मंगळवार, २८ जून, २०११

मोबाइल संगीतातील तंत्रसाधना !

मोबाइल संगीतातील तंत्रसाधना !

संगीताचा आस्वाद घेणे कधी काळी खिशात पैका खुळखुळत असेल तरच शक्य होते. आकाशवाणीने व मग दूरदर्शनने आम आदमीला कानसेन बनविले पण त्यालाही काही मर्यादा होत्याच. संगीताचा घरबसल्या व हवे तेव्हा आस्वाद घेण्याची जी साधने होती ती मध्यमवर्गीयाच्या आवाक्याबाहेरच होती. ग्रामोफोन, कॅसेट प्लेयर, वॉकमन व एम.पी. 3 प्लेयर , आय-पॉड या प्रवासात संगीत अभिजनांपासून जनांपर्यंत सर्वत्र झिरपायला लागले. नेट वर सुरवातीला एम.पी. 3 गाणी अगदी सहज उपलब्ध होती पण ती वाजविण्यासाठी लागणारी उपकरणे परवडण्याजोगी नव्हती. स्वामीत्व कायद्याचा बडगा उगारला गेल्याने , एम.पी. 3 माध्यमातुन संगीत उपलब्ध करून देणार्या अनेक साइटस भूमिगत झाल्या ! म्हणजे दात होते तेव्हा चणे खायला पैसे नव्हते व आता दात पडल्यावर चणे खायची ऐपत आहे अशी स्थिती संगीताचे वेडे असलेल्यांची झाली. जुनी गाणी मिळत नाहीत व रिमिक्सचा मारा मात्र चालूच आहे. एम.पी.3 या प्रकारातली जुनी मराठी गाणी अनेक साइटसवर उपलब्ध आहेत पण ती फक्त ऐकायला मिळतात, उतरवून घेता येत नाहीत ! काही वेब-साइटस गाणी ऐकायची असतील तर नोंदणी करायची सक्ती करतात, तर काही वेब-साइट्स गाण्याची काही सेकंदाची झलक ऐकवून दामाजी काढा असे बजावतात !


 

मला स्वत:ला जुनी मराठी व हिंदी गाणी खूप आवडतात व ही गाणी मोबाइलवर ऐकत पनवेल-मुंबई-पनवेल हा रोजचा प्रवास अगदी सुरेल होतो ! एम.पी.3 प्लेयर असलेला मोबाइल व गाणी साठविण्यासाठी 2 जीबीचे मेमरी कार्ड घेणे सोपे आहे पण त्यात गाणी, ती ही आपल्याला आवडणारी , भरण्यासाठी पचंड खटपट मला करावी लागली. शोधा म्हणजे नेटवर काहीही सापडेल ! अनेक तास नेटावर नेट लावून भ्रमंती केल्यावर जे काही हाती गवसले ते या लेखात संकलित करीत आहे.

