गुरुवार, ५ फेब्रुवारी, २००९

क्रीकेटने घेतली गोलंदाजांचीच विकेट !

क्रीकेट वा मराठमोळे नाव चेंडूफ़ळी , निदान नावात तरी गोलंदाजी व फ़लंदाजी या त्याच्या दोन्ही अंगात समानांतर राखून आहे. अकरा खेळांडूच्या संघात ५ फ़लंदाज व ५ गोलंदाज, एक यष्टीरक्षक एके यष्टीरक्षक. बराबर का हिसाब ! फ़लंदाजांनी फ़लंदाजी करावी, गोलंदाजांनी गोलंदाजी, ५ विकेट पडल्या की डाव आटोपल्यातच जमा असायचा ! आता जरा मैदानावर उतरूया ! फ़लंदाजी करणारा फ़लंदाज आणि त्याची विकेट घ्यायला टपलेले ११ जण (तसा कवा कवा १ पंच सुद्धा !). लाल-चूट्टूक चेंडू घेउन दाण दाण धावत येणारे , आग्यावेताळ, ताडमाड वाढलेले गोलंदाज, भोवताली टोमणे मारून हैराण करणारे क्षेत्ररक्षक ! ताशी १०० मैलाच्या वेगाने अंगावर सोडलेले चेंडू, फ़लंदाजांच्या बरगड्याचा वेध घेणारे. कानशीलाला वारा घालून चेंडू विकेटकीपरच्या हातात विसावतो आहे . चेंडू फ़लंदाजाच्या पायावर आपटायची खोटी, तारस्वरात ओरडून , अर्वाच्य शिव्या देत अंगावर धावून येणारे अकरा दैत्य. फ़लंदाजाच्या बॅटची कड चेंडूने कड घेताच त्याला झेलायला सज्ज असलेले चित्त्यासारखे क्षेत्ररक्षक ! अशा प्रतिकुल वातावरणात धीरोदात्तपणे उभा असलेला वामनमुर्ती फ़लंदाज, कधी ब्रॅडमन, कधी गावस्कर, गोंडस-गोजिरवाणा गोवर, कधी गुंडाप्पा तर कधी तेंडल्या. या स्थितीत पब्लीकची फ़ुल सहानुभूति फ़लंदाजाला न मिळती तरच नवल ! तोफ़ेचा गोळा सोडल्यासारखी गोलंदाजी जेव्हा हे वामनमुर्ती फ़ोडून काढू लागले तेव्हा अर्थातच पब्लीक जाम खुष व्हायला लागली. त्यात आली बॉडीलाइनची भानगड ! झाले, पब्लीकला गोलंदाजांबद्दल वाटणारे ममत्व संपलेच. प्रेक्षक मैदानात येउ लागला तोच चौकार, षटकारांची आतषबाजी बघण्यासाठी. क्रीकेट हा खेळ अधिकाधिक फ़लंदाज धार्जिणा होउ लागला. कसोटी क्रीकेटची लोकप्रियता उतरणीला लागल्यावर आले मर्यादीत षटकांचे , झटपट क्रीकेटचे युग ! त्यातही आधी साठ षटकांचे असणारे सामने मग पन्नास व आता तर २० षटकांएवढे मर्यादीत झाले. पाच दिवसाच्या कसोटीत आधी दिवसाला २५० धावा पण खूप वाटायच्या आता त्या किमान ४०० झाल्या तर पब्लीकला पैसा वसूल झाला असे वाटते. ६० षटकांच्या स्पर्धेत जास्तीत जास्त धाव नोंदल्या गेल्या होत्या २८०, पण पन्नास षटकात एक संघ ४०० प्लस धावांचे आव्हान देतो व दूसरा त्याचा यशस्वी पाठलागही करतो असाही इतिहास रचला गेला आणि इथेच गोलंदाजांचे खच्चीकरण करण्याची बराच काळ चाललेली प्रक्रीया पूर्ण झाली ! आधी फ़लंदाज गोलंदाजांपुढे गुढगे टेकायचे, गांगुली सारखे भागुबाई तर पळायचे, आता मात्र फ़लंदाज शिरजोर झाले आहेत व गोलंदाज दाती तृण धरून शरण आले आहेत ! तळाचा फ़लंदाज जेव्हा दांडपट्टा फ़िरवुन धावा उकळतो ( खंडणी उकळणे असाच