बुधवार, २७ मे, २००९

आंब्याचे अर्थकारण !

कोकण म्हटले की निसर्गसंपन्न प्रदेश समोर उभा रहातो पण त्याच वेळी मागासलेला व दरीद्री ही विशेषणे सुद्धा आठवतात। लहानपणी केव्हातरी “पिकवतोले परब व खातोलो अरब” असे काहीसे कानी पडले होते. पुढे आजोबांबरोबर आंबा विक्रीच्या पैशाची वसूली करण्यासाठी दलालांच्या घरची , जे सर्व घाटावरचेच असत, पायपीट करताना खात्री पटली की “खपतो रायबा आणि गबर होतो घाटबा” हेच योग्य आहे. कोकणातल्या आंब्याची चव हंगामात सगळ्यात आधी श्रीमंत अरब जरूर चाखतो पण फ़ूकट नक्कीच नाही. मग हे पैसे जातात कोठे तर अडत्यांच्या घशात !
माझे आजोबा, वडीलांचे चुलते, तसे मुंबईला आंबा पाठवण्याचे धाडस करणारे पहील्या पिढीचे मँगो मर्चंट ! धंद्यातले अनेक बारकावे आत्मसात केलेले मुरब्बी आंबा उत्पादक / व्यापारी। मुंबईत भाव मिळत नाही असे समजल्यावर लगोलग माल मिरजेच्या वा बेळगावच्या बाजारात पाठवायची कल्पकता पण त्यांचीच. दरवर्षी जुन-जुलै मध्ये त्यांची मुंबईवारी असे. हेतू एकच, घाटावरच्या दलालांनी थकवलेले पैसे वसूल करणे. आधी बाबा त्यांची सोबत करत, मी मोठा झाल्यावर व मुंबईची चांगली माहीती झाल्यावर बाबांनी माझ्यावरच ते काम सोपवले. ( साधारण १९८० ते १९९०) आजोबा तेव्हा मुंबईतल्या निदान ५ दलालांकडे आपला माल पाठवत. दलाल पट्ट्या पाठवत पण हिशोब चूकता करण्यात बरीच टंगळ-मंगळ करत, त्यांच्या उरावर बसल्याशिवाय वसूली होत नसे ! आमची मोहीम सकाळी १० वाजता चालू होई. बहुतेक व्यापारी महात्मा फ़ुले मार्केट मधले असत. गाळ्यावर त्यांना गाठले कि सांगत पेढीवर जा व पेढीवर गेलो की सांगत गाळ्यावर जा ! कधी आताच तुमचा ड्राफ़्ट बनवायला माणूस गेला आहे अशीही लोणकढी थाप मारत. पण आजोबा पक्के खमके होते. उद्या येतो ड्राफ़्ट काढल्याची व पोस्ट केल्याची पावती तयार ठेवा म्हणून खडसावत. मग तो दलाल, तुम्ही आता एवढे आलाच आहात तर ड्राफ़्ट रद्द करतो, उद्या संध्याकाळी रोकड घेउन जा म्हणून सांगे ! पुढची पिढी आता मुंबईला माल पाठवतच नाही. सांगली, मिरज व बेळगावच त्यांना जवळचे वाटते, नाहीतर कॅनिंग आहेच !
मधल्या प्रवासात आजोबांशी अनेक बाबींवर चर्चा होई आणि आंब्याचा धंदा करणे येर्यागबाळ्याचे काम नाही हे उमगे ! आधी मला वाटे आजोबा या धंद्यात बखळ पैसा कमवतात। साधा हिशोब होता, मुंबईत आलेला पहीला आंबा हजार ते दोन हजार रूपयाला पेटी या भावाने खपत असे, मग साधारण १००० पेट्यांचे किती ? मग मी पट्ट्या तपासल्या तेव्हा थक्कच झालो. जास्तीत जास्त भाव ३०० रूपडे होता व कमी म्हणाल तर पार ५० रूपये , त्यात लाकडी पेटीचीच किंमत २५ रूपये असे ! हे पैसे पण सगळे मिळत नसतच, दलाल हिशोब करताना सतराशेसाठ कलमे लावून त्यातले बरेच पैसे वळते करून घेत ! आजोबांना मी अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडे व त्यातुनच उमगलेले आंब्याचे अर्थकारण असे,
कोकणातले आंबा उत्पादक पुर्वापार दलालांच्या मार्फ़तच आंबा विकतात। हे दलाल एकजात सर्व घाटावरचे आहेत. आंब्याचा हंगाम जरी एप्रिल-मे असा असला तरी त्यासाठी वर्षभर खपावे लागते. कलमांना वेळोवेळी फ़वारणी , खते देणे, बागेतली तणे उपटणे या साठी पैसा लागतो. कोकणातल्या माणसाला कडकीने कायमचे घेरलेले. त्याची ही अडचण बघुन घाटावरले दलाल जानेवारीच्या आसपास कोकणात येतात व बाग मालकांना आगाउ रक्कम देउन बांधून घेतात. उत्पादकाला अगदी सुरवातीला चांगल्या भावाच्या पट्ट्या पाठवतात व मग मात्र भाव पाडून त्याला चांगलेच कोंडीत पकडतात. बरे हे पैसे सुद्धा द्यायला त्याला अनेक खेटे घालावे लागतात. माल कोवळा निघाला, ट्रकला अपघात झाला, गोदीतल्या संपाने भाव कोसळला ही व अशी हजारो कारणे त्यांच्याकडे तयार असतात. ३०० ते ५० हा पेटीला भाव देणारे दलाल याच पेट्या बड्या धेंडाना अवाच्या सवा भावाने विकतात व गबर होतात. आता तर स्थिती अशी आहे की परप्रांतातले व्यापारी , ज्यांना आंब्यातले काडीही समजत नाही, ते सुद्धा आंबा मोहरण्याच्या सुमारास येउन बागाच्या बागा खरेदी करतात ! कोकणी माणूस सुद्धा धंद्यातल्या अनिश्चिततेला घावरून जे मिळेल ते घेउन गप्प बसतो. यापुढे कोकणात गेल्यावर खायला आंबाच मिळणार नाही असे झाल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही !
हल्ली कोकणातला आंबा उत्पादक कॅनिंगच्या कच्छपि गेला आहे. सब घोडा बारा टक्का, या न्यायाने कॅनिंगवाले किलोच्या भावाने कलमी आंबा विकत घेतात व रोकडा पैसा देतात. आंबा उत्पादक म्हणतो मस्त आहे, आंबा नुसता उतरवायचा, प्रतवारी करायची गरज नाही, पेट्यात भरायची कटकट नाही, दलालांकडून फ़रपट नाही. पोत्यात आंबा भरा व रोकडे मोजून घ्या ! तसेही आमराईत खपायला, राखायला गडी कोठे मिळ्तात ?
सहकारी पतपेढ्या जवळपास नाहीतच ! आजोबांच्या घरी अनेकवेळा जिल्हा सहकारी संस्थचे गट विकास अधिकारी येत व सांगत की बोगस का होईना, सहकारी संस्था स्थापन करा, सर्व सभासदांच्या नावाने कर्ज घ्या व खुषाल बुडवा, निधी परत चालला आहे, पण छे ! काही उपयोग होत नसे. आंबा उत्पादक कधी संघटीत झालेच नाहीत, तसे प्रयत्न झाले , आप्पासाहेब गोगटे , जे पुढे रत्नागिरीचे आमदार सुद्धा झाले, त्यांचे कार्य नक्कीच उल्लेखनीय आहे, पण तो पॅटर्न कोकणभर राबवला गेला नाही, घाटावरच्या दलालांची मक्तेदारी तुटली नाही. आंबा पिकतो, रस गळ्तो पण कोकणचा राजा स्वत: झिम्मा खेळत नाही, नुसते बघतो ! शिमगा मात्र करतो ! या शापित प्रदेशाला काही उ:शाप आहे की नाही ?

गीतेचा खप कसा वाढवावा ?

गीता, आपला धर्मग्रंथ, एवढेच आपल्याला माहीती असते, त्या पुढे घरी एखादी गीतेची प्रत असणे, त्याचे वाचन करणे, मनन, आचरण या खूपच लांबच्या बाता झाल्या. तसे चोप्रांच्या करणीने “कर्मण्ये वाधिका रस्ते” हे सुद्धा बर्याच लोकांना ठावकी झाले आहे, पण गीता पाठ करण्यापेक्षा तिच्याकडे पाठ करणेच अनेक जण पसंत करतात. तसे गीता हे नाव म्हणून भलतेच पॉप्युलर आहे पण नाव ठेउन गीतेची गोडी वाढली असा काही अनुभव नाही. अथर्वशीर्ष पाठ केल्यावर आवर्तने करून चार पैसे कनवटीला मारता येतात, त्याची फ़लश्रूती सुद्धा आहे तेव्हा साहजिकच लोकांचा ओढा तिकडेच जास्त. गीता शिकून मला काय मिळणार असा रोकडा सवाल आल्यावर गीतेचा प्रचारक निरुत्तरच होतो. तसे मध्ये छापून आले होते की गीता संपूर्ण पाठ असलेल्याचा कांची-कामेठी पीठाचे शंकराचार्य रोख पुरस्कार देउन सत्कार करतात, पण त्याची खातरजमा प्रयत्न करूनही होत नाही आहे. हल्ली माझे बाबा मात्र असे प्रश्न विचारण्याला शौचाला जाउन तुला काय मिळते ?’ असा बिनतोड उलट प्रश्न विचारतात.

