बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१२

पालघर पोलिसांचे निलंबन – एक अतिरेकी कारवाई !



शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पालघरमधील एका मुस्लिम तरूणीने फेसबुकवर बाळासाहेबांचा अवमान करणारी एक टिपणी केली होती. पालघरमधील शिवसैनिकांनी त्याची पोलिसात रीतसर तक्रार नोंदविली व कारवाईची मागणी केली होती. पोलिसांनी सदर मुस्लिम तरूणीला अटक केलीच पण ती टिपणी  आवडली असे नमूद करणार्या तिच्या हिंदू मैत्रीणीलासुद्धा अटक केली. त्यांना रितसर न्याय दंडाधिकार्यापुढे हजर केले गेले व 24 तासात जामिनावर मुक्त सुद्धा केले गेले होते.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच झाला म्हणून मिडीयाने बरीच बोंब ठोकल्याने स्वत: मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले व या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेची चौकशी केली. अहवाल प्राप्त होताच दोन पोलिस अधिकार्यांना थेट निलंबित करण्यात आले आहे व त्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेने पालघर बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मी स्वत: अमर्याद अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता असलो तरी थेट निलंबनाची कारवाई हाच मला अतिरेक वाटतो आहे. अशाने पोलिस दलाचे मनोधैर्य खच्ची होईल यात शंकाच नाही. एकाने गाय मारली म्हणून दूसर्याने वासरू मारले असा प्रकार झाला आहे.
मिडीया आता अशी बोंब ठोकतो आहे की बंदला विरोध केला म्हणून अटक का केली ? त्या तरूणीने बंदला नुसता विरोध केला नव्हता तर बाळासाहेबांचा अवमान सुद्धा केला होता हे सोयीस्करपणे दडपले जात आहे ! तिची पोस्ट अशी होती “ बाळासाहेबांसारखी माणसे रोज जन्माला येतात व रोज मरतात, त्यांच्यासाठी बंद कशाला ?” ज्याच्या अंत्ययात्रेला 25 लाख लोक जमतात अशी किती माणसे या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात जन्माला आलेली आहेत ? हल्ली तर कोणाच्या मयताला 4 खांदेकरी सुद्धा मिळत नाहीत ! तेव्हा या टिपणीने बाळासाहेंबांचा अवमान करण्याचा हेतू होता हे स्पष्टच आहे. शिवसेनेने बंदची हाक दिली नव्हती, तो उत्स्फूर्त होता, तेव्हा बंदची सक्ती नव्हती हे सुद्धा स्पष्ट आहे.
बाळासाहेबांच्या निधनाने शोकाकुल वातावरणात अशी टिपणे करणे अयोग्यच होते, त्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरूपयोग केला गेला हे नक्की. टिपणी आवडली असे नोंदविणार्या हिंदू तरूणीवर सुद्धा पोलिसांनी कारवाई केली हे सुद्धा नमूद करण्यासारखे आहे. आपल्या देशात पोलिस दल तपासाचे काम करते व न्यायालय सजा देण्याचे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या तरूणींना न्यायालयात उभे केले व तिकडे त्यांना जामिन मिळाला. त्यावेळची तणावपूर्ण  परिस्थिती बघता, अवमानास्पद टिपणीने दंगलीचा भडका उडू नये म्हणून पोलिसांनी केलेली अटक योग्यच होती असे मला वाटते. अटक केली नसती तर त्या तरूणींना जमावाच्या हिंसक हल्ल्याला सामोरे जावे लागले असते व त्यातून अधिकच भडका उडाला असता हे नक्की. अटकेने त्या तरूणींची सुरक्षितताच जपली गेली. बाळासाहेबांच्या निधना नंतरची अत्यंत तणावपुर्ण परिस्थिती पोलिसांनी अत्यंत कौशल्याने हाताळली म्हणून त्यांचे कौतुक होत असताना हे निलंबन आततायीपणाचे व पोलिसांच्या चांगल्या कामगिरीवर बोळा फिरवण्यासारखे आहे. निलंबन रद्द करावे त्या अधिकार्यांना सन्मानाने रूजू करून घ्यावे हेच योग्य !

      जय महाराष्ट्र !