बुधवार, २३ मार्च, २०११

पनवेल कब आयेगा ?

लोकलमधल्या मरणाच्या गर्दीत काही पहिलिटकर असतातच. मुरलेल्या लोकलकराला सुद्धा तोबा गर्दीमुळे गाडी नक्की कोणत्या स्थानका दरम्यान आहे हे सांगता येत नाही. नव्यानेच लोकलने प्रवास करणार्यांच्या मनात त्यांना हवे असलेले स्थानक केव्हा येणार, कोणत्या स्थानका नंतर येणार, किती वेळ लागणार व फलाट कोणत्या बाजूला येणार असे प्रश्न हमखास सतावत असतात. तसे मुंबईकर नवख्या माणसाला मदत करण्यासाठी तत्पर असतात. तो जर कुर्ल्याला उतरणार असेल तर अगदी चेंबूर गेल्यागेल्याच पुढे सरकायला लागा हा सल्ला सुद्धा आपसूकच मिळतो. प्रश्न विचारणार्याचा टोन काय आहे यावर सुद्धा त्याला मिळणारे उत्तर कसे असेल ते बरेचसे अवलंबून असते. बसलेल्या वा त्याहून कहर म्हणजे खिडकीजवळ बसलेल्या व्यक्तीने हा प्रश्न विचारल्यास त्याला तिरकस उत्तरे मिळणार हे नक्की ! एखादे स्थानक कधी येणार या प्रश्नावर जी उत्तरे दिलेली मी ऐकली आहेत त्याचे एक संकलन –

मै खुद नया नया हूँ.

मालूम नही (म्हणजे खरे तर “बतानेका नही” असते ! )

भोत देर है, तू सो जा आराम से !

मै भी वहीच उरतनेवाला हूँ, फिकिर मत करो !

सब लोग जहा उतरेंगे वोइच पनवेल.

बस आता ही होगा.

खांदेश्वरके बाद पनवेल आयेगा.

जो साला उठतो तो हल्ली पनवेलला येतो, मुंबईची आयझेड करून झाली, आता पनवेलची वाट लावा !
पनवेल के पहले तिलक टर्मिनस आयेगा. वहा उतरो, वहा से दरभंगा एक्सप्रेस पकडो और पटना जाओ. लालू और निलेश तेरेको उधरही बुला रहे है !

पनवेल कधी येणार म्हणे, आपण काय यांच्या बापाचे नोकर आहोत काय ? एकेकाला असा फोडला पाहिजे की परत लोकलमध्ये यायची हिंमत नाही करणार.
का ? पनवेलमध्ये झोपडी बांधायची आहे का पानाची गादी टाकायची आहे ?
स्वत: खिडकीजवळ झोपायचे वर विचारायचे पनवेल केव्हा येणार. खिडकीतुन बाहेर बघ म्हणाव स्थानकांची नावे, का वाचतापण येत नाही ?

सगळ्यात कहर म्हणजे-
बेटे तुम जहा गाडी पकडा वो था वी.टी, अभीका सीएसटीएम, तुम्हे नींद लगा तब वडाळा गुजर रहा था, गाडी वाशीके पहले पाच मिनिट सिग्नलको रूकी थी. अभी गया बेलापूर, उसके बाद खारघर, वहा पे डेक पार्किग है, उसके बाद मानसरोवर बाद मे खांदेश्वर और फिर आयेगा पनवेल. और पंधरा मिनट है. तुम्हे जुना पनवेल जाने का है की नया पनवेल ? की बस डेपो जाना है ? अगर डेपो जाना है तो मै तुम्ही शॉर्टकट दीखाता हूँ, नवीन पनवेल जाना है तो बडा ब्रिज क्रॉस करना पडेगा, बाहर गाव जाने वाली गाडी पकडनी है तो ब्रिजके उपर खडा रहो, प्लॅटफॉर्म अनाउन्स होगा तो ही नीचे उतरना ---- !

गाडी पनवेलला लागली तरी त्याची शिकवणी चालूच ! हे बघून एका मराठी तरूणाची सटकते ! त्याची जळजळीत प्रतिक्रीया , “अशी वागणूक मिळत असेल तर हे परप्रांतिय इथेच डेरा टाकणार नाहीत तर काय करतील ? या भय्यांनो या , आमच्या उरावर बसा ! “

जरा हटके !