गीतेचा पुस्तक रूपाने तरी प्रचार व्हावा म्हणून अनेक संस्था झटत आहेत, त्यात गीता प्रेस, गोरखपुरचे योगदान प्रचंड आहे. कल्पकतेने, अनेक प्रकारे गीतेची पुस्तके त्यांनी बाजारात आणली आहेत, जसे गीता डायरी, खिषात राहील अशी गीता, मोठ्या टायपातली गीता, सर्व भारतीय भाषांमध्ये अर्था सहीत गीता. दर्जेदार छपाई असूनही त्यांच्या किमती सुद्धा विश्वास बसणार नाही एवढ्या कमी आहेत. सर्व प्रमुख शहरात त्यांची दूकाने आहेत, पण त्यात बहुदा कोणी फ़िरकत सुद्धा नाही. हरे राम पंथीयांनी मग यातुनच बोध घेतला व गल्लोगल्ली मोटारचा वापर करून गीता व त्यावर आधारीत पुस्तके विकायला सुरवात केली. किमती माफ़क ठेउन सुद्धा लोकांनी तिकडेही पाठच फ़िरवली , तशा अगरबत्ती, जपाची माळ असे आयटम खपल्याने विकणारे खपले नाहीत एवढेच ! लोक रस्त्यावर गीता घेत नाहीत मग आपण थेट ती लोकलमध्येच जाउन का विकु नये , असे वाटून आता त्या पंथाचे तरूण प्रचारक लोकलच्या डब्या डब्यातुन गीतेची पुस्तके विकताना दिसतात. बिचारे अगदी कळवळुन गीता घ्या असे लोकांना सांगत असतात पण लोक काही वळत नाहीत. अहो विकत घेउ नका, निदान चाळून तरी बघा, निदान हातात तरी घ्या असे सांगत ते जेव्हा गीता लोकांच्या हातात ठेवतात तेव्हा लोक झुरळ झटकल्याप्रमाणे ते पुस्तक झटकून टाकतात !

हे रोज रोज बघुन माझी एक अजब घुसमट होत होती. असाच डब्यात एक प्रचारक हताश हो़उन माझ्या जवळच बसला. मी विचारले की साधारण किती पुस्तके खपतात ? त्याचे उत्तर होते, दिवसभरात फ़ारतर दोन ते चार , एखादा दिवस तर एकही प्रत विकली जात नाही ! पनवेल यायला अजून १५ तरी मिनीटे होती, डबा सुद्धा भरलेला होता. माझ्यात काय संचारले कोणास ठाउक, त्याची पुस्तकानी भरलेली झोळी मी माझ्या गळ्यात अडकवली, डब्याच्या मधोमध उभे राहुन सर्वांना खणखणीत आवाजात प्रश्न विचारले .. किती जण स्वत:ला हिंदू समजतात ? त्यांनी हात वर करा .. बहुसंख्य हात आपसूकच वर गेले. मग आपला धर्मग्रंथ कोणता ? गीता असे अनेक जण पुटपुटले ! मग मी विचारले की डब्यात कोणी ख्रिश्चन, मुस्लीम , शीख असतील तर त्यांच्या घरात बायबल, कुराण, ग्रंथसाहेबा असतील व ते त्यांनी वाचलेही असतील असे विचारायला हवे का ? सुदैवाने असे इतर धर्माचे सुद्धा कोणी ना कोणी होते व त्यांनी एकमुखाने हे आमच्या घरी आहे व ते वाचले नाही तर आम्ही आमचा धर्म सांगू कोणत्या तोंडाने, असेही सुनावले ! मग थोडा पॉज घेउन मी किती हिंदूच्या घरी निदान एक तरी गीतेची प्रत आहे ? असे विचारतात लोकल मध्ये सन्नाटा पसरला. स्वत:ला हिंदू समजता व आपल्या धर्मग्रंथाची प्रत शोभेला सुद्धा आपल्या घरात नाही असे सांगताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही असे कडाडताच डब्यात खळबळ उडाली ! अहो गीता वाचु नका निदान घरात ठेवा तरी असे शेवटी कळकळीने आवाहन करताच, मला द्या, मला द्या असा एकच गलका उडाला. २० रूपयाला एक प्रमाणे झोळीतले शेवटचे पुस्तक संपले तेव्हा गाडी पनवेल स्थानकात शिरत होती. साधारण शंभर पुस्तके हातोहात खपली होती. अनेक लोकांना पुस्तक हवे असूनही मिळाले नव्हते.

पनवेल स्थानकात एका बाकड्यावर बसून मी रिकामी झोळी व सर्व पैसे त्या प्रचारकाच्या ताब्यात दिले तेव्हा त्याची अवस्था बघण्यासारखी होती. डोळ्यातुन अश्रू घळाघळा वहात असतानात माझा हात हातात घेउन त्याने “ किशनजी की लीला अगाध है” एवढेच उदगार काढले. लोकल परत सीएसटीच्या दिशेने रवाना होण्यापुर्वीच त्याने ती पकडली व मार्गस्थ झाला. गीता प्रचाराच्या प्रवित्र कार्यात आपली सुद्धा एक मुठ पडली या विचारातच मी घर गाठले.

बाय द वे, तुमच्या घरे आहे का हो गीता ?

मंगळवार, २६ मे, २००९

शेन वॉर्न आणि सचिन, चकमक आणि युद्ध !

सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न – क्रिकेट मधली दोन दैवते ! चालत्या बोलत्या दंतकथा ! त्यांची थोरवी आता म्या पामराने काय वर्णावी ? क्रिकेटचा ओरिजिनल डॉन या दोघांनाच आपल्या वाढदिवसाचे एक्स्लुजिव आमंत्रण देतो यातच सर्व आले ! शेन सचिनला थोडा सिनियर असावा कारण आपल्या पदार्पणापासून सचिन त्याला झोडपतच मोठा झाला आहे. आता शेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन निवृत्ति पत्करून सुद्धा बराच काळ झाला आहे व त्याचा बळींचा विक्रम सुद्धा मुरलीधरनने मोडीत काढला आहे. मुरली चेंडू फ़ेकतो व शेनची शैली अगदी क्लीन होती. जेमतेम दोन पावले तो जे चालायचा त्याला रनअप असे म्हणणे सुद्धा अतिरेक होईल. फ़लंदाजाच्या ढेंगेमागुन दांडी उडवायचे कसब फ़क्त तोच करू जाणे ! सचिन मात्र अजूनही आपल्या बॅटचे पाणी पाजतच आहे व आता सिद्ध करण्यासारखे त्याला काहीही उरले नाही. जगज्जेत्ता सिकंदर , आता जिंकायला काही उरले नाही म्हणून (म्हणे) रडला होता, सचिनने सुद्धा फ़लंदाजीत काही करायचे शिल्लक ठेवलेले नाही, तसे कसोटी त्रिशतक किंवा लारासारखे चौशतक, वनडे मध्ये द्वीशतक बाकी आहे, पण त्याने काही त्याची महानता कमी होत नाही. शेन फ़लंदाज नव्हताच, सचिनने धावांचे डोंगर रचतानाच बळींच्या खात्यात पण चांगलीच भर घातली आहे, अनेक नामचीन फ़लंदाजांची डोकी त्याच्या शिकारखान्यात पेंढा भरून ठेवलेली आहेत.