  • कुलटोड, ( www.cooltoad.com , नोंदणी आवश्यक ) इस्निप्स ( www.esnips.com नोंदणीची गरज नाही पण त्यांचा डाउनलोडर वापरावा लागतो. ) या साइटसवर अजूनही असंख्य मराठी जुनी गाणी आहेत. अजूनही कुलटोड वरून सर्च करून तुम्ही सहज हवे ते गाणे उतरवू शकता पण बाकी वेब-साइटस तुम्हाला फक्त गाणे ऐकायची सवलत देतात. उदा. www.in.com, www.raaga.com . www.aathavanitli-gani.com ही वेब-साइट संपूर्ण मराठीत आहे, गाण्यांचे बोल सुद्धा दिलेले आहेत, दी बेस्ट !
  • आडमुठ्या वेब-साइट्ना वठणीवर आणणारा उपाय आहे तो म्हणजे इंटरनेट डाउनलोड मॅनेजर ( आय.डी.एम ) हे सॉफ़्टवेयर वापरणे. हा प्रोग्राम वापरल्यास गाणे ऐकत असतानाच ते तुम्हाला उतरवता येते ! आय.डी.एम. ची अजून एक कमाल म्हणजे त्यात असलेला "साईट ग्रॅबर" हा पर्याय ! हा पर्याय वापरून तुम्ही एखाद्या साइटसवर असलेली सर्वच्या सर्व एम.पी.3 गाणी (किंवा त्या वेब साइटसवरील हवे असलेले काहीही ! ) एका झटक्यात उतरवून घेवू शकता ! यात तुम्ही वेळ सुद्धा सेट करू शकता. म्हणजे आधी लिंक उतरवून घ्यायच्या व रात्री जेव्हा नेटचा स्पीड कमाल मिळतो ती वेळ सेट करून ठेवायची. ठरवलेल्या वेळी उतरवून घेण्याचे काम चालू होते. संगणकाचा मॉनिटर स्वीच ऑफ करून ठेवायचा. वीज व वेळ दोन्हीची बचत होते. काम आटोपल्यावर सांगितले असेल तर बापडा संगणक बंद सुद्धा करतो ! जबराट आहे हे सॉफ्टवेयर !
  • यु-ट्यूब ( www.youtube.com ) वर सुद्धा अनेक मराठी गाणी आहेत. एरवी ती तुम्हाला फक्त ऐकता येतील पण आय.डी.एम असेल तर तुम्हाला ती flv मध्ये उतरविता येतील.
  • मायाजालावर flv चे mp3 मध्ये परिवर्तन करणारा प्रोग्रॅम सुद्धा आहे !
  • मायाजालावर मिळणारी गाणी 128 ते 320 या बीटरेटने ( Bit Rate in Kbps ) साठविलेली असतात. साधारण 3 मिनिटाचे एक गाणे 3 ते 4 एम.बी. एवढी जागा व्यापते. हेच गाणे जर 64 केबीपीएस बीट रेट मध्ये परावर्तित केले तर दीड ते दोन एम.बी. एवढीच जागा व्यापेल ! म्हणजेच नेहमीपेक्षा दुप्पट गाणी तुम्ही तेवढ्याच जागेत बसवू शकाल ! अर्थात दर्जाशी थोडी तडजोड करावी लागेल पण इयरफोन कानाला लावून गाणी ऐकत असाल तर तेवढे तुम्हाला जाणवणारही नाही !
  • तुमच्या कडे गाण्यांच्या सीडी असतील तर त्यातली गाणी सुद्धा तुम्ही सहज एम.पी.3 मध्ये बदलू शकता. त्यासाठी Audio Grabber नावाचा प्रोग्राम उपलब्ध आहे.
  • संगणकावर गाणी ऐकताना तुम्हाला तुमच्या आवडीच्या गाण्यांची यादी बनवून (प्ले-लिस्ट) ऐकायची सोय असते पण अनेकदा तुमच्या मोबाइलमध्ये ही सोय नसते. काही मोबाइल गाण्याच्या एम.पी.3 टॅग प्रमाणे वर्गवारी करतात (ऑटो लिस्ट जनरेशन ) पण त्यासाठी मूळात गायकाचे नाव, अल्बमचे नाव, जातकुळी (Genre) इत्यादी माहिती फाइलीत साठविलेली हवी. समजा मला लावण्यांची एक यादी बनवायची आहे व माझ्या मोबाइलमध्ये स्वत:च्या आवडीप्रमाणे यादी बनवायचा पर्याय नसेल तर काय ? यावर सुद्धा उपाय आहे तो म्हणजे एम.पी.3 टॅग एडीटर ! याचा वापर करून तुम्ही गाण्याचे टॅग बदलू शकता केव्हा नसतील तर टाकू शकता. तुम्ही हवे असलेले टॅग टाकून घेतलेत जसे गायक, संगीतकार, गीतकार, चित्रपट, गाण्याचा प्रकार की मग तुमचा मोबाइल त्या प्रमाणे यादी बनवून देइल. अनेकदा मोबाइल वर गाण्यांची यादी बघताना फाइल गाण्याच्या नावाने सेव केली असली तरीही गाण्याचे नाव न दिसता "ट्रॅक 1" असे काही दिसते. त्यामुळे गाणे कोणते आहे तेच कळत नाही ! गाण्याच्या टॅग मध्ये टायटल या प्रकारात जी माहिती साठविलेली असते तीच तुमचा मोबाइल दाखवित असतो. टॅग एडीटर वापरून तुम्हाला या समस्येवर सुद्धा मात करता येते. गाण्याच्या नावाप्रमाणे फाइल असेल तर एका क्लिकसरशी तुम्ही ते नाव टायटलमध्ये अपडेट करू शकता ! टायटल असेल पण फाइल नाव मात्र वेगळेच काही, जसे फाइल 1, 2 असे असेल तर हाच प्रोग्राम वापरून तुम्हाला एका झटक्यात सर्व फाइल टायटल प्रमाणे रीनेम करता येतात.


