मंगळवार, २१ एप्रिल, २००९

ना खाया ना पिया, गिलास फ़ोडा बारा आना !

अगदी वर्षभरापुर्वीच ठरले होते, मुलाची दहावी आटोपली की हिमालयात पदभ्रमणाला जायचे आणि ते सुद्धा युथ हॉस्टेलसोबतच ! संकल्प पक्का व्हावा म्हणून जिथे संधी मिळेल तिकडे त्याचा पुनरूच्चार करत होतो. त्यामुळे झाले काय की माझ्याबरोबरच कामावरचे अजून ४ जण, त्यांची मुले, कोब्रा कट्ट्यावरचा गुणेश हे सुद्धा सोबत यायला तयार झाले. साधारण फ़ेब्रुवारी महीन्यात युथ हॉस्टेलच्या वेबसाइटवर ट्रेकचे ऐलान होते. ४ मेच्या तुकडीत दाखल व्हायचे सुद्धा पक्के झाले. रेल्वे आरक्षणाची जबाबदारी नेहमीप्रमाणेच माझ्यावर सोपवली गेली. परळच्या कार्यालयात जाउन नावनोंद कामावरचा मित्र विवेक करणार होता. मधेच थोडा गोंधळ झाला, अचानक माझी अध्यक्षांचा स्वीय सहायक म्हणून नियुक्ती झाली. कोणीतरी पचकले, मराठे, तुला आता एवढी सुट्टी मिळणारच नाही त्यात हा तर मे महीना, तुझा ट्रेक आता बोंबलला ! पण मी अशी काही फ़िल्डींग लावली की रजा सुद्धा चार महीने आधीच पास करून घेतली. पण त्यासाठी एक अट मान्य करायला लागली ती म्हणजे हिमालयातुन रोज , एकदा सकाळी, एकदा रात्री फ़ोन करून संपर्कात रहायचे. तसेही पनवेलच्या मुख्यालयाला रोज रात्री रीपोर्टींग करावे लागणारच होते ! हिमालयात नेटवर्कचा प्रोब्लेम काहीच नसतो पण मोबाईलची बॅटरी चार्ज करण्याची सोय बेस कॅम्प सोडला की नसते. यावर उपाय म्हणून ठराविक वेळीच मोबाईल स्विच ऑन ठेवायचा असे ठरवले व एक जास्तीची बॅटरी खरेदी करून ठेवली. एकदाचा फ़ेब्रुवारी उजाडला, ट्रेकचे रीतसर ऐलान झाले, हर की धुन या मोहीमेसाठी नावनोंद झाली. डोळ्यात तेल घालुन बरोबर ९० दिवस आधी मी सर्वांच्या रेल्वे आरक्षणाची जबाबदारी पार पाडली. अर्धी मोहीम फ़त्ते झाली होती !

मुलाची परीक्षा २० मार्चला संपली आणि घरात दबक्या आवाजात चालणारी ट्रेकची चर्चा खुलेआम सुरू झाली ! संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी अशी एक म्हण आहे तीच थोडी बदलून “माझ्या ट्रेकला बूटापासून सुरवात” अशी केली की मला अगदी चपखल बसते ! एवढे ट्रेक केले पण त्यासाठी लागणार्या वस्तू जमवताना माझ्या कायम नाकी नउ येतात ! बायको म्हणते की ट्रेकमधे तुझी जेवढी पायपीट होत नाही तेवढी माझी तुझ्या ट्रेकची तयारी करताना होते ! त्यात आता एकसे भले दो अशी स्थिती होती. बायकोची रोज भुणभुण चालू होती, ट्रेकला जात आहेस, सोबत मुलाला घेउन, तर तयारीचे काय ? मी अजून बराच अवकाश आहे, वेळ आहे, पुढच्या महीन्यात, आठवड्यात – असे करत करत एप्रिल उजाडला. मग मात्र बायकोने एका रविवारी आम्हाला घराबाहेरच पिटाळले ! प्रसादसाठी बूट घेताना माझेही बूट फ़ाटल्याचे समजले. मग हाच प्रकार सॅक घेताना सुद्धा झाला. दोघांचे सामान राहील इतपत मोठी एयर-बॅग पण ’असू दे’ म्हणून घेतली. थंडीपासून बचाव म्हणून, कानटोपी-हातमोजे हवेतच पण घरात काही केल्या ते सापडेनात म्हणून नवे घ्यायला लागले. पण तेवढ्याने काय होणार म्हणून थर्मलवेयरची खरेदी झाली. हिमालयात आंघोळ करायची गरज नसते पण पायमोजे दिवसाआड बदलावेच लागतात. तिकडे ते धुउन परत वापरणे शक्यच नसते म्हणून मग त्यांचे ६ जोड घेतले, अर्थात इनटू टू ! कॉटनच्या सहा खिसे असलेल्या चार कार्गो पॅण्ट, तेवढेच टी शर्ट विकत घेतले, कार्गो पॅण्टच्या वर घालायला तलम मेणचट कापडाची विजार घेतली. भरपूर फ़ोटो काढता यावेत म्हणून डीजिटल कॅमेरा होताच पण त्याच्या बॅटरी चार्ज करता येणार नाहीत म्हणून त्यांचेही अधिकचे तिन जोड घेतले. मग लगे हात, २ गीबीचे एक मेमरी कार्ड सुद्धा घेउन टाकले, असलेले बरे ! तिकडे मधेच हलकासा हिमवर्षाव होतो, बारीकसा पाउस पडतो, त्या पासून बचाव म्हणून ’बरसाती’ची (कोकणातले इरले) खरेदी झाली. पण बरसाती काय कायम अंगावरच ठेवायच्या का ? मग जॅकेट घेणे क्रमप्राप्तच होते ! बूट घालुन कायम फ़िरता येणार नाही म्हणून ऑल-वेदर चप्पल घेतल्या गेल्या. मध्येच उन्हा़चा त्रास हो़उ नये म्हणून गॉगल मस्ट , अशी एक टूम निघाली, तेही खरीदले. क्रेडीट कार्ड हैना आपुन के पास ! फ़िर क्या फ़िकर करने का ? ट्रेकची फ़ी ३६०० रूपये, प्रवास खर्च २७०० रूपये, वस्तू खरेदी साधारण ७ सहा हजाराची – प्रत्येकी – असा ताळेबंद मांडल्यावर मात्र हे जरा अतिच झाले, जरा जास्तच खर्च झाला याची चुटपुट लागली. पण ती फ़ार वेळ टिकली नाही, कारण साधारण २० दिवसाचे स्कूटर पार्कींगचे तब्बल २०० रूपये वाचणार होते ! अजून एक आयडीया सूचली, तिमाही पास न काढता, मासिक पास काढूया, कारण जवळपास संपूर्ण मे महीना कामावर कोठे आहोत ? वा ! क्या बात है ! मग २० फ़ेब्रुवारीला पास संपल्यावर मासिक पासच काढला व २१ एप्रिलच्या पुढचे सात दिवस यात्री तिकीटावर प्रवास करायचे ठरवले, थोडे-थोडके नाही तब्बल ३० रूपये वाचणार होते ! अर्थशास्त्र कोळून प्यायलो आहे बरे मी ! बचतीच्या पैशात माथेरानचा ट्रेक करण्याचे ठरले !

घरी ’हिमालय की गोद मे’ या हिन्दी तर ’क्लीफ़हँगर’ व व्हर्टीकल लिमीट’ या अंग्रेजी चित्रपटांचे सतत शो चालू होते. मस्त माहोल पैदा झाला होता. घरात व बाहेर ’सासू’रवास चालू होता. सारख्या सूचना ! अधे-मधे फ़ोनाफ़ोनी करून आम्ही तुकडीतले सहकारी एकमेकांच्या तयारीचा आढावा घेत होतो. एखाद्या रविवारी ट्रायल ट्रेक ठरायचे घाटत होते. काय करा, काय करू नका, हे घ्या, ते घ्या …. . एका नतद्रष्टाने तर तुझ्याच वयाचा कोणतरी मागच्या ट्रेकमधे खपला होता ना ? अशी मनहूस आठवण करून दिली ! तसे चेयरमनच्या पीएला एवढी सुट्टी मिळतेच कशी म्हणून काहींचा जळफ़ळाट चालु होताच. पण आता फ़क्त ’साद घालती हिमशिखरे’ अशी अवस्था होती व मनाने हिमालयाच्या दर्या-खोर्यात आम्ही बर्फ़ तुडवत होतो. एकच धुन ओठावर होती , हर की धुन !

११ एप्रिल, दूपारचा १ वाजला होता आणि माझा मोबाईल खणखणला (बायकोने केला असेल तर किणकिणतो !). युथ हॉस्टेलच्या परळ कार्यालयाचा फ़ोन होता. आमच्या सर्व तुकडीची नावे घेतली गेली. मी उत्साहाने हो हो म्हणत गेलो आणि काही क्षणाच्या जीवघेण्या पॉजनंतर, ’ट्रेक रद्द झाला आहे, तुम्ही हवे तर दूसर्या मोहीमेसाठी नाव नोंदवू शकता, नाहीतर पैसे परत मिळतील. काय ते लवकर या नंबरावर कळवा’ असे भावनाशून्य आवाजात कानी पडले. मी ’काय ?’ असे जोरात किंचाळताच फ़ोन कट केला गेला. मी सुन्न हो़उन मटकन खुर्चीत बसताच माझे सहकारी ’कोण गेले, कधी , केव्हा, कसे – अशी फ़ायरींग करत धावत आले. तू निघ लगेच, असे खांद्यावर हात ठेउन सांगू लागले. मी , ’तसे’ काही नाही झाले, माझा ट्रेक रद्द झाला आहे’ असा खुलासा केला ! एवढेच ना, हुश, करत ते आसनस्थ झाले ! कोणाला काय हो त्याचे , कळा ज्या लागल्या जीवा ! विवेकला फ़ोन करून हा प्रकार सांगितला, त्याला ते आधी एप्रिल फ़ूल वाटले व तो माझ्यावर कातावला. बाकी सगळ्यांशी संपर्क साधला पण कोब्रा कट्ट्यावरचा मित्र गुणेशचा फ़ोन काही लागेना, त्याचा माग काढण्याकरता चक्क कॉमवर टॉपिक टाकला पण त्यातुन भलताच मनस्ताप अनुभवावा लागला. पर्यायी मोहीम म्हणून सार-पासला जायच्या शक्यतेवर थोडा विचार झाला कारण परतीची एका गाडीची आरएसी तिकीटे, मोजून ४, उपलब्ध होती पण गुणेशच्या फ़ोनच्या प्रतीक्षेत असतानाच ती गाडी सुद्धा फ़ूल झाली ! परतीचे दोरच वेगळ्या अर्थाने कापले गेले ! जड अंत:करणाने ट्रेक रद्द करायचा निर्णय घेतला गेला. सगळा अगदी इस्कोट-इस्कोट झाला. रजा रद्द केली. अनेकांचे सांत्वनपर फ़ोन आले पण त्यात आसूरी आनंदच जास्त होता. एवढ्या महीन्याच्या तयारीवर एका फ़ोनने पाणी पडले होते. पैशाचा अगदी चुराडा झाला. रेल्वे आरक्षण रद्दीकरणाचेच प्रत्येकी २०० रूपये गेले, ट्रेकची संपूर्ण फ़ी परत मिळणार पण त्यासाठी २०० रूपये विकास-निधी व १०० रूपयाची सभासदत्व फ़ी यावर पाणी सोडावे लागणार होते. ट्रेकसाठी झालेली सगळी खरेदी आता अनावश्यक ठरली होती. जीवन है अगर जहर तो पिनाही पडेगा ---- जीनाही पडेगा ! असे म्हणत गाडी रूळावर येउ लागली होती.

एप्रिलची २१ तारीख, सकाळी १० च्या सुमारास सीएसटी स्थानकातुन बाहेर पडत असतानाच एक सुंदर तरूणी कलेजा खलास करणारे हास्य फ़ेकत सामोरी येते. मनमोर नाचत असतानाच ती मंजुळ आवाजात, ओठाचा चंबू करून …. ’तिकीट प्लीज’ असे विचारते, मी भानावर येतो, खिषातुन पास काढत असतानाच आठवते की ….. ! हात .. सॉरी, पास (संपलेला) दाखवून अवलक्षण करून घेण्यापेक्षा गुमान २५० रूपये बाहेर काढतो. एरवी कधीही ओळख न दाखवणारे अनेक जण ’काय झाले मराठेसाहेब’ असे खोचकपणे विचारत होते. साला इज्जत का फ़ालुदा ! लेडी टीसी ’कसे पकडले’ अशा भावात पावती फ़ाडते ! उंटाच्या पाठीवरली शेवटची काडी ! माथेरान ट्रेक सुद्धा कॅन्सल !

सोमवार, ६ एप्रिल, २००९

कर नाही त्यालाच डर !

