सोमवार, २३ नोव्हेंबर, २००९

गोरा भिकारी !

साधारण १९८५ मधली गोष्ट असेल. दादरला काही कामा निमित्त गेलो होतो. दादर पश्चिमेला फूलबाजार आहे, तिकडच्या रेल्वे पुलाखाली लोकांची गर्दी झाली होती. कुतुहुल म्हणून गर्दीचे कारण शोधायला गेलो व थक्कच झालो. एका गोरा, चेहर्यावरून तरी युरोपियन वाटणारा तरूण तिकडे उभा होता. केस विस्कटलेले, दाढीची खुंटे वाढलेली, टाय अस्ताव्यस्त, कोट उसवलेला, शर्ट अर्धवट खोचलेला, ढगाळ विजार व बूट विटलेले. चेहर्यावर अत्यंत विमनस्क भाव. गळ्यात त्याने वृत्तपत्राच्या पानावर स्केचपेनने खरडलेला मजकूर लटकवलेला होता तो फारच लक्षवेधक होता…

“I am British tourist. Some thugs robbed me here. I lost all my money, cards, contact details, passport and luggage. Please help me!”

John.

मुंबईतल्या माणसांना भिकार्याचे कसले अप्रूप असणार ? तशी भारताची बाहेरच्या जगातली ओळख भिकार्यांचा देश अशीच आहे. एरवी भिकार्यांना भीक न घालणारे बाबू लोक या गोर्या भिकार्याभोवती मात्र कोंडाळे करून उभे होते. कोणी त्या चोरांचा उद्धार करत होते, कोणी त्या चोराने आपली इमेज डागाळली असे म्हणत होते. त्याच्या पाटीचा अनेक भाषात अनुवाद करून विंग्रजी न समजणार्यांना लोकांच्या डोक्यात प्रकाश पाडला जात होता. ज्या ब्रिटीशांनी आपल्या देशावर तब्ब्लल १५० वर्षे राज्य केले, सोन्याचा धूर निघणारा हा देश नागवला, त्याच देशातल्या एकावर आपल्या देशात टूरीस्ट म्हणून आला असताना लुबाडला जाउन भीक मागण्याची वेळ याते याच्या डागण्या अनेकांना अस्वस्थ करत होत्या. मग या पापाचे प्रायश्चित म्हणून गोर्या भिकार्याला मदत करण्यासाठी धक्का-बुक्की होत होती. त्याने आपली हॅट उलटी करून धरली होती. त्या हॅट मधून नोटा शब्दश: खाली पडत होत्या एवढी ती भरली होती ! एरवी ’बेगरला’ आठ आण्याच्या वर भीक न देणारे या गोर्याला मात्र निदान १० ची नोट ते २० रूपये त्याचे सांत्वन करून देत होते ! कोणी स्वयंसेवक बनून नोटा नीट लावून त्याच्या कोटाच्या खिशात ठेवत होते. तोडक्या मोडक्या इंग्रजीत त्याची माफी सुद्धा मागितली जात होती. गोरा मात्र तोंडातून एक चकार शब्द काढत नव्हता ! खाली घातलेली मान त्याने काही वर उचलली नव्हती ! भिकारी मग तो गोरा असो की काळा मी काही त्याला भीक कधीच घालत नाही. जरा वेळ हा तमाशा बघून मी घरची वाट धरली. पण एकंदरीत प्रकार जरा संशयास्पदच वाटत होता. जर खरेच तो ब्रिटीश नागरीक असता तर पोलिसांच्या मदतीने तो त्यांच्या देशाच्या वकिलातीत का नाही गेला ? हा प्रश्न मला पुढचे अनेक दिवस अस्वस्थ करत होता. गोरी चामडी बघितली की भुरळायची आपल्या लोकांची मानसिकता स्वातंत्र्यानंतरही बदलली नाही याची चीड होतीच.