शब्द प्रयोग आहे नाही का ?) तेव्हा ही खेळपट्टी दुभंगुन मला पोटात घेइल तर बरे असेच त्यांना वाटत असणार ! जितक्या जास्त धावा तितकी विजयाची जास्त संधी हे गणित पक्के झाले व मग ५+५+१ अशी संघाची रचना ७+४ तर कधी ८+३ अशी झाली ! यष्टीरक्षक-फ़लंदाज व अष्टपैलू फ़लंदाज कम गोलंदाज अशा हायब्रीड जाती जन्माला आल्या. अर्थात हे सगळॆ एका रात्रीत नक्कीच घडले नाही. क्रीकेटचे धुरीण, जे बहुतेक माजी फ़लंदाजच होते, उदा. गावस्कर, बॉर्डर, चॅपेल बंधु, बॉयकॉट ,त्यांनी गोलंदाजांची कबर खणण्यास सुरवात केली. सगळयात आधी, फ़लंदाजाच्या काळजाचे पाणी करणारा लाल भडक गोळा पांढरा हो़उन जणू फ़लंदाजांना शरण गेला ! त्याची हातबांधणीची शिवण, मशीनवर बांधली जाउ लागली व धारदार इनस्विंगर व आ़उटस्विंगर, झपकन आत येणारे कटर इतिहासजमा झाले. डे-नाइटच्या जमान्यात, दूसरी गोलंदाजी करताना दवामुळे चेंडूवर ग्रीपसुद्धा घेता येत नाही. गोलंदाजाला क्रीजच्या मर्यादेत काटेकोरपणे जखडण्यात आले, जरा मर्यादा ओलांडली की नो किंवा वाइड. लेग स्टंपला चाटून जरी बॉल गेला तरी तो ठरणार स्वैर ! नो बॉलवर चौका , छक्का मारल्यास आता तर पाच किंवा सात धावा मिळतात, वर फ़्री हिट सुद्धा बहाल केली जाते, हान तिच्या मायला ! जादा अपील करायचे नाय, नाहीतर दंड किंवा सक्तीची विश्रांती ! बीमर टाकायचाच नाय ,बंपर एकच टाकायचा, तो बी खांद्याच्या वरून गेला तर 'नो' ! मैदानाची लांबी अगदी ६० यार्ड एवढी कमी ठेवता येते, पडूदे चौकार , षटकारांचा पा़उस ! मैदानाचा आकार सुद्धा षटकोनी वा पंचकोनी चालू लागला. दहा, वा पाच षटके टाकून झाली की त्या गोलंदाजाने पुन्हा हातात बॉल घ्यायचा नाही, फ़लंदाज मात्र अगदी सलामीला येउन शेवटपर्यंत नाबाद राहीला तर त्याचे कोण कौतुक ! संशयाचा फ़ायदा द्यायचा झाला तरी तो सुद्धा फ़लंदाजालाच द्यायचा. चेंडू बॅटला लागुन पॅडवर आदळला तर पायचीत नाही पण जर तो थेट पायालाच लागून गेला तर मात्र लेगबाय ! गोलंदाजाने चेंडू स्टंपातच टाकला पाहीजे पण फ़लंदाजाने मात्र कशीही वेडीवाकडी बॅट, दांडपट्टा फ़िरवल्यागत धावा काढल्या तरी पब्लीक खुष ! वर समालोचक म्हणणार , 'धावा बनणे मुख्य, मग त्या कशाही का बनेनात' ! हाणामारीच्या षटकात, क्षेत्ररक्षणावरील मर्यादेमुळे बरेचदा चेंडू बॅटची कड घेउन, स्लीप मधून सीमापार जातो. गोलंदाज कपाळावर हात मारतो तर फ़लंदाज खिदळतो ! उंच उडालेला एखादा झेल एखादा कोंबडी फ़ील्डर टाकतो, गोलंदाजाला त्याला धड शिव्याही घालता येत नाहीत पण अगदी मधली यष्टी उखडली गेली पण बेल नाही पडली, तर मात्र फ़लंदाज नॉट आ़उट ! गोलंदाजाने बॉलींग सुरू करण्यापुर्वी तो कोणत्या हाताने, कोणत्या अंगाने गोलंदाजी करणार ते सांगितलेच पाहीजे, फ़लंदाज मात्र