सोमवार, २३ जुलै, २०१२

पाऊस, पापड व पाडगावकर !

फार फार वर्षापुर्वी लिज्जत कंपनीच्या लक्षात आले की पावसाळ्यात पापडांची विक्री जवळ-जवळ होतच नाही. कंपनीचा आर्थिक डोलारा कोलमडू नये म्हणून एक तज्ज्ञ समिती नेमण्यात आली. या कमिटीने बरेच पापड फस्त केल्यावर उपाय सूचविला तो म्हणजे कविता पाडायचा ! लोक कविता वाचता-वाचता पापड खातील , त्यांना आपण अशी सवयच लावायची ! लिज्जतने तो अहवाल स्वीकारला व कविता पाडण्याचे कंत्राट कोणाला द्यायचे यासाठी एक उच्च स्तरीय समिती नेमली. अनेक पावसाळॆ कोरडे गेल्यावर एकदाचे या समितीने एक नाव नक्की केले ते म्हणजे पाडगावकर !

 लिज्जतने मग पाडगावकरांबरोबर करारच करून टाकला की पाडगावकरांनी पाउस पडताच एक कविता पाडायची, पावसाचे आगमन झाले रे झाले की लिज्जतने आपल्या पापडाच्या जाहिरातीत ती कविता वापरायची, अगदी दरवर्षी ! पहिल्याच वर्षी ही कल्पना चांगलीच चालली ! जाहिरात प्रसिद्ध झाल्या झाल्याच कंपनीचे सगळॆ पापड हातोहात खपले ! पाऊस, पापड व पाडगावकर हे समीकरण अगदी फिट्ट बसले. पुढच्या वर्षी तर पावसाने अटच घातली की आधी पाडगावरांना कविता पाडू दे मगच मी पडतो ! मग पुढची काही वर्षे आधी पाडगावकर पावसाला कवितेतून “ये रे ये पावसा “ म्हणायचे व पाऊस लगेचच धावून यायचा ! लोकसुद्धा याला सरावले. म्हणजे आधी जून महिना लागला की छत्री, रेनकोट यांची खरेदी सुरू व्हायची, आता लोक पाडगावकरांनी पावसाला साद घातली की मगच या खरेदीसाठी घराबाहेर पडू लागले. खरे-खोटे पाडगावकर जाणोत पण या वस्तू विकणारे उत्पादक सुद्धा पाडगावकरांवर वॉच ठेवून स्टॉक बाजारात आणू लागत असे म्हटले जात असे. पाडगावकरांच्या पाऊस कवितेची लोकांना एवढी सवय झाली की लोक “आधी पडते पाडगावकरांची कविता, मग पडतो पाऊस” असे म्हणू लागले. ज्या भागात दुष्काळ पडतो त्या भागात सरकारच आपल्या खर्चाने पाडगावकरांच्या पाऊस कविता छापू लागली व मग तिकडे धो धो पाऊस कोसळू लागला. पुढे मग भारतातील 13 प्रमुख भाषांत पाडगावकरांच्या पाऊस कवितांचे अनुवाद केले गेले व भारत “सुजलाम सुफलाम झाला” !

 पुढे मात्र पाडगावरांचे मन या सगळ्या प्रकाराला वीटले. अति झाले आणि हसू आले म्हणतात तसे झाले. पाडगावकर कविता खरेच पाडू लागले, एका पापडाच्या लाटीतुन जसे 10 पापड बनतात तसे पाडगावकर एकाच कवितेच्या दहा कविता बनवून देवू लागले. कधी तर आधी कधी छापलेल्याच कविता नव्या म्हणून खपवू लागले. लोकांना त्या कविता रटाळ वाटू लागल्या. आधी पाऊस सुद्धा पाडगावकरांच्या स्वत:वरच्या कविता वाचायला अगदी उत्सूक असायचा पण त्याच त्याच पापडासारख्या एक सारख्या कविता वाचून तो सुद्धा बिथरला. लिज्जतची जाहिरात छापून आली की पाऊस रडायचा म्हणजे अगदी बदाबदा कोसळायचा. पण त्याने योग्य संदेश जात नाही असे कळल्यावर तो तोंड असे काळे करायचा की लोकांच्या तोंडचे पाणीच पळायचे व डोळ्यात पाणी यायचे ! मग सरकारी आदेशाने लिज्जतवाले पाऊस पुरेसा पडून झाला की मगच ती जाहिरात काढायचे ! सरकार सुद्धा लगोलग “मान्सून” संपल्याचे जाहिर करायचे ! ज्या भागात अतिवृष्टी होत असेल त्या भागात सरकार आपल्या खर्चाने पाडगावकरांची पाऊस कविता छापायचे व पाऊस धूम ठोकायचा. 

