिल्ल्याकडे कूच केले. हा कुत्रा परत आमच्या सोबत चालू लागला. गडाची दोन टोके आहेत. मी, माझा मुलगा प्रसाद व अजून एक सहकारी असे आम्ही तिघे पुढे होतो. किल्ल्यावर पोचल्यावर दोन वाटा लागल्या. एक वाट खालच्या टोकाकडे जात होती तर दूसरी वाट वरच्या मुख्य भागाकडे जात होती. तिकडे ध्वजस्तंभ सुद्धा उभारलेला आहे. आम्ही तिकडेच जायचे ठरवले व थोड्याच वेळात ते टोक गाठले. वरून बघितल्यावर कळले की बाकी सगळॆ खालच्या बुरजाकडे गेले आहेत. आम्ही वरून हाका मारून त्यांना मुख्य भागाकडे यायची वाट दाखविली. मग कळले की तिकडे एक भुमिगत भुयार आहे व ते बघण्यासारखे आहे तेव्हा परत जाताना ते बघायचे आम्ही ठरविले. सुर्यास्ताचा आनंद लूटताना वेळ कसा गेला कळलेच नाही व अंधार दाटू लागला. मित्रांची सूचना धूडकावून आम्ही त्या न बघितलेल्या टोकाकडे गेलो. याच वेळी परत तो कुत्रा आमच्या मागेपुढे घुटमळू लागला. भुयार बघेपर्यंत चांगलाच काळोख पडला. आमच्यातील एकाकडे बॅटरी होती , तिच्या प्रकाशात आम्ही खाली उतरायची वाट शोधू लागलो पण ती काही केल्या सापडेना. आम्ही तिघेच त्या काळोखात अडकून पडलो होतो. अचानक मला त्या कुत्र्याची आठवण झाली. माझ्या मित्राने बॅटरी सभोवती फिरवली तेव्हा तो कुत्रा एका ठीकाणी उभा असलेला दिसला. त्याच भागावर नीट प्रकाश टाकल्यावर तो खाली जाण्याचा वाटेवरच उभा होता हे लक्षात आले. जणू तो आम्हाला योग्य मार्गच दाखवित होता. आता मात्र आमचे कुतुहल जागे झाले. एकदा वाट कळल्यावर आम्ही मुद्दामच थांबू लागलो तेव्हा तो सुद्धा थांबू लागला. एकादा तर आम्ही मुद्दाम वेगळी वाट धरली तर हा पठ्ठ्या आमच्याबरोबर न येता योग्य मार्गावर थांबून राहिला !
काळोख वाढत चालला व कुत्र्याची परीक्षा बघताना शेवटच्या टप्प्यात आम्ही खरेच वाट चुकलो. अगदी भुलभुल्लयातच सापडलो. जणू एखाद्या चकव्यातच सापडलो ! गोल गोल भरकटून आम्ही परत त्याच जागी येवू लागलो. पुढे मुक्कामी पोचलेले मित्र आम्हाला बॅटरीचा प्रकाश दाखवित होते पण वाट मात्र आम्हाला काही केल्या सापडत नव्हती. बॅटरीच्या झोतात आम्ही वाट शोधत असतानाच अचानक तो कुत्रा एका ठीकाणी बसलेला दिसला. आधीच्या अनुभवाप्रमाणे आम्ही गुमान त्या वाटेने चालू लागलो व अचूक मुक्कामाला पोचलो. मी हा प्रसंग मित्रांना सांगितल्यावर ते सुद्धा विचारात पडले. अध्यात्माची आवड असलेल्या एका मित्राने मात्र “साक्षात दत्तगुरूंनीच कुत्रा पाठवून तुम्हाला वाट दाखविली” असे सांगितले. गंमत म्हणजे दूसर्या दिवशी आम्ही भल्या पहाटे मनरंजन गडावर गेलो तेव्हा मात्र तो आमच्या बरोबर अजिबात आला नाही. त्या दिवशी गडावरून दुपारी परत आल्यावर आम्ही त्याला झुणका-भाकर दिली ती मात्र त्याने म्हणता म्हणता फस्त केली !
हा अनुभव मला नक्कीच अंतर्मुख करणारा आहे ! कोणीतरी आपली काळजी घेत आहे ही जाणीव सुद्धा सुखावणारीच आहे !
३ टिप्पण्या:
khupach chaan aahe... it's really amezing...
janu tya kutrayla he mahitich hota ki pudhe kay honaar aahe te...
really good...
Nice article, AA
nice one
टिप्पणी पोस्ट करा