कोणताही चेंडू कोठेही मारायला मोकळा, त्याने रीव्हर्स वा बॅक हॅण्ड स्वीप मारला तरी चालते, (आता तर उजवा खेडाळू डावरी पोझीशन घेउन सुद्धा बॉल फ़टकारतो !), स्कूप करा वा सरसावत खेळपट्टीच्या मध्यापर्यंत या, चेडूचा टप्पा पडेपर्यंत तरी का थांबा ? पब्लीक धावाच तर बघायला येते ! एकच मंत्र, गोलंदाजीची पीसे काढा, फ़ोडा ती उभी आडवी , उभारा धावांचा टोलेजंग टॉवर ! खेळपट्टी पण कशी हवी तर 'पाटा' ! जरा जरी ती सम-पातळीत नसली, चेंडू असमान उसळतोय वा घसटी जातोय असे दिसले की करा सामनाच रद्द ! फ़लंदाजाला कोणी सांगते का की बाबा दहा षटके खेळलास की तू तंबूत परतायचे – नाही ! जखमी झाला तरी पठ्ठ्याला रनर घेउन खेळायला मोकळीक ! का असे म्हणते की तू ज्या दिशेला मारला असेल त्याच दिशेला बॉल गेला तर धावा मिळतील, चक्री , अकडम-तकडम धावा नाही चालणार म्हणून ? कड लागून चेंडू सीमापर गेल्यास निदान धावा तरी बहाल होणार नाहीत अशी सुधारणा होईल ? दोन पावलांच्यावर क्रीज सोडायचे नाही, एका षटकात एक फ़टका एकदाच मारायचा, वेडे-वाकडे शॉट सांगून खेळायचे असे नियम का नाहीत ? पण काय सांगावे धावांचा टॉवर हवा म्हणून गुगली टाकायचा नाही, हातभर बॉल वळवायचा नाही, यॉर्कर षटकात एकच टाकायचा, १०० च्या हुन जास्त वेगात बॉल पडला तर तो 'नो' , क्षेत्ररक्षकाने सुद्धा हातात आला (का ओंजळीत ?) तरच झेल पकडायचा अशा सुधारणा(?) मात्र नक्की होतील ! आधुनिक तंत्रज्ञान आले खेळात पण साले ते पण फ़लंदाज धार्जिणेच निघाले. वेगवेगळ्या गियर मुळे फ़लंदाज अधिकाधीक निर्घोर, निर्धोक झाले. कितीही वेगात चेंडू शरीराच्या कोणत्याही भागावर आदळला तरी फ़लंदाजाला अंगावर पिस फ़िरल्यासारखेच वाटते ! त्या मुळे गोलंदाजांची दहशतच संपली. सर्व गियर चढवून फ़लंदाज मैदानात उतरतो तेव्हा तो अगदी बॉम्ब निकामी करणार्या पथकातलाच वाटतो. माझे कोनीबी कायबी वाकडे करणार नाही हे त्याला चांगले ठावकी असते ! बॅटच्या तंत्रात पण खूप सुधारणा झाल्या, आता तर दोन्हीबाजूनी सपाट बॅट वापरता येणार आहे ! का तर अकडम-तकडम फ़टके चांगले बसावेत म्हणून ! गोलंदाजीचा वेग अजून ताशी १०० मैल या कमाल मर्यादेतच आहे पण फ़लंदाजांचे फ़टके मात्र खणखणीत हो़उ लागले आहेत. बराच काळ षटकार मारणारे भारतीय हा दुर्मिळ प्रकार होता पण हल्ली युवी काय लीलया छकडी चढवतो ! पण बॉल मात्र गोल गरगरीतच हवा, तो करा की अंडाकृती. पण नाही ! त्याचा शेप जरा बदलायची खोटी, फ़लंदाज आकाश पाताळ एक करून तो बदलणे भाग पाडतो ! मैदानावरचे पंच फ़लंदाजावर अन्याव करतात म्हणून त्यांना तिसरा डोळा दिला गेला (त्रयस्थ पंच असतातच). धावचीत, यष्टीचीत देताना त्याचा सढळ वापर केला जातो पण पायचीतचा निर्णय , जो खेळात सर्वात कळीचा मुद्दा आहे , तो