पाडगावकरांची कविता असलेली जाहिरात आधी वर्तमानपत्रे पहिल्या पानावर छापत पण कवितांचा दर्जा घसरल्याने जाहिरात छापून येते त्या दिवशीच पहिले पान बघून वितरक गठ्ठ्याला हातच लावत नाहीत म्ह्टल्यावर ती आतल्या पानात छापली जावू लागली. खरी गोची झाली लिज्जतची. पाडगावकर पडले पक्के व्यवहारी. त्यांनी प्रदीर्घ कराराचे सगळेच पैसे आगावू घेतलेले होते म्हणून पावूस पडला काय नाय पडला काय, पापड खपले काय नाय खपले काय , जाहिरात पहिल्या पानावर छापली काय की आतल्या पानावर, त्यांना कसलेच सोयर-सुतक नव्हते ! लिज्जतने परत एक समिती नेमली व यातून “वे आऊट” शोधायचे ठरले. पावसाळ्यात पापड खपत नाहीत याचे सोपे कारण होते ते ओले राहतात म्हणून, सुर्यप्रकाश नसल्याने पापड पुर्ण सुकत नाहीत, ते तसेच पॅक केले जातात म्हणून ते खराब होतात व लोक ते घेत नाहीत ! पण या पश्चात बुद्धीचा काय उपयोग ? मग समितीला एक नामी उपाय सूचला. सरकारकडेच “बेल आउट” पॅकेज मागायचे ! कंपनी तोट्यात चालली आहे तेव्हा अनुदान द्या नाहीतर पापड कविता छापून पावसावर पडदा पाडतो ! सरकारने पण समिती नेमली व त्या समितीने दुष्काळ नको असेल तर लिज्जतला बेल-आउट करणे भागच आहे अशी शिफारस केली व सर्व करातुन सूट, कोणतेही बिल पुढची दहा वर्षे भरायचे नाही असे व अजून बरेच काही डील झाले. 

 आधी ताकाने तोंड पोळलेला पाऊस आता अनुभवातुन शहाणा झालेला आहे. जुन महिन्यात जाहिरात नाही आली याची खात्री करून मगच तो पडतो, तो सुद्धा तूरळक, मग आठवडाभर थांबतो, जाहिरात नाही ना आली परत याची खात्री करतो व असाच बेता-बेताने पडून आपला मुक्काम लांबवतो कारण तो गेला असे वाटून परत जाहिरात छापून आली तर काय घ्या ?

रविवार, २२ जुलै, २०१२

पुन्हा एकदा “भज गोविंदम” !

साधारण वर्षभरापुर्वी मी आद्यशंकराचार्यांच्या “भज गोविंदम” या स्तोत्राचा मराठी अनुवाद पोस्ट केला होता. सोबत एका प्रसिद्ध दाक्षिणात्य (नाव आता आठवत नाही) गायिकेच्या आवाजातील एम.पी.3 चा दुवा सुद्धा दिला होता. ही पोस्ट प्रसिद्ध झाल्यावर साधक या नावाने एक प्रतिक्रीया आली होती व त्यात एम.पी.3 तला आवाज “Childish” आहे असे म्हटले होते ! हे स्तोत्र पंडीत जसराज यांच्या आवाजात ऐका असे सूचवले होते व त्या गाण्याची लिंक सुद्धा दिली होती. पंडीत जसराजांच्या आवाजातले ते स्तोत्र ऐकता येत होते पण उतरवता येत नव्हते. मी अनेक खटपटी-लटपटी करून ते उतरवण्यात एकदाचा यशस्वी झालो व ते माझ्या मोबाइलवर सुद्धा उतरवून घेतले. पहिल्यांदा लोकल प्रवासात ते गाणे ऐकायला घेतले तेव्हा त्याची सुरवात अगदी संथ वाटली व ते बंदच करून दूसरे गाणे ऐकायला घेतले. मग पुन्हा कधी ते गाणे ऐकण्याच्या फंदात पडलो नाही.

 काहि दिवसापुर्वी लोकल प्रवासात शफल करून गाणी ऐकत असताना गाणे वाजू लागले व काय ब्याद आहे असे म्हणत ते गाणे स्किप करायच्या ऐवजी फॉरवर्ड झाले व एक दणदणीत आवाजातली तान ऐकू आली. मी त्या आवाजाने थरारलोच ! हे काही तरी वेगळे आहे असे समजले व जसराजांच्या आवाजातले “भज गोविंदम” पहिल्यापासून ऐकायला घेतले.
हे ध्वनी-मुद्रण निश्चितपणे एका भव्य मैफिलीतले असणार. आधी संथ लयीत व हळूवार आवाजात “भज गोविंदम” ची सुरवात होते. सुरवातीचा श्लोक असाच म्हटलेला आहे. पंडीतजी व त्यांच्या साथीदारांनी ( चेल्यांनी ?) या दरम्यान आपला आवाज व वाद्ये लावून घेतली असावीत ! मग मात्र आवाजाची पट्टी वाढू लागते, साथीला एकेका वाद्यांची सुद्धा भर पडते. दमदार ताना, आरोह-अवरोह, पलटे, आवाजातले चढ-उतार यातून गायन रंगत जाते, खुमासदार होते, अगदी कान तृप्त होतात ! नादब्रह्म म्हणजे काय याचा साक्षात्कार होतो ! भज गोविंदम हे स्तोत्र आहे पण ते एका आगळ्याच ढंगात म्हटले आहे व शेवट तर चक्क भजनात केला आहे ! तब्बल 24 मिनिटे देहभान विसरून आपण ऐकत राहतो ! पंडीत जसराजांची गायकी ऐकताना आपण स्वरांच्या अभिषेकात डुंबतो, भक्तीरसात चिंब भिजतो, अगदी धन्य पावतो, भरून पावतो ! हे ऐकल्यावर अगदी ब्रह्मानंदी टाळी लागते. या तंद्रीतुन आपण बराच काळ बाहेर येवूच शकत नाही. अजून काही ऐकूच नये असे वाटावे असे कान तृप्त झालेले असतात ! अंगावर रोमांच उभे करणारा हा अनुभव आहे ! अर्थात हे सगळे वाचायचे नाही तर अनुभवायचे असे आहे. हा घ्या दुवा व दुवा द्या सुद्धा ! http://ge.tt/5WJHOrK/v/1
अगदी असाच अनुभव पंडीत जसराज यांनी गायलेले “भज नंदन” ऐकताना सुद्धा येतो. त्याचा दुवा खाली दिलेला आहे. हे ध्वनिमुद्रणसुद्धा त्याच मैफिलितले असावे. कालावधी 26 मिनिटांचे आहे. हे सगळे ज्यांनी लाइव कन्सर्ट मध्ये ऐकले असेल ते किती नशीबवान असतील नाही ? http://www.ge.tt/5WJHOrK/v/0?c

बुधवार, ११ जुलै, २०१२

प्रतिभाताईंमुळे मराठी माणसाची मान शरमेने खाली गेली आहे !

अब्दूल कलामांनी राष्ट्रपति पदाची शान पाच वर्षात एवढी उंचावर नेवून ठेवली होती की पुढच्या 50 राष्ट्रपतींनी नुसते बसून दिवस काढले तरी चालेल असे मला बापड्याला वाटायचे. महाराष्ट्राची सुकन्या असलेल्या प्रतिभाताईंनी मात्र पाच वर्षे पुरी व्हायच्या आत त्या पदाचे पोतेरे केले आहे ! गांधीघराण्याप्रति अखंड निष्ठा या एकमेव निकषाने त्यांना एवढा मोठा बहुमान मिळवून दिला होता. त्यात गुजरातमध्ये राज्यपाल म्हणून असताना मोदी सरकारचे धर्मातरबंदी विधेयक व टाडा सारखा कठोर कायदा आणू पहाणारे विधेयक त्यांनी परत पाठविले . या असामान्य कर्तबगारीची दखल दिल्लीश्वर घेतल्याशिवाय कसे राहतील ? पवारांनी आपले राजकारण साधले व शेखावत वि शेखावत अशी झुंज लावून दिली. प्रतिभा पाटलांच्या प्रतिभा शेखावत झाल्या आहेत हे मात्र मराठी माणसाला या निमित्ताने तरी समजले हे ही नसे थोडके ! या संधीचे सोने करण्याचा वकुब नव्हता तर निदान त्याची माती तरी करायची नव्हती, पण महाराष्ट्राचेच दुर्दैव , दूसरे काय ! जन्माने मराठी असलेल्या महिला राष्ट्रपतिने मराठी माणसाला कायमचा कमीपणा आणला आहे ! गोडसेने महात्म्याचा खून केला तर ताईंनी आपल्या विशेष अधिकारात बलात्कार करून खुन करणार्यांची फाशी रद्द केली ! एक दोन नव्हे, त्यांच्या पुढे प्रलंबित असलेल्या सर्वच्या सर्व म्हणजे तब्बल 35 प्रकरणात ताईंनी अट्टल गुन्हेगारांना “दे दान सूटे गिर्हान” या धर्तीवर फाशीतुन सूट दिली आहे. वर ताईंचे म्हणणे आहे की मी एकाही दहशतवाद्याची फाशी कमी केलेली नाही ! अहो पण मग अफझलच्या व राजीव गांधीच्या मारेकर्यांच्या फाइल का नाही क्लियर केल्या ? त्यांच्या जरी गळ्याभोवती फास आवळायची हिंमत दाखविली असतीत तर निदान महाराष्ट्राला थोडी तरी मान उंचावता आली असती ! अजून एक क्रूर विनोद म्हणजे तुमच्या कार्यालयाने 5 वर्षीपुर्वी जेलमध्येच मरण पावलेल्या एका कैद्याची फाइल तुमच्यासमोर ठेवली व तुम्ही दयाळूपणे त्याची फाशी सुद्धा माफ केली आहे. तुमच्या या राजहट्टापायी सरकारला आता नरकात याचना अर्ज करून त्या कैद्याला परत जिवंत करून आणायला लागणार आहे !

भारतात फाशी अगदी विरळात-विरळा अशा प्रकरणातच दिली जाते. बलात्कार्याला फाशी हवी असे जमनत असताना , असे केल्यास बलात्कार करून पुरावा नष्ट करण्यासाठी पीडीतांचे खून सुद्धा होतील असे सांगून सरकार बलात्कारी नराधमाला फाशी द्यावी अशी सुधारणा करीत नाही. भारतातली कमालीची सडलेली पोलिस यंत्रणा, गुन्हा उभे करण्यासाठी लागणारे काटेकोर पुरावे, ते गोळा करण्यातली सर्वच संबंधितांची उदासीनता, कारणे कोणतेही असोत – भारतात गुन्ह्याचे प्रमाण प्रचंड आहे व त्या तुलनेत तक्रार दाखल होणे / करून घेणे, आरोपी सापडणे, पुरावे मिळणे, कोर्टात केस उभी राहणे व आरोपीला शिक्षा होणे याचे प्रमाण नगण्य आहे. बरे खालच्या न्यायालयात शिक्षा झाली तरी हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात अपील केल्यास शिक्षा कमी वा रद्द होण्याचीच शक्यता जास्त. असे असताना, “विरळात विरळा” असा निकष लागून अगदी सुप्रीम कोर्ट जेव्हा एखाद्याची फाशी कायम करते तेव्हा त्याची विना-विलंब अंमलबजावणी झालीच पाहिजे, यात पुन्हा राष्ट्रपतीला दया याचना करायचा प्रश्न येतोच कोठे ? बरे असा खास अधिकार लोकशाहीतली सर्वोच व्यक्ती म्हणून दिला तर त्या व्यक्तीने तो अधिकार अगदी काटेकोरपणे वापरला पाहिजे. ताई म्हणतात की सरकारचे सर्व विभाग दया अर्जावर टीपणी देतात व मला त्या बाहेर जाता येत नाही ! म्हणजे हे पद रबर स्टॅम्प आहे असेच तुम्हाला ताई म्हणायचे आहे का ? शेंबडे पोर सुद्धा सांगेल की हा बचाव तकलादू आहे ते ! फाइलवर ऊलट-सूलट मते असली तरी अंतिम अधिकार उच्चाधिकार्याचाच असतो व त्याची जबाबदारी पण त्या व्यक्तीनेच स्वीकारायची असते. हाताखालच्या लोकांवर त्याचे खापर फोडणे म्हणजे पळपुटेपणा तरी आहे नाहीतर आपल्यात निर्णय क्षमता नाही याची कबुली देणे आहे ! कलामांनी दोन अर्ज निकाली काढले , त्यात एकाला माफी दिली तो बलात्कारी नक्कीच नव्हता व त्याचे वय झाले होते 80. एकाचा, कोलकात्याचा धनंजय (?) बॅनर्जी, याचा अर्ज मात्र त्यांनी फेटाळला होता. त्याने कोवळ्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. या बॅनर्जीच्या नातलगांनी मग फारच थयथयाट केला होता, फाशी दिल्यास भर चौकात स्वत:ला म्हणे जाळून घेणार होते. पण बंगालमधले तेव्हाचे कम्युनिस्ट सरकार खंबीर राहले व कडक बंदोबस्तात नराधम बॅनर्जीच्या गळ्याभोवती फास आवळला गेलाच !

स्वत: एक महिला असलेली राष्ट्रपति, तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करणार्या नराधमाला दया दाखवितेच कशी ? अशी कोणती स्थिती होती की या नराधमाला जिवंत ठेवावे असे ताईंना वाटले ? हा निर्णय घेण्यापुर्वी ज्यांची हत्या झाली त्यांच्या नातलगांचे मत विचारात घेतले गेले का ? 35 दया अर्जापैकी 2 नवे होते तर बाकी 33 आधीच्या राष्ट्रपतींच्या काळापासून पेंडींग होते. साडेचार वर्षात ज्या फाइल पडून होत्या त्यावर निवृत्तिला काही महिनेच राहिले असताना होससेल पद्धतीने निर्णय घेण्याएवढी कोणती परीस्थिती निर्माण झाली होती ? सगळेच अनाकलनीय ! अफझल गुरू व मुरूगनच्या डेथ वॉरंटवर सही करायची धमक नाही की अजून एखादा देश फिरायला वेळ कमी पडतो आहे ? शिवसेनेने याच साठी या ताईंना पाठींबा दिला होता का ? सेना याचा जाब ताईंना का बरे विचारीत नाही ? उठसूठ सचिनला शिव्या घालणारे सेनाप्रमुख आता ताईंच्या या सार्वत्रिक माफीवर गप्प का ? तशी मराठी वृत्तपत्र सृष्टीने ही सार्वत्रिक माफीची बातमी साइडलानलाच टाकली, आता कोठे जनतेच्या तीव्र प्रतिक्रीया “वाचकांची मते” मध्ये अगदी सौम्य करून छापल्या जात आहेत. कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही हे आता या पेपरवाल्यांनाच सांगायची वेळ आली आहे. ताई , मराठी माणसे तुमच्या मुलाची आमदारकी विसरतील, नवर्याने मिरवलेला पदचा बडेजाव विसरतील, तुमच्यावर तुमच्या आप्त-स्वकियांवर सहकार क्षेत्रात झालेले गैरव्यवहाराचे आरोप विसरतील, (अर्थात या आधीच्या एकाही राष्ट्रपतीकडे बोटही दाखवायची कोणाची हिंमत झाली नव्हती, असो ! ) जगातल्या प्रत्येक देशाला भेट देवून जनतेच्या पैशाची केलेली उधळपट्टी विसरतील पण बलात्कारी खुन्याला दिलेली माफी कसे विसरतील ? कोणत्या तोंडाने सांगतिल की बलात्कारी खुन्याला माफी देणारी व देशद्रोह्यांबाबत निर्णय घेण्याची धमक न दाखविणारी व्यक्ती मराठी राष्ट्रपति होती ? पहिली मराठी राष्ट्रपति म्हणून मराठी माणसाने तुम्हाला मान दिला त्याच मराठी माणसाची मान तुमच्यामुळे शरमेने खाली गेली हे नक्की !

रविवार, ८ जुलै, २०१२

ना पैसा मिला ना कार्ड, भरो 200 रुपया चार्ज !

“एटीएम नव्हे चक्रव्यूह “ हा किस्सा तब्बल आठ वर्षापुर्वीचा तर हा प्रसंग अगदी फडफडता, 4 जुलै, माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच घडलेला.