नव्या भरतीतला ’अ’ नावाचा कर्मचारी व्यवस्थापकाकडे “आजचे काम काय ?” ते विचारायला गेला. व्यवस्थापकाने त्याला नदी पार करून जायचे काम दिले. ’अ’ ने ते काम मोठ्या उत्साहाने केले. काम झाल्यावर व्यवस्थापकाने त्याला “ठीक” असा शेरा दिला.

व्यवस्थापकाने ’ब’ ला पण तेच काम दिले पण नदी पार करतानाच त्याने नदीत गटांगळ्या खाणार्या आपल्या एका सहकार्याला सुद्धा वाचविले. त्याला “बरा” असा शेरा मिळाला.

काही दिवसाने “क” हा नवीन कर्मचारी कामावर रुजू झाला, त्याने सुद्धा व्यवस्थापकाला काम काय आहे ते विचारले. त्याला पण नदी पार करायची कामगिरी मिळाली. “क” ने आधीच्या दोघांनी ते काम कसे केले ते अभ्यासले. त्या दोघांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे अनुभवाचे बोल त्याने ऐकले. कामातले धोके त्याला कळले. सर्व माहिती घेवून त्याने एक कृती योजना बनविली व स्वत: त्याप्रमाणे नदी पार करून निर्धोक, कमी वेळेत नदी पार करून देणारी योजना त्याने कंपनीला सादर केली. व्यवस्थापकाने त्याला “चांगला” असा शेरा दिला.

मग आला “ड” कर्मचारी. त्याने आधी काय घडले त्याचा आढावा घेतला. “क” ने केलेले गाइड सुद्धा त्याने अभ्यासले. त्याला कळले की नदी पार करण्यासाठी पोहत जायची गरजच काय ? त्यात जोखीम आहे शिवाय वेळ सुद्धा वाया जातो. त्या पेक्षा या नदीवर एक पुल बांधला तर ? नुसती कल्पना करून तो थांबला नाही, स्वत: आराखडा बनवून त्याने अल्प काळात इतरांच्या मदतीने त्या पुलाची उभारणी सुद्धा केली. व्यवस्थापकाला तो एवढेच म्हणाला की हे काम आता परत कोणाला तुम्हाला द्यावेच लागणार नाही ! अर्थात त्याला व्यवस्थापकाने शेरा दिला “उत्तम” !

अ,ब , क व ड यांच्या कामाचे मूल्यमापन कसे करता येईल ? आपण बहुतेकदा दिलेले काम करताना चाकोरी बाहेरचे काही करून बघतच नाही. पाट्या टाकायचे काम वर्षानुवर्षे करून आपल्याला समाधान मिळते का ? आपण मोठी जबाबदारी निभावल्याचा आव आणतो पण माझ्या कामाची हवी तेवढी कदर झाली नाही असे सुद्धा म्हणतो.

ब ने दूसर्या बुडणार्याला वाचविले याने त्याचे कौशल्य अर्थात पणाला लागले. त्याचे काम अ पेक्षा नक्कीच उजवे होते.

क ने त्याच्याही पुढे जावून डाटा बँक बनविली. अनेकदा पुर्वतिहास न तपासताच आपण एखादे काम करतो. दूसर्याच्या चूका लक्षात घेवून आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे काम करता येते. हे सर्व करून पुढच्यांसाठी त्याची मार्गदर्शिका बनविणे हे काम नक्कीच बहुमूल्य आहे. आधीची माहिती संकलित करून ती चांगल्या प्रकारे वापरणे हे खरेच मोठे काम होते ! त्याने नदी पार करण्यातली जोखीम कमी झाली होती वर शिवाय वेळही वाचला होता. नव्याने येणार्या कामगारांसाठी छान वस्तूपाठच घालून दिला गेला. Learn to teach and teach to learn !

ड ने मात्र चाकोरीबाहेरचा विचार केला. त्याने नदी पोहून पार करणेच कालबाह्य करून टाकले ! म्हणूनच तो उत्तम ठरला.

