शुक्रवार, २९ जुलै, २०११

“काम न करण्यासाठी” करायची कामे !

"काम न करण्यासाठी" करायची कामे !

  • कोठेही जाताना हातात कागदपत्रांचे भेंडोळे ठेवा. हातात कागदपत्रे असलेले लोक कामसू दिसतात तर रिकाम्या हाताने फिरणारे कॅन्टीनला चालले आहेत असे वाटते. हातात पेपर असेल तर तो माणूस प्रसाधनगृहात चालला आहे असा समज होतो. घरी जाताना सुद्धा फायलींचे ढीग सोबत न्या. असे केल्याने तुम्ही कामावरच नाही तर घरी सुद्धा कंपनीचे भले बघत असता असा वरीष्ठांचा समज अधिक दृढ होतो.
  • संगणक वापरून तुम्ही कामात मग्न असल्याचे दाखवा – तुम्ही जेव्हा संगणकावर असता तेव्हा आम आदमीला तुम्ही कामात व्यस्त आहात असेच वाटते. तुम्ही व्यक्तीगत इ-मेल पाठवा किंवा तुम्हाला आलेली वाचा, गेम खेळा, मित्रांशी गप्पा ठोका, थोडक्यात काम सोडून काहीही काम करा. ज्यांनी संगणकाचा शोध लावला त्यांना त्याचा असा वापर अभिप्रेत नसेलही पण असे करण्यात वावगे काय आहे ? आणि समजा तुम्हाला बॉसने हे धंदे करताना पकडलेच तर खुषाल ठोकून द्या की मी माझे संगणक ज्ञान अद्ययावत करत आहे व त्याचा फायदा कंपनीलाच होणार आहे तो ही एक पै सुद्धा खर्च न करता !
  • टेबलावर पसारा करून ठेवा – टापटीप टेबल बड्या सायबाला शोभून दिसते ! आपल्यासारख्या पामरांच्या बाबतीत मात्र हेच काम करीत नसल्याचे लक्षण ठरते. तुमच्या टेबलावर , आसपास कसा नुसता फायलींचा ढीग साचलेला हवा ! काही फायली नसतील तर मागच्या वर्षीच्या फाइल ठेवा हो, बघणार्याला फाइल नवी काय जुनी काय, काय फरक पडतो ? फायलींचा ढीग दिसल्याशी कारण ! ढीग कसा चांगला उंच व ऐसपैस पसरलेला हवा ! आणि समजा जर कोणी आलाच तुमच्या टेबलाकडे तर महत्वाची फाइल त्या ढीगार्यात दडवून ठेवा व तो आल्यावर ती शोधण्याच्या बहाण्याने सगळे ढीगारे उलथे-पालथे करीत रहा !
  • तुमच्याकडे वॉइसमेलची सोय असेल तर कधीही फोनवर उत्तर देवू नका ! उगाच कोणी कोणाला फोन करीत नाही. अहो तुमच्याकडून काही काम करून घ्यायचे असते म्हणून तर लोक तुम्हाला फोन करतात ! वॉइसमेल बघितल्यावर जे कॉल तुम्हाला कामाला लावणारे असतील तर ते करणार्यांना त्यांच्या जेवणाच्या किंवा अशावेळी की ते फोन घेण्याची सुतराम शक्यता नाही , तेव्हाच फोन लावा. या मूळे तुमची तत्पर आणि कामसू अशी प्रतिमा तयार होइल, भले प्रत्यक्षात तुम्ही कामचोर असलात तरी !
  • चेहरा सतत त्रासलेला ठेवा, बघणार्याला तुम्ही अस्वस्थ असल्याचे वाटले पाहिजे – अशाने तुमच्या वरिष्ठांना तुम्ही कामाच्या बोजाने दबले गेले आहात असे वाटेल. "ये बेचारा काम के बोज का मारा" असे दिसले पाहिजे.
  • कार्यालयातून उशीरा घरी निघा – कामावर उशीरापर्यंत थांबा, खास करून तुमचा बॉस थांबला असेल तेव्हा. अर्थात या वेळात तुम्ही तुमच्या आवडीचे एखादे मासिक, गोष्टीचे पुस्तक वाचू शकता जे वाचायला एरवी तुम्हाला सवड मिळत नाही. बाहेर पडताना बॉसच्या केबिनवरूनच जा, त्याला तुम्ही उशीरा पर्यंत थांबला होता ते कसे कळणार नाहीतर ? महत्वाचे इमेल अवेळी धाडत जा, जसे रात्री 9 वाजून 05 मिनिटे किंवा सकाळी 7 वाजून 05 मिनिटे., त्यातही तो दिवस रविवार वा सार्वजनिक सुट्टी असेल तर उत्तमच !
  • सतत उसासे सोडत रहा – मोठ्याने व सतत उसासे सोडत राहिलात की लोकांना तुम्ही जबरदस्त तणावाखाली काम करीत आहात असे वाटते.
  • ढीगार्याची क्लुप्ती – कागदपत्रांचा टेबलावर नुसता ढीग करून ठेवाच पण त्या बरोबरच काही पुस्तके जमिनीवर पडलेली दिसली पाहिजेत. या साठी संगणकाची जाडजूड माहिती पुस्तके एकदम बेस्ट !
  • शब्दसंग्रह वाढवा – संगणकाची मासिके चाळा व त्यातील अत्यंत क्लिष्ट शब्द निवडून काढा, नव्या नव्या उत्पादनांची माहिती करून घ्या व साहेबाशी बोलताना त्याचा मस्त वापर करून त्याला अगदी भंजाळून टाका. न कळणारी तांत्रिक परिभाषा वापरून त्याला अगदी शब्दबंबाळ करा. त्याला तुमचे म्हणणे कळेलच असे काही नाही, कळले पाहिजे असेही नाही , छाप मात्र नक्की पडेल !
  • दोन जॅकेट असू द्या – तुमचे टेबल जर सगळ्यांना दिसेल असे असेल तर एक जॅकेट तुमच्या खुर्चीच्या पाठीवर पसरवून ठेवा. लोकांना ते जॅकेट बघून तुम्ही जवळपासच कोठेतरी आहात असे वाटेल व मग दूसरे जॅकेट घालून तुम्ही कामाच्या वेळात कोठेही उंडारायला मोकळे.
  • आणि शेवटी अत्यंत महत्वाची गोष्ट – ही पोस्ट तुमच्या साहेबापर्यंत पोचणार नाही याची काळजी घ्या !

