शुक्रवार, २७ जून, २००८

'ते' तिघे !

'ते' तिघे !

संगणक विभागात काम करताना जे अफाट यश मिळाले ते अर्थातच एक team work होते ! आमच्या विभागाचे प्रमुख होते श्री. रियाज शेख, सहायक गोदी प्रबंधक (आता उप-पबंधक आहेत) तर श्री. विनोद भोज programmer होता (आता त्यांच्या विभागात सहायक अधिकारी). या दोघांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला आहे, (तसेच तिसरा श्री. नितीन बने ) यांच्या कडून भरपूर शिकायला मिळाले, मी त्यांचा ऋणी आहे !
श्री. शेख हे यांचा अतिषय कडक शिस्तीचे अधिकारी असा लौकीक आहे. गोदी मध्ये तिसर्या पाळीत असताना ते आमच्या झोपण्याच्या वेळेतच येत आणि चांगलेच खडसावत. येताना ते जीप लांब उभे करीत व थोडे अंतर पायी चालत येत, त्यामुळे जागे असलेले सुद्धा झोपलेल्यांना जागे करू शकत नसत ! अशा अधिकार्याबरोबर काम करायचे म्हणजे मी आधी धास्तावलोच होतो आणि तो पर्यंत कोणा अधिकार्या समोर जायचा प्रसंग सुद्धा आला नव्हता. उगाच कशाला गाढवाच्या पाठी आणि साहेबाच्या पुढे जा ? पण जसे जसे कामाचा व्याप वाढू लागला, त्यांच्या बरोबर अधिकाधिक संबंध येउ लागला व त्यांच्यातले अनेक गुण समजू लागले. त्यांची निर्णयशक्ती अफाट आहे, drafting जबरदस्त आहे, नियमांचे नेमके ज्ञान आहे, स्मरणशक्ती दांडगी आहे, एकदा फोनवर ऐकलेला आवाज ते कायम लक्षात ठेउ शकतात, नालायकातल्या नालायक माणसाकडून कसे काम करून घ्यायचे हे त्यांना चांगले ठाउक आहे. हग्या दम कसा द्यावा हे त्यांच्याकडून शिकावे तसेच चांगल्या कामाचे कौतुक करण्यात पण ते कमी पडत नाहीत ! त्यांच्या व्यक्तीमत्वाचा माझ्यावर प्रभाव पडला व पुढे सगळ्या विभागाचा भार सांभाळताना अडचणी आल्या नाहीत. ते चांगले सहा फूट उंच आहेत, गोरेपान, देखणे आहेत. कामचूकार , खोटारड्या माणसाला त्यांच्या समोर जायला भीती वाटावी अशी जरब त्यांच्या नजरेत आहे पण एकदा का त्यांचा विश्वास तुम्ही जिंकलात की त्यांच्या सारखा सुह्र्य दूसरा कोणी नाही. त्यांच्यात करडया अधिकार्याबरोबरच एक मस्त मिष्कील, खट्याळ इसम दडलेला आहे. इंग्रजी वरचे त्यांचे प्रभुत्व वादातीत आहे. अनेक नियतकालीकांत प्रसिद्ध होणारे त्यांचे व्यवस्थापन या विषयावरचे लेख, ललीत लेख वाचनीय असतात. एकदा निर्णय घेतल्यावर त्याच्या चांगल्या-वाईटाची जबाबदारी ते स्वत:वर घेतात, निर्णयाशी ठाम राहतात, मी असे आदेश दिलेलेच नाहीत म्हनून हाताखालच्या माणसांना कधीही उघडे पाडत नाहीत ! एकदा guide lines ठरवून दिल्यावर कामात अवाजवी हस्तक्षेप ते कधीही करत नाहीत.त्यांच्या सारखा धडाडीचा अधिकारी सुरवातीलाच मिळाला म्हणूनच गोदी विभागाचे संगणकीकरण सूरळीत पार पडले. विरोध अनेक प्रकारे झाला पण तो त्यांनी खंबीरपणे मोडून काढला. माझ्या पाठीशीपण प्रत्येक प्रसंगात ते ठामपणे उभे राहीले त्यामुळे विरोधासाठी विरोध मला झाला नाही.अशा अधिकार्याबरोबर काम करायला मिळाले, गोदीच्या संगणकीकरणात स्वत:ची छाप पाडता आली, हे मी माझे भाग्यच समजतो !