ब, क, ड यांनी आपल्या कामाने संघभावनेचे महत्व दाखविलेच पण त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे त्यांनी आपल्या कामात “पुढाकार” घेतला !

सचिनचा कथित झेल, माझा मात्र त्रिफळा !

विंडीज विरूद्धच्या सामन्यात सचिन पंचाच्या निर्णयाची वाट न बघता तंबूत परतला. मी काही ते दृष्य पडद्यावर बघितले नव्हते. दूसर्या दिवशीच्या वर्तमानपत्रात मात्र या कृतीचे खिलाडूवृत्ती म्हणून कौतुक झाले होते तसेच सचिनने मैदान सोडले नसते तर फेरनिर्णय मागितला असता तरी तो बाद असल्याचे निर्विवाद सिद्ध झाले नसते अशीही पुस्ती जोडली गेली होती. सचिन याच्याही आधी अनेकदा पंचाच्या निर्णयाची वाट न बघता तंबूत परततो असेही दाखले दिले गेले होते.

घरी बायकोने मथळा वाचताच, “यात कसली आली आहे खिलाडूवृत्ती ? मिंधे पत्रकार सचिनचा उदो-उदो करायची एकही संधी सोडत नाहीत !” अशी मल्लीनाथी करताच मी भडकलो. “मग टी.व्ही. फोडणे, शिव्या घालणे ही खिलाडूवृत्ती का ?” या माझ्या प्रतिसवालावर बायकोने पलटवार केला. आमच्या घरात मग दोन गट पडले, मी व मुलगी विरूद्ध सौ. व मुलगा !

सौ – खेळात अंपायर , वर लागलाच तर तिसरा अंपायर कशासाठी असतो ?
मी – मान्य, पण दोषी व्यक्तीने स्वत:हून पद सोडणे चांगले की न्यायालयाने लाथ घातल्यावर ? सचिनला वाटले आपण बाद आहोत, त्याने लगेच मैदान सोडले, यात त्याचा मोठेपणाच दिसतो, त्याच्यासारख्या थोड्यांमुळेच अजूनही हा खेळ सभ्य माणसांचा म्हणून ओळखला जातो !
सौ – याच्या आधी सचिनने कधी पंचाच्या निर्णयावर नाराजी दाखविलीच नव्हती का ? अगदी या आधीच्याच सामन्यात आपण पायचीत नव्हतो असे त्याला वाटत होते. निर्णयाविरूद्ध दाद मागण्यापुर्वी त्याने कोहलीशी चर्चा केली, जेव्हा कोहली त्याचा उपयोग होणार नाही असे बोलला तेव्हा तो निर्णय त्याने मान्य केला. अंपायर नेहमीच बरोबर असेल असेही नाही तसेच तो कायम चूकेल असेही नाही, अंपायर देईल तो निर्णय आदळ-आपट न करता मान्य करणे म्हणजेच खिलाडूवृत्ती !

मुलगी – अग पण त्याला वाटले आपण बाद आहोत तर अंपायरच्या निर्णयाची वाट त्याने कशाला बघायची ? पायचीतच्या निर्णयात चेंडू स्टंपवर गेला असता का हे फलंदाजाला कसे कळणार ? त्या साठी हॉक-आय तंत्राची मदत घेण्यात काय चूक ? आपल्या बॅटची कड लागून चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला हे मात्र फलंदाजाला सगळ्यात आधी समजते.

मुलगा – त्याला स्वत:चे मोठेपण दाखवायचे होते ! दूसरे काय ? आपण सामना जिंकलो म्हणून ठीक आहे पण हरलो असतो तर हे नको तिकडे दातृत्व संघाला किती महाग पडले असते ? एरवी सचिन “संघासाठीच मी खेळतो” असे टुमणे वाजवित असतोच ना ? त्यानेच हल्ली सांगितले होते की स्लेजिंग मला मान्य नाही पण एका सामन्यात संघाने ठरविले म्हणून मॅकग्राला त्याने “तुला मी मैदानाच्या बाहेर फेकणार आहे” असे सुनावले होते ! अंपायरने बाद दिल्याशिवाय मैदान सोडायचे नाही हे धोरण संघासाठी नक्कीच योग्य आहे. असे केल्याने खिलाडूवृत्तीला कोणतीही बाधा येत नाही.

मी – एरवी तुम्हीच बोंब मारता ना की सचिनने शतक काढले की भारत हरतो म्हणून ? या सामन्यात म्हणूनच तो मुद्दाम लवकर तंबूत परतला असेल. त्याच्या दोन शतकी खेळीवर पाणी ओतल्याचा त्याने असा निषेध केला असेल !

सौ – पण मग तेच सिद्ध झाले ना ? सचिनने हौतात्म्य पत्करले पण युवराज चमकलाच ना ? मॅच जिंकलो ना शेवटी ? सचिन सलग दोन सामन्यात कधीही यशस्वी ठरत नाही. त्याने हाच मोका साधला व स्वत: भोवती आरत्या ओवाळून घेतल्या !

मी – तुम्ही काही म्हणा, सचिन हाच आता या खेळातला शेवटचा सभ्य माणूस आहे. अर्थात त्याचा आदर्श आहे सुनील गावस्कर, सुनील सुद्धा कधी अंपायरने बोटाने “चालते व्हा” असा इशारा करेपर्यंत थांबला नाही !

सौ – काय पण उदाहरण दिले आहे ! याच तुमच्या सुनीलने ऑस्ट्रेलियात अंपायरच्या निर्णयाचा निषेध म्हणून सामनाच सोडायचा आततायी निर्णय घेतला होता ना ?

मी – शेवटी ते दोघेही हाडामासाची माणसेच आहेत. तेवढ्या एका प्रसंगाने ते रडे असल्याचे कसे म्हणता येइल ? मराठी माणसाचे हेच चूकते, गुणांची पूजा करावी, दोष का उगाळत बसता ? शंकराचा निळा गळा हा त्याचा कलंक ठरत नाही मग सचिन-सुनीलला एकाच प्रकरणामुळे का झोडपता ?

मुलगा - बाबा, तुला आता एकच प्रसंग सांगतो – दूध का दूध पानी का पानी ! सचिन खेळातला सभ्य माणूस आहे ना ? अगदी तो चेंडू कुरतडत असल्याची फिल्म बघून सुद्धा लोकांनी तो नखाने शिवणीच्या भोवतालची माती साफ करत होता हा त्याचा खुलासा मान्य केला, पण मंकीगेट प्रकरणाचे काय ?

मी – मला अमेरिकेतले वॉटरगेट माहीत आहे. मंकीगेट काय ?

मुलगा – बाबा, उगीच वेड पांघरून पेडगावला जावू नकोस ! हरभजनने एका सामन्यात सायमंडसला मंकी असे चिडवले होते. हा उघड उघड वर्ण-व्देषी शेरा आहे. स्टंप जवळच्या कॅमेर्याने भज्जी चांगलाच गोत्यात आला होता, भारताची इभ्रत सुद्धा पणाला लागली होती. या प्रसंगात सचिनचा वापर साक्षीदार म्हणून केला गेला व त्याने मंकी असे आपण ऐकले नाही, “मां की” असे काहीसे ऐकू आले असे सांगून हरभजनच्या पापावर पांघरूण घातले ! या वेळी जर तो ठामपणे भज्जीचे चूक आहे, त्याने वर्णव्देषी टीका करून क्रिकेटला बट्टा लावला आहे असे सांगता तर तो खरा खिलाडू ठरला असता – तेव्हा कोठे गेला होता तुमच्या सचिनचा धर्म ?

त्रिफळा उडल्यावर थांबण्याची गरजच काय ? मी लगेच हापिसला जायला उशीर होत आहे असे सांगून मैदान सोडले !

रविवार, १३ मार्च, २०११

म्या मरीन पण तुका ---- !