दोन बड्यांची तुलना करायची खोड तशी जुनीच आहे. त्या मुळे शेन व सचिनची तुलना होतच राहीली. खरेतर सचिन फ़लंदाज अधिक उपयुक्त गोलंदाज व शेन निखळ गोलंदाज, तुलना करणार तरी कशाची ? पण मोह आवरत नाही. नुसती तुलना करून थांबतील ते क्रिकेटवेडे कसे ? त्यातही डावे-उजवे आलेच, कोण श्रेष्ठ ? दोघेही आपापल्या क्षेत्रात दिग्गज , प्रचंड लोकप्रिय, प्रतिस्पर्ध्याला पुरते नामोहरम करणारे, संघाचे तारणहार. शेन कधी कप्तान झालाच नाही आणि सचिन आपण कधी काळी कप्तान होतो हे विसरणेच योग्य समजेल. त्यांच्यातली साम्ये इथेच संपतात. मैदानवाहेर तर त्यांच्यात कमालीचा फ़रक आहे. सचिनचे पाय कायमच जमिनीवर राहीले, शेन उतला, मातला व घसरला सुद्धा ! ऐन विश्वचषकात अंमली पदार्थ घेतल्याचे सिद्ध झाल्याने त्याची जागतिक छी-थू झाली, काही काळ खेळण्यावर सुद्धा बंदी आली. शेन त्यातुनही सही-सलामत सुटला व यशस्वी पुनरागमन करता झाला. यशाच्या सर्वौच्च शिखरावर असतानाच सन्मानाने निवृत्त झाला , पण एक खंत मनात ठेउनच, सचिन त्याच्यापेक्षा काकणभर सरसच ठरला होता ! हे दोघे जेव्हा-जेव्हा आमने-सामने आले तेव्हा-तेव्हा सचिनने शेनला आपल्या बॅटचा हिसका दाखवलाच. स्वत: शेनने पण दिलखुलास कबुली दिली की सचिन आपल्या स्वप्नात पण येतो व सरसावत षटकार खेचतो ! दोघेही एकमेकांना मानतात, खुल्या दिलाने एकमेकांची तारीफ़ करतात पण त्यांच्या चाहत्यांना हे मान्य नाही. आतापर्यंत शेनची जादू सचिनवर कधीही चालली नाही, (सचिनच काय, तसे कोणाच भारतीयावर चालली नाही) तेव्हा शेन निवृत्त झाल्यावर हिसाब चुकता होणारच नाही याची खंत शेनच्या समर्थकांना स्वस्थ बसू देत नव्हती. जणु चमत्कार झाल्याप्रमाणे आयपीएल चे ऐलान झाले त्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार म्हणून शेनने पुन्हा अवतार घेतला, समोर सचिन मुंबई इंडीयन्सचा कर्णधार या रूपात उभा होताच. पहील्या स्पर्धेत शेनने असामान्य नेतृत्व गुण दाखवत सगळ्यात दुबळ्या संघाला विजयी केले, तिकडे सचिनचा संघ, मोठे-मोठे दिग्गज असतानाही भुईसपाट झाला. सचिन-शेनची आमने-सामने गाठच पडली नाही ! शेनवरील कलंक कायमच राहीला ! दूसर्या स्पर्धेत उभय संघातला पहीला सामना पावसाने वाहुन गेला. दूसरा सामना दोन्ही संघाच्या जीवन-मरणाचा प्रश्न होता म्हणूनच त्याला वेगळे आयाम लाभले, त्यात सचिन आणि शेन अशी लढत होणार होतीच वर त्यात ते आपापल्या संघाची धुरा वाहणार होते. परत असा योग येइल अशी फ़ारशी शक्यता नाही. दोन दिग्गजांमधील ती अंतिम लढाई होती. जखमी असूनही शेन, निव्वळ सचिनशी दोन हात करायची अंतिम संधी साधायचीच, याच इराद्याने मैदानात उतरला होता. दोघांचे चाहते धडधडत्या छातीने सामना डोळ्यात साठवत होते. अंतिम युद्ध !

मी टी.व्ही. ऑन केला तेव्हा सचिनने लागोपाठ तीन चौके हाणुन संघाला परत विजयाच्या वाटेवर आणले होते. धावगती आटोक्यात होती, विकेट सुद्धा शाबुत होत्या, सचिनने फ़क्त कॅरी करायची गरज होती. शेनने आधीच्या तीन षटकात फ़क्त १२ धावा दिल्या होत्या व दोन गडी टीपले होते. सचिन समोर असतानाच त्याने स्वत:च्या हातात चेंडू घेतला तेव्हा मी हादरलोच. शेन जुगारच खेळत होता. सचिनला सुर गवसला असताना त्याने खरेतर आपले षटक राखायला हवे होते , स्वत:च्या प्रतिष्ठेपायी संघाला धोका द्यायची काही गरज होती का ? पण तसेही त्याला दूसरा पर्याय तरी कोठे होता ? समोर सचिन भरात असताना इतर कोणाच्याही हाती चेंडू देणेच जास्त धोक्याचे होते. आणि तसे त्याच्या कडे गमावण्यासारखे होतेच काय ? सचिनने त्याला आधी अनेकदा फ़ोडले होते, त्यात फ़ारतर ’अजून एकदा’ असे झाले असते. पण सचिनला जर त्याला बाद करता आले असते तर मात्र त्याची पहीली पापे पार धुतली गेली असती, शेवटच्या संधीचे सोने शेनला करायलाच हवे होते !

आता सचिनच्या बाजुने विचार करू. तो आपल्या संघाचा कर्णधार होता. विजय त्याला हवाच होता. तो मैदानावर असेपर्यंत पराभवाचा विचारच कोणाच्या डोक्यात नव्हता. शेन जुगार खेळत होता म्हणून त्याला तो खेळायलाच हवा होता, असे काहीही नव्हते. जरा आठवा, निव्वळ सचिनचा करीष्मा जाणुन, “सचिनला फ़ोडले“ या मोठेपणापेक्षा संघाचा विजय महत्वाचा मानुन लारा, इंझमाम हक सारख्या फ़लंदाजांनी सचिनचे अख्खे षटक मान खाली घालुन तटवले होते ! सचिनला पण तो पर्याय खुला होता. शेनच्या पहील्याच चेंडूवर वाईड अधिक धावुन दोन अशा तीन धावा अनायसे मिळाल्याच होत्या. दूसरा चेंडू सचिन पार चकला होता, तेव्हाही त्याला स्वत:ला आवरता आले असते, पण शेनवर कायम हावी होण्याच्या नादात त्याचे भान सूटले. पुढचा चेंडू स्वीप करायचा त्याला प्रयत्न सपशेल फ़सला, चेंडू त्याच्या पॅडवर आदळला, शेनने जोरदार अपील केले व पंचाचे बोट आकाशाच्या दिशेने गेले ! सचिनचाच नाही, मुंबई संघाचाच निक्काल लागला होता जणू ! शेनने केलेला जल्लोश बघण्यासारखाच होता ! “बचेंगे तो और बी लडेंगे” याच खुमखुमीने दुखापती विसरून तो या अंतिम युद्धात उतरला होता व शेवटी निर्विवाद विजेता ठरला होता. अर्थात सचिनचा अपमान मात्र करण्यास तो धजावला नाही, एरवी दूसर्या कोणाही ऑसीने हा मोका सोडला नसता, अश्लील हावभाव करत, तोंडाने शिव्यांची लाखोली वहात ते सचिनवर धावून गेले असतेच असते. पण का कोणास ठाउक शेन या क्षणी तरी मातला नाही. सचिनला निराशा लपवता आली नाही पण पायचीतचा निर्णय त्याने खिलाडूपणे मान्य केला व आपल्या लौकीकाला जागला. जे सचिनने कर्णधार म्हणून केले नाही, त्याचीच नक्कल मग अजिंक्य रहाणेने केली, दोन षटकार खेचल्यावर स्टंप सोडून खेळायची काहीच गरज नव्हती. तसेच भज्जीला विकेट शिल्लकच नाही अशा स्थितीत , शेवटच्या चेंडूपर्यंत वाट बघता नसती का आली ? पण अर्थात या झाल्या जर-तरच्या गोष्टी, जिथे कप्तानच वाहवत जातो तिकडे शिलेदारांकडून अपेक्षा तरी का ठेवायची ? निर्णायक क्षणी शेनला आपली कामगिरी उंचावता आली, सचिन मात्र नेहमीसारखाच या बाबतीत या वेळीही कमीच पडला ! असंख्य चकमकी हरल्यानंतर , अंतिम युद्धात मात्र शेनच जेता ठरला. शेन वॉर्नच्या जिद्दीला माझा सलाम. कोणी हरो-जिंको, क्रीकेट जिंकले, फ़ायटींग स्पिरीट जिंकले , मला एवढेच पुरे !

सोमवार, १८ मे, २००९

प्रोटोकॉल !

चेयरमनचा पीए म्हणून नियुक्ती झाल्याला काही महीनेच झाले होते. कामाची हळूहळू माहीती होत चालली होती, वावरण्यात आत्मविश्वास, आवाजात नम्रता आणि ठामपणा येउ लागला होता. डोक्यावर बर्फ़ ठेउन, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जायची मनाची तयारी होत होती. अति-महत्वाच्या व्यक्तींचे फ़ोन कसे घ्यायचे , त्यांचे प्रोटोकॉल काय असतात, याच्या बर्याच टीप्स आधीपासूनच तिथे असलेल्या सहाकार्यांनी दिल्या होत्या त्याचा तर खूपच उपयोग होत होता. असाच एका माजी खूप बड्या अधिकार्याने फ़ोन केला. अत्यंत उर्मटपणे माझ्या गोदी व रोड पासचे काय झाले अशी विचारणा केली. मी त्यांचे नाव अदबीने विचारून घेतले व चौकशी करून, स्वत: फ़ोन करून कळवतो म्हणून सांगितले. लगोलाग फ़ोना-फ़ोनी करून सर्व माहीती काढली तेव्हा कळले की त्यांचे जुने पास संपून काही दिवसच झाले होते पण त्यांना त्याच्या नूतनीकरणासाठी अर्ज केलाच नव्हता. मी त्यांना फ़ोन करून हे सांगितले व एक अर्ज द्या , सोबत आपले जुने पास पण पाठवुन द्या म्हणून सांगितले. आता त्यांनी माझे नाव विचारले व मराठे, म्हणजे मराठी माणूस, असे म्हणत एवढा वेळ फ़र्ड्या इंग्रजीत बोलणारे ते मराठीत बोलु लागले. पण टोन तोच ! “अहो, तुम्हाला कळते आहे माझा पास संपला आहे, तर तुम्ही तो स्वत:हुन नूतनीकरण करून मला का नाही पाठवला, का पेन्शनर देतो तसे हयात प्रमाणपत्र द्यायचे होते मी ? बरे, मी अर्ज करतो पण उद्याच मला पुण्याला जायचे आहे तेव्हा माझ्यासाठी वनडे पास बनवा. “ त्यांचा मुद्दा अजबच होता, पण करतो काय, माजी बडे अधिकारी पडले ते ! मी त्यांना समजावले की एका दिवसात पास देणे अशक्य आहे, तरीही मी सर्व गेटला , तसेच टोल नाक्याच्या दोन्ही टोकांना फ़ोन करून सूचना देउन ठेवतो, मला तुमचा गाडी नंबर द्या, आणि साधारण वेळ कळवा. या वर ते एकदम खुष झाले व व्हेरी गुड असे म्हणाले. जरा वेळाने त्यांनी परत फ़ोन करून माझा मोबाईल नंबर घेतला का तर वाटेत कोठे अडचण आली तर ? मी सर्व गेटना फ़ोन करून त्यांचा गाडी नंबर दिला, साधारण वेळ दिली, त्यांच्याकडे कोणताही पास नाही पण ते माजी बडे अधिकारी असल्याने त्यांना आडकाठी करू नका असे सांगितले. दूसर्या दिवशी रविवार होता तरी घरून फ़ोन करून ते व्यवस्थित मार्गस्थ झाल्याची खात्री करून घेतली. चार दिवसानी परत त्यांनी अगदी पहाटे फ़ोन केला व मी आता पुण्याहुन परत निघालो आहे, तेव्हा जाताना केलीत तशीच व्यवस्था करायला सांगितले, ते पण काम केले तेव्हा साहेव एकदम खुष झाला ! दोन दिवसानी त्यांनी रितसर अर्ज केला, मी तो माझ्या साहेबांची सही घेउन संबंधित दोन विभागांकडे पाठवुन सुद्धा दिला.