सोमवार, २५ जुलै, २०११

इनोसंट कलमाडी साहेब !

चला, आज दसरा, आजच दिवाळी ! अहो , तोंड सांभाळून बोला, मला विस्मरणाचा रोग नाही जडला आहे, जडला होता आमच्या कलमाडी साहेबांना ! या रोगाने त्यांची नुसती आठवणच नव्हती गेली , राजकारणातली सोन्यासारखी फुललेली करीयरही संपूष्टात आली होती. कोणी म्हणत होते की शरदाचे चांदणे त्यांना बाधले. महालात राहणारा माणूस तिहारच्या तुरूंगात सडत होता. भगवान के दरबारमे देर है लेकिन अंधेर नही याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. आमचे साहेव आता निर्दोष सूटणार !


 

आता कोणाला सांगायला हरकत नाही, माझी व साहेबांची ओळख फार फार जुनी, म्हणजे किती वर्षापुर्वीची हे बी आठवत नाय यवडी जुनी ! आता गोदीत कारकुनी करणारा माणूस एवढ्या मोठ्या माणसाच्या संपर्कात तरी कसा आला असा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिक आहे म्हणा, पण वो एक बहुत पुरानी कहानी है ! किती पुरानी ते मात्र आता आठवत नाय बघा ! झाले असे की आस्मादिक पुण्याचा प्रसिद्ध दगडूशेट हलवाईचा गणपती बघायला गेले होते. दगडूशेटला पोहचे पर्यंत पुण्यातल्या रीक्षावाल्यांनी घुम घुम घुमवून माझा अर्धा खिसा रिकामा केलेला होताच. दर्शनासाठी नंबर लागेपर्यंत माझे पाकिट, मोबाइल, घड्याळ, अंगठी,( चेन घातली होती का व घातली असेल तर ती सुद्धा मारली का ते आठवत नाही.) असे काय काय गहाळ झाले, दगडूशेटच्या पायावर लोटांगण घाले पर्यंत माझा कॉटन किंगचा कॉटनचा शर्ट सुद्धा कोणीतरी मारला. भयंकर प्रसंग ओढवला होता. त्याच वेळी दाढीधारी, पांढरे शुभ्र कपडे घातलेला माणूस नवस फेडण्यासाठी तिकडे आलेला होता. माझी त्याची नजरा नजर झाली व लगेच त्याने मला "पपलू" अशी जोरात हाक मारली. माझी ही अवस्था बघून तो मला "पुना कॅफे" अशी पाटी असलेल्या एका दूकानात घेवून गेला. त्याने दोन कॉफी अशी झोकात ऑर्डर ठोकली. मला उगीच वाटतय की ज्याने कॉफी आणली त्याची सुरत बारामतीकरांशी काफी मिलती जुलती होती. मी पपलू नाही, एकनाथ मराठे असे त्यांना हजारदा सांगितल्यावर त्यांना पटले. पण माणूस मोठा दिलदार ! "या कलमाडीने एकदा कोणाला आपला दोस्त मानले की मानले, कवा बी येत जा राव, हा कॅफे आपलाच आहे, दोस्त आपकी सेवा मे हाजिर है !" असा सबूद दिला आणि तो पाळलाही. योगायोग असेल पण माझी अपघाती झालेली ओळख त्यांना चांगलीच लकी ठरली. सोनिया (मा/आ)यने आश्रय दिला, राज्यसभेची खासदारकी मिळाली , पुढे तर राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजन समितीचे यजमानपद सुद्धा मिळाले.


 

साहेब म्हणजे एक वल्ली आहेत. मला त्यांनी एकदाही मराठे वा एकनाथ म्हणून हाक मारलेली मला आठवत नाही. खरेच आठवत नाही हो - नाही तसे नाही – कधी मारलीच नाही अशी हाक ! कधी मला ते टी बाळू म्हणत, कधी लखोबा, कधी आर आर कधी राहुल --- एकदा तर मला त्यांनी ममद्या अशी हाक मारून पाठीत प्रेमळ धपाटा सुद्धा घातला होता ! मला थोडे विचित्र वाटायचे पण मोठ्या माणसांच्या लिला आपल्याला कशा कळणार म्हणून सोडून द्यायचो. पुढे मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतले. दिल्लीत आयपीएचे ऑफिस आहे त्यात त्यांनी मला डेप्युटेशनवर बसविले. माझा दिल्लीत चांगलाच जम बसला. राष्ट्रकूल स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली होती, विविध कामांची धडाक्यात टेंडरे निघू लागली व माझ्या पायाला जणू भिंगरी लागली. चहा सोनियाजीं बरोबर, फराळ प्रियांकाच्या घरी, रॉबर्टबरोबर बीयर, राहुलबाबा बरोबर धाब्यावर खाणे, मनमोहनांसोबत मलईदार लस्सी, शीला दिदींच्या घरी रात्रीचे शाकाहारी खाणे ---- ! मस्त चालले होते सगळे ! पण प्रत्येक चांगल्या गोष्टीला नजर लागतेच ना ! साहेबानी काहीतरी गडबड सुरू केली होती. टेंडर एकाचे, कंत्राट दूसर्यालाच, कामाचे पैसे तिसर्यालाच ते सुद्धा ठरल्यापेक्षा कितीतरी जास्त ! एकच काम, पण बिले हजार, काम रूपयाचे, बिले लाखाची तर कधी काम न करताच बिले ! एरवी साहेब सुरेश कलमाडी याच नावाने क्रॉस्ड चेकच घ्यायचे पण हल्ली मला ते चेक भरायला द्यायचे त्यावर आपले नाव काही भलतेच लिहायचे. मग चेक घेणे बंदच करून गांधीच घ्यायला लागले. पण मग मिळालेले पैसे तरी नीट तिजोरीत ठेवायचे ना ? अहो काय सांगू, नोटांची बंडलेच बंडले कोठेही टाकून द्यायचे, गादीखाली, लादीत, सोफ्यात, बाथरूममध्ये , अगदी संडासात सुद्धा ! शेवटी मी त्यांना जबरदस्ती डॉक्टरांकडे घेवून गेलो. सगळी लक्षणे विस्मृती रोगाची होती ! हे कळल्यावर साहेबांनी क्षणाचीही उसंत न घेता आपला राजीनामा खरडला, सार्वजनिक जीवनातुन निवृत्त होणार असून आता फक्त पुना कॅफे सांभाळणार असे प्रत्रक माझ्याकडून बनवून घेतले. आपल्या निवृत्तिचे कारण सोनिया माय, शीला दिदी, प्यारे मोहन या सगळ्या सगळ्यांना कळवायची जबाबदारी त्यांनी मोठ्या विश्वासाने माझ्यावर दिली. मी उदयिकच १० जनपथ गाठले. सोनियामाय बरोबर पास्ता खात असतानाच मी कलमाडी साहेबांना झालेल्या असाध्य रोगाची माहीती दिली व ते सार्वजनिक जीवनातुन निवृत्त होत आहेत असेही सांगितले. मग मात्र अजबच झाले, सोनियांना कलमाडी कोण तेच आठवत नव्हते ! मी जोरात "राहुलबाबा जल्दी आओ" असे ओरडलो व तो धावतच आल्यावर कलमाडी टेप वाजविली तेव्हा राहुलबाबाने "कलमाडी हो या अनाडी, उनसे हमारा क्या वास्ता ? " असे मला विचारले. तिकडून मी थेट मनमोहनांकडे धाव घेतली तर त्यांना राष्ट्रकुल स्पर्धा किस चीज का नाम आहे हेच आठवत नव्हते, त्यांनी माझी बोळवण शीला दिदींकडे केली. शीला दिदींना मी सगळा प्रकार धाप लागेपर्यंत सांगितला तर त्यांनी "आपको विश्राम की सख्त जरूरत है" असे सांगत हातावर एक पेपरमिटची गोळी देवून पिटाळले. हा सगळा प्रकार साहेबांना सांगायला गेलो तर त्यांनी मलाच "कोन है बे तू ?" असे खडसाविले व धक्के देवून बाहेर काढले ! काहीतरी भयंकर घोटाळा होणार, साहेबांबरोबरच देशाचे नाव सुद्धा खराब होणार म्हणून मी पवार साहेबांना बारामतीत जावून लोटांगण घातले. मी त्यांना त्यांच्या नावाने साद घालताच ते एकदम शून्यात नजर लावून बोलू लागले " कोण मी, कोठून आलो, बारामतीची भानामती की मैद्याचे पोते ? की ममद्या खाटीक की मी श्रीखंड्या ? मराठा सदार की मोघल बादशहा ?" असे स्वगत बोलल्यासारखे बोलू लागले !