आमचा programmer विनोद भोज हा एक टीपिकल गुजू आहे. सडसडीत बांध्याचा, उंच, उभट चेहर्याचा, soft spoken, true gentleman ! तसे तो इनडोअरचा व मी आउटडोअरचा , दोन्ही विभागाच्या माणसांना परस्परांविषयी प्रचंड अविश्वास, असूया, पण आमच्या बाबतीत असे कधीही घडले नाही. पहील्या भेटीतच आमचे tuning जमले आणि पुढची १० वर्षे शब्दश: खांद्याला खांदा लावून काम केले ! विनोद VJTI च्या पहील्या बँच चा MCA आहे. गोदी विभागाचे संगणकीकरण करण्याची जबाबदारी त्याने अक्षरश: एक हाती पार पाडली आहे ! त्याचा कामाचा झपाटा विलक्षण आहे. टापटीप, नीटनेटकापणा हे गुण त्याच्या बरोबर काम केल्याने माझ्यात थोडेफार आले. त्याला चिडलेला मी कधी बघितले नाही. कोणत्याही प्रसंगात तो डोक्यावर बर्फ ठेवल्यासारखा कसा राहू शकतो याचे मला राहून राहून आश्चर्य वाटते. तसा हुद्द्याने मी त्याला बराच कनिष्ठ होतो/ आहे पण तसे त्याने मला कधीही जाणवू दिले नाही. मी त्याला अनेक गोष्टी, बदल सूचवले आणि ते पटल्यावर कोणतीही खळखळ न करता त्याने अमलात आणले. आमच्या कामात नियमापेक्षा अपवादच जास्त आणि अशा कामांचे संगणकीकरण हे तसे किचकटच काम पण माझी कामाची जाणकारी व त्याचे त्याच्या क्षेत्रातले ज्ञान यांच्या युतीने एक अतिषय अवघड काम सोपे झाले.माझ्या विभागाची सर्वसाधारण शैक्षणिक पात्रता दहावी पास असल्यामुळे प्रोग्रँम युजर फ्रेंडली असावे या साठी मी कायम आग्रही असे आणि त्या साठी मी कधी कधी टोकाचा आग्रह धरत असे. COBOL च्या अनेक मर्यादा आहेत पण त्यातूनही त्याने युजर फ्रेंडली प्रोग्रँम बनवायचा चांगला प्रयत्न केला. मला थोडेबहुत प्रोग्रँम करता येउ लागल्यावर त्याने नि:संकोच सर्व डाटा फाईलची स्ट्रक्चर मला समजावुन सांगितली. छोटे मोठे प्रोग्रम लिहायला मला उत्तेजन दिले, केल्या कामाचे कौतुकही केले. पुढे पुढे house keeping मध्ये ही मी तरबेज झालो. माझ्यामुळे त्याला रोजच्या कामापासून सूटका मिळाली. unix च्या अनेक कमांड / short cuts त्याला माहीत होते व पाठी उभा राहून शिकवायचे काम तो मनापासून करायचा. आजही आम्ही बरोबरच आहोत पण वेगळ्या project वर, पण काहीही समस्या आल्यास मी त्याला अजूनही त्रास देतो !