“म्या मरीन पण तुका रांड करीन” अशी एक इरसाल मालवणी म्हण आहे ! टीम इंडीयाने या म्हणीचा प्रत्यय काल शतक ठोकणार्या सचिनला दिला ! हीच टीम इंडीया सचिनला विश्वचषकाची भेट देणार आहे म्हणे ! मुंह मे राम और बगल मे छुरी ! इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात सुद्धा सचिनने शतक केल्यावर बाकी फलंदाजानी योजनाबद्ध हाराकिरी केली होती पण सचिनच्या पुण्याईनेच तो सामना टाय झाला. हल्ली काही दळभद्री लोक सचिनने शतक ठोकले की भारत हरतो अशी बोंब ठोकत आहेत. अशांच्या xx मध्ये बेल्ससकट सहा स्टंप ठोकायला हवेत. संघातला एक फलंदाज चेंडूगणिक धाव घेवून शतक ठोकतो व बाकिचे त्याला नाट लावण्यासाठी आपले नाक कापून घेतात हेच खरे ! माणूस जेवढा मोठा होतो तेवढेच त्याला शत्रू सुद्धा निर्माण होतात. सचिनवर बंगाली काला-कांडी करून गांगुली थकला, अझरने बेंटींग करून सचिनच्या अनेक चांगल्या खेळींची माती केली. द्रविडने वेळ येताच कानडीपणा दाखविला आता धोणी तीच गादी पुढे चालवित आहे !


कालचा पराभव माझ्या मते सर्वात लाजिरवाणा पराभव म्हणावा लागेल ! अगदी जावेदने शेवटच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराचे वळ एक वेळ बुजतील पण हा सचिनच्या खेळीला नाट लावण्यासाठी ओढवून घेतलेला पराभव विसरू विसरता येणारा नाही ! काल आपल्याला दक्षिण आफ्रिकेने हरविले यावर अजूनही माझा विश्वास बसलेला नाही. नक्की कोठे घोटाळा झाला ? चावलाला काढून टाकले तर त्याच्या जागी अश्विनला घ्यायचे सोडून नेहराच बरा धोणीला गवसला ? आणि सुरेश रैना काय फक्त क्षेत्ररक्षणासाठीच संघात आहे का ? गंभीर किंवा विराट कोहली यातल्या एकाला आलटून पालटून विश्रांती देवून रैनाला का खेळविले जात नाही ? रैना गोलंदाजी सुद्धा करू शकतो व त्याची फिल्डींग हा बोनसच आहे.


सचिन-सेहवागच्या धडाकेबाज सलामीनंतर भारताची धावसंख्या कमाल ४०० ते किमान ३५० असायलाच हवी होती. इंग्लंडविरूद्ध अशीच दणकून सलामी मिळून सुद्धा शेवटी उडालेल्या घसरगुंडीने शेवटचा चेंडू खेळायला आपल्याकडे फलंदाजच शिल्लक उरला नव्हता. या इतिहासातुन टीम इंडीयाने कोणता बोध घेतला ? तर या वेळी शेवटचे आठ चेंडू खेळायला आपल्याकडे फलंदाजच शिल्लक नव्हता ! याला म्हणतात अनुभवाने शहाणे होणे ! धोणीचे गणित सुद्धा कच्चे आहे हे नक्की. शेवटचे षटक आपल्या सर्वोत्तम गोलंदाजाकडे कसे यावे यासाठी त्याने शिकवणी लावायची गरज आहे. धोणीच्या वकुबाबद्द्ल सुद्धा शंका घ्यायला बराच वाव आहे. पॉवर प्ले कधी घ्यायचा याचा निर्णय कायम त्याच्या व पर्यायाने संघाच्या अंगलट आला आहे. शतकी खेळी केलेला सचिन दमला असणे स्वाभाविक होते व पॉवर प्ले मध्ये उलचून चेंडू मारण्यात तो यशस्वी होण्याची शक्यता कमी होती. तो एकेरी-दुहेरी धावा घेवून धावफलक हलता ठेवत असताना पॉवर प्लेचा अवसानघातकी निर्णय पुढे ढकलता आला असता. बरे पॉवर प्ले मध्ये विकेट पडत आहेत हे लक्षात आल्यावर आक्रमकपणाला मुरड घालून खेळपट्टीवर तळ ठोकला असता तरी निदान ३०० चा पल्ला गाठता आला असताच. सचिन असेपर्यंत फलंदाजीला साथ देणारी खेळपट्टी एकदम रंग बदलेल हे संभवत नाही. पण सचिनला नाट लावायची या एकाच प्रेरणेने सगळे खेळत होते व हे सगळे दूसर्या टोकाला धोणीच्या साक्षीने चालले होते. धोणी कॅप्टन कुल नसून खूनशी आहे नाहीतर बथ्थड तरी आहेच आहे ! अगदी शेवटच्या षटकात तेरा धावा हव्या असताना धोणीने चेंडू दिला नेहराकडे ! काय त्या नेहराचा चेहरा ! एरंडेल घेतलेला नेहरा शेवटचे षटक टाकणार म्हटल्यावर छातीत धस्स झाले होते ! सचिन गोलंदाजीसुद्धा ( हो, सेहवाग सुद्धा ! ) करू शकतो याचा हल्ली धोणीला विसरच पडलेला आहे ! याच सचिनने पोरसवदा असताना याच आफ्रिकेविरूद्ध शेवटचे षटक टाकून सामना टाय केला होता , इंझमाम हक सारख्या कसलेल्या फलंदाजाला शेवटच्या चेंडू पर्यंत जखडून ठेवण्याची करामत केलेली होती --- पण सचिन द्वेषाने पछाडलेल्या झारखंडी धोणीला त्याचे काय ? मराठ्यांचे पानिपत कसे करायचे हेच त्याच्या सडक्या डोक्यात असणार ! निदान शेवटच्या चेंडू पर्यंत तरी उत्कंठा वाटेल असेही नेहराने काही केले नाही ! चोकार, षटकार, चौकार ! खेळ खल्लास ! हीच का टीम इंडीयाची सचिनला संस्मरणीय भेट ? ३७ वर्षाचा तरूण तडाखेबंद शतक ठोकतो, तेवढ्याच उत्साहात स्वत:च्या शरीराचा कोट करून क्षेत्ररक्षण करतो व त्याला नाट लावण्यासाठी बाकी टोळभैरव विकेट विकतात, हातातले झेल सोडतात, तो जेव्हा दूसरी धाव घेण्यासाठी अर्धे अंतर पार करून आलेला असतो तेव्हा त्याचा तरूण सहकारी एक धाव कशीबशी पुरी करीत असतो !