 

मधला काही काळ मीच कोमात होतो (म्हणे )! काही महिन्यानंतर की वर्षानंतर डोळे उघडल्यावर "मै कहा हूं" असे न विचारता मी "राष्ट्रकूल स्पर्धा पार पडली का ?" हा प्रश्न विचारला. पडली एकदाची रडत खडत पण त्यात करोडोचा घोटाळा केला म्हणून कलमाडी तुरूंगात आहेत असे कळताच मी "ये हरगिज नही हो सकता, साब बेकसूर है, वो तो अपनी यादगाश खो बैठे है, उन्हे छोड दो" असा टाहो फोडला तेव्हा डॉक्टरांनी "इसके दिमाखपे असर हुआ है" असे म्हणून मला येरवड्याला हलवायची व्यवस्था केली.


 

शेवटी आज तो सोनियाचा दिनू उगवला, माझी मेंटल वार्ड मधून सूटका झाली तशी आदरणीय कलमाडी साहेबांची सुद्धा होईलच ! गेलेला मान-सन्मान परत मिळेल ! चला, मला आता दिल्लीत होणार्या ऑलिंपिकच्या तयारीला आतापासूनच लागायला हवे !

रविवार, २४ जुलै, २०११

नाणेफेकीचा कौल.

क्रिकेटमध्ये नाणेफेक जिंकणे ही अनेक वेळा विजयाची पहिली पायरी समजली जाते. नाणेफेक जिंकणार्या संघाला आधी फलंदाजी करायची की क्षेत्ररक्षण करायचे याचा निर्णय घेता येतो. हवामानाचा अंदाज, मैदानाचा लौकिक, आपल्या संघाची बलस्थाने व प्रतिस्पर्धी संघाची कमजोर बाजू यांचा दोन्ही संघाचा गृहपाठ झालेलाच असतो व कौल मनासारखा मिळाल्यास काय करायचे हे आधीच ठरलेले असते. कौल मनासारखा लागणे हा नशीबाचा भाग असला तर त्यानंतर घेतला जाणारा निर्णय मात्र संघाच्या थींक टँकची ताकद दाखविणारा असतो. नाणेफेक जिंकल्यावर काही प्रमाणात तरी संघाला फायदा होतोच. अनेकदा काहीच आडाखा बांधता न आल्याने अनेकदा नाणेफेक हरणेच चांगले असे वाटते. निदान नाणेफेक जिंकूनही सामना गमावला असा दोष लागत नाही. कधी कधी दोन्ही कर्णधारांचे अंदाज अगदी विरोधी असतात व एका कर्णधाराला आधी फलंदाजी करायची असते तर दूसर्याला गोलंदाजी ! अशावेळी नाणेफेकीचा कौल काहीही लागला तरी फारसा फरक पडत नाही.