असाच एकदा मला त्यांनी रजेच्या दिवशी, अवेळी फ़ोन केला. तुमचा गेटचा स्टाफ़ ओळख दाखवुनही मला आत सोडत नाही अशी तक्रार केली. मी चौकशी केल्यावर कळले की पास त्यांचा एकट्याचाच आहे, सोबत चालक आहे, बायको आहे एकवेळ त्यांनाही सोडू पण अजून एक आहे त्याला कसे सोडू ? तेव्हा मी बड्या साहेबांना समजावले की सुरक्षा सध्या थोडी कडक आहे, कृपया सहकार्य करा, तुम्ही बाहेरच्या रस्त्याने आमचा टोल नाका गाठा. थोड्या वेळाने परत फ़ोन, “तुम्ही काय माझा सतत पाण़उतारा करायचे ठरवले आहे काय ? मी कोण आहे माहीत आहे ना ? तुमचा हा फ़डतूस क्लार्क म्हणतो माझ्याकडचा पास इकडे चालणार नाही म्हणून, काय चाललाय काय ? चौकशी केल्यावर कळले की त्यांना अजून रोड पास दिलाच गेला नाही आहे. अर्थात ही चूक आमचीच असल्याने मी परत फ़ोनवरच सूचना देउन त्यांचा मार्ग मोकळा केला, जायचा व यायचा सुद्धा ! मग कामावर पोचल्यावर त्यांच्या रोड पासचे लाल फ़ितीत अडकलेले काम सुद्धा मार्गी लावले.

त्या नंतर २६/११ घडले, सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी फ़क्त एकच गेट उघडे ठेवले गेले, त्याचा एक अनपेक्षित फ़ायदा झाला ! फ़ोर्ट मधुन कल्याण, पुणे दिशेला जायचे असेल तर पी.डीमेली रोड, वाडीबंदर येथे प्रचंड वाहतुक कोंडीचा सामना करायला लागतो. बडे अधिकारी आमचा गोदी पास फ़्री घेउन फ़ोर्टे च्या ग्रे-गेट मधुन आत प्रवेश करून थेट माझगावला बाहेर पडत, पुढे लगेच आमचा रस्ता आहे तो थेट माहुलला जातो ! गोदीतल्या कंटेनर वाहतुक जलद व्हावी म्हणून तो बांधला गेला, आधी तो पुर्ण त्याच कामासाठी होता. पुढे गोदीतली कंटेनर वाहतुक जवळ जवळ बंदच पडल्याने, त्याची देखभाल परवडावी म्हणून तो टोल घेउन सर्वाना मोकळा केला गेला. अर्थात बड्यांना त्याचाही फ़्री पास द्यायला लागतो. आता कर्नाक बंदरचे एकच गेट उघडे असल्याने गोदी पास निरर्थकच ठरला होता. हे झाल्यावर गोदीत एक कार्येक्रम होता, त्याचे ठीकाण ग्रे-गेट कडून अगदी जवळ होते, साहेबाना तिकडे जायचे होते. वळसा वाचावा म्हणून ग्रे-गेट समोर गाडी उभी करून ते उघडायची तयारी चालु झाली. तेव्हा साहेब गाडीतुन खाली उतरले. माझ्यासाठी सुद्धा कोणताही नियम मोडायची गरज नाही. गाडी बाहेरच राहू दे, मी चक्रीने आत जातो ! योग्य तो सिग्नल गोदीला मिळाला ! नियम म्हणजे नियम ! काही दिवसानी कस्टम्सच्या एका पायलट बोटीचे अनावरण करायचे होते. त्यांनी विशेष बाब म्हणून ग्रे-गेट उघडायची विनंती(?) केली. साहेवांनी ती नम्र पणे फ़ेटाळली. मग सुरू झाले दबावाचे राजकारण, साहेबानी त्यालाही भीक घातली नाही. तेव्हा गेटच्या बाहेर एक ,व आत एक गाडी उभी करून तो पेच सोडवला गेला.

काही दिवसांनी परत ’त्यांचा’ फ़ोन आला. तुमचा स्टाफ़ मला आत घेत नाही. हा काय प्रकार आहे ? मी त्यांना समजावुन सांगितले की आत जाउन तुमचा काहीही फ़ायदा नाही, कारण त्याच गेटने तुम्हाला बाहेर पडावे लागेल, हकनाक वळसा पडेल. मग हा पास फ़ूकटच आहे म्हणजे ! असा खवचट शेरा ऐकावा लागला .( हे दूसर्या अर्थाने सुद्धा खरेच होते !) मग बर्याच महीन्यानी त्यांचा परत फ़ोन आला, तुमचा स्टाफ़ मला बाहेर सोडत नाही म्हणून. वर तुमचे नाव सांगितल्यावर ओळखत नाही असे गुर्मीत म्हणतो ! तुम्ही एवढे चेयरमनचे सचिव आणि तुम्हाला ओळखत नाही म्हणजे काय ? मी चकीत झालो, बाहेर पडायला हे मूळात आत शिरले तरी कसे ? नवी व्यवस्था त्यांना माहीत होती. त्यांना मी याची नम्रपणे जाणीव करून दिली तेव्हा ते चुकून आलो, आता एवढा आलोच आहे, तर एकवेळ सोडा ! मला खूप घाई आहे. आणि माझे जाउ दे हो, तुम्हाला पण तो किंमत देत नाही म्हणजे काय ? त्याचा रीपोर्टच करा ! बोलण्याच्या ओघात ते असेही बोलून बसले की या आधी तुमचे नाव सांगितल्यावर दोनदा मला सोडले गेले आहे ! मला क्षणात सर्व परीस्थीतेचे आकलन झाले. त्यांचा चूकलो, हा सरळ सरळ कांगावा होता, उलट माझे नाव सांगून तो दोनदा असे गेला होता, सोकावला होता ! मला आता हरभर्याच्या झाडावर चढवुन आपले काम होईल असे त्याला वाटले असावे. मी त्यांना सांगितले की आपण स्वत: जबाबदार माजी अधिकारी आहात, नियम तुम्हीच तोडणार असाल तर त्याला अर्थ काय ? आमचे साहेब स्वत: या बाबतीत आदर्श घालुन देत असताना आम्ही तुमचा तरी अपवाद का करायचा ? तुम्ही कृपया गाडी परत फ़ीरवा व आलात तसेच बाहेर जा. लगेच मी इंटरकॉम वरून फ़ोन करून गेट-कीपरला सक्त ताकीद दिली कि कोणत्याही स्थितीत गेट उघडायचे नाही ! पाच मिनीटाने त्या गेट कीपरने फ़ोन केला व साहेब तो जामच तमाशा करतोय, थयथयाट चालला आहे नुसता, मोठी मोठी नावे घेत आहे, सोडू का एक वेळ ? मधल्या मध्ये आमच्यावर संक्रात ओढवायची, तुम्ही नामा-निराळे व्हाल. मी म्हटले अजिबात नाही. मी तुमच्या पाठीशी आहे, निर्धास्त रहा ! ते गेट तोडू तर नक्कीच शकणार नाहीत. तुम्ही त्यांना कोणतेही उत्तर देउ नका, अगदीच वेळ आली तर मला फ़ोन करा. पुढची सलग दहा मिनीटे तो बडा माझा मोबाईल ट्राय करत होता, मी तो घेतला पण नाही. मग त्यांचा संयम संपला व त्यांनी चक्क एसेमेस केला “you bloody fool, I will teach you a lesson”. मग मात्र मी त्यांना उलट फ़ोन करून ठामपणे सांगितले “इनफ़ इज इनफ़ ! एसेमेस करून तुम्ही मला भक्कम पुरावा दिलात त्याबद्दल धन्यवाद ! तमाशा बंद करा, गुमान गाडी परत फ़िरवा, दहाव्या मिनीटाला तुम्ही बाहेर नाही पडलात, तर मी हा सर्व प्रकार चेयरमन साहेबांना कळवीन. तुमचा रोडचा पास मग रद्द सुद्धा होईल, mind this well ! मग मात्र तो जमिनीवर आला, ते गेट बाहेर गेल्याचा मेसेज दूसर्याच मिनीटाला मिळाला. काही वेळाने फ़ोन करून त्यांनी चक्क माफ़ी मागितली, झाले गेले विसरून जा, प्रकरण वाढवू नका अशी गळ घातली.

या एकाच प्रसंगातुन बरेच शिकता आले. हे शक्य झाले अर्थात साहेबांनी स्वत:च्या आचरणातुन एक आदर्श घालुन दिला होता म्हणूनच !

ओझे !

जन्माला येताना काही पौंडाचा का असेना, बोज बनून आलेलेच असतो आपण सर्व, पुढे खायला काळ आणि भुईला भार होतो ते अगदी खरा काळ येईपर्यंत. त्यातही हिंदू असाल तर तुमच्या नश्वर देहाची राख तरी होते, एरवी तो ही थडग्याचे अधिकचे ओझे अंगावर घेउन कयामतच्या दिनाची वाट पहात राहतो ! हे अजडाचे ओझे मग पेलतो आधी जडाकडे वळतो.

मल स्वत:ला कोठेही सडाफ़टींग जायला आवडते, अगदीच नाइलाज असेल तर किमान ओझेच मी नेतो. कोठे जाण्यासाठी आम्ही मित्र स्टेशनला जमलो की मित्रांना मी काहीच कसे घेतले नाही याचा धक्का बसतो, मला त्यांचे सामान बघून नक्की किती दिवस जायचे आहे असा प्रश्न पडतो ! आजपर्यंत मला कधीही कुली करावा लागला नाही. नाही, पैसे तर वाचतातच पण आपले ओझे दूसर्याच्या मानेवर द्यायला नाही आवडत, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे ! तसे जाताना माझे ओझे असते त्यापेक्षा कमीच होते कारण मी बाहेर शॉपिंग कधीही करत नाहीच शिवाय माझ्या काही वस्तु तिकडेच सोडून सुद्धा यतो, अर्थात विसरून !
ओझी सुसह्य व्हावी म्हणून बाजारात विविध प्रकार आहेत, वळकट्या , ट्रंका, पेटारे, एयर बॅग्स, सॅक, सूटकेसेस, त्यात परत त्यांना चाके लावायची सोय सुद्धा असते ! पण त्यांचेही स्वत:चे काही वजन असतेच ना ? अजून हास्यास्पद म्हणजे त्यांना कुलपे सुद्धा असतात ! अरे जर आत सोने असेल आणि कुलुप उघडत नसेल तर चोर काय बॅग कापून किती नुकसान होईल याचा विचार करत बसणार का ? बरे अगदी ऐन वक्ताला त्या धोका देतातच. कधी त्यांचे बंद तूटतात, चेन फ़सते, किल्ल्या हरवतात, मुठ हातामध्ये येते व मग जी त्रेधा उडते ती बघण्यासारखीच असते ! त्यांचे आकार सुद्धा रेल्वेचा किंवा बसचा रॅक, मोटारची डीकी यात नीट बसावे असे प्रमाणित नसतात आंइ मग पायाला साखळी बांधल्या सारखे ते घेउन बसावे लागते.

औरंगाबादला माझे लग्न झाले, आता संसाराचे ओझे पेलावे लागणारच होते पण “ही” सोबत जी आली ती चार सूटकेस घेउन ! बाबांनी माझ्याकडे पाहीले व माझा क्रोधाग्नी भडकायच्या आत त्यांनी मला नजरेने दामटले, मी गप्प बसलो. लग्न झाल्यावर डबा नियमित मिळू लागला. तो न्यायला आधी पाउच होता, पण तो विसरायची भीती होती म्हणुन हीने मला एक एयर बॅग घ्यायला लावली. मग आता जागा आहेच तर एक लहान पाण्याची बाटली, एक फ़ळ, नॅपकीन, बिस्कीटचा पुडा, काही सामान येताना आणायला सांगितले तर एक नायलॉनची पिशवी ! ही सगळी भर तिने घातल्यावर मी तरी का मागे राहु ? मी सुद्धा लोकलमध्ये वाचण्यासाठी गीतेचे पुस्तक, चष्मा – जो मी कधीही लावला नाही, अधिकची पेने, मोबाईल चार्जर, त्याचा इयरफ़ोन, कोरे कागद , चेक बुक , डायरी अशी भर घातली. आता त्या एयर बॅगचेच ओझे एवढे झाले आहे की डबा नसेल तेव्हा ही मी ती घेउन जातो, कारण अगदी हलके वाटून करमत नाही म्हणून ! मुलांना ती अलीबाबाची गुहाच वाटते !

अनेक बाबतीत आमची टोकाची मते आहेत, त्यात कोठे जाताना लगेज किती न्यायचे यावर प्रचंडच मतभेद आहेत. हीच्या मते जेवढे दिवस मुक्काम तेवढे कपड्याचे जोड हवेत, माझ्या मते एक दांडीला व एक … ! तेच कपडे पुन्हा घातले तर आपल्याला कोण ओळखतो आहे बाहेर गावी ? पण हल्ली वाद नको म्हणून मी कोठे मुक्कामाला जायचे असले की तिलाच सामान भरायला सांगतो. रात्री सगळ्या तयारीचा आढावा घेताना लगेजची तपासणी होते. कपड्यांच्या दोन मोठ्या सूटकेस, खाण्याची एक पिशवी, पिण्याच्या पाण्याची एक पिशवी, भेट-वस्तुंची एक पिशवी, एक अधिकची बॅग , येताना काही आणण्यासाठी, एक स्लीपरची पिशवी , आणि हे काय, पारलेची बिस्कीटे २ किलो ? ती नाही का तिकडे मिळत ? आणि एवढ्या प्रवासात त्यांचा चुरा नाही का होणार ? यावर तिचे उत्तर, अरे, पार्ले बिस्किटच्या फ़ॅक्टरीत गेले होते ना, तिकडे घेतली, स्वस्त मिळतात ! त्यातलीच थोडी(?) आईला घेउन चालली आहे ! मी कपाळावर हातच मारला. आता मी निक्षून सांगतो, हे जरा जास्तच होते आहे, थोडे कमी कर. ही तितक्याच ठामपणे सांगते, उलट हे कमीच आहे, लोकं जातात तेव्हा बघा जरा ! तुला ना कसली हौसच नाही ! मग माझी प्रश्नांची फ़ैर … हमाली करायची कसली आली हौस ग ! एवढे खाणे कशाला, दुष्काळी भागात चाललो आहोत का ? प्रवासात बिसलेरी घेता येत नाही का ? भेटींची ओझी इकडून नेण्यापेक्षा तिकडेच काही घेउन द्यावे नाहीतर सरळ रोख पैसे का देत नाहीस ? लोकांना मुंबईवरून काही आणले याचे कौतुक असते कळले का, असे एकाच प्रश्नाचे उत्तर देउन बाकी प्रश्नावर ती अर्थात मौन पाळते.
माझे किती कपडे घेतले आहेस ? माझा पुढचा प्रश्न,
चार जोड आहेत.
मग त्यातले दोन कमी कर, माझा फ़ायनल आदेश.
ही तणतणत माझे कपडे परत कपाटात ठेवते पण येताना त्या बदल्यात आपले दोन व लेकीचे दोन जोड घेउन येते !

तु नाही तर आम्ही तरी घेतो मिरवुन लग्नात !

शेवटी सगळे सामान बॅगात कोंबताना नाकी ऩउ येतात. प्रसाद-प्रियांका सूटकेस वर उभे राहतात तेव्हाच त्या बंद करता येतात. मग बाहेर पडताना ही हातात फ़क्त पर्स घेउन लेकी सोबत पुढे जाते. मी दोन हातात दोन सूटकेस, दोन्ही खांद्यावर एयर बॅगा घेतल्यावर प्रसाद बाकीचे उचलतो ! हमाल न करणे हे तुझे तत्व आहे ना मग कर हमाली !

ता.क. :- आत्ताच ही माहेरून आली. सोबत प्रचंड ओझे, कल्याणला उतरून पनवेलसाठीच्या बसमध्ये सामानासह चढणेच अशक्य झाले ! एक तास हेच चालले होते. गर्दी वाढतच चालली होती. शेवटी स्पेशल रीक्षा करून, ३०० रूपये मोजून बाईसाहेब आल्या ! ( औरंगाबाद ते कल्याण – एक्सप्रेसचे तिघांचे भाडे होते २८० रूपये ! ) काय ग ? एवढे ओझे ? आईकडून सगळे मसाले करून आणले आहेत, पापड , चिकवड्या , शेवया सुद्धा आहेत !

शनिवार, १६ मे, २००९

गुगली, दूसरा व तिसरा सुद्धा !