अगदी काही महीन्यापुर्वीचीच गोष्ट. संध्याकाळी सीएसटी स्थानकाच्या वाटेवर लोकांचा घोळका जमला होता. नक्की तोच होता तो .. जॉन, गळ्यात तशीच पाटी अडकवून , त्याच स्टायलने तो उभा होता. सगळा प्रसंग अगदी जसाच्या तसा ! थोडा फरक होता, नोटा मात्र २०, ५०, १०० च्या होत्या, मधल्या काळात महागाई किती वाढली आहे ना ! अर्थात तेव्हा माझ्याकडून झालेली चूक पुन्हा होणार नव्हती. एका बाबतीत त्याला मानायलाच हवे. स्वत:ला काय मेंटेन केले होते त्याने ! त्याच्या सडसडीत अंगकाठीत काहीच फ़रक पडला नव्हता. गर्दीतुन वाट काढत मी जॉनच्या समोर उभा ठाकलो व त्याला “Hey John, so from last 20 years you are collecting money in India ! Let’s go to British Consulate, they will certainly help you if you are British!” हे ऐकल्यावर जॉनच्या चेहर्यावरचे भाव भरभर बदलायला लागले. आजूबाजच्या लोकांना सुद्धा हा काय प्रकार आहे ? असा प्रश्न पडला. मी त्यांना हा लोकांना फसविणारा भामटा आहे, त्याच्या गोर्या चमडीवर जाउ नका असे बजावले. लोक पांगले. मी जॉनचा हात धरला व त्याला टॅक्सीत बसवू लागताच तो गयावया करू लागला. त्याचा विदेशी मुखवटा पार गळून पडला. त्याला पोलिसात नेउन काही फ़रक पडला नसता. त्यांना हप्ते आधीच पोचले असणार, माझ्यासमोर त्यांनी थोडे नाटक करून त्याला सोडून दिलेच असते. मला त्याच्याबद्दल बरेच जाणून घ्यायचे होते. ही आयडीया त्याला सूचली कशी याचे कुतूहल होतेच ! मी त्याला एका टॅक्सीत कोंबले व गेट वे गाठले. पोलिसात देत नाही पण या भागात परत फ़िरकायचे नाही व तुझी सगळी स्टोरी, अगदी खरी, मला सांगावी लागेल असे म्हटल्यावर तो बोलता झाला.

तो चक्क मराठी होता. बी.कॉम झाला होता. सगळ्या अंगावर कोड आल्याने, की आणखीन कोणत्या रोगाने, त्याच्या त्वचेचा रंग लालसर, गुलबट झाला होता. केस त्याने डाय करून घेतले होते. त्याचे मित्र त्याला ब्रिट म्हणूनच चिडवत. नोकरी मिळायची शक्यता कमीच होती. भीक मागायची लाज वाटत होती व मागितल्यास देणार कोण हा प्रश्न होताच ! बेकार म्हणून भटकत असताना अनेक भारतीय गोरा साहेब समजून आपल्या मागे पडतात हे त्याच्या लक्षात आले. या मानसिकतेचा फायदा घ्यायचे त्याने ठरवले. त्याची आयडीया भलचीच क्लिक झाली ! अगदी सुपर-डुपर हीट ! अर्थात तो रोज भीक मागत नव्हताच. एकदा एका एरीयात भीक मागितली की त्या भागात तो सहसा परत जात नव्हता. देशातल्या बहुतेक शहरात या ’निमित्ताने’ तो पोचलेला होता. काही पोलिस ठाणी त्याने बांधून ठेवली होती. भीक मागताना एक शब्दही तोंडातुन तो बाहेर पडू देत नव्हता. इंग्रजी त्याचे तोडके-मोडकेच होते, तोंड उघडले असते तर त्याचे बिंग फूटलेच असते ! सर्वात मुख्य म्हणजे त्याची कमाई ! किती असावी ? काही अंदाज ? दिवसाला, काही तासात तब्बल १०,००० ते १५,००० रूपये ! एखादा नामांकित डॉक्टर सुद्धा एवढे कमवत नसेल ! अर्थात महीन्यातले १० दिवसच तो काम करायचा ! या पैशाचे तो करतो तरी काय ? बहुतेक मोठ्या शहरात त्याचे फ़्लॅट आहेत. कोठेही जाताना तो सगळ्यात वरच्या क्लासनेच प्रवास करतो. त्याचा स्टे नेहमी पंचतारांकितच असायचा. लग्न मात्र केलेले नाही !