 

2000 व्या कसोटी सामन्याच्या निमित्ताने मी नाणेफेक या विषयाचा अनेक अंगांनी वेध घ्यायचा प्रयत्न केला आहे व हे करताना अनेक ठोकताळे कसे चुकीचे असतात याचा प्रत्यय मला अनेकदा आला. या अभ्यासातून दादा संघ कोण व कच्चे लिंबू संघ कोणते हे सुद्धा अधोरेखित झाले.


 

मला सगळ्यात थक्क केले ते नाणेफेक जिंकायच्या संभाव्यतेने. दैवाने या बाबतीत दोन्ही संघाना समान न्याय दिलेला आहे. नाणेफेक जिंकायची सरासरी टक्केवारी 51 आहे ( देशात 52, परदेशात 51 ) ! याबाबतीत त्यातल्या त्यात झिम्बाब्वे जास्त नशीबवान आहे (देशात 57, बाहेर 62, सरासरी 59) तर पाक कमनशीबी (देशात व देशाबाहेरही 47).


 

नाणेफेक जिंकण्याची दोन्ही संघाना समान संधी असते हे सिद्ध झाल्यावर पुढचा निर्णय कर्णधारालाच घ्यायचा असतो, दोनच पर्याय असतात, आधी फलंदाजी घ्यायची किंवा प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजासाठी मैदानात खेचायचे. तब्बल 70 टक्के वेळा नाणेफेक जिंकणारा संघच फलंदाजीसाठी उतरतो ! या प्रमाणात देशात वा देशाबाहेर खेळतानाही काही फरक पडत नाही ( 71 व 69 ). खेळपट्टीचा काहीच अंदाज बांधता येत नसेल , तेव्हा जोखीम न पत्करता फलंदाजी करायला सर्वच संघ पहिली पसंती देत असावेत, सेफ बेट ! संघपातळीवर मात्र या प्रमाणात प्रचंड तफावत आहे. क्रिकेटमधील दादा असलेला ऑस्ट्रेलियाचा संघ देशात खेळताना 74 % तर बाहेर खेळताना 86 % आधी फलंदाजी करणेच पसंद करतो. या उलट इंग्लंडचा संघ देशात 86 % व परदेशात 78% वेळा फलंदाजी स्वीकारतो. या दोन्ही संघाना आपल्या फलंदाजीतील ताकदीवर जास्त विश्वास असावा किंवा प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीला ते फारशी किंमत देत नसावेत. विंडीजचा संघ मात्र देशात खेळताना 57% वेळा फलंदाजी घेतो परदेशात मात्र त्यांचे हेच प्रमाण (73) असते ! न्युझीलंडचा संघ बाहेर खेळताना सरासरी पाळतो पण देशात खेळताना मात्र दोन्ही बाजूंना जवळ जवळ समान न्याय देतो , 49 आणि 51 !


 

अर्थात नाणेफेक जिंकून काय करायचे हे ठरवले म्हणजे संपत नाही. आता खरी कसोटी असते टीमवर्कची. आपल्या कर्णधाराने घेतलेला निर्णय बरोबर ठरविण्याची जबाबदारी संघातील प्रत्येकाची असते. प्रत्येकाने आपली जबाबदारी चोख पार पाडली तर ? पण असे बहुदा होत नाही. नाणेफेक जिंकून विजयाची सरासरी फक्त 27 % ( देशात 34, बाहेर फक्त 21 ) आहे , पराभूत होण्याची शक्यता मात्र 39 % आहे ! आश्चर्य म्हणजे नाणेफेक हरूनही संघ जिंकण्याचे प्रमाण जवळपास तेवढेच म्हणजे 24 % ( देशात 30, बाहेर 18 ) आहे. अजून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे यजमान देशाला नाणेफेकीचा कौल कसाही लागला तरी फारसा फरक पडत नाही. दादा संघ मात्र ही सरासरी एकदम खोटी ठरवितात. देशातही आणि बाहेरही ! नाणेफेक जिंकून ऑसीज देशात 58 % तर बाहेर 40 % वेळा विजयी झाले आहेतच पण कौल विरोधात गेल्यावर सुद्धा देशात 54 % आणि परदेशात 34 % वेळा त्यांनी विजयश्री खेचून आणली आहे ! सर्वात दुबळ्या बांगलादेशाचे इन-बिन-तिन विजय आहेत व तिन्ही वेळा नाणेफेकीचे दान त्यांच्या बाजूनेच पडले आहे !