मी ज्या प्रकारे बेल दाबुन धरली त्यावरूनच आत सिग्नल गेला की स्वारीचे काहीतरी सॉलीड बिनसले आहे ! मग आत गेल्यावर लाडोबा आणि दिवट्या असा मुलांचा उद्धार न झाल्याने त्यावर शिक्का-मोर्तब झाले. मी चपला भीरकावल्या, डबा काढुन हीच्या हातात दिला व विस्कटल्याप्रमाणे खुर्चीवर पसरलो. “तू म्हणतेस ते आज पटले, अगदी कोणा-कोणावर सुद्धा उपकार करू नयेत, कातरलेल्या अंगठ्यावर मुतु सुद्धा नये. स्वार्थी बनले पाहीजे, रेस्ट न्यु वे चे स्वामी सांगत त्या अर्थाने नाही, लौकिक अर्थाने, अप्पलपोटी बनले पाहीजे !” मग कपडे बदलले, आंघोळ करून फ़्रेश झालो, जरा विसावलो तेव्हा मंडळी भक्तीभावाने, काय झाले ? असे विचारती झाली.

अग आज सकाळी स्टेशनला स्कूटर पार्क करत होतो तेव्हा एक बाई, कडेवर वर्षाचा मुलगा, त्यात परत दिवस गेलेले व हातात या अवजड दोन बॅगा, अशा अवस्थेत अगदी खुरडत चालल्या सारखी स्टेशनच्या दिशेने चालली होती. मला अगदी राहवले नाही, म्हटले मी तुमच्या बॅगा घेतो, तुम्हाला पुल पार करून देतो, तुम्हाला कोणती गाडी पकडायची आहे ? ती बोलली नेत्रावती, ठीक आहे, ती ५ नंबरला येते मी तिकडेच उतरून थांबतो ….
तरूण होती का रे ? - ही.
हो, तिशीची असेल, साउथची असावी – मी.
सुंदर असेल ना ? – ही.
हो – मी !
तरीच …! ही. विथ जळजळीत कटाक्ष ! ( इति गुगली )
असा राग आला, मुसलमान असतो तर तीन काय तीनशे वेळा तलाख-तलाख-तलाख असे म्हणालो असतो. पण परोपकाराचे मीच भरवलेले खुळ मुलांच्या डोक्यातुन जावे यासाठी मला गोष्ट पुरी करणे भाग होते !

तर तिचे सामान घेउन मी भरभर तो पुल पार केला व सामान फ़लाटावर ठेउन ती कोठवर आली आहे ते पाहु लागलो. इतक्यात “चोर, चोर” असे माझ्या कानी पडले. मी आसपास बघितले तर संशयास्पद कोणी दिसेना. ओरडणारा तो काळाकुट्ट मद्रासी चक्क मलाच बघुन चोर असे ओरडत माझ्या समोर उभा ठाकला. लगेच आसपासच्या माणसांनी आमच्या भोवती कोंडाळॆ केले. कधी नव्हे ते पोलीस सुद्धा आले व त्या मद्राशालाच चोर समजले व क्या चोरी किया बे, चल निकाल, असे म्हणाले. या वर तो मद्रासी माझ्याकडे बोट दाखवुन “मै नै, यैच चौर है” असे म्हणाला. पोलीस पण गडबडला, हा तर जंटलमन वाटतो असे भाव त्याच्या चेहर्यावर दिसत होते. इतक्यात मुदली, सेक्टर ३ मधला, माझा कामावरचा मित्र, आला. त्याने काय झाले म्हणून विचारले. मला जरा मग धीर आला. मद्रासी सांगत होता की “ये मेरा लगेज चोरी करके भाग रहेला है, पकडो साले को !” मग मी पण आवाज चढवला, अबे मदरासी, तेरी तो …, ये लगेज पीछे से एक औरत बच्चा लेके आ रही उसका है, मै उसकी मदत कर रहा था, चोर, लफ़ंगे तो तुम दिखते हो !” इतक्यात ती बाई मला पुल उतरताना दिसली. मी तीचे लक्ष वेधुन, इकडे या असे खुणावले. त्यावर तो म्हणतो कसा, “ ये तो मेरीच वाइफ़ है !” आता पब्लीक चेकाळले, त्याच्यावर नुसत्या शिव्यांचा भडीमार झाला, गरोदर बायकोला सामाना सकट मागे सोडून आपण मोकाट फ़िरतो, माणूस आहे का हैवान. एकाने तर त्याच्या कानफ़टातच भडकावली ! म्हणे पर्यंत त्याची बायको तिथे पोचली. त्या बरोबर तो मद्रासी तीच्या अंगावर धाउनच गेला. दात-ओठ खाउन तो तीला बरेच काही त्यांच्या भाषेत बोलला, मग तीने त्याला काहीतरी समजावले, मग तो एकदमच शांत झाला. निर्लज्जा सारखे हसला सुद्धा वर मला सॉरी, थँक्स म्हणत त्याच्या बायको बरोबर पुढे गेला.

मुदली आणि मी मग लोकल पकडायला गेलो तेव्हा मुदली म्हणतो कसा “मराठे, तेरे मे ना ये अजीब सुलेमानी किडा है, दुनियाका कंधे पे कायको लेता है ? बेचारे हजबंड ने खामका मार खाया.”
अबे, मुदली, त्याला तर तुडवायला हवा होता ….” माझा सात्विक संताप नुसता उफ़ाळून आला होता.
…मेरे को थोडा थोडा तमील आता है, उनका जो झगडा हुआ वो थोडा बहुत समझा मुझे.
…अरे वो हैवान तो उसकी जान भी ले सकता है, मुझे अब उसका ही डर लग रहा है !

यावर मुदली जो काय हसत सूटला, अगदी वेड लागल्यासारखा ! शेवटी मी त्याच्या थुलथुलीत पोटावर एक सणसणीत पंच मारला. तेव्हा, अबे सुन, गुस्सा क्यो होता है, म्हणत पुढचे सांगू लागला.
नवरा तीला म्हणत होता “छीनाल औरत, अपने जोरू को पराये आदमी के सामने जलील करती है, तुम्हारी तो चमडी निकालता हूँ, मै तुम्हे क्या बताया था, उधरीच खडी रह, मै कुली लेके आता हूं, फ़ीर भी वो हरामीकी मदत क्यो ली तुमने ?”
यावर ती बाई बोलली, “मै तो थोडा छांव की तरफ़ जा रही थी, वो आया, और सामान लूं क्या पुछा, आदमी शकलसे तो शरीफ़ लग रहा था, तो लो बोली. उतना कुली का पैसा बचेगा, ओर वैसे यहा कुली मिलता कहा है ? बकरा खुद मिल रहा था तो क्यो नही बोलने का ? उगीच तो नवरा हसला व तुला धन्यवाद, माफ़ करा नाही बोलला काही ! ( हा होता “दूसरा” )

हे ५० सेकंदाचे भाषांतर मुदलीकडून पुर्ण समजायला सीएसटी यायला लागले, मला मुदलीच्या हसण्याला ब्रेक मारायला त्याच्या पोटावर किमान चारदा पंच मारायला लागले. अख्खा डबा फ़िदीफ़िदी हसत होता !

सगळे सांगितल्यावर मात्र जरा हलके वाटले. आता कानाला खडा, दुनियादारी गेली बाराच्या भावात, आणि बायकांना तर अजिबात मदत नाही करणार. जेन्टस डब्यात आल्या तर अजिबात उभा राहणार नाही. लगेच ही बोललीच, “सुंदर आणि तरूण बायकांची तर अजिबातच करू नका ! “ (अग किती छळशील !)

हीच्या शेर्यांकडे दुर्लक्ष करत मी मुलांना म्हणालो,सगळॆ संस्कार विसरा पार, ही दुनिया चांगल्या माणसांची नाहीच आहे मुळी. काही कोणाला याच्या पुढे मदत करायची नाही, याद राखा ! जरा वेळ शांततेत गेला, मग प्रसाद बोलला, “ पण बाबा ती परमहंसाची गोष्ट नाही का तु सांगत .. गंगा नदी, वाहणारा तो विंचु.., त्याला वाचवणारे परमहंस.., तो त्यांना चावतो , सारखा सारखा पाण्यात पडतो .., ते त्याला वाचवत राहतात…आपणही आपला धर्म सोडू नये …!” चूप कार्ट्या, एकदम चूप ! त्याला चूप केल्यावर प्रियांका सरसावली, “अरे बाबा, मग तर तु ही गोष्ट अगदी कोणा-कोणाला सांगितली सुद्धा नाही पाहीजेस, कारण तुझ्या त्या गोष्टीत नाही का, सेवाभावी साधु असतो.., त्याचा अबलख घोडा.., चोराला तो हवा असतो.., लंगडा बनून वाटेत पडतो.., साधु फ़सतो.., चोर पळत असताना साधु म्हणतो चोरला नाही, दिला म्हणून सांग... नाहीतर पुढे लोक लंगड्यांना मदत नाही करणार !

आता मात्र माझा राग कोठल्या कोठे पळतो, मस्त प्रसन्न , अगदी फ़्रेश वाटते ! मग ही म्हणते “तुमचा बाबा काय परोपकार करण्याचे थांबणार आहे का ? अगदी उद्याच कोणी तरूण, तीशीची, सुंदर बाई दिसली की तीची पर्स सुद्धा हातात घेईल , माझी मात्र कधी सूटकेस पण हातात नाही घेतली ! काय तर म्हणे स्वावलंबी व्हा, आपले ओझे आपणच ओढा !”

