ताज म्हटले की मुंबईकरांना तरी गेट-वे समोरचे ताज महाल हे पंचतारांकीत हॉटेलच डोळ्यासमोर येते. मुंबईबाहेरच्यांना ताजची ओळख २६/११ च्या नंतर झाली असे म्हणणे सुद्धा धाडसाचेच ठरेल ! पण मुंबईच्या १.२५ कोटी लोकसंख्येपैकी किती ताज मध्ये गेले असतील ? किती आसपास फ़िरकले असतील ? तर नगण्य ! अगदी १ टक्का सुद्धा नाही ! डोंगर दूरून साजरे असतिल तर ताज जवळून सुद्धा लांबच वाटावे एवढे महागडे आहे. मुंबईत एवढी वर्षे राहुन सुद्धा ताजच्या वाट्याला, अगदी वाटेला सुद्धा जावे असे मनात आले नव्हते. ताजची रसभरीत वर्णने मात्र खूप ऐकली होती. तिकडचे दर, चकचकाट, आदब … बरेच काही(बाही) !
साधारण १९९६ साल असावे. बायको, चार वर्षाचा मुलगा, कडेवरची मुलगी यांना घेउन गेट-वे ला आलो होतो. समिंदराची सैर करून तिकडच्या बागेत विसावलो होतो. एवढ्यात प्रसादला 'ती' इमारत दिसली. बाबा ते काय आहे या त्याच्या प्रश्नाला मी ते एक जगप्रसिद्ध पंचतारांकीत हॉटेल आहे असे दबल्या आवाजात सांगितले. यावर तो म्हणाला 'चला मग आज तिकडेच खायला जाउ या'. उडप्याकडे जाउन थाली घेणे किंवा इडल्या चापणे येगळे व ताजमध्ये जाणे येगळॆ हे त्याला कसे बरे समजाउन सांगणार ? पण मग विचार केला, महाग, महाग म्हणजे किती महाग असेल ? खिषात क्रेडीट कार्ड तर आहे ना ? कशाला त्याला तरी नाराज करा ? मग काय , चलो ताजचा नारा देत मी सगळ्यांना घेउन ताजची वाट धरली. ताजच्या मुख्या लॉबीतुन अनेक बड्यांची ये-जा चालली होती. ६ फ़ूट उंचीचे तगडे दरवान त्यांचे अगदी ९० अंशात लवून स्वागत करीत होते. त्यांचा तो पोषाख बघुनच दडपण येत होते. आपल्याला ते काही विचारतील व सरळ बाहेरचा रस्ता दाखवतील असेही वाटत होते पण अगदी कोणीही आमची विचारपूस सुद्धा केली नाही. इतके का आम्ही 'हे' वाटतो ?
ताजच्या आत पाउल टाकल्यावर मात्र अगदी हरखूनच गेलो. मंद प्रकाश फ़ेकणारी झुंबरे, फ़ूटभर पाय रूतेल असे गालिचे, नेत्र-दीपक रंगसंगती, भव्य पणा नुसता त्या वास्तुत भरून राहीला होता. आत भलतेच थंड वाटत होते. माझ्यावर त्या वातावरणाचे भलतेच दडपण आले व कपाळावर त्या थंडीत सुद्धा घाम जमला. पण सौ. व प्रसाद, प्रियांका एखाद्या खानदानी श्रीमंताप्रमाणे आत वावरत होते. प्रसाद तर अगदी हुंदडत होता आत ! आत बराच वेळ आम्ही विंडो-शॉपिंग केले, पण आत खादाडी कोठे करायची याचा काहीच पत्ता लागत नव्हता. शेवटी एका वेटरच्या मागोमाग गेलो तेव्हा ते सापडले, काहीतरी अरवी नाव आहे, खैबर बहुदा. तर आत स्थानापन्न झालो व मेनु-कार्ड बघु लागलो. दर बघून मात्र तेवढा धक्का बसला नाही. रोज कोण येतो हो ताज मध्ये ? तेव्हा फ़ारसा वेळ न दवडता डोसा, इडली, बिर्याणी , ज्यूस अशा