 

सुरवातीच्या भागात बघितल्याप्रमाणे, बहुतेक वेळा नाणेफेक जिंकणारा संघ फलंदाजीला उतरतो ( 70 %) पण विजयश्रीच्या मनात काही वेगळेच असते. अशा स्थितीत विजयाची टक्केवारी फक्त 27 टक्के आहे तर गोलंदाजी केल्यास विजयाची शक्यता थोडी वाढते, 32 %. अर्थात ऑसी ही सरासरी सुद्धा धुडकावतात, त्यांचे हेच प्रमाण 59 व 53 आहे. म्हणजेच खेळपट्टीचे अचूक निदान करण्यात ऑसींचा हात धरणारा कोणी नाही ! आफ्रिकेचा संघ मात्र जेव्हा रेड चेरी हाती घेतो तेव्हा सर्वात खतरनाक ठरतो, आधी गोलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय 55 % वेळा बरोबर ठरला आहे.


 

नाणेफेक जिंकूनही घेतलेला निर्णय अंगलट येण्याचे व पराभवाची नामुष्की पदरी पडायची सरासरी टक्केवारी 39 % एवढी प्रचंड आहे. अर्थात इंग्लंडवर अशी मानहानी फारच कमी वेळा आलेली आहे, फक्त 25 % ( त्या खालोखाल आहेत ऑसी 26 %, भारत, पाक 27% श्रीलंका 29% द. आफ्रिका 34% , न्युझीलंड 41%, झिम्बाब्वे 59 % ) तर बांगलादेशाचे हेच प्रमाण आहे 86 % !


 

पुरे आता ! डोक्याला मुंग्या आल्या ! तशा अजून बर्याच शक्यतांचा अभ्यास बाकी आहे. फिर कभी !


 

साभार - http://www.espncricinfo.com या संकेतस्थळावरील आकडेवारीचे इंजिन ( प्रगत पर्याय.)

शनिवार, २३ जुलै, २०११

सूटायचे कसे ? राज्य कोणावर ?

कोणताही खेळ म्ह्टला की "राज्य कोणावर ?" हा प्रश्न आधी सोडवावा लागतो.
अगदी पत्त्यासारख्या बैठ्या खेळापासून ते क्रिकेटसारख्या मैदानी खेळापर्यंत राज्य कोणावर हा प्रश्न अनेक प्रकारे सोडविला गेला आहे. बहुतेक सर्व पद्धतीत "खेळ कोणाला दैवाचा कळला ?" या चालीवर दैवाचा कौलच महत्वाचा मानला गेलेला आहे. म्हणजे आकाशात फेकलेले नाणे खाली पडताना छापा वर असेल की काटा हे कोणीच सांगू शकत नाही !

सुटण्याची सर्वात बाळबोध पद्धत म्हणजे १०, २० , ३० करणे ! अर्थात गणित कळायला लागल्यावर कोठे उभे राहिले की सूटका होते ते समजू लागते व मग यात मजा वाटत नाही !

थोडा पुढचा प्रकार म्हणजे "जास्तीची वा कमीची मेजॉरीटी" ! भाग घेणार्या सर्वानी रांगेत उभे रहायचे, हात एकत्र वर उंचावायचे व एका लयीत खाली आणताना तळवा उलथा किंवा पालथा धरायचा. जास्तीची मेजॉरीटी ठरली असेल तर पंजे उलथे जास्त असतील तर उलथेवाले सूटले ! दोनच जण उरले असतील तर सुटलेल्या एकाने डमी ( याला सुद्धा काही खास शब्द आहे, मला तो आता आठवत नाही, तुम्हाला आठवतो आहे का ? ) म्हणून भाग घ्यायला लागतो !