 पैसे खाणारी माणसे असतात तशी काही मशीन सुद्धा पैसे खातात. माणसाचा गुण नाही पण वाण लागणारच ना ! रेल्वे स्थानकावर वजन छापून देणारी मशीन रूपया दोन रूपये गिळंकृत करतात, कार्ड वापरून पैसे काढताना पैसे प्रत्यक्षात हातात पडतच नाहीत पण बॅलन्स मात्र कमी होतो व हे सगळे निस्तरायला आपले रक्त आटवावे लागते याचा अनुभव सुद्धा अनेकांनी घेतलेला असेल. त्या दिवशी माझे कार्ड मात्र कोटक बँकेच्या मशीनने चक्क गिळून टाकले ! वाढदिवसाची मित्रांना पार्टी द्यायची म्हणून कार्यालयाकडून अगदी जवळ, कोपर्यावरच असलेल्या कोटकच्या एटीएम केंद्रात शिरलो. एटीएम खाचेत योग्य दिशेने आता ढकलताच ते पुर्ण आत गेले व लगेच बाहेर सुद्धा आले. हा प्रकार मला नवा होता. जुन्या मशीनमध्ये कार्ड खाचेत पुर्ण आत जाते व व्यवहार संपला की ते आपसूकच बाहेर येते. नव्या यंत्रात ते हातात ठेवूनच स्वाइप करायचे असते. इकडे मात्र पिन नंबर न विचारताच कार्ड बाहेर कसे आले म्हणून मी चक्रावलो. स्क्रीनवर काही सूचना पण नव्हती. नेटवर्क खराब असेल म्हणून मी ते कार्ड परत आत ढकलले तर परत ते बाहेर आले ! सकाळची वेळ असल्याने विचारायला कोणी रांगेत उभे नव्हते , सुरक्षा रक्षक आपली टोपी ठेवून गुल झाला होता व आत मदतीसाठी फोन सुद्धा दिसत नव्हता. मी कार्ड योग्य बाजूने ढकलत आहोत याची खात्री करून कार्ड परत आत ढकलले. आता मात्र ते कार्ड परत बाहेर आले नाही ! मी आता स्क्रीनवर पिन टाकण्याचा संदेश येण्याची वाट बघू लागलो पण तसे काहीच झाले नाही. आधीसारखे कार्डही बाहेर आले नाही ! मी मशीनवरच्या सगळ्या की दाबून बघितल्या पण काहीही उपयोग झाला नाही. मशीन निगरगट्टासारखे वागत होते. मग मी जरा डोळसपणे मशीनवरच्या सूचना वाचल्या व मग कळले की कार्ड बाहेर आले की आपल्या ताब्यात घ्यायचे आहे व पुढेचे सोपस्कार ! मी दूसर्या बँकेचे कार्ड वापरून व्यवहार पुरा केला. पण आत अडकून पडलेल्या कार्डाचे काय ?

  एटीएम केंद्राला लागूनच कोटक बँकेची शाखासुद्धा होती. आत जावून सगळा प्रकार सांगितला व कार्ड परत मिळण्यासाठी काय करावे लागेल याची विचारणा केली. आधी त्या कर्मचार्याने माझ्याकडे एक बापुडवाणा कटाक्ष टाकला व आता विसरा ते कार्ड असे पुटपुटला. माझा कानावर विश्वासच बसला नाही. अहो , असे कसे म्हणता ? एरवी अशी कार्ड ज्या बँकेची असतात त्या बँकेला परत करायची असतात व ज्याने त्याने आपल्या बँकेतुन ती घ्यायची असतात. मी त्याला परत परत उलट-सूलट प्रश्न विचारून हैराण केल्यावर त्याने सांगितले की या मशीनमध्ये तशी सोयच नाही. दोन संधी दिल्यावर मशीन तुमचे कार्ड सरळ पोटात घेवून नष्ट करते ! त्याचे अगदी तुकडे करते ! आम्ही काहीही करू शकत नाही. तुमच्या बँकेला कळवून तुम्हाला आता नवे कार्ड घ्यावे लागेल !