 

यात नमूद केलेली सर्व सॉफ्टवेयर मायाजालावर अगदी मोफत उपलब्ध आहेत व याचा वापर करताना एकाच वेळी अनेक फाइल हाताळता येतात (बॅच मोड ) . या सगळ्यांच्या लिंक मी देत आहे सोबत "मीडीया फायर" या फाइल शेयरींग वेब-साइटवर असलेला जुन्या , सुमधुर मराठी गाण्यांच्या खजिन्याची किल्ली ( लिंक्स किंवा दुवे ) मी तुम्हाला देत आहे.

मराठी गाण्यांच्या लिंक्स

अभंगवाणी

गीतरामायणातील निवडक गाणी (बाबुंजीच्या निवेदनासह )

बेधुंदगीते.

भावगीते

देशभक्तीपर गीते.

नाट्यसंगीत

लोकगीते

निसर्गगीते

तमाशा/लावण्या

प्रेमगीत

विरहगीत

भावगीते

भक्तीगीते

संकीर्ण

लेखात उल्लेख असलेली सर्व सॉफ्टवेयर उतरविण्यासाठीची लिंक.

महत्वाची सूचना :- या लेखातील माहीतीचा वापर ज्याने त्याने आपल्या जोखमीवर करायचा आहे. मायाजालात मिळालेल्या लिंक मी फक्त देत आहे. या बाबत कोणत्याही प्रकारे मला जबाबदार धरता येणार नाही. धन्यवाद !

रविवार, १२ जून, २०११

निसर्गाचा न्याय !


पावसात मस्त फुललेले निशिगंधाचे फूल ! त्यातुन डोकावणारे मधयुक्त पराग कण , त्याला भुलुन त्या परागकणांच्या दिशेने झेपावलेली माशी ! पण आपण एवढे जवळ जावून सुद्धा ती उडत कशी नाही ? एवढी रममाण झाली आहे मधुकण टीपण्यात ? ही मेलेली तर नाही ? पण मग खाली कशी पडत नाही ? आणि मेली तरी कशाने असेल ? अधिक रोखून बघितल्यावर कळले की फुलाच्या पांढर्याशुभ्र पाकळीत बेमालूमपणे लपलेल्या एका कोळ्यासारख्या दिसणार्या पण पांढर्या किड्याने आपल्या पायानी तिची मान आवळली आहे ! बिचार्या माशीला याची जरातरी कल्पना आली असेल का ? हीच का निसर्गातली समता ? हाच का निसर्गातला न्याय ? निसर्गाच्या न्यायालयात माफी नाही हेच खरे ! मोहाला बळी पडलात तर तुम्हाला मिळणार देहांत प्रायश्चित ! त्याहून कमी काहीही नाही ! ( हा दुर्मिळ क्षण कॅमेर्‍यात टीपला आहे प्रसादने ! )

बिनडोक बंडू !

बंड्या भलताच खूष होता आज. कारणही तसेच भारी होते. त्याला चक्क एक करोड डॉलरची लॉटरी लागली होती. त्याचा इमेल आयडी मायक्रोसॉफ्ट कंपनीला भलताच आवडला होता व त्यासाठी काढलेल्या लकी ड्रॉ मध्ये तो लकी ठरला होता. संपर्कासाठी दिलेल्या इमेलवर त्याने लागलीच संपर्क साधला व आपण एक करोड डॉलरचे बक्षिस क्लेम करत असल्याचे सहर्ष कळवून टाकले. लॉटरी कंपनीच्या एका एजंटाने त्याला उत्तर देताना अमक्या खात्यात प्रक्रीया खर्च म्हणून फक्त एक लाख रूपये भरा की लागलीच तुमच्या खात्यात ऑन-लाइन एक करोड डॉलर जमा झालेच म्हणून समजा असे कळविले होते. अर्थात बाबांना सांगण्यात काहीही अर्थ नव्हता कारण ते याला मूर्खपणा असे म्हणून मोकळे झाले असते. पण बाबांच्या खात्याचा ऑनलाइन युजर आयडी व पासवर्ड बंड्याला माहीत होता व बाबांचे खात्यासंबंधी येणारे अलर्ट ज्या मोबाइलवर यायचे तो मोबाइल सुद्धा बंड्याच्या ताब्यातच होता ! बाबांच्या खात्यात कसेबसे एक लाख रूपये होते पण मिनिमम बॅलन्स २५००० रूपये आवश्यक असल्याने तो ते ट्रान्सफर करू शकत नव्हता.