माझी जिज्ञासा शमल्याने मला आता घरची वाट धरावी लागणार होती. मी निघालो तेव्हा तो एवढेच म्हणाला की तुम्हाला जो प्रश्न पडला, वकिलातीत जाण्याचा, त्याचा मात्र विचार मी प्लान करताना केला नव्हता. आश्चर्य म्हणजे एवढा लॉजिकल प्रश्न एवढ्या वर्षात कोणालाच पडला नव्हता, निदान त्याला तरी तसे कोणी विचारले नव्हते !

सोमवार, ९ नोव्हेंबर, २००९

मृत्यूपत्र कसे करावे ?

या जगात आपण नागडे येतो व नागडेच जाणार आहोत. ( खाली हाथ आये है हम, खाली हाथ जाना है !) या मध्यल्या काळात जे काही डबोले आपण गाठीला बांधणार आहोत त्यातले काही म्हणजे काहीही तुम्हाला सोबत नेता येणार नाही. अर्थातच आपल्या आप्तांना / जवळच्यांना ते मिळावे अशी तुमची इच्छा असणारच. पण नुसती इच्छा असून चालत नाही. त्या करीता तसे मृत्यूपत्र बनवणे फार फार गरजेचे आहे. अनेकांना नामनिर्देशन करणे व वारस नेमणे यातला फरक कळत नाही. नामनिर्देशित व्यक्तीला मृत व्यक्तीची संपत्ति एक विश्वस्त म्हणून मिळते , तो तिचा मालक बनू शकत नाही. मृत्यूपत्र नसेल तर मृत व्यक्तीची संपत्ति वारसांना मिळण्यात असाधारण विलंब होतो, मनस्ताप भोगावा लागतो, पैसा सुद्धा अमाप खर्च होतो, फ़सवणुक होण्याची भीती असतेच. मृत्यूपत्र केले असेल तर हे सगळॆ विनासायास होते तसेच मालकीहक्क बदलताना कोणतेही अतिरीक्त शूल्क द्यावे लागत नाही.

साधारण पणे वयाची चाळीशी पार केलेल्या माणसाने मृत्यूपत्र करून ठेवलेच पाहिजे. मृत्यूपत्र बनवायला तुम्हाला एका दमडीचाही खर्च येत नाही. मृत्यूपत्र नसल्याने वारसांची कशी फ़रफ़ट होते व हितशत्रू लोक त्यांना कसे अडचणीत आणतात, वकिल कसे लूटतात याचे अनेक किस्से मला माहीत आहेत. मी गेली १० वर्षे हा विषय सातत्याने मांडत आहे. अनेकजण मला सांगतात की मग तुम्ही मृत्यूपत्राचा मसूदाच का देत नाही ? काल योगायोगाने, निवृत्तांच्या एका सभेला गेलो असता, त्या संस्थेच्या वार्षिक अहवालात मृत्यूपत्राच नमूनाच मला मिळाला. त्याचा मूळ इंग्रजी मसूदा जसाच्या तसा देत आहे. त्याचा जरून फ़ायदा करून आपल्या पश्चात आपल्या संपत्तिचा उपभोग आपल्या वारसांना निश्चिंतपणे घेता येईल अशी व्यवस्था कराच !