  एवढा कसा मी हा असे वाटून मला स्वत:ची लाज वाटत होतीच पण ते कार्ड मी गेली 15 वर्षे वापरत होतो म्हणून थोडा सेन्टी सुद्धा झालो, वाढदिवसाच्या दिवशीच असे घडावे याची खंत बोचत होतीच ! ते शुद्ध एटीएम कार्ड होते. आता बँकांनी एटीएम-कम-डेबिट कार्ड आणली आहेत व निखळ एटीएम कार्ड देणे बंदच केले आहे ! फक्त एटीएम कार्ड असल्याने त्यासाठी कोणतेही शूल्क नव्हते, डेबिट कार्ड गळ्यात मारून बँका खातेदाराकडून वर्षाला निदान 100 रूपये उकळतात. माझी आयसीआयसीआय बँक गेली अनेक वर्षे तुम्ही डेबिट कार्ड घ्या असे आधी विनवीत होती व मग धमकावित होती पण मी भीक घातली नव्हती. आरबीआय कडे तक्रार करीन व खाते सुद्धा बंद करीन असा दम देवून मी बँकेला दाद देत नव्हतो. आता मात्र माझ्याच चुकीने मी ते कार्ड घालवून बसलो होतो.

  कामावर पोचल्यावर सगळी कामे हातावेगळी करून मी नवीन कार्डसाठी ऑनलाइन विनंती करायला खाते उघडून बसलो. “डुप्लिकेट कार्ड” या सरदाखाली कार्ड हरविणे वा फाटणे असे दोनच पर्याय होते. माझे कार्ड तर गिळले गेले होते ! जखमेवर मीठ चोळण्यासाठीच त्यात म्हटले होते की डुप्लिकेट कार्डासाठी 200 रूपये प्रक्रीया शूल्क आकारले जाइल ! शेवटी मी हेल्पलाइनला फोन केला. पण मदत मिळण्यासाठी मला एटीएम नंबर द्यावा लागणार होता व तो माझ्याकडे वेगळा लिहिलेला नव्हता, पाठ तर नव्हताच नव्हता, अगदी त्यातला एक आकडा सुद्धा मला आठवत नव्हता ! शेवटी घरी फोन करून तो नंबर मिळविला. मग ग्राहक सेवा अधिकार्याशी बोलून सगळा प्रकार सांगितला व दूसरे कार्ड देण्याची विनंती केली.

  काही क्षण शांततेत गेल्यावर त्याने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्या प्रीत्यर्थ एरवी पडणारे 200 रूपये प्रक्रीया शूल्क माफ केले. अर्थात याचे मला अप्रूप वाटले नाही, त्या साल्याला नक्कीच आसूरी आनंद झाला असणार ! गेली पाच वर्षे बँकेला दाद न देणारा नाठाळ ग्राहक आपल्याच कर्माने गोत्यात आला होता. सुंठीवाचून खोकला गेला होता. आता डेबिट कार्ड त्याच्या माथी मारून वर्षाला 100 रूपयाचा मीटर चालू झाला होता. प्युअर एटीएम गमावून बसलेला बँकेचा मी शेवटचा ग्राहक तर नसेन ?

  “ ना खाया ना पिया ग्लास फोडा बारा आना” तसे “ना पैसा मिला ना कार्ड, भरो 200 रुपया चार्ज !

एटीएम नव्हे चक्रव्यूह !

आठ वर्षापुर्वी आम्ही तीन कुटुंबे केरळला गेलो होतो. हा धम्माल प्रसंग तेव्हाचा आहे. सहल सगळी व्यवस्थित पार पडली होती व दूसर्याच दिवशी आम्हाला तिरूअनंरपुरमवरून मुंबई गाठायची होती. माझ्या एका मित्राला थोडे पैसे कमी पडतील अशी भीती वाटली व तिकडेच एटीएम मधून पैसे काढायचे त्याने ठरविले. 8 वर्षापुर्वी आजच्यासारखी गल्लोगल्ली एटीएम नव्हतीच, त्यात ते तिरूअनंतपुरम ! रात्री 11 वाजता आम्ही दोघे एटीएम शोधायला बाहेर पडलो. थोडे चालल्यावरच आयसीआयसीआयचे एटीएम दिसले. माझ्याकडे त्या बॅंकेचे एटीएम होते. मी त्याला म्हणालो की स्टेट बँकेचे एटीएम उगाच शोधत बसण्यापेक्षा मी पैसे काढतो , गरज पडली तर वापर तू ते. त्याला तो तयार झाला व मी पैसे काढून घेतले.