अर्थात स्वस्थ बसेल तो बंड्या कसला. त्याने त्या एजंटलाच कळवून टाकले की काही दिवस कळ काढा, बाबांचे काही चेक जमा झाले की आपण हा व्यवहार पुरा करू. एजंटने लगेच कळवून टाकले की ७५००० हजार दिलेत तरी हरकत नाही, स्पेशल केस म्हणून मी माझ्या अधिकारात हा व्यवहार पुरा करू शकतो. आजच व्यवहार पुरा करा नाहीतर तुमचा क्लेम रद्द होईल !

बंड्या कसाही असला तरी दिल्या शब्दाला पक्का होता व व्यवहाराला अगदी चोख ! त्याने कळविले की व्यवहार म्हणजे व्यवहार, तुम्हाला लाखापेक्षा मी एक पैही कमी देणार नाही पण तुम्ही काही दिवस थांबणार असाल तर तुम्हाला मी लाखच काय दहा लाख द्यायला तयार आहे. काहीही करा पण या व्यवहाराला थोडी वाढीव मुदत मिळवा. सोबत पुरावा म्हणून बाबांच्या खाते उतार्याची पीडीफ प्रत त्याने अटॅच केली होतीच व सोबत एजंटने दिलेले खाते पेयी लिस्ट मध्ये अ‍ॅड केल्याची व त्या नावावर चार दिवसानंतर १ लाख ट्रान्सफर करायची सूचना नोंदविल्याची नोंद सुद्धा त्याने जोडली होती.

एजंटला सुद्धा बंड्याची सच्चाई कोठेतरी भिडली असावी. त्याने स्वत:हून बंड्याच्या बाबांच्या खात्यात २५००० रूपये जमा करायची तयारी दर्शविली. बंड्याने सुद्धा संकोच वाटत असला तरी हा प्रस्ताव मान्य केला पण या उपकाराच्या ओझ्याखाली दबलो गेल्यामुळे एक लाखाच्या ऐवजी दोन लाख त्या एजंटला देवू केले व तशी सूचना दुरूस्त केल्याचा पुरावा सुद्धा त्याला इमेलने सत्वर धाडला ! एजंटने सुद्धा लगोलग त्याच्या बाबांच्या खात्यात रूपये २५००० जमा केले.



.
.

.


.

.

.
.
.
.

.
.
.
.















































आधीच्या एका प्रकरणातले २५००० व हे २५००० हजार मिळून बंड्याने बजाजची भारी बाइक घेतली आहे व बबलीला बॅकसीटला बसवून तो भटकत असतो हल्ली बेलापुर पर्यंत ! बंड्या बिनडोक आहे असे म्हणणार्या बाबांची बोलती बंद झाली आहे !

चष्मा लागला पण दृष्टी मात्र गेली !