मृत्यूपत्र तयार करण्याबाबत अनेक गैरसमज आहेत, ते दूर करायचा हा एक प्रयत्न. मृत्यूपत्र बनवताना या बाबी जरूर लक्षात घ्या;
१) मृत्यूपत्र साध्या कोर्या कागदावर सुद्धा करता येते, त्यासाठी स्टॅम्पपेपर, कोर्ट फ़ी स्टॅम्प लावलेला पेपर अशा कशाचीही गरज नाही.
२) मृत्यूपत्र नोटरी कडून नोंदवून घेण्याची व न्यायालयात नोंदवायची कोणतीही सक्ती नाही, अर्थात हे केलेत तर चांगलेच आहे.
३) मृत्यूपत्रावर ते करणार्याची व दोन साक्षीदारांच्या सहीची गरज असते. त्यातला निदान एक साक्षीदार डॉक्टर असेल तर उत्तम. साक्षीदार आपल्यापेक्षा तरूण असणे केव्हाही चांगले व ते आपल्या जवळपास राहणारे, परीवाराला चांगले माहीत असलेले असावे. साक्षीदारांचे पुर्ण नाव व पत्ता त्यात असावा.
४) मृत्यूपत्राच्या अंमलबजावणीसाठी (जास्त करून वारस अज्ञान असेल तेव्हा ) विश्वस्ताची नियुक्ती करावी. त्याचे नाव, पत्ता, मानधन याचा स्पष्ट उल्लेख केल्यास चांगले. वारस व विश्वस्त एकच असू शकत नाहीत.
५) मृत्यूपत्रात आपल्या सर्व स्व-कष्टार्जित चल-अचल संपत्तिचा सविस्तर उल्लेख असावा, कारण अशी संपत्तिच तुम्ही आपल्या वारसांना देऊ शकता.
६) कोणात्याही वेळी मृत्यूपत्र रद्द करता येते, त्यात बदल करता येतो, अधिक माहीती समाविष्ट करता येते, पण बदल करण्यापेक्षा पहीले फ़ाडून टाकून नवे कारणेच जास्त हिताचे आहे.
७) अधिकची खबरदारी तुम्ही देशाच्या कोणात्याही भागात तुमच्या मृत्यूपत्राची नोंद करू शकता.
८) मृत्यूपत्राचे कागद त्याची अंमलबजावणी करणारे व वारस यांना माहीती आहे अशा ठीकाणीच सीलबंद करून ठेवावे.


“WILL SAMPLE”

1) This is the last will of myself Shri/Smt ---------------------------------------, son/daughter/wife of Shri/Smt ----------------------------------------------, aged ------- years, resident of ------------------------------------ (Write full address), made on this --------(Date, Month, Year in words ).
2) I hereby revoke all my earlier WILLs and codicils made by me.
3) I hereby execute this last WILL and testament of mine voluntarily and without any compulsion or pressure from any source or person and in my sound health and good state of mind.
4) I appoint my wife and my eldest son/daughter/ ------ to be the executors and trustees of this WILL. (Executors and Trustees cannot be the same as beneficiary)
5) I own the following movable and immovable properties which are all my self acquired properties, built or acquired out of my own earnings and incomes without any assistance of any ancestral estate and I have therefore absolute power of disposal of the same and they are detailed below.
(Here give full description of your own land, houses, areas, their location, plot numbers, village/town/city etc,. All fixed deposits, Bank accounts, Bonds, National Saving Certificates, Equity shares, Debentures, Deposits in PPF, Insurance policies, etc. which are all on your name.)
6) I hereby fully and absolutely bequeath all my above said movable and immovable properties to my ……………. (Wife/son/daughter/or any one of your choice pther than relatives), Shri/Smt ------------------, son / daughter of Shri/ Smt --------------------.
7) I also declare that whatever nominations have been made by me shall all form part of estate and shall be dealt with accordingly and given to my heirs stated above. In witness thereof, I the said Shri / Smt ---------------- have put my signature on each sheet of this WILL, contained in this sheet and the preceding (1/2/3/4 sheets of paper ), on the day and the year first above written, viz. the …………….. day of ----.


Date: Signature of Testator.

Signed by the above name Testator in our presence at the same time and each of us has in the presence of the Testator, signed our name hereafter as the attesting witnesses.

Name/Address/Signature of first witness

Name/Address/Signature of second witness

रविवार, १ नोव्हेंबर, २००९

री-युनियन – असेही एक माजी विद्यार्थी संमेलन !

