ज्याने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, नुसते खेळलेच नाहीत, खेळाच्या दोन्ही अवतारात सर्वाधिंक धावा कूटल्या आहेत, सर्वाधिक शतके ठोकली आहेत, सर्वाधिक सामना तसेच मालिका वीराचे सन्मान पटकावले आहेत, सर्वाधिक भागीदार्या रचल्या आहेत त्याला सर्वात्तम मात्र मानता येत नव्हते ! काही शापच असे असतात, पण प्रत्येक शापाला उ:शाप हा असतोच असतो ! तो महान आहे असे सगळेच म्हणत पण महानतम नव्हे असे नियतीच जणू अनेकांकडून वदवून घेत होती. तो काहीच बोलत नव्हता, उतत नव्हता, मातत नव्हता, घेतला वसा टाकत नव्हता ! धावांचा रतीब घालतच होता ! शाप नक्की कोणता आहे हे त्याला माहीत होते व उ:शाप सुद्धा त्याच्या लक्षात असणारच ! आपल्यात अजून चिक्कार क्रिकेट बाकी आहे हे त्याचे उद्गार सूचकच होते !
सचिन सर्वात्तम नव्हता, का ? तर – त्याने सहा चेंडूवर सहा षटकार मारले नव्हते युवराज वा सोबर्स सारखे, सर्वात जलद शतक आहे आफ़्रीदीच्या नावावर, तर अर्धशतक आहे जयसूर्याचे, डावातल्या सर्वाधिक धावा होत्या सईद अन्वरच्या नावावर, त्यात तो पाकिस्तानी व या धावा त्याने आपल्यात देशाच्या पाठीवर आसूड ओढल्यागत कोरल्या होत्या ! त्याला जावेद मियादाद सारखा शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून संघाला विजयी करता आलेले नव्हते, चवथ्या डावातली त्याची सरासरी जेमतेम २० ची आहे तर रिकीची ५५, लारासारखा ४०० धावांचा धबधबा त्याला घालता आला नव्हता, एखाद्या अंतिम सामन्यात ३०० धावांचा गांगुलीसारखा त्याला विजयी पाठलाग करता आला नव्हता, सेहवागसारखे दोनदा त्रिशतक त्याला झळकावता आले नव्हते ! पण वरची अनेक नावे आता इतिहासजमा झाली आहेत, जे खेळत आहेत ते त्याच्या आसपास सुद्धा नाहीत पण त्या सगळ्यांनी मिळून जे केले त्यातले काहीतरी सचिनने करायलाच हवे होते, हाच तो उ:शाप होता. यातल्या एकातरी गोष्टीवर त्याचे नाव कोरलेले त्याच्या चाहत्यांना या जन्मात बघायचेच होते.
मधला काही काळा खरेच कसोटी बघणारा होता. सततच्या दुखापती, चाहत्यांच्या प्रचंड वाढलेल्या अपेक्षा, विश्वचषकातली अकाली एक्झिट, संजय मांजरेकर, कपिल देव, सुनील गावस्कर यांची बोचरी टीका , मित्र मानलेल्या विनोद कांबळीचे उलटणे, फेरारी करमाफी प्रकरण, फ़िक्सिंगमध्ये रोखलेली संशयाची सुई. संघातले सहकारी सुद्धा त्याच्या विरूद्ध कटकारस्थाने करीतच होते – त्याचा नंबर खाली आणणे, तो १९७ वर असताना डाव सोडणे , गांगुलीसारखा चिडका-रडका कर्णधार त्याचा पाण-उतारा करायची एकही संधी सोडत नव्हता, अगदी अलिकडचा धोणीही तो संघाला योगदान देत नाही अशी ओरड करतच होता ! रसिक उतावीळ झाले होते जसा सचिन हा शेवटचा डावच खेळणार होता , आता नाही तर मग केव्हाच नाही अशीच जणू वेळ होती ! आपला सचिनच हे करू शकतो , दूसरा कोणीच नाही ! मग तो त्यात अपयशी ठरतोय म्हटल्यावर लोक बिथरले ! त्यात सलग दोन मालिकात तो अपयशी ठरल्यावर पब्लिकचे ताळतंत्रच सूटले ! माझ्यासारखे त्याचे निस्स्मिम चाहते सुद्धा त्याच्या विरोधात गरळ ओकू लागले ! त्याला हाकला अशी हाकाटी सुरू झाली ! मुंबईत वानखेडेवर त्याची रेवडी उडवली जाणे म्हणजे अगदी कहरच झाला होता ! नालायक गांगुली संघात हवा म्हणून बंगाल संसदेत दंगा करतो तर इकडे मात्र मराठी माणूससुद्धा सचिनला बोल लावत होता ! अगदी अलिकडचे म्हणजे मुंबई कोणाची या वादात त्याने केलेले विधान व बाळासाहेब ठाकर्यांची ओढवून घेतलेली जहरी ठाकरी टीका ! कोणीही याने बिथरला असता, बॅट जाळून मोकळा झाला असता ! कशासाठी त्याने खेळायला हवे होते ? काय त्याला अजून साध्य करायचे उरले होते ? अनेक पिढ्या बसून खातील एवढे धन गाठीशी असताना कशाला कोणाची उणी-दुणी कोणी ऐकली असती ? पण सुर्यावर थुंकणारे थुंकतच होते ! त्याच्या अलौकिक कर्तबगारीने अनेकांचे डोळे दिपले होते, घुबडाला म्हणे उजेडात दिसत नाही, तसेच अनेकांचे झाले होते ! त्यात मध्येच त्याने शतक केले की भारत हरतो अशी कोल्हेकुई सुरू झाली होती ! काय दु:ख झाले असेल त्याला , कल्पनाही करता येणार नाही ! तो म्हणे शतकासाठी खेळतो, जसे काही त्याने काढलेली धाव त्याच्याच खात्यात जमा होते, संघाची पाटी कोरीच राहते ! पण नियतीच हे सर्व घडवून आणत होती, अनेक भोग त्याला भोगायला लावून त्याला तावून सुलाखून घेत होती, कसाला उतरतो का ते बघत होती ! शेवटी सोने बावनकशी आहे यावर शिक्कामोर्तब झाले. त्याच्या वरचे एकेक आक्षेप त्याने धुवून काढायला सुरवात केली. सुरवात झाली दोन वर्षापुर्वी ऑस्ट्रेलियात ! कांगारूंची मस्ती त्याने परत एकदा उतरवली, ती सुद्धा त्यांच्याच देशात ! मग इंग्लंड विरूद्ध चवथ्या डावात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग युवराजच्या साथीने नाबाद शतकी खेळाने केला व तो संघाला विजयाप्रत कॅरी करून शकत नाही असे म्हणणार्यांची बोलती बंद करून टाकली ! मायदेशात कांगारूच्या ३५० धावांचा पाठलाग त्याने घणाघाती १७५ धावा करून आटोक्यात आणला होताच पण परत नियती चाल खेळली. अवसानघातकी फटका मारून तो बाद झाला व ’तेव्हा’ पाकबरोबर जसे कसोटी हरलो होते तसेच यावेळीही संघाचे तारू बुडाले व परत सचिन टीकेचा धनी झाला ! मग श्रीलंकेत अंतिम सामन्यात शतक काढून संघाला विजयी करून त्याने ते पाप धुवून काढले. मायदेशात बांगला देश व आफ्रीकेविरूद्ध झालेल्या दोन्ही कसोटीत त्याने शतके ठोकली. दक्षिण आफ्रीकेच्या पहील्या वन-डेत तो हकनाक धावबाद झाला पण त्याच सामन्यात निर्णायक क्षणी झोकून देउन त्याने चौकार अडवला ! नियती हसली ! उ:शापाचा क्षण जवळ आला होता ! शापित गंधर्वाला मुक्ती मिळण्यासाठी ठीकाण ठरले मध्य प्रदेशातले इंदौर !