  परतताना आम्ही उगाच इकडे-तिकडे भटकत असताना आम्हाला स्टेट बँकेचे एटीएम सुद्धा दिसले ! थोडे आतल्या वाटेवर होते पण तिकडे रांगच नव्हती. मित्राला अनायसे मशीन सापडले आहेच तर आपण सुद्धा कॅश काढून ठेवावी असे साहजिकपणे वाटले. पण एटीएमच्या आत शिरायचे कसे ? स्टेट बँकेच्या एटीएम केंद्रात कोणी सुरक्षा रक्षक दिसला नाही. एकदम मला आठवले की दाराला असलेल्या खाचेत कार्ड सारल्यास दरवाजा उघडतो ! तसे करून दोघेही त्या केंद्रात शिरलो, मित्राने रोख काढून घेतली. परत बाहेर पडताना मात्र दार उघडत नव्हते ! आम्ही दोघांनी ताकद लावून सुद्धा दार जराही हलले नाही. आत येताना जसे खाचेत कार्ड सरकवावे लागले तसे बाहेर जाताना असावे म्हणून तसाही तपास करून बघितला पण अशी खाच कोठेही आतून दिसली नाही. चक्रव्यूहात अडकल्यासारखे झाले ! आपण काही तांत्रिक बिघाडाने केंद्रातच अडकून पडलो असेच आधी आम्हाला वाटले. त्या एसी केंद्रात सुद्धा आम्हाला दरदरून घाम फुटला. कोणाची मदत मागावी तर आसपास कोणी दिसतच नव्हते. आत हेल्पलाइन होती पण ती कशी वापरायची याच्या सूचना स्थानिक भाषेत दिलेल्या होत्या. आम्हा दोघांचे मोबाइल सुद्धा सिग्नल दाखवत नव्हते. केंद्र सगळे बंदिस्त असल्याने आमचा आवाज बाहेर जात असेल का ही शंकाच होती. केंद्रात दोघांना बघून आम्ही कोणी चोर असू असे वाटण्याची भीती होती. बर्याच वेळाने तिकडे कोणीतरी पैसे काढायला आला. आमची बाहेर पडायची खटपट बघून त्याने तिकडून पोबारा केला व काही वेळाने अजून काही स्थानिक लोक त्याने जमविले. बाहेरचा जो तो आमच्याकडे वेगवेगळ्या अर्थाने बघत होता. कोणाला आमची दया येत होती, कोणाला आम्ही चोरटे वाटत होतो, कोणाला अडाणी ! बाहेरचे पब्लिक आधी त्यांच्या भाषेत व मग खाणा-खुणा करून आमच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करीत होते पण आम्हाला त्यात सूटकेचा काही मार्ग दिसत नव्हता उलट कोणीतरी आता पोलिसांनाच पाचारण करेल अशी भीती वाटत होती.

  अचानक आशेचा किरण दिसावा तसा एक तरूण बाहेरच्या बाजूला आला. त्याने कागदी चिटोर्यावर “What went wrong” असे खरडून आम्हाला दाखविले. मी लगेच मशीनजवळ पडलेल्या अनेक स्लिपपैकी एक स्लिप उचलली व त्या स्लिपवर पेनाने खरडले “How to come out ?” व त्याला दाखविले. त्याने आधी कपाळावर हात मारला व मोठ्याने हसत त्याने खरडले “Press the bell and push the door”. म्हणजे आम्ही आधीही ती बेल दाबत होतोच पण ती आपतकालिन मदतीसाठी असेल अशा समजुतीने. ती दाबून ठेवून दार ढकलायचे काही आमच्याकडून झाले नव्हते ! हुश्श ! एकदाची झाली सूटका ! आता तो तरूण स्थानिक भाषेत काय घोळ झाला ते बाहेर जमलेल्या सगळ्यांना घोळवून घोळवून सांगत होता व बाहेरचे आमच्या मुर्खपणाला लोट-पोट होईपर्यंत हसत होते ! धरतीमाता पोटात घेइल तर बरे असेच तेव्हा आम्हाला वाटत होते !

  अजूनही स्टेट बँकेचे एटीएम दिसले की मला “ती” फजिती आठवून हसू येते व एवढे साधे कसे आपल्याला सूचले नाही याचे आश्चर्य वाटते !