आठवीपर्यंत मी आगाशी,विरार येथील काशिदास घेलाभाई हायस्कूल मध्ये होतो. मग वडीलांना कार्यालयीन निवासस्थान मिळाल्यावर आम्ही सगळे वडाळ्याला शिफ़्ट झालो व नववी, दहावी मी वडाळ्याच्या ज्ञानेश्वर विद्यालयातुन केले. मैत्रीचे बंध ज्या वयात घट्ट होत असतात त्याच वयात शाळा बदलल्याने नव्या शाळेतील मित्रांशी माझी फ़ारशी नाळ जुळली नाही. त्यात कॉलनीतले मित्र म्हणजे अळवावरचे पाणी. वडील निवृत्त झाले किंवा त्यांची स्वत:ची जागा झाली की त्यांचा संपर्क कायमचा तुटायचा. शाळा सोबती म्हटले की म्हणूनच मला आगाशीच्या शाळेतलेच मित्र आठवतात. आगाशीतले बहुतेक मित्र तिकडले स्थानिकच होते तेव्हा आगाशी सोडून ते कोठे जायचा प्रश्नच नव्हता. नोकरी लागल्यावर मला फ़ार वाटायचे की एकदा आपल्या सर्व शाळा सोबत्यांना भेटायचे व त्यासाठी स्वत:च पुढाकार घ्यायचा. पण अनेक कारणांनी ते शक्य झाले नाही. पेपरात अधे-मधे इतर शाळांच्या री-युनियनच्या बातम्या वाचून मला गहीवर यायचा. तशा बातम्या मी अजूनही अगदी बारकाईने वाचतो. वडाळ्याच्या शाळेची ऑर्कुटवर कम्युनिटी आहे पण माझ्या १९८२ च्या बॅचमधला मी एकमेव सभासद आहे. बाकी सर्व सभासद थेट वाय२के मधले !

री-युनियनच्या ध्यासाने एका रविवारी अगदीच कासावीस झालो असताना मोबाईल वाजला. पलिकडून ’एकनाथ मराठे ना ?’ अशी विचारणा झाली व ’मी सुनील चुरी बोलतोय’ अशी ओळख दिली गेली आणि क्षणात मनाने आगाशीच्या वर्गात पोचलो ! सुनील माझा वर्गमित्र. त्याने चक्क आम्हा शाळासोबत्यांचे संमेलन आयोजित केले होते. त्यासाठी तो गेली काही वर्षे खटपट करत होता. माझा पत्ता त्याला योगायोगानेच माझ्या विरारला असलेल्या भावाकडून मिळाला व ४० पैकी ४० विद्यार्थी संपर्कात आल्यावर त्याने प्लान पक्का केला होता ! नालासोपार्याला एका रीसॉर्ट वर रात्री आम्ही सगळे एकत्र येणार होतो. ३०० रूपये शूल्क आल्यावर जमा करायचे होते. मला आता रात्रंदिवस ते संमेलन कसे असेल याचीच दृष्ये दिसत असत. कोण-कोण शिक्षक येणार असतील, आपल्याला ते ओळखतील का ? ओळखल्यावर ते आपल्याला खास ठेवलेल्या नावाने हाक मारतील का ? तसाच पाठीत धपाटा घालतील का ? त्यांना शाल व श्रीफ़ळ दिल्यावर त्यांच्या डोळ्याच्या कडा कशा पाणावतील याची कल्पना करताना माझेच डोळे पाणावायचे ! आपल्या बॅचतर्फ़े दहावीला शाळेतुन पहीला येणार्याला बक्षिस द्यायची माझी योजना मांडली की कसा टाळ्यांचा कडकडाट होईल या कल्पनेने सुद्धा मी मोहरून जायचो ! मी कामावर जो भेटेल त्याला आम्ही माजी विद्यार्थी कसे भेटणार याचे रसभरीत वर्णन करत होतो. त्यांना सुद्धा आश्चर्य, कौतुक वाटत होते. तब्बल २८ वर्षानी हा योग येणार होता.