गल्लीत क्रिकेट खेळताना बॅंटींग पहिली कोणी करायची हा मुद्दा सुद्धा कळीचा ( भांडण या अर्थाने सुद्धा ! ) ठरू शकतो. एखाद्या खेळाडूच्या पाठीवर दोन्ही हातांच्या बोटांचा वापर करून नंबर ठेवला जातो. पाठमोरा खेडाळू ज्याचे नाव घेइल त्याचा तो बॅंटींगचा नंबर. सगळ्यात शेवटी जो असेल त्याला बॉलिंग करायला लागते. फलंदाजी १,२ अशा क्रमाने तर गोलंदाजी शेवटून उलट्या क्रमाने. "पाठीवर नंबर पाडण्याची" पद्धत अनेक खेळात वापरली जाते. अजून एक पद्धत म्हणजे बॅटच्या आडोशाने नंबर जमिनीवर लिहायचे. मग बॅटने ते झाकायचे. प्रत्येकाने त्यातली एक खूण धरायची. बॅट काढल्यावर त्या खुणेसमोर जो नंबर असेल तो त्याचा नंबर !

सापशीडी सारख्या फासे वापरून खेळायच्या खेळात फाशाचा वापर करूनच नंबर ठरविला जातो. प्रत्येकाने दान टाकायचे, जास्त मोठे दान ज्याचे पडेल त्याचा नंबर आधी लागतो वा त्याला आपल्या आवडीने सोंगटीचा रंग निवडता येतो.

गोट्या खेळताना सुद्धा नंबर ठरविण्याचे अनेक प्रकार वापरले जातात. रींगण खेळताना एक रेषा आखली जाते. ठराविक अंतरावरून त्या रेषेपर्यंत गोटी प्रत्येकाने फेकायची. याला "चकणे" असे म्हणतात. ज्याची गोटी रेषेच्या सर्वात अधिक जवळ तो आधी खेळणार ! गल भरणे ( राजा-राणी खेळताना ) हा सुद्धा प्रकार वापरला जातो. ज्याची गोटी गलीच्या सर्वात जवळ तो आधी खेळ्णार किंवा जो सर्वात कमी प्रयत्नात गल भरेल तो आधी खेळतो.

वीटी-दांडू खेळताना राज्य कोणावर ते ठरविण्यासाठी सर्व भीडू एकेक टोला लगावितात. जो सर्वात लांब टोला मारतो तो सूटतो व कमी लांब टोला मारणार्यावर राज्य येते. गल्लीवर दांडू आडवा ठेवून लांबून वीटीने दांडू उडवायचा प्रकार सुद्धा वापरला जातो. कधी कधी गल्लीत वीटी ठेवून ती लांबवर उडविली जाते व त्याप्रमाणे नंबर ठरविला जातो.

भोवर्यात कोचापाणी खेळताना, सर्वानी एकाचवेळी भोवरा फिरवायचा असतो. ज्यांचा भोवरा जास्त वेळ फिरत राहतो तो सूटतो. कतरी जो जास्त लांब मारेल तो सूटला असेही काही ठीकाणी करतात.

बुद्धीबळात डावाची सुरवात कोण करणार, पर्यायाने पांढर्या मोहरांनीशी कोण खेळणार हे सुद्धा ठरवावे लागते. एक खेडाळू एका हातात काळे व एका हातात पांढरे प्यादे झाकून ठेवतो. प्रतिस्पर्धी खेळाडूने पांढरे प्यादे कोणत्या हातात आहे ते सांगायचे असते. त्याने बरोबर ओळखले तर तो डावाची सुरवात करतो.

पत्त्यांत पाच-तीन-दोन खेळताना पाच, तीन, दोन हे पत्ते पालथे ठेवले जातात. प्रत्येकाने त्यातला एकेक पत्ता उचलायचा, त्या प्रमाणे त्याने किती हात करायचे ते ठरते, दोन हात करणार्याकडे आपसूकच पीशी येते. एरवी खेळाच्या सुरवातीला पिसायचे कोणी हे ठरविण्यासाठी पत्ताच्या जोडामधून प्रत्येकजण एक पान ओढतो, ज्याच्याकडे सर्वात जड पान येते त्याच्यावर पीशी येते. बदाम सात मध्ये ज्याच्याकडे बदामची सत्ती येते तो डाव सुरू करतो, झब्बूच्या खेळात इस्पिकचा एक्का ज्याच्याकडे असेल (कोकणात याला भजे म्हणतात !) तो डावाची सुरवात करतो, एरवी पीसणार्याच्या हाताखालचा खेडाळू डाव सुरू करतो. बोलून हात करण्याच्या खेळात (उदा. मुमरी ) ज्याची सर्वात जास्त हाताची बोली असते तो डाव सुरू करतो.