मात्र असे पंच देत नाहीत. मग अनेक वेळा सी-हॉक तंत्राने मोठ्या पडद्यावर रीप्ले बघताना आपल्या चेंडूने मधला लकडा उडवला होता हे बघत हळहळणेच बॉलरच्या नशीबी येते ! हे सर्व कमी म्हणून की काय, मॅन ऑफ़ दी मॅच / सिरीज निवडताना सुद्धा गोलंदाजाला डावलले जाते. खरे तर एखाद्या सामन्यात फ़लंदाजाने शतक काढले असेल तर कोणा गोलंदाजाने पाच किंवा अधिक बळी घेतलेले असतातच पण बहुमान मात्र फ़लंदाजालाच मिळतो. तसे पाच बळी ही कामगिरी शतकाच्या, सात ते आठ बळी द्वीशतकाच्या तर ९ वा परफ़ेक्ट टेन ही कामगिरी त्रिशतकाच्या बरोबरीची असते. पण लक्षात कोण घेते ? निदान कसोटी सामन्यात तरी सामना जिंकण्याकरीता सर्व फ़लंदाज दोनदा बाद करणे अनिवार्य असते व ही कामगिरी गोलंदाजच पार पाडतात ना ? का म्हणूनच मर्यादीत षटकांच्या सामन्यात या नियमाला फ़ाटाच दिला गेला ? बहुसंख्य कर्णधार सुद्धा फ़लंदाजच असतात. निव्वळ गोलंदाज म्हणून संघात स्थान मिळणे आता अवघडच झाले आहे. बिचारे झहीर, हरभजन व पठाण , काल-परवाचा इषांत शर्मा, हे सुद्धा हल्ली गुमान फ़लंदाजी करतात ! पहील्या पाच खेळाडूंनी नांगी टाकल्यावर बिचार्यांना कसलेल्या फ़लंदाजाप्रमाणे उभे रहावे लागते. एखादा फ़लंदाज शतक काढल्यावर दमलो म्हणून तंबूतच आराम करू शकते वा स्लीपमध्ये झोपा काढू शकतो पण ते भाग्य कोठले गोलंदाजाच्या नशीबी ? कधी पठाण किंवा झहीरला स्लीपमध्ये उभा(?) बघितला आहे कोणी ?पुढे सरसावत ठोकलेला उत्तुंग षटकार, खणखणीत कव्हर ड्राइव्ह, नजाकतभरी लेटकट वा ग्लान्स, गोलंदाजाचा फ़ॉलो थ्रू पूर्ण व्हायच्या आत अगदी समोरच्या स्टंपला वारा घालत, गवत कापत मारलेला स्ट्रेट ड्राइव्ह, बंपर छातीवर घेउन केलेला हूक यातच क्रीकेटचे सौंदर्य आहे का ? हे म्हणजेच क्रीकेट का ? रोरावत येणारा यॉर्कर, कानशीले लाल करून जाणारा वा बरगड्या शेकवणारा बंपर, गलीतगात्र करणारा बीमर, झपकन आत आलेल्या बॉलवर तीन-ताड उडणारी यष्टी, अचानक खाली राहुन यष्ट्यांचे वेध घेणारी वा पायावर आदळणारी डीलीवरी, हात टेकणारे फ़लंदाज हे बघताना नाही तुमच्या अंगावर रोमांच उभे रहात ? हे नाही तुम्हाला बघायला आवडत ?भविष्यकाळ स्पष्ट आहे , हाडामासाच्या गोलंदाजाची गरजच काय अस एक खुळ येइल ! यांत्रिक गोलंदाज साचेबद्ध गोलंदाजी करेल, क्षेत्ररक्षक सुद्धा "आता उरला उपचारापुरते" या भावनेने , चेंडूच्या पाठी नुसते पळतील, तो थांबला की(च) थांबतील, सीमारेषेवरून फ़क्त बॉल आणून देतील, फ़लंदाज धावांचा रतीब घालतील, संघ धावांचा टॉवर उभारतील, मैदाने अधिक आकसतील, अगदी गिरगावच्या गल्लीत सुद्धा 'बल्ले-बाजी'चा विश्वकप भरेल, तेव्हा दूर कोठेतरी क्रीकेटच्या पंढरीत माझ्या सारखा क्रीकेट रसिक गोलंदाजांच्या कबरीवर मुकपणे आसवे ढाळत असेल !