सोमवार, २४ डिसेंबर, २०१२

दिल्लीतील आगीत सचिनची आहुति की हौतात्म्य ?



जवळचा कोणी अंथरूणाला खिळलेला असतो. प्रेमापोटी तो आज ना उद्या नक्की ठणठणीत बरा होइल या आशेवर चाहते  डोळे लावून बसलेले असतात. तसा आधीही तो कोमात जावून आलेला असतोच ! त्याची विल पॉवर जबराट आहे, त्याला स्वत:लाच आपण बरे होण्याची आशा आहे तोवर आशा आहे ! कोणी मात्र त्याला अंथरूणाला खिळलेल्या अवस्थेत बघण्यापेक्षा तो गेला तर बरे, एकदा काय ते दु:ख होईल पण त्याला असा बघणे जास्त वेदनादायक आहे असे हळू आवाजात बोलून दाखवित असतात ! त्याच्या आजारपणावर उतारा म्हणून औषध बदलून बघायचे ठरते. तो बरा होणार अशा आशेवर जगणार्यांची   आशा अजून एकदा पालवते, बाकीच्यांना मात्र “कशाला हा अट्टाहास, थोडे का उपाय झाले ? बरे आता वय तरी कोठे साथ देते आहे ? त्याचे हाल बघवत नाहीत हो “ असा सूर असतो !

अचानक तो गेल्याची खबर येते ! तो जगणार अशा आशेवर असणार्यांना हा धक्काच असतो पण “आता मरण हीच त्याची सूटका” असे वाटणार्यांना पण हळहळ वाटतेच ! तसा काही तो अकाली गेलेला नसतो, वय झाल्यावर कोणी गेला तर तेवढे दु:खही होत नसते पण अनेक वर्षे मर्दुमकी गाजवणार्याने असे अंथरूणाला खिळून मरावे याचा विषाद नक्कीच होतो. रणागणांतच त्याची अखेर झाली असती तर ?

पाकिस्तानच्या भारतातील दौर्याची निवड अवघ्या काही तासावर आलेली असताना सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ति जाहिर केलेली आहे. आज ना उद्या जे घडणार होतेच पण ते झाल्यावर मात्र मनात अनेक वादळॆ उठली आहेत !  50 षटकांच्या खेळात त्याच्या आसपास फिरकेल असाही कोणी नाही. त्याने खेळलेल्या शेवटच्या डावात पाकच्या 329 धावांचा पाठलाग करतान ढाक्यात 48 चेंडूत 52 धाव तडकावून विराट विजयाचा पाया रचला होता. पाकविरूद्ध तो वेगळ्याच इर्षेने खेळतो व विश्वचषकात पाक विरूद्धच्या जवळपास प्रत्येक विजयात त्याची बॅट तळपली आहे. त्याच पाकड्यांविरूद्ध घरच्या मैदानात त्याला दोन हात करायची संधी मिळणार होती. तो ही संधी दवडेल अशा सुतराम शक्यता नव्हती.

असे असताना हा निर्णय त्याने का घेतला ? उघडपणे निवड समितीने त्याच्यावर कोणत्याही प्रकारे दबाव आणलेला दिसत नाही. पण पडद्यामागे बरेच काही झाले असावे. भारतात क्रिकेटचे राजकारणच  जास्त जोरात चालते. राजकारणी मंडळी क्रिकेटला मगरमिठी मारून बसली आहेत. सचिनने स्वीकारलेले राज्यसभेचे सदस्यत्व, त्याला “भारत रत्न” मिळावे अशी चर्चा व दिल्लीत माजलेली अनागोंदी या सर्वांची एक लिंक मला तरी स्पष्ट दिसते आहे !
राजधानीत दोन दिवस अनागोंदी माजली आहे. लोक कोणालाही न जुमानता रस्त्यावर उतरले आहेत. लाठी हल्ला, गोळीबार झाला म्हणून सर्व मिडीया सरकारवर तुटून पडलेला आहे. सत्तारूढ सरकार याने हादरले आहे. परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून निदान मिडीयाला दूसरीकडे  कोठेतरी गुंतविणे  भागच आहे ! मग यात सचिनची निवृत्ति जाहिर झाली तर ? मिडीयासाठी ही ब्रेकिंग न्युज ठरेल व त्यांचा अर्धा वेळ तरी सचिन संबंधित बाइटस टीपण्यात जाइल ! तितकाच सरकारला मोकळा श्वास घेता येइल ! पण हे व्हावे कसे ? सचिन निदान एकदिवसीय प्रकारातुन या वेळी निवृत्ति जाहिर करणे शक्यच नाही ! अर्थात जे काम सरळ होत नाही ते कोणत्याही मार्गाने करण्यास राजकारणी तरबेजच असतात ! सीधी उंगलीसे थोडेही घी निकलता है ? सचिनला आधी विनंती, मग प्रेमळ विनंती मग तुझी निवडच करीत नाही अशी धमकी व मग भारत रत्नचा मार्ग मोकळा करायचे वचन देवून त्याला निदान एकदिवसीय सामन्यातून निवृत्ति घ्यायला भाग पाडले हे स्पष्ट आहे ! त्याने जर हा निर्णय मनापासून घेतला असता तर कसोटी क्रिकेटला पण त्याने राम-राम ठोकला असता !

दिल्लीतील आग आटोक्यात आणण्यासाठी सचिनवर अर्धवट निवृत्ति एकतर लादली तरी गेली आहे किंवा एखादी ऑफर त्याला देवून त्याला हौतात्म्यासाठी तयार  केले गेले आहे ! दिल्ली संकटात असते तेव्हा सह्याद्रीने मदतीला धावायचे असते ही तर परंपराच आहे, यात मराठ्यांचे पानिपतच होणार !