नाणेफेक जिंकून पाटा खेळपट्टीवर धोणीने फलंदाजी स्वीकारली. दणक्यात सुरवात करणारा सेहवाग लवकरच बाद झाला ! आता संघाला तिनेशेपार नेण्याची जबाबदारी सचिनवरच होती ! जणू १८ वर्षापुर्वीचा सचिन मैदानावर ठाकला होता ! गोलंदाजांना सोलपटून काढणारा, त्यांची पिसे काढणारा, त्यांना वेडेपिसे करणारा, कर्दनकाळ ! काय त्याच्या खेळीची वर्णन करावे ! भगवान श्रीकृष्णाचे विश्वरूप दर्शन पाहताना अर्जुनाची जी अवस्था झाली असेल , अगदी तशीच अवस्था ही ऐतिहासिक खेळी बघणार्यांची झाली असणार ! उत्साह सामर्थ्य तुझे अपार, तू सर्व की सर्व तुझ्याच ठायी ! सचिनने पन्नास पार केले आणि कोठेतरी आत काहीतरी वेगळे घडणार याचे संकेत मिळू लागले ! ’तो अन्वरचा विक्रम मोडणार का ?’ या प्रश्नाचे पुढे हो हो मोडणार अगदी आजच मोडणार अशा निर्धारात रूपांतर झाले ! करोडो भारतीय देवाकडे एकच मागणे मागत होते, सचिनचे आज द्वीशतक झालेच पाहिजे ! जो सर्वाधिक वनडे खेळला आहे, ज्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत, सर्वाधिक शतके केली आहेत त्याच्याच नावावर एका डावातील सर्वाधिक व्यक्तीगत धावांचा विक्रम हवाच हवा ! नाही, तो त्याचा हक्कच आहे ! तेवढी शक्ती देवा त्याला दे ! सामुदायिक प्रार्थनेत प्रचंड शक्ती असते ! तिचाच प्रत्यय काल आला ! चमत्कार चमत्कार अजून काय वेगळा असतो ? सचिनने आधी सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढलाच पण तेवढ्यावरच न थांबता त्याने २०० धावांचा अशक्य वाटणारा टप्पा गाठला व आपल्या सोनेरी कारकिर्दीला हिर्याचा शिरपेच खोवला ! माझ्यासारख्या कारकुनी करणार्याने सचिनचे माप काढावे हेच किती विनोदी पण नियतीपुढे कोणाचे काय चालते ! आता मात्र मान्य केलेच पाहिजे की त्याने डॉनलाही झोकाळून टाकले आहे ! झाले बहु, होतील बहु पण या सम हाच ! सचिन तुझे आभार तरी काय मानायचे ? तुझा बहरणारा खेळ याची देही, याची डोळा बघता आला हेच आमचे परम भाग्य ! स्वत:बरोबरच तू मराठी माणसाची व भारताची मान उंचावली आहेस, निष्ठा म्हणजे काय याचा वस्तुपाठ घालून दिला आहेस ! कर्तबगारीचे शिखर एवढे उंचावून ठेवले आहेस की तिकडे बघताना सुद्धा एखाद्याचे डोळे पांढरे होतील !
आता एकच हवे सचिन, कसोटीतला लाराचा चारशे धावांचा विक्रम सुद्धा तुझ्याच , मराठी माणसाच्या व भारतीयाच्याच नावावर हवा म्हणजे हवाच ! अधिक मागणे नाही ’देवा’ ! जय हो !
( चला, मला सुद्धा सचिनच्या पराक्रमाने ब्लॉगवरची धूळ झाडायची प्रेरणा मिळाली ! हा लेख सचिनचे दोन निस्सिम भक्त - एक माझा सहकारी मित्र संजय पारकर व दूसरा कोब्रा मित्र रूपक लेले यांना अर्पण ! )