कामावरून थेट मी विरार गाठले. आधी भावाच्या घरी गेलो. त्याला ते रिसॉर्ट माहीत होते तरी ठरल्याप्रमाणे नवापुरच्या तीठ्यावरच त्याला मी सोडायला सांगितले. वेळेआधीच मी तिकडे दाखल झालो व सुनील चुरीला मोबाईलवरून मी आल्याचे उत्साहात सांगितले. तो ही काही मिनिटातच बाइकवरून तिकडे हजर झाला. अर्थात इकडे-तिकडे बघत असल्यामुळेच मी त्याला ओळखले नाहीतर एरवी त्याने मला व मी त्याला ओळखणे कठीणच होते. तो खूपच जाड झाला होता, बाकी चेहर्यात फ़ारसा फ़रक पडला नव्हता. पुढच्या वीस-एक मिनिटात आम्ही दहाजण तिकडे जमलो, बाकीचे परस्परच रीसॉर्टला येणार होते ! मला ओळखयला त्यांना फ़ार वेळ लागला नाही पण मला दरवेळी डोक्याला भलताच ताण द्यावा लागत होता. आम्ही सर्व रीसॉर्टला आलो. बर्याच खुर्च्या हिरवळीवर मांडून ठेवलेल्या होत्या. तिकडे परस्पर आलेल्यांची ओळखपरेड सुद्धा चांगलीच रंगली. बाकि सर्व घरे जवळच असल्याने परस्परांना भेटत असणार, मी मात्र तब्बल २८ वर्षानी त्यांना दिसत असल्याने माझ्या भोवती काही काळ कोंडाळे जमले होते. शाळेत असताना दांडगोबा असलेले आता भलतेच मवाळ झाले होते तर तेव्हा शामळू असलेले अंगापिंडाने चांगलेच भरले होते. कोणाचा केशसंभार उतरणीला लागला होता, कोणाला विगचा आश्रय घ्यावा लागला होता तर कोणाला कलपाचा ! कोणाला टक्क्ल पडले होते, कोणी भरपूर मिशा वाढवल्या होत्या तर कोणी दाढी दीक्षितसुद्धा झाले होते.माझी शाळा सोडल्यानंतरची वाटचाल मी त्यांना कथन केली. सगळ्या मित्रांचे तसे बरेच चालले होते. कोणाची भात गिरण, केळ्याची बाग, फ़ुलबागा असल्याने शिक्षण त्यांनी फ़ारसे सिरीयसली घेतले नव्हते व आपल्या वडीलोपार्जीत व्यवसायात ते छान रूळले होते. काहींनी मात्र डीग्री, डिप्लोमा करून नोकरी, छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले होते. सुनील चुरी स्वत: इलाक्यातला लघुकारखानदार म्हणून फ़ेमस झाला होता. आगाशी सोडलेले मी व विनय ताटके असे दोघेच होतो. विनय माझ्या नेहमीच्या संपर्कातला होता.

इतक्यात एका गाडीतुन विदेशी दारूचे खोके व शीतपेयांचे क्रेट उतरवले गेले. आधी मला वाटले रीसॉर्टवाल्याने मागवले असतील पण ते सर्व आमच्याच मंडळींनी मागवले होते. दारू थंड ठेवण्याचा इंतजाम सुद्धा अगदी चोख होता. मद्यपान कोणी केले तर मला त्याचे वावडे अजिबात नाही पण शिक्षकांसमोर तरी असले प्रकार नको असे वाटून मी सुनील चुरीला शिक्षकांचा सत्कार आधी हो‍उन जाउदे, मग हे बाहेर आणा असे सुचवले तेव्हा तो उडालाच. कोण शिक्षक येणार आहेत ? त्यांचे काय काम इथे ? असे मला त्याने उलटेच विचारले ! अरे मग आपण जमलो कशासाठी ? या प्रश्नावर त्याने ’खाना पिना और मजा करना’ ही त्रिसूत्री सांगितली ! या धक्क्यातुन सावरायला मला बराच वेळ लागला. मी सावरेपर्यंत मद्यपींची मैफ़ल सुरू सुद्धा झाली होती ! माझ्यापुढे सुद्धा चषक केला गेला व मी घेत नाही असे सांगताच एकच गदारोळ उडाला ! बीपीटीत कामाला आणि दारू घेत नाही ? लगेच एकाने मला बीपीटी म्हणजे बेवडा पिउन टाइट असे सुद्धा ऐकवले. तु पित नसलास तरी पुढच्या पार्टीला दारूची सोय तुच करायचीस असाही लाडीक आग्रह झाला.