रात्री हळूच म्हणाली, “तीचे काही नाही चुकले, त्या बाईच्या जागी मी असते ना तरी अगदी हेच केले असते ! पुढच्या जन्मी तु ना माझ्या शेजारणीचा नवरा हो, म्हणजे माझी पण खूप कामे हलकी होतील ! ( आणि हा “तिसरा” !)

शुक्रवार, १५ मे, २००९

विक्रम आणि वेताळ कथा – अपेक्षाभंग !

विक्रमादित्य कोणालाही न जुमानता स्मशानात गेला. झाडावर लटकत असलेले प्रेत खांद्यावर घेउन तो झपाट्याने परत निघाला तेव्हा, प्रेतात बसलेला वेताळ त्याला म्हणाला , “विक्रमा, का असा आयुष्यभर एकच ध्येय बाळगुन राहीला आहेस, तुझी पण अवस्था त्या इ-काकांसारखीच होणार हे नक्की !”. विक्रमाचे कुतुहुल चाळवले, त्याने वेताळाला इ-काकांची गोष्ट सांगायचा आग्रह केला. वेताळाने अट घातली की मध्ये बोललास तर मी परत झाडाला लटकायला मोकळा , बोल कबूल ? विक्रमाने अट कबूल करताच वेताळ सांगु लागला;

ऑर्कुटवरील कोब्रा कट्ट्यावर इ-काका सामील झाले आणि अल्पावधीतच कमालीचे लोकप्रिय झाले. रोज नवे नवे विषय मंचावर मांडून ते मस्त चर्चा घडवुन आणत. विषय पण सर्व हाताळत, सर्व वयोगटाला आपले वाटावे असे, कधी बंडखोर, कधी सुधारणावादी, कधी विचार करायला लावणारे, तर कधी मजेदार शब्द खेळ , कधी टीपी टाइप फ़ुलटू टाइमपास टॉपिक सुद्धा टाकत ! कट्ट्याला शिस्त लावण्यासाठी काही जण होते, उनाडपणा करणार्यांना ते तंबी देत, धाकात ठेवत. त्यात एक दादा सुद्धा होता पण तो विनाकारण अधिकार गाजवतो अशीही तक्रार होती काहींची. पण दादाच्या बेटकुळ्या व दंडावर मॉनिटरचा बॅच, यामुळे सगळॆ टरकून असत त्याला. एकदा असाच इ-काकांनी एक टॉपिक टाकला. ताईने टक्क्यांचे गणित तर स्टेप बाय स्टेप सोडवले, उत्तरही अचूक मांडले पण तळटीप लिहीली की माफ़ करा काही कळलेच नाही बघा. हेतु तरी काय हो तुमचा इ-काका ? लगे हात दादा पण पचकला, १०० % रतीब, हा हा हा, हो हो हो, खो खो खो, खी खी खी ! मग काय इ-काकांची सटकलीच की ! त्यांनी दादाला आडे हात घेतले, दरडावले. परीणाम मात्र भलताच झाला ! दादा दंड थोपटत व छाती काढून काकांना म्हणु लागला, “ताता, तुम्ही तान ताल्ले, ते पन दोड नाही तल मताला ! ताता तुमच्या वयाला हे षोबत नाय ! तान ताता ते ताता तर तिंत तारता ! “ इ-काका एकदम हैरान, परेशान झाले. अरे झाले काय याला ? हा असा काय बोलतो आहे, बोलताना अंगावर शिंतोडे उडल्यासारखे कसे वाटते आहे ? बघे अवाक झाले. दोन बड्यांच्या भांडणात बाजू तरी कोणाची घ्यायची ? बरे , पान कोण खात आहे ते सुद्धा स्पष्ट होत नव्हते. अचानक काडकन आवाज आला ! जशी वीज चमकावी तसा. मग दिसले के दादाचे थोबाड फ़ुटले आहे, दात घशात गेले आहेत. आणि हे काय ? पान तर तोच खात होता ! पण दादा पण कसलेला गडी होता, तो बाहीला तोंड पुसुन कांगावा करू लागला, “ तुम्हीच पान खाल्ले, छी, तुम्हाला झेपत नाही तर कशाला या वयात पान खायचे ? ते पण १२० नंबरी ? माझेच चुकले, तुम्ही कसले रतीब टाकता, तुम्ही तर पिंक टाकता टॉपिकची !

आता मात्र इ-काकांचा उरला सुरला संयम सुद्धा संपला, मग त्यांनी रूद्रावतार धारण करत स्टेनगनची फ़ैरच डागली, नुसती आग होती ती आग;

“शिंतोडे दिसले तेव्हाच दात घशात घातले होते. बदललेल्या स्मायलीज वरून ते पुरेसे स्पष्टही झाले होते . (का मी परत समजवण्यत कमी पडलो ?) जेव्हा कळले की पाठीवर पिंक मारली गेली आहे - तेव्हा परत दात पाडायची गरज निर्माण झाली. ज्या वयात धारोष्ण दूध प्यावे त्या वयात पहील्या धारेची का प्यावी ? बरे पहाटे उठून जो ते प्रामाणिक पणे रतीब म्हणून टाकतो त्याचा मान राखू नका निदान अपमान तरी करू नका ? बरे प्या वर ते नंबरी पान कशाला ? बरे पान खा, बोलताना शिंतोडे उडणार नाहीत याचे भान तरी बाळ्गा ? पिंक तरी कोपर्यात मारा ? बरे शिंतोडे उडाले हे दाखवुन दिल्यावर माफ़ी तरी मागा ? बरे ते ही जमत नाही तर तुम्हीच नको त्या वयात नको ते पान खाल्ले हा कांगावा कशाला ? अरे तोंड तुझे रंगले आहे, रस तुझ्या तोंडातुन टपकतो आहे, जीभ तुझी रंगली आहे, तुझ्या पिंका टाकायच्या सवयीशी सगळे परीचीत आहेत, हे सर्व १६६६२ सभासदांना दिसते आहे - तरी उलट्या बोंबा ? तुझ्या नाकातुनसुद्धा अजून पुरेसा शेंबूड बाहेर पडलेला नाही याचे तरी भान बाळग ! “

आता सांग विक्रमा, इ-काकांना एवढे चिडायचे कारणच काय होते ? या वयात एवढा राग ? या प्रश्नाचे उत्तर जर माहीत असूनही तू दिले नाहीस तर तुझ्याच डोक्याची शंभर शकले हो़उन ती तुझ्याच पायावर लोळू लागतील ! या अगदी अनपेक्षित प्रश्नांनी आधी विक्रमादीत्य हडबडला. मग मात्र शांतपणे उत्तर देता झाला , “इ-काकांचे चिडणे स्वाभाविक आहे. दादाने अकारण त्यांची खोडी काढली हे सुर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे. पिंक मारणार्या दादाने इ-काकांवरच भलते-सलते आरोप करावेत हे सुद्धा डोस्के फ़िरवणारेच आहे. अन्याय सहन करणे हा सुद्धा गुन्हाच आहे, म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो.”

विक्रमादित्याचे बोलणे संपताच वेताळ खांद्यावरून उडाला व थेट वडाच्या पारंबीला लटकू लागला. सात मजली हास्य करत म्हणाला “विक्रमा, तू बोलसास आणि फ़सलास ! मी परत मोकळा झालो ! पण तुझे उत्तर मात्र यावेळी मात्र साफ़ चूकले ! विक्रम परत हैराण परेशान झाला ! “अरे वेताळा , गोष्ट पण जरा वेगळ्याच धाटणीची सांगितलीस आणि प्रश्न काही तिसराच विचारलास ? हा काय प्रकार आहे. माझे उत्तर चूकले असेल तर निदान खरे उत्तर तरी सांग ?” वेताळाने चक्क नवनीत बाहेर काढले, गोष्टीचा क्रमांक बघुन शेवटच्या, उत्तराच्या पानावरील, त्या क्रमांकाचे उत्तर वाचले, “अ पे क्षा भं ग” ! विक्रम आता पार भेलकांडलाच ? अरे पण कोणाचा ? कसा ? अपेक्षा तरी काय होती ? वेताळ अदृष्य होता होता म्हणाला, “मला काय माहीत, तिकडे एवढेच लिहीले आहे !” बुचकळ्यात पडलेला विक्रमादीत्य पनवेलची वाट धरता झाला ! उद्या परत स्मशानात जाउन या प्रश्नाची तड लावायचीच या निर्धाराने !

अर्पण पत्रिका :- माझे प्रेरणास्थान, आदीगुरूंना, सविनय !

गुरुवार, १४ मे, २००९

३३ टक्के व टोमणे !