सचिन भारतात जन्माला आला हे आपले भाग्य पण त्याचे काय ? ही कसली टीम इंडीया ही तर ’शेम इंडीया’ !

शनिवार, १२ मार्च, २०११

जाणे कोण, कोण जाणे ?

• “चौकशी” असे लिहिलेल्या खिडकीवरचा कर्मचारी कोठे गुल झाला आहे याची चौकशी कोठे करायची ?

• बस स्टॉपवर वा रेल्वेच्या फलाटावर उभी असलेली माणसे मान मोडेपर्यंत ट्रेन किंवा बस येत आहे का ? ते का बघत असतात ? असे नाही बघितले तर गाडी फलाट सोडण्याची भीती असते का ?

• आपण घेतलेल्या शेयरच्या किंमती लगेचच खाली येतात वा विकलेल्या शेयरच्या किमती अपर सर्किट ब्रेकरला कशा भिडतात ?

• बॉस जेव्हा आपणाला बोलावतो तेव्हाच नेमके आपण जागेवर कसे नसतो ?

• लिहिता वाचता येणारी माणसे सुद्धा रेल्वे स्थानकावर उभी असलेली लोकल कोठे जाणार ते का विचारतात ?

• आपलीच स्कूटर कमी मायलेज कशी देते ?

• आपण नेटवर्क मध्ये असताना कोणी सुद्धा आपल्याला फोन करत नाही पण हेच जर आपण लिफ्ट वा ट्रेन मध्ये असलो की हमखास कोणीतरी आपली आठवण काढते.

• मिसकॉलचा नेमका कोणता अर्थ घ्यायचा ?

• मराठी माणसाची जीभ मुंबई बोलताना अजूनही का चाचरते ? हाच मराठी नाणूस न विसरता चेन्नई, कोलकता, बेंगलुरू असे कसे बरे म्हणतो ?

• ट्रेनमध्ये कॉर्नरला बसणार्याला बाहेरून भिरकावल्या जाणार्या दगडाची भीती , दूसर्या सीटला बसणार्याला वरून पडणार्या लगेजची भीती, तिसरे बसणार्याला चवथा माणसाकडून फ्री मसाज, चवथ्याला पॅसेज मधून जा-ये करणार्यांचे शिव्याशाप ! प्रवास तरी कसा करायचा ?