मुंबई बंदर, पगारा व्यतिरीक्त अनेक खर्चाचा अंशत: परतावा आम्हाला देत असते. अर्थात त्याची प्रक्रीया एवढी किचकट असते की ’भीक नको , पण कुत्रे आवर’ असा प्रत्यय ते घेताना येतो व आमच्या गोदी विभागातले अनेक जण त्या फंदात पडतच नाहीत. दोन वर्षातुन एकदा आम्हाला चष्मा घेण्यासाठी १००० रूपये किंवा प्रत्यक्ष आलेला खर्च यात जे कमी असेल त्या रकमेचा परतावा मिळतो पण त्यासाठी आमच्या किंवा सरकारी रूग्णालयात जावूनच नंबर काढावा लागतो ! अर्थात यात पुर्ण दिवस वाया जातो म्हणून कोणी त्या भानगडीत पडत नाही. काही वर्षापुर्वी मला कोणीतरी सांगितले की सेंट जॉर्ज रूग्णालयातला एक शिपाई १० रूपये दिले की तुम्हाला डोळ्याचा नंबर काढल्याचे (हव्या त्या नंबराचे !) सर्टीफिकेट देतो. हे रूग्णालय आमच्या कार्यालयाच्या बरोबर समोरच असल्याने आम्ही सगळे सहकारी तिकडे गेलो व १० रूपये मोजून प्रत्यक्षात कोणतीही तपासणी न करता ते प्रमाणपत्र घेतले होते ! पुढची प्रक्रीया होती चष्मा बनविल्याचा कॅश मेमो त्या प्रमाणपत्राला जोडून अर्ज सादर करायची. अर्थात अशी खोटी बिल सुद्धा बनवून देणारे अनेक दूकानदार होते पण मी त्या भानगडीत न पडता एका दूकानात जावून खरेच नंबर तपासला तेव्हा तो अगदीच नगण्य होता व चष्मा लावायची मला काहीही गरज नव्हती. मी तो नाद मग सोडून दिला.

अध्यक्षांचा मदतनीस म्हणून काम सुरू केल्यावर मात्र सततच्या संगणक वापराने डोळे व डोके दुखू लागले. चाळीशी लागल्याची सर्व लक्षणे दिसत होती पण कामाच्या रामरगाड्यात रूग्णालयात जावून दिवस वाया घालविणे कसे जमणार ? पण आता मी अध्यक्षांचा पीए होतो नाही का ! फक्त एक फोन करून डोळ्याच्या डॉक्टरची भेटीची वेळ ठरविली व इतर कोणतेही सोपस्कार न होता मला तपासणी करून नंबर काढून मिळाला व तसे आवश्यक प्रमाणपत्र सुद्धा मिळाले. या वेळी मात्र नंबर चांगलाच वाढला होता व जवळचा व लांबचा असे दोन्ही दोष निर्माण झाल्याने चष्मा रोज वापरावाच लागणार होता. क्लेम मिळणार होता जास्तीत जास्त हजार रूपयाचा पण माझे खर्च झाले १५०० रूपये ! बायफोकलने मला खूपच ताप झाला. कार्यालयात बसण्याच्या रचनेप्रमाणे संगणकाचा पडदा माझ्यापासून दिड फूट लांब होता, की- बोर्ड खाली दोन फूट अंतरावर व नोंदी करायचे रजिस्टर एक फूटावर ! हे त्रांगडे मला चांगलेच त्रास देवू लागले. इकडून तिकडे नजर फिरविताना आधी सगळेच धूसर दिसायचे व काही सेकंदाने नजर बसायची ! पायर्या उतरताना भयंकर गोंधळ उडू लागला. पायरी किती खोल आहे याचा अंदाजच यायचा नाही. असेच एकदा घाई- घाईत कार्यालयाच्या बाहेर पडताना, पायरीचा अंदाज न आल्याने माझा पाय मुरगळला व मी चांगलाच आदळलो ! लगेच काही कळले नाही पण पनवेलला पोहचेपर्यंत पाय हत्तीसारखा सूजला होता. या स्थितीत स्टेशनचा जिना चढून तिसर्या मजल्यावरच्या घरात कसा पोहचलो माझे मलाच माहीत ! सकाळी उठलो तेव्हा मुरगळलेला पाय मी जमिनीला टेकवू सुद्धा शकत नव्हतो. ही अवस्था दोन दिवस होती ! संपूर्ण बरा व्हायला तब्बल महिना लागला पण १० दिवसाच्या रजेनंतर एका पायाने कामावर जायला लागलो होतो. मधल्या काळात अध्यक्षांच्या पीएचा पाय घसरला, पायरी विसरला , पायरी समजली , पायरी ओळखा --- असे अनेक पीजे मित्रमंडळीनी पसरवले होतेच ! चष्म्याचे हजारभर रूपये मिळाले पण १० दिवसाची रजा वाया गेली, ओवरटाइम बुडाला, क्ष-किरण तसासणी, फिजीओथेरपी व मलमे यावर हजारभर रूपये खर्च झाले ! लेने के देने पडले ! पण हे एवढ्यावरच थांबले नाही. असला अपघात परत होवू नये म्हणून डॉक्टरी सल्ल्याने मी दोन चष्मे बनवून घेतले, एक जवळचे बघायला व एक लांबचे बघायला. त्याचा दोन्हींचा खर्च आला पत्येकी एक हजार ! एक काढून दूसरा चष्मा लावताना धांदरटपणाने त्याच्या काचा सुद्धा अनेकदा फूटल्या व तो बदलायचा खर्च वेगळाच !

अशी दोन वर्षे धडपडत गेल्यावर परत नव्याने क्लेम लागू झाला. या वेळी आधी पनवेलमधीलच प्रख्यात नेत्र-तज्ज्ञाकडून नंबर काढून घेतला व आधी वेळ ठरवून आमच्या रूग्णालयात गेलो. तिकडे काढलेला नंबर काही वेगळाच निघाला पण तरीही मी खाजगी तपासणी करून घेतलेल्या नंबरा प्रमाणेच प्रमाणपत्र घेतले. चष्मा बनवायला दूकानात दोन दिवसाच्या अंतराने गेलो तेव्हा दूकानदाराने तपासणी करून तिसराच नंबर दिला तेव्हा मात्र माझ्या डोळ्यासमोर काजवेच चमकले ! आता चष्मा कोणत्या नंबराप्रमाणे बनवायचा ? शेवटी दूकानदाराने परत तपासणी करून त्याने काढलेल्या नंबराप्रमाणेच चष्मा बनवायचे ठरले. दोन फ्रेम होत्याच तेव्हा त्यानांच नवीन नंबराच्या काचा लावून दे असे दूकानदाराला सांगताच त्याने माझ्यापुढे प्रोग्रेसिव लेन्सचा प्रस्ताव ठेवला. या लेन्स म्हणे जशी आपली नजर फिरते त्याप्रमाणे आपोआपच अॅचडजस्ट होतात. याचा खर्च मात्र येणार होता फक्त २५०० रूपये ! अर्थात जुन्या फ्रेम नव्या प्रोग्रेसिव लेन्सला सूट होत नसल्याने नव्या फ्रेमसकट हा खर्च होता. अर्थात सोय चांगली असल्याने मी त्याला देकार दिला.

चष्मा बनल्यावर मी तो दूकानात घालून बघितला तेव्हा मला थ्री डी चित्रपट बघत असल्याचा भास झाला ! डोके नुसते गरगरू लागले ! ना जवळचे नीट दिसते होते ना लांबचे ! खोलीचा अंदाज तर बिलकूलच येत नव्हता ! दूकानदाराने मात्र सवय नाही म्हणून असे होते , रोज वापरा, काही दिवसाने तुम्हाला सवय होइल असे सांगून माझी बोळवण केली ! दिवस कसले, काही महिने झाले तरी मला काही त्याची सवय झालेली नाही ! जवळचेही दिसत नाही, लांबचेही दिसत नाही, पायर्या उतरताना चाचपडणे काही थांबत नाही ! ’ते’ दूकान शोधतो आहे पण चष्मा काढल्यावर ते दिसत नाही व लावल्यावर ’हेच ते दूकान’ म्हणून ओळखता येत नाही. डोंगर दुरूनसुद्धा साजरे दिसत नाहीत. एखादी सुंदरी (तसे हल्ली जगात सुंदर असे माझ्या दृष्टीने काही उरलेलेच नाही म्हणा ! ) जवळून गेली तरी मान मोडेपर्यंत बघायचे कष्ट मी हल्ली घेत नाही त्यामुळे सौ मात्र भलतीच खुष आहे !