“स्त्री पुरूष समानता” हा शब्द वापरून गुळगुळीत झाला आहे. त्याचा फ़ुले-आंबेडकरांना अभिप्रेत असलेला अर्थ सुद्धा बदलत चालला आहे. ३३ % च्या राजकारणाने तर स्त्रीया सरपंच ( बिहारच्या रूपाने मुख्यमंत्रीसुद्धा ! ) आणि सत्तेची सगळी सूत्रे बैलोबाकडे असे सुद्धा दिसते आहे. अशी समानता कोणाला अभिप्रेत असलेली हवी, कोणी त्या करीता मागणी केली, गरज का निर्माण झाली या प्रश्नाच्या मुळाशी कोणी जात नाही. हल्ली तर असा आव आणला जातो की झाले हे खूपच झाले, बोट धरायला दिले आणि आता या डोक्यावरच बसल्या, ट्रेन मध्ये आधी एक डबा अर्धा वेळ, मग दीड डबा पूर्ण वेळ, आता तर काय अख्खी ट्रेन ? बहोत नाइन्साफ़ी है ! बसमध्ये राखीव जागा, तिकीटासाठी वेगळी रांग, आयकरात जास्तीची सवलत, छळ प्रतिबंधक कायदे काय, या मुळेच घटास्फ़ोटाचे प्रमाण वाढले आहे, अनाचार बोकाळला आहे, अहो यांच्या अपेक्षा वाढल्याने बिचार्या पुरूषांची लग्ने सुद्धा होत नाहीत हो ! ३३ % राजकारणात आरक्षण काय …. लय झाले ! आता आम्हालाच वाचवा असे म्हणायची पाळी आली आहे .. कोणी म्हणे महीला पीडीत पुरूषांची संघटना काढली आहे ! असली बात क्या है ? माजरा क्या है ?

अगदी काही दशकापर्यंत प्रपंचाची अर्थविषयक जबाबदारी पुरूष पार पाडत होता, बायका शिकलेल्या असूनही घर सांभाळत होत्या. पुढे प्रपंचाचा गाडा ओढण्यात पुरूष कमी पडतो आहे म्हटल्यावर स्त्रीया पदर खोचून पुढे आल्या ( सोय म्हणून मग ओढणी खोचु लागल्या !) खरे तर पुरूषांना हे हवेच होते पण अग अग म्हशीच्या चालीवर – घराचे काय होईल, मुलांना कोण बघेल, त्यांच्यावर संस्कार कोण करेल अशा लटक्या सवबी पुढे हो़उ लागल्या, मग तुझ्या शिक्षणाचा उपयोग तरी काय असे असा पवित्रा घेत , मग साळसूदपणाचा आवा आणत, तु करते म्हणते आहेस तर कर नोकरी, पण पहीले प्राधान्य घराला, मुले मोठी झाली की मग मात्र नोकरी सोडायची हं ! ( पुढे मात्र नोकरीवाली बायकोच हवी झाली, अगदी आपल्याहुन जास्त पगार हुद्दा असलेली सुद्धा ! ) बायका त्यालाही पुरून उरल्या, दोन्ही आघाड्यावर लढून त्यांनी बाजी मारली. पुरूषी अहंकाराचा फ़ुगा फ़ुटला तो पहीला इथे ! पुढे नोकरी करणार्या बायकांना बाकी बायका त्यांची मुले सांभाळुन, त्यांना डबे, फ़राळ करून देउन, त्यांना मेक-अप करून देउन, त्यांच्या मुलांच्या शिकवण्या घेउन, संस्कार वर्ग , छंद वर्ग चालवुन मदतीचा हात देउ लागल्या. तुम्ही फ़क्त लढा ! एकमेका सहाय करू – अवघे धरु सुपंथ ! तसेही सगळ्याच बायकांना नोकरी कशी मिळणार होती ? शतकानुशतके सोसलेल्या अन्यायाला मग वाचा फ़ुटु लागली, अस्मिता चेतवली गेली. आर्थिक पाठबळ मिळाल्यावर नवर्याचा जाच सहन करायची गरज(च) काय असा प्रश्न पडू लागला. तु कमावतो आहेस तर मी पण कमावते आहे वर घर पण सांभाळते आहे, तुझ्या गमजा नाही चालणार, शिक स्वयंपाक, घास भांडी, काढ कचरा ! म्हणता म्हणता बायकांनी प्रत्येक ठीकाणच्या पुरूषी वर्चस्वाला सुरूंग लावले, मक्तेदारी मोडली, चांगले प्रवाह आणले. आधी नवर्याचे मत तेच बायकोचे मत असे गृहीतच धरले जायचे, मग मात्र स्वतंत्र विचार करणार्या बायकांची सुद्धा वोट बँक हो़उ शकते हे चलाख राजकारण्यांना कळले. हे असेच चालु राहीले तर आपले राज्य खालसा व्हायला वेळ लागणार नाही हे पण समजले. अगदी सर्व पक्षीय एकमत झाले, म्हणूनच ३३ % आरक्षण लोकसभेत अजूनही लागू होत नाही, अगदी पक्षीय पातळीवर सुद्धा नाही. काही राज्यांची मुख्यमंत्री असु दे महीला, अगदी सत्तारूढ आघाडीच्या प्रमुख सोनिया गांधी का असेनात, लोकसभेत “नो लाड” ! मग राजा उदार झाला आणि तथाकथित सवलतींचा वर्षाव सुरू झाला. तसा कामगार कायदा सहजा-सहजी बदलला नाहीच गेला. त्यासाठी प्रदीर्घ लढा द्यावाच लागला, बाळंतपणाची भरपगारी रजा देताना पण बरीच ’कळ’ काढावी लागली , समान वेतन सुद्धा सहज नाही मिळाले ! झालेच तर कामावर होणारी स्त्रीयांची छळवणुक, या विरोधात सर्वंकष कायदा ही सुद्धा अगदी हल्लीचीच बाब आहे, ती सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या फ़टकार्याने झाली आहे ! यातले स्त्रीयांनी काय मागितले आहे ? आणि देणारे पुरूष कोण ? आपण भले समजतो आहोत जे काही आपण दिले आहे , तुम क्या याद करोगे स्टायलने , त्यातच बायका रमतील ? हे जे पुरूषांनी स्त्रीयांना दिले आहे ते निव्वळ आधीच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणूनच ! पापाची क्बोच कमी व्हावी म्हणून. त्यावरच स्त्रीया खुश आहेत असा भ्रम सुद्धा लवकरच फ़ुटेल, तिसरे पाउल कोठे ठेउ असे पण त्या विचारणार नाहीत ! “हम मेहनत मजदुरी करके जब अपना हिस्सा मांगेगे , एक गाव नाही, एक शहर नही, हम सारी दुनिया मांगेगे “ ! अर्थात यालाही बराच काळ जाईल , कारण आता जे चित्र दिसते आहे ते फ़क्त शहरी शिकलेल्या मध्यमवर्गीयात, एकूण लोकसंख्येच्या फ़ारतर २० % ! अर्थात याचे दुष्परीणाम सुद्धा असतील, पुढे जाणवतील(ही) पण सध्या तरी ते नगण्य आहेत, अपवाद म्हणूनच, त्याचा बाउ करण्याचे काहीच कारण नाही !

पुरूषांच्या डब्यात चुकुन जरी एखादी बाई शिरली तरी पुरूषी स्वातंत्र्याचा महासंकोच होतो, यांना वेगळा डबा आहे ना, मग इथे का कडमडायला येता ? “धक्का खायला येता का ? ” ते “धक्का लगा तो बोलो मत” असेही धमकावले जाते, का तिकडे बसायला मिळत नाही व आम्ही स्त्रीदाक्षिण्य दाखवुन यांना बसायला देतो. जरा पुरूष दाक्षिण्य पण दाखवा अशी डीमांड आहे पुरूषांची ! पण आज ज्या संख्येने स्त्रीया घराबाहेर पडत आहेत, अर्थात आपल्याच नाकर्तेपणामुळे, त्या प्रमाणात या मेहरबान्या अगदी तुटपुंज्या आहेत हे नक्की ! आमच्या हार्बरवर संपूर्ण महीला लोकल नाही पण सकाळच्या एका लोकलचे पुढचे तीन डबे महीलांसाठी राखीव असतात. एकदा अगदी चूकुन ती लोकल मिळाली. गर्दी जरा जास्त वाटली म्हणून गाडी लेट आहे का अशी चौकशी केली तेव्हा शेजारचा काय पिनकला ! बायकांचा उद्धार करत तीन डबे राखीव आहेत म्हणून तिरडी बांधली जाते आहे पुरूषांची असे फ़ुत्कारला ! ९ पैकी ३ म्हणजे ३३ % च नाही का ? प्रत्येक स्टेशनाला गर्दी वाढत चालली व बायकांचा उद्धार अधिक उच्चरवाने हो़उ लागला ! शेवटी मला राहवले नाही, मी त्या शेजार्याला म्हटले की तुम्ही तीन तीन डबे राखीव आहेत म्हणून तणतणता ते कोणत्या दिशेचे ? उत्तर आले सीएसटी कडून ! अहो मग त्यातला शेवटचा डबा तर बायकांचाच असतो ना ? दूसरा डबा घुडघुड्या ( वरती पेंटोग्राफ़ असणारा, माझ्यासारखे अनुभवी प्रवासी चूकूनही त्या डब्यात शिरत नाहीत !), तिसरा डबा अर्धा प्रथम वर्गाचा, म्हणजे प्रत्यक्षात एकच डबा जास्तीचा दिला आहे ! अहो पश्चिम रेल्वेवर तर अख्खी लोकल राखीव आहे महाराजा ! अनेकांना ते उमजले, पुढे स्वर थोडा खाली आला, एकाने तर कबुल केले की “सच्ची, आपने पते की बात की” !