समुद्रात जशी अनेक रत्ने असतात तशी आमच्या मुंबई बंदरात अनेक नर-रत्ने आहेत. काही अप्रकाशित, काही तावून-सुलाखून उजळून निघालेली. सगळीच रत्न जरी बहूमूल्य असली तरी त्यातही कोहीनूर एकच असतो. श्री. नितीन बने उर्फ बन्याबापू, आमचा प्रोग्रँमर ( आज्ञावलीकार ?) हा खरच हिरा आहे हिरा ! स्वत:च्या बुध्दीमतेवर संगणकावर त्याने मिळवलेले प्रभुत्व वादातीत आहे. त्याला जेवढ्या संगणकाच्या भाषा येतात तेव्हढ्या खचितच दूसर्या कोणाला येत असतील. यातली कोणतीही समस्या तो चुटकीसरशी सोडवतो. तो असला की कोणी manual उघडायचे कष्ट घेत नाही कारण तोच एक चालते बोलते manual आहे ! खरतर हा अजून आमच्याकडे कसा याचेच मला राहून राहून आश्चर्य वाटते.तसा त्याचा आणि माझा कामानिमित्त संबंध यायचे पहीले १० वर्ष काही कारणच नव्हते. गोदीतल्या कामगारांची हजेरी, त्यांचा पगार, त्यांच्यासाठी असलेली प्रोस्ताहन योजना अशी सगळी किचकट कामे त्याच्याकडे होती. मी cargo tracking टीम मध्ये होतो. युनिक्स च्या शेल कमांड वापरून मी काही चिल्लर प्रोग्रँम लिहीले होते. awk चा माझा थोडाबहुत परीचय झाला होता. बन्याबापू त्यातही पारंगत होता ! अशीच एका awk प्रोग्रँम संबंधीची काही समस्या मी त्याला विचारली आणि बापूंनी माझे जीवन awkमय करून टाकले. त्याची एक खास लकब आहे. त्याच्या कडे काही समस्या नेली की तो आधी काय अगदी सोपे आहे, जरा नीट बघ ना म्हणणार. मग हळूच आपला प्रोग्रँम t1 , t2 किंवा nit1 या नावाने कॉपी करणार, त्याची पार चिरफाड करणार, किती लिहीता रे असे म्हणणार. आणि मग समस्या समाधान !प्रोग्रँम जणू त्याच्याशी बोलतो ! त्याला काय प्रोब्लेम आहे ते सुद्धा अनेक वेळा सांगावे लागत नाही.अतिषय मितभाषी , पण जे बोलणार त्यात ठामपणा, बोलताना कोणाचीही भीडभाड बाळगणार नाही. कामाला वाघ. सलग एका जागी बसून काम उडवायची अजब क्षमता !संगणकावर त्याचे सतत काही प्रयोग चालूच असतात. स्वत:चे ज्ञान तो कायम अद्ययावत ठेवत असतो, आपल्या बरोबरच्यांनाही सतत मदत करत असतो. माझा कार्गो मधला अवतार संपल्यावर त्याने ज्या विभागाचे प्रोग़्रम लिहीले होते तिथे माझी बदली झाली. बापूंची प्रतिक्रीया होती "तुझी बदली मीच रद्द करतो, नाहीतर माझे काही खरे नाही !"आणि खरंच २ आठवस्यातच अनेक सुधारणा करण्यासाठी मी त्याचा पिच्छा पुरविला ! खरतर गेली १० वर्ष ते प्रोग्रँम वापरात होते, तो स्वत: सुद्धा दूसर्या अनेक व्यापात गळ्यापर्यंत बुडाला होता. तरीही त्याने मला रोज संध्याकाळी ४:३० च्या पुढची वेळ दिली. प्रसंगी ७ वाजेपर्यंत थांबून त्याने मी जे जे सांगितले ते ते मला करून दिले, ते ही अवघ्या ४ दिवसात, माझ्या समोरच ! एरवी याच कामाला कोणी हातही लावला नसता ! खरंच , तो gr8 आहे !तसा माझ्यामुळे त्याला शेयरचा नाद लागला, गुण नव्हताच पण वाण मात्र लागला. मग बापू या ही भानगडीत अखंड बूडाले. शास्त्रोक्त अभ्यास का काय तो केला त्याने. मग chartist बनून तो आता आम्हालाच टीप देत असतो !मध्ये मी त्याच्या मुलीकरता काही भन्नाट गेम कॉपी करून दिले. काल माझी त्याने चांगलीच फिरकी घेतली. तुझ्या गेमने माझा गेम झालाय. बायकोच तासंतास खेळत बसते. नसती भानगड माझ्यापाठी लावून दिलीस !हल्लीच त्याला त्यांच्या विभागात सहायक प्रबंधक म्हणून बढती मिळाली आहे. त्याला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: