आपला देश विकसनशील देश आहे. गरीबी, बेकारी, अनारोग्य, आरोग्यसुविधांचा अभाव, अंधश्रद्धा यामुळे आपल्या देशात अंधत्वाचे प्रमाण खूप आहे. जगातील अंधाच्या संख्येच्या १/४ म्हणजे सुमारे १.२ कोटी अंध लोक भारतात आहेत ! अंधत्वाचे महत्वाचे कारण म्हणजे मोतिबिंदू असून दुसरे महत्वाचे कारण म्हणजे पारदर्शक पटलाचे विकार किंवा corneal blindness. भारतातील अंध व्यक्तींपैकी २५ टक्के लोक पारदर्शक पटलाच्या विकारामुळे अंध आहेत आणि यात ६० टक्के प्रमाण लहान मुलांचे आहे ! या विकारामध्ये डोळ्याचे पारदर्शक पटल (cornea) किंवा बुबुळ अपारदर्शक बनते व ती व्यक्ती अंध होते. हे खराब झालेले पटल बदलून दान केलेल्या डोळ्यातील पटल तिथे बसवणे हाच या प्रकारच्या अंधत्वावर उपचार आहे. या अंध व्यक्तींना दृष्टीदान देण्यासाठी वर्षाकाठी दीड लाख नेत्रपटलांची (cornea) गरज आहे. सध्याच्या अंदाजानुसार फक्त पंधरा हजार ते वीस हजार पटल उपलब्ध होतात. यावरून नेत्रदानाची चळावळ वाढायला हवी हे स्पष्ट होते. श्रीलंकेसारख्या छोट्या देशात नेत्रदानाचे प्रमाण खूप आहे आणि तेथे जरूरीपेक्षा दहापट जास्त नेत्रदान केले जाते ! आपल्या देशात मात्र हे प्रमाण गरजेच्या पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे ! त्यामुळे आज आपल्या देशात नेत्रदानाची तीव्र गरज आहे.
एक वर्षे वयावरील कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते. नेत्रदानाला वय, जात, लिंग, धर्म यांची अट नाही. कोणत्याही धर्मात नेत्रदानाला विरोध नाही. ज्या व्यक्तीच्या डोळ्याचे पाददर्शक पटल निर्दोष असते अशा कोणत्याही व्यक्तीला नेत्रदान करता येते. रक्तदाव, मधुमेह (ब्लडप्रेशर, डायबेटीस) असलेल्या व्यक्तीपण नेत्रदान करू शकतात. नेत्रदानाला अपात्र व्यक्ती म्हणजे ज्यांना एडस सारखा रोग झालेला आहे किंवा ज्यांचा मृत्यू संशयास्पद कारणांनी झाला आहे किंवा मेंदूज्वर, रेबीजने मरण पावलेल्या व्यक्ती.
नेत्रदान करताना पूर्ण डोळा अगर पारदर्शक पटल (cornea) काढला जातो व ज्या व्यक्तीचे पारदर्शक पटल खराव झाले असेल त्याच्यावर रोपणाची शस्त्रक्रीया (corneal grafting) केली जाते. मृत्यूनंतर ६ तासांच्या आत नेत्रदान करावे लागते व ४८ ते ७२ तासांच्या आत रोपण करावे लागते. सरकारी रूग्णालायांमध्ये ही शस्त्रक्रीया विनामूल्य केली जाते.
नेत्रदान करण्यासाठी इच्छूक व्यक्तीने आपल्या नावाची नोंदणी जवळच्या नेत्रपेढीत करावी लागते. जरी नोंदणी झाली नसेल तरी नातेवाईकांच्या इच्छेनेही नेत्रदान होऊ शकते. नेत्रदानाच्या वेळा मृत्यूचा दाखला व जवळच्या नातेवाईकांची संमती आवश्यक आहे. मृत व्यक्तीचे डोळे काढल्यावर त्या जागी कृत्रिम डोळा बसवून पापण्या शिवल्या जातात व चेहरा विद्रूप होत नाही. कोणाचे नेत्र कोणाला रोपण केले जातात याची माहीती मात्र गुप्त ठेवली जाते. अंधव्यक्तीच्या एकाच डोळ्यावर पटल रोपण केले जात असल्याने एका दात्याच्या मरणोत्तर नेत्रदानाने ( अथवा त्याच्या जवळच्या नातलगांनी तशी परवानगी दिल्यास ) दोन अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते !
नेत्रदान हे असे दान आहे की त्यासाठी पैशाची श्रीमंती लागत नाही. या एका दानाने दोन अंध व्यक्तींचे आयुष्य प्रकाशाने उजळून निघते ! म्हणूनच आपण सर्वानी मरणोत्तर नेत्रदानाची इछा आपल्या जवळच्या नातलगांकडे व्यक्त केली पाहिजे तसेच आपल्या जवळची व्यक्त मरण पावल्यास दु:खाला आवर घालून डोळसपणे जवळच्या नेत्रपेढीशी संपर्क साधून नेत्रदानाचे सामाजिक कर्तव्य निभावले पाहिजे. गेलेली व्यक्ती परत येणार नसते पण त्या व्यक्तीचे नेत्र दान करून आपण दोन अंध व्यक्तींना दृष्टी देउ शकतो व त्या व्यक्तीच्या स्मृती आगळ्या प्रकारे जपू शकतो , सामाजिक दायित्व पार पाडू शकतो हे नक्की !
साभार - नेत्रतज्ज्ञ डॉ. सौ. संगीता जोशी,
नवीन पनवेल.