एका प्रख्यात चित्रकाराच्या शिष्याची ही गोष्ट आहे. चित्रकलेच्या प्रांतात काहीतरी वेगळे करून दाखवायचे अशी आस या शिष्याने बाळगली होती. आपल्या कुंचल्याची करामत लोकांसमोर ठेवून स्वत:चे कौशल्य त्याला अजमावयाचे होते. 3 दिवस अहोरात्र मेहनत करून त्याने एक अतिभव्य कलाकृती साकार केली. निहायत सुंदर असे ते निसर्गचित्र होते. या चित्रकृतीवर त्याला थेट लोकांच्या प्रतिक्रीया हव्या होत्या. त्यासाठी त्याने ते चित्र एका चौकात मांडले. सोबत त्याने एका फलकावर लोकांना आवाहन केले की “मी दिवसरात्र खपून जी चित्रकृती साकार केली आहे त्यावर मला तुमचे प्रामाणिक मत हवे आहे. माझा हा पहिलाच प्रयत्न असल्याने यात काही चूका झाल्या असण्याची शक्यता आहेच. जिकडे तुम्हाला काही चूकले असे वाटत असेल तिकडे तुम्ही एक फुली मारून ठेवा.”
संध्याकाळी लोकांचा प्रतिसाद बघायला तो चौकात आला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. लोकांनी सगळ्या चित्रावर फुल्या मारून ठेवल्या होत्याच शिवाय अनेक कुचकट शेरेही लिहीले होते.
दु:खातिरेकाने कोलमडून तो आपल्या गुरूकडे आला व धाय मोकलून रडू लागला.रडत रडतच त्याने आपल्या चित्रावर कशा सर्वत्र फुल्या मारल्या गेल्या आहेत व शेरे लिहीले आहेत ते सगळे गुरूला सांगितले.पुढे तर, आपले सगळे शिक्षण वाया गेलेले आहे व कलाकार म्हणून आपली लायकी शून्य आहे. लोकांनी त्याची कलाकृती पार झिडकारली आहे. त्यामुळे त्याला मेल्याहून मेल्यासारखे वाटत आहे असेही तो म्हणू लागला.
त्याच्या गुरूने त्याला हसत हसत सूचवले की मला तर तुझी कलाकृती महान व निर्दोष वाटते, लोक काय म्हणतात याकडे तू लक्ष देवू नकोस. पण शिष्याला काही ते पटले नाही. उगीच तुम्ही मला खोटी आशा दाखवू नका, माझा स्वत:वरचा विश्वास उडाला आहे. कलाकार म्हणून मी नापास झालो आहे असे तो म्हणाला. यावर गुरू म्हणाला की मी सांगतो तसे अधिक प्रश्न न विचारता कर. नाराजीनेच त्याने गुरूने सांगितल्याप्रमाणे दोन रात्र खपून पहिल्या चित्राचीच नक्कल साकारली. गुरूने ते चित्र घेतले व त्याला घेवून त्याच चौकात आला. यावेळी फलकावर गुरूनेच लिहून ठेवले की “लोक हो, माझी उत्कृष्ट अशी चित्रकृती मी सादर करीत आहे. या क्षेत्रात मी नवखा असल्याने मला तुमच्या बहुमूल्य मार्गदर्शनाची गरज आहे. इथेच मी एक रंगेपेटी व कुंचला ठेवला आहे, चित्रात काही चुकले असेल तर या कुंचल्याने तिकडे दुरूस्ती करावी. धन्यवाद !”
संध्याकाळी गुरू-शिष्य जेव्हा त्या चौकात आले तेव्हा शिष्याला नवा धक्का बसला. चित्रावरती कोणी काहीही केलेले नव्हते. पुढचा एक महिना ते चित्र तिकडे ठेवून सुद्धा अगदी कोणीही त्याच्यावर कुंचल्याचा एवढाही फराटा ओढलेला नव्हता !
तात्पर्य काय तर – दूसर्याच्या कामात दोष शोधणे सोपे आहे पण ते दुरूस्त करणे महाकठीण ! तुम्हाला जर खरेच दूसर्याने सुधारावे असे वाटत असेल तर आधी लोकांचे वर्तन, दृष्टीकोन व कौशल्ये कशी सुधारता येतील हे स्वत: समजून घ्या व मगच मदतीचा हात पुढे करा. तसेच दूसर्याच्या टीकेने नाराज होवू नका व त्या आधारे स्वत:चे मूल्यामापन करून खचून जावू नका. “निंदकाचे घर असावे शेजारी” या उक्तीप्रमाणे सकारात्मक , योग्य टीकेचा मात्र स्वत:ला सुधारण्यासाठी उपयोग जरूर करून घ्या.