ऑर्डर दिल्या गेल्या. आजुबाजुला जणु मीनी इंडीया बसला होता. विदेशी पर्यटक सुद्धा भरपूर होते. भारतीय पदार्थाचा आस्वाद घेताना त्यांची फ़जिती उडताना दिसत होती. हॉटेलात उतरलेला कोणी पाहुणा आला की त्याच्या पाठी छत्र-चामरे धरलेला ताजचा कर्मचारी असे, त्यावर त्याचा रूम-नंबर लिहीलेला असे, बिल करण्यासाठी, हे दृष्य पण खूप मनोरंजक होते. सगळ्यात आनंद झाला होता प्रसाद-प्रियांकाला. प्रसादने उडप्याकडे मागतात तसे सांबार व चटणी अजून मागून घेतली. आपले खाणे भरकन संपवून दोघेही हातात हात घालुन. बागेत फ़िरल्यासारखे फ़िरत होते. हॉटेलच्या वेटरना त्यांना चुकवताना भलतीच कसरत करावी लागत होती. मला आणि सौ.ला मात्र ताजचे खाणे अजिबात आवडले नाही. अगदी आजारी माणसाला देतात तसे सगळे अगदी बेचव होते. एकदाचे साग्रसंगीत बिल आले. १३०० का काहीसे रूपये होते ते मी क्रेडीट कार्डने दिले वर ५० रूपये टीप पण ठेवली, अगदी भीड पडली म्ह्णूनच, तर हीने ती सरळ त्या वेटर समोरच काढून घेतली व या पुचाट पदार्थांसाठी टीप कसली द्यायची असे त्याला अगदी ऐकू जाईल इतपत मोठ्याने पुटपुटली !
बाहेर एक कारंजा होता व त्यात बदकाची पिले पण सोडली होती. त्यांना डुंबताना बघण्यात प्रसाद-प्रियांका अगदी रंगून गेली होती. अचानक, प्रसादने आपली चड्डी खाली केली व त्या कारंजाच्या पाण्यात चक्क शू केली ! ते बघून माझी जणु दातखीळच बसली ! अग – तो बघ – आवर त्याला – असे मी काहीसे बडबडत होतो पण ही अगदी ढीम्म होती. त्यात काय, लहान आहे तो अजून, या तिच्या उत्तराने मी अगदी सर्द झालो. मला वाटत होते की आता ते हट्टे-कट्टे पंजाबी दरवान येतील व मला मानगुटीला धरून बाहेर काढतील. त्या आधी मॅनेजर काही पैसे दंड म्हणून घेइल. मी प्रसादला बावळ्याला धरून, जवळपास फ़रफ़टतच बाहेर आणले. ही मात्र शांतपणे प्रियांकाला कडेवर घेउन बाहेर आली, प्रियांकाच्या डोळ्यात आपल्या दादाबद्दलचे कौतुक नुसते ओसंडून वहात होते ! नशीब तिला त्याचे अनुकरण करावेसे नाही वाटले ! बाहेर येउन सुद्धा माझ्या छातीत धडधडत होतेच. काय सांगावे, त्यांना आता 'हे' कळले असेल व अजून कोणीतरी आपल्या मागे येइल असेच वाटत होते. मी सरळ टॅक्सी केली व स्टेशन गाठले. मला कोणीतरी "ठहरो" असे दरडावत असल्याचा भास सतत होत होताच !
ज्याच्या खानदानात कोणी पंचतारांकीत वास्तव्य केले नाही त्याचा मुलगा चक्क ताजमधील कारंजात शू करतो हा काव्यगत न्याय तर नाही ना ? त्या नंतर ताजच्या आसपास सुद्धा फ़िरकायचा प्रसंग आला नाही. ताज वरील हल्लाच्या क्लीप्स बघताना आम्ही 'तो' कारंजा कोठे दिसतो का हे बघत होतो व त्या आठवणीने त्या गंभीर प्रसंगात सुद्धा आम्हाला हसू येत होते !