मी शीतपेय एका ग्लासात भरून सोबत थोडे खारे दाणे घेउन जरा बाजुलाच बसलो. आता इथून सटकणे सुद्धा शक्य नव्हते. तेवढ्यात विनय ताटके आला. तो सुद्धा माझ्याच पंथातला असल्याने शीतपेय घेत घेत एका कोपर्यात आमच्या गप्पा रंगल्या. आम्हाला शिकवणार्या शिक्षकांची सद्यस्थिती मला जाणून घ्यायची होती. इंग्रजी शिकवणार्या बाई अर्धांगवायुने घरीच पडून होत्या, सुतारकाम शिकवणारे चिखलकरसर दारूच्या पार आहारी गेले होते, गणित शिकवणारे चुरीसर अजूनही उदरनिर्वाहासाठी क्लास घेत होते. एनसीसीचे सर सुद्धा आजारपणाने अंथरूणाला खिळलेले होते. कालायतस्मै नम: ! माजी विद्यार्थी संघ नावाला उरला होता पण ८० च्या बॅचची मुले मात्र नियमित भेटतात, शिक्षकांचा आदरसत्कार करतात, कोणी त्यांना आर्थिक , वैद्यकीय मदत सुद्धा करते हे ऐकून मात्र खूप बरे वाटले. केसरी पाटील टूर्सचा संचालक (बहुदा) योगेश पाटील त्याच बॅचचा असल्याने सगळी आर्थिक बाजु तो सांभाळत होता. शेवटी विनय म्हणाला आपली बॅचपण जमते पण नुसती पिण्यासाठी, या वेळी तु येणार असे कळले म्हणून मी आलो, एरवी मी इथे फ़िरकलोही नसतो. पिउन झाल्यावर जेवणाचा का‍र्यक्रम होता पण मेनु सगळा मांसाहारी ! आम्ही दोघे दारू पित नाहीच वर शाकाहारी आहोत हे कळल्यावर परत आमचा प्रेमळ उद्धार झालाच ! रात्री बारा वाजता बाहेर तरी काय मिळणार ? शेवटी त्या रीसॉर्टच्या मालकाने आम्हाला स्वत:च्या घरी नेउन आमटी-भात करून वाढला ! सगळे जेवत असताना मी याच्या पुढे भेटू तेव्हा आपल्या शिक्षकांचा सत्कार करू व आपला एक माजी विद्यार्थी संघ स्थापून गुणवंत मुलांना काही बक्षिस ठेउ असे सुचवताच एकच कल्ला झाला. जो तो आपला आवाज टीपेला लावून सांगू लागला, कशाला ? काय फ़ूकट शिकलो आपण ? त्यांनी काय पगार घेतला नव्हता ? मग कोणाला बेवडा, कोणाला मारकुटा, कोणाला सर्कीट अशी शेलकी विशेषणे देत गुरूजनांचा शब्द-गौरव चालु होताच मी व विनयने परत कोपरा गाठला. सुनील चुरीने मग एक कागद फ़िरवला, सगळ्यांची नावे, मोबाईल नंबर, पत्ते, इमेल तो नोंदवून त्याच्या कॉप्या तो सगळ्यांना पाठवणार होता. त्याने मग ५०० रूपये वर्गणी मागताच मी उडालो. अरे ३०० ठरले होते ना ? या वर जरा बजेट वाढले म्हणून ५०० काढायला लागत आहेत असा खुलासा तयार होताच !

५०० रूपयात मला धड जेवायला सुद्धा मिळाले नव्हते व शाळेत असताना ज्यांना चहासुद्धा माहीत नसेल त्या सोबत्यांनी दारूचे खोके रीचवले होते व मांसाहार हादडला होता. पैशाचे काही दु:ख नाही हो, इतक्या लांबून, इतक्या वर्षानी मी ज्या ओढीने तिकडे आलो होतो, ज्याची कल्पना केली होती त्यातले प्रत्यक्षात काही म्हणजे काहीही उरतले नव्हते. विमनस्क अवस्थेत घर गाठले, चेहरा बघुनच बायकोला काय झाले असेल त्याचा अंदाज आला असावा. “काय झाले ?” असे एका शब्दानेही तिने मला विचारले नाही ! ऑर्कुटचे खाते उघडून बसलो. वडाळ्याच्या शाळेची कम्युनिटी ज्याने काढली होते त्याचा स्क्रॅप आला होता, “We are pleased to announce re-union of our schoolmates …” चला, निराश व्हायचे काही कारण नाही, निदान यावेळी तरी …. !