• मार्केटींग कॉल ओळखायचे काही तंत्र आहे का ?

• रीक्षा , टॅक्सीचे परमिट मिळण्यासाठी तसेच सरकारी नोकरी मिळण्यासाठी उर्मट असणे अनिवार्य आहे का ?

• महागडे बूट पायात घालण्यापेक्षा गळ्यात का बरे घालत नाहीत ?

• घड्याळ फास्ट ठेवल्यामुळे नक्की कोणता हेतू साध्य होतो ?

• इ-मेल सेवा जर विकत घ्यायला लागली तर किती जण ती वापरतील ?

• एखादे महत्वाचे पत्र फॅक्स करून ते मिळाल्याची खात्री करून सुद्धा ते कुरीयरने का पाठवावे लागते ?

• संगणकाचा उपयोग खरेच कागदाचा वापर कमी करण्यासाठी होतो का ?

• बॅकअपचा वापर करून फाइल परत मिळाल्याचे एक तरी उदाहरण आहे का ?

• ऑर्कुट वा फेसबुकवर डमी प्रोफाइल बनविण्याने नक्की कोणता हेतू साध्य होतो ?

• एसेमेस केल्यावर तो मिळाला का असे विचारणारा फोन करणे कितपत योग्य आहे ?

• सरकारी परिपत्रके कशी वाचायची, त्याचा अर्थ कसा लावायचा या साठी काही कोर्स आहे का ?

• हेल्प चा पर्याय वापरून मदत कशी होते ? प्लिज हेल्प !

• मुंबईच्या लोकलमध्ये १२ ते ३ या वेळॆत म्हणे वरीष्ठ नागरीकांसाठी काही आसने राखीव असतात , पण या आसनापर्यंत पोचायचे कसे ? तिथे जर कोणी बसले असतील तर दाद कोणाकडे मागायची ?

• ईसीएस, इ-तिकिटींग सारख्या सुविधा असताना बिल भरण्यासाठी वा तिकिट काढण्यासाठी लोक अजूनही रांग का लावतात ?

• मी नेहमी देशासाठीच खेळतो असे सचिनला प्रत्येक मॅच नंतर का सांगावेसे वाटते ?

• मुलाचे नाव “पार्थिव” ठेवणार्यांना त्याचा अर्थ तरी माहीत असतो का ?

• महनीय व्यक्ती कायमच कशा बीझी असतात ?
• भुंकणारा कुत्रा चावत नाही असे आपण मानतो पण कुत्र्याला ते मान्य असते का ?

• कुत्र्याचे नाव टायगर असे का ठेवतात ? कुत्र्याची मदर टंग इंग्रजी असते का ? का इंग्रजी कुत्र्यांना लवकर अवगत होते ?

• मुंबईच्या लोकलमध्ये हिजडे खंडणी गोळा केल्यासारखे पैसे गोळा करतात तेव्हा “मुंबईत हिजडे किती ?” असा प्रश्न पडतो !

• आपल्या देशात अनेक चौकशी आयोग नेमले जातात , अशा आयोगातुन नक्की काय निष्पन्न झाले याची चौकशी करणारा आयोग कधी स्थापन होणार ?

• जनेतेच्या दबावामुळे सरकार एखादा चौकशी आयोग नेमते व त्याचा अहवाल मात्र “गोपनीय” ठरवून दडपून टाकते !

• न्यायालयाचा अवमान म्हणजे नक्की काय ? प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे म्हणजे काय ?

• अंधाराचा फायदा नेहमी चोरांनाच कसा मिळतो ?

• काही घातपात झाला की सुरक्षा यंत्रणा “अजून” मजबूत / कडक केली जाते !

• सणात विघ्न येवू नये म्हणून पोलिस समाज कंटकांची धरपकड करतात असे आपण पेपरात वाचतो, पण एखादा समाज कंटक आहे असे माहीत असूनही पोलिस इतरवेळा त्याला बाहेर का ठेवतात ?

• आत्महत्या करणार्या माणसाला सुसाइड नोट लिहीणे कंपलसरी असते म्हणून बरीच माणसे आत्महत्येचा विचार मनातून काढून टाकतात !