शुक्रवार, १० जून, २०११

मरणानंतर वैर संपते पण ---

रामाने रावणाचा वध केल्यावर ’मरणांतानि वैराणी’ असे म्हणत स्वत: रावणाला विधिवत अग्नी दिला होता. हा आदर्श भारतात अजूनही पाळला जातो. स्वराज्याचा घास घ्यायला आलेल्या खानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी काढला पण त्याच्या कबरीला प्रतापगडाच्या पायथ्याशी जागा दिली. कारगिल युद्धात मेलेल्या पाकच्या सैनिकांचे भारतीय जवानांनी सन्मानाने दफन केले, अगदी याच पाकड्यांनी आपल्या सैनिकांच्या मृतदेहांची मेल्यानंतरही विटंबना केलेली असतानाही ! न्यायालयीन कारवाई टाळण्यासाठी परागंदा झालेले हुसेन लंडनमध्येच पैगंबरवासी झाले म्हणून भारतीय वृतपत्रांनी मोठाच मातम केला आहे ! त्यांनी लंडनमध्ये पलायन केले याला जणू सगळे हिंदूच जबाबदार या आवेशात सगळ्या पेपरवाल्यांनी गळा काढला आहे.

महाराष्ट्रातील पंढरपूर येथे जन्मलेले चित्रकार एम.एफ. हुसेन लंडनमध्ये पैगंबरवासी झाले. भारतात उदंड पैसा, प्रसिद्धी कमावलेले हुसेन लंडनमध्ये कशाला गेले होते ? हिंदू देव-देवतांची नग्न चित्रे काढल्याबद्दल त्यांच्यावर भारतात न्यायालयात खटले चालू होते. त्यात त्यांना शिक्षा होणार होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांना जर एवढा पुळका होता तर आपली ही भूमिका त्यांना न्यायालयात ठामपणे मांडता आली असती. जिकडे कसाबचे ऐकले जाते तिकडे हुसेनचे सुद्धा ऐकले गेले असतेच ! पण भ्याड हुसेन यांनी आधी दुबईत मग इंग्लंडमध्ये पलायन करणे पसंत केले. आता वयाच्या पंचाण्णवाव्या वर्षी मृत्यू येणे तसे स्वाभाविकच आहे आणि तो जिकडे असाल तिकडेच येणार. यमदूत काही देशांच्या सीमा पाळायला बांधील नाहीत. हुसेन यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दावाच मुळात खोटारडा होता. हिंदू देव देवतांची नग्न चित्रे त्यांनी रेखाटलीच पण त्याही पुढे जावून त्यांनी भारतमातेच्याच वस्त्राला हात घातला. या वेळी मात्र भडका उडाला व हुसेन यांचे हात त्यात पोळले, तोंड दाखविणे त्यांना मुष्किल झाले. त्यांनी या प्रकाराची माफी मागितली तेव्हाच हिंदू देव-देवतांना विकृत स्वरूपात रेखाटल्याबद्दल खेद व्यक्त करायला हवा होता. पण तसे मात्र त्यांनी केले नाही ! हिंदूच्या देव देवतांना नग्न रेखाटणारा हुसेन यांचा कुंचला इतर धर्मातल्या विभूति रेखाटताना मात्र भलताचा सोज्वळ असे. हुसेन यांची आई लहानपणीच गेली होती व अखेरपर्यंत ते आपल्या आईच्या कबरीचा शोध घेत होते. आईचे रेखाटन करताना हे असले थेर हुसेन यांना का सुचले नाहीत ? तेव्हा हिंदूना दुखविणे, त्यांच्या श्रद्धा स्थानांना ठेच पोचविणे व यातुन अधर्मी मिडीयाचा वापर करून स्वत:ची तुंबडी भरणे हेच हुसेन यांचे खरे स्वरूप होते. जिकडे आपण नाव कमाविले तिकडेच मरण येणे हे भाग्यलक्षण असले तरी ते भाग्य हुसेन यांनी स्वत:च लाथाडले होते. दोष त्यांच्या कर्माचाच आहे. देशद्रोहाचा आरोप माथ्यावर मिरवत परागंदा असलेला दावूद सुद्धा केव्हातरी मरणारच आहे, तो उद्या पाकमध्ये किंवा दुबईत मेला म्हणून भारतीय मिडीया असाच मातम करणार आहे का ?

झाले ते झाले ! हुसेन मेले ,वैर संपले, आता खुषाल त्यांचे थडगे पंढरपूरमध्ये बांधा पण कफन म्हणून भारतमातेच्या वस्त्राला हात घालू नका म्हणजे झाले !