भारताचा राष्ट्रीय खेळ कोणताही का असेना सायबाच्या क्रीकेटने येथील जनमानसावर करणीच केली आहे. क्रीकेट हाच आमचा धर्म असे मानणारेही काही कमी नसतील. राष्ट्रीय संघातुन खेळण्याचा आनंदही काही औरच असतो ! अर्थात १०० कोटींच्या देशात असा टीळा लागणे दैव-दुर्लभच. राष्ट्रीय संघात कधी काळी ११ पैकी ६ खेळाडू मुंबईकर असायचे, अनेक कारणाने हा दबदबा ओसरला असला तरी मुंबई भारतीय क्रीकेटची पंढरीच आहे ! मुंबईने देशाला अनेक उत्तमोत्तम खेळाडू दिले, त्यांची नावे आठवायचीही गरज नाही एवढे त्यांचे योगदान प्रचंड आहे. त्यांच्या नावावर एक ’धावती’ नजर टाकूया, खंडू रांगणेकर, अजित वाडेकर, एकनाथ सोलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, विजय व संजय मांजरेकर, संदीप पाटील , अजित आगरकर आणि सचिन तेंडूलकर ! यांच्यात काही साम्य आहे का ? हो, एक दोन अपवाद सोडले तर सगळे फ़लंदाज आहेत. अजून एक, त्यांच्या आडनावात कर आहे ! संदीप पाटील अपवाद समजा, तसेच रवी शास्त्री हा रविशंकर शास्त्री आहे हे ही लक्षात घ्या ! सगळीच नावे खणखणीत वाजलेली, नावाजलेली आहेत यात दुमत व्हायचे कारणच नाही. म्हणजे एक नियम असा बनतो की ज्या मुंबईकर खेळाडूंच्या नावात, आडनावात कर असतो तेच भारतीय संघात काहीतरी करतात ! तसेही क्रीकेट या खेळात कराचे महत्व अनन्यसाधारणच, तो कर जर नावात आला तर कर्तबगारी बहरणारच ना !

आता ज्यांच्या नावात कर नव्हता त्यांची करणी (कर्तृत्व) बघुया, रणजी सम्राट अशोक मांकड, चंद्रकांत पंडीत, अमोल मुझुमदार, सलील अंकोला, राजू, निलेश व अलीकडचा धवल कुलकर्णी (तसा लपलेला कर आहे म्हणूनच गुणवत्ता पण दडलेलीच राहीली !), विनोद कांबळी, प्रवीण आमरे, राजेश पवार, रमेश पोवार…. . या सगळ्यांनीच रणजी व तत्सम देशांतर्गत स्पर्धात धावांचा रतीब व बळींचा नैवेद्य दिला . तसा काहीना टीळा लागला पण गंध नाही लागले, निवडसमिती काही त्यांना पावली नाही, सिस्टीमचे ते बळी ठरले का नावात नसलेल्या कराची करणी ? ! कर नाही त्यालाच डर !

तरीही तुमच्या भुवया उंचावलेल्याच असतील, काही नावे तुम्ही माझ्या तोंडावर फ़ेकायला तयार असाल ना ? हो, रामनाथ पारकर, गुलाम पारकर, अजून एक सणसणीत नाव म्हणजे पद्माकर शिवलकर, चक्क करवर्ग (दोन कर !) , पण कसोटी टीळा काही लागला नाही तो नाहीच. मान्य आहे, पण अपवादानेच तर नियम सिद्ध होतो ना ? काय म्हणता, गावस्करांचा रोहन --- अहो तो मुंबईच्या वाटेने गेलाच नाही, बंगालच्या आडवाटेने तो गेला आणि त्याची वाट लागली, ही बंगाली करणी त्याच्या करीयरला भोवली !

अजून एक अजब योगायोग, क्रीकेटवर खुमासदार लेखन, रोखठोक टीका करणारे, अचूक मीमांसा करणारे, ओघवते धावते समालोचन करणारे, विविध पेपरातले स्तंभलेखक यांची नावे जरा डोळ्यासमोर आणा. वि.वि. करमरकर, शिरीष कणेकर व दिलीप प्रभावळकर ! यांनी आपल्या लेखंदाजीने भल्याभल्यांना कर (हात) टेकायला लावले आहेत ! झालेच तर क्रीकेटची आकडेवारी तोंडपाठ असलेले सांख्यिकी तज्ज्ञ शशिकांत(?) झारापकर आठवा !

हा करमहीमा मी या आधी बहुतेक मराठी वृत्तपत्रांना छापण्यासाठी पाठवला होता पण त्याला कचऱ्याची टोपली दाखवली गेली, माझ्याही नावात कर कोठे आहे म्हणा ! कर नाही त्यालाच डर, निदान मुंबईकर असाल तर, हे आता तरी पटले ना ?