• रस्त्यावर अपघातात मेलो तर ५००० रूपये व विमान अपघातात मेलो तर काही लाख, असा भेदभाव का ?

• ग्यारंटी देणार्याची ग्यारंटी कोण देणार ?

• खटला हरला तर आरोपीला शिक्षा होते पण त्याची खोटी बाजू मांडणारा वकिल मात्र मोकाट सूटतो !

• रस्यावरील अपघातात जखमी झालेल्या माणसाला आधी वैद्यकिय मदत मग पोलिस केस असे सुप्रीम कोर्टाने बजावून सुद्धा अनेक वर्षे झाली तरी सिनेमा वा मालिकेत डॉक्टर आधी पोलीसांना बोलवा असा नियम का दाखवितात ?

• क्रिकेटसाठी पाटा पीच बनवले असेल तर बॉलर म्हणून यंत्रमानव का वापरला जात नाही ? हाण तिच्या मायला !!

• निवडणुका जिंकल्या तर तो गांधी घराण्याचा करीष्मा असतो पण हरल्या तर मात्र तिकडाची स्थानिक संघटना मजबूत नसते !

• विजय मल्या या मद्य सम्राटाने गांधीजींच्या दुर्मिळ वस्तू लिलावात घेतल्या तेव्हा गांधी परत ’हे राम’ म्हणाले असतील !

• क्रिकेट हा ’सभ्य माणसांचा खेळ’ कवापर्यंत होता ?

• ज्याच्या धावाच होत नसतात असा खेळाडू देवाचा धावा तरी कसा करणार ?

• ठरवून डेन्टीस्ट झालेला कोणी असेल का ?

• ’वाचाल तर वाचाल’ हे तरी न वाचणारा कशाला वाचेल ?

• बॉल वाया घालविणार्या फलंदाजाला परत बोलवायचा पर्याय कर्णधाराला कधी मिळणार ?

• क्रिकेटमध्ये नॉन प्लेयिंग कॅप्टनचा पर्याय का नाही ?

• मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण “मिस्टर क्लिन” आहेत मग त्यांचे बाकी सहकारी करप्ट आहेत का ?

• पंधरा रूपयाचे बिसलेरी पिणारा महानगर पालिका १००० लिटरला ३ रूपये आकारून पाणी घरपोच देते ते मात्र महाग असे म्हणतो !

• सरकार कडे शाळा काढायला पैसा नाही, शाळेत शिकविले जात नाही म्हणून पालक मुलांना महागडे क्लास लावतात , सरकार शाळांप्रमाणे क्लासला मात्र अनुदान देत नाही, मग या क्लासनाच शाळेच दर्जा का दिला जात नाही ? शाळेची फी परवडत नाही म्हणून गळा काढणारे पालक आपल्या पाल्याला आपण किती महागड्या क्लासला घातले आहे ते मात्र बोंबलून सांगत असतात !

• फायद्यात चालणारे उद्योग सरकारला विकायचे नसतात तर तोट्यात चालणारे सरकारी उद्योग चालविण्यात उद्योजकांना रस नसतो !


• कर्ज फेडू न शकणारा शेतकरी गळ्यात फास घालतो तर कर्ज बुडवे उद्योजक मात्र सरकारी बँकाची कर्ज बुडवून वर त्यांचा एनपीए कसा कमी करता येइल यावर सरकारला सल्ले देत असतात !

• ज्यांना वीजेचे बिल कमी येते ते नक्की आदल्या जन्मी विजेचा शॉक लागून मेलेले असतात !

• डॉक्टरकडे गेल्यावर तो आपल्यालाच “काय झाले आहे ?” असे का विचारतो ?

• वृत्तपत्रांचे संपादक एरवी खुल्या धोरणाचे स्वागत करतात, परकिय कंपन्यांना मुक्त प्रवेश द्या असे सांगतात पण त्यांच्या धंद्यात मात्र त्यांना परकीय कंपन्या अजिबात नको असतात !

• ज्या मुलांचे प्रोजेक्ट त्यांचे पालक करून देतात ती स्वत: पालक झाल्यावर काय करतील ?