सांघिक स्पर्धत नाणेफेक करूनच हा पेच सोडविला जातो. सध्या रूळलेल्या पद्धतीप्रमाणे एकाने नाणे आकाशात उडवायचे असते व दूसर्याने हेड किंवा टेल ते सांगायचे असते. दोन देशात असेल तर यजमान देशाचा कर्णधार नाणे उडवितो. जो नाणेफेक जिंकेल त्याला डावाची सुरवात कोणी करायची हा निर्णय घेता येतो. अर्थात मराठीत ओली-सुकी हा शब्द सुद्धा आहे. आम्ही लहानपणी खापराच्या एका बाजू्ला थुंकायचे व ती बाजू ओली करायचो , खापर उडाविले तर फूटायची भीती असायची म्हणून हातात ते उलटे किंवा पालटे करून ठेवले जायचे व त्या प्रमाणे ओली का सुकीचा कौल मागितला जायचा. सांघिक खेळात अनेकदा पुर्ण वेळ सामना खेळून सुद्धा हार-जीतीचा फैसला होत नाही. मग सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुद्धा पेनल्टी शूट-आउट, सडन डेथ , टाय-ब्रेकर सारखे पर्याय वापरायला लागतात. वीस षटकांच्या क्रिकेटमध्ये आधी बॉल आउट पद्धत वापरली गेली आता सुपर ओवरची पद्धत वापरली जाते.

आयुष्य हा सुद्धा एक खेळच आहे. यातुन सुद्धा सूटका करून घेतलीच पाहिजे, पण आपण सर्वच या खेळात एवढे रमतो की "सूटकेलाही मन घाबरते, जो आला तो रमला" अशीच आपली अवस्था होते. जन्म-मरणाच्या खेळात आपण अडकूनच पडतो. सूटकेचा , मोक्षाचा मार्ग काही आपणाला सापडत नाही. अर्थात या खेळातून सुद्धा दोन प्रकारे सूटता येते, गीतेत सांगितल्याप्रमाणे भक्तीमार्गाने , शरण भावाने किंवा ज्ञानमार्गाने, अर्थात इथून कोणाला सूटायचेच नाही त्याला गीता तरी काय करणार ! घ्या राज्यावर राज्ये !

गुरुवार, २१ जुलै, २०११

2000 व्या कसोटीच्या निमित्ताने !

Overall figures

 

Team

Span

Mat

Won

Lost

Tied

Draw

W/L

Ave

RPO

HS

LS

 

England

1877-2011

912

322

261

0

328

1.23

32.20

2.69

903

45

 

Australia

1877-2011

730

341

192

2

195

1.77

34.09

2.89

758

36

 

West Indies

1928-2011

473

153

156

1

163

0.98

32.49

2.99

790

47

 

India

1932-2011

452

110

139

1

201

0.79

33.55

2.86

726

42

 

New Zealand

1930-2011

364

68

147

0

149

0.46

28.28

2.56

671

26

 

Pakistan

1952-2011

358

108

100

0

150

1.08

32.41

2.87

765

53

 

South Africa

1889-2011

358

125

124

0

109

1.00

31.80

2.73

682

30

 

Sri Lanka

1982-2011

201

61

71

0

69

0.85

33.32

3.08

952

71

 

Zimbabwe

1992-2005

83

8

49

0

26

0.16

26.57

2.65

563

54

 

Bangladesh

2000-2010

68

3

59

0

6

0.05

21.68

3.00

488

62

 

ICC World XI

2005-2005

1

0

1

0

0

0.00

16.70

3.43

190

144

 


 

आज लॉर्डसवर २००० वा कसोटी सामना खेळला जात आहे. कसोटी दर्जा असलेल्या अकरा देशांच्या संघाने एकूण किती कसोटी सामने खेळले आहेत, त्यात ते किती जिंकले, किती हरले, किती बरोबरील सूटले, किती अनिर्णीत राहिले, प्रत्येक संघाची डावातील सर्वांधिक तसेच सर्वात कमी धावसंख्या, संघाची प्रत्येक षटकामागे धावगती अशी सर्व माहिती वरील तख्त्यात दिली आहे. या माहितीचे विश्लेषण अनेक प्रकारे करता ये‍ईल व त्यातून अनेक गोष्टींवर प्रकाश पडेल.

  • सर्वात जास्त कसोटी खेळलेला संघ आहे इंग्लंडचा ( ९१२ ), त्या खालोखाल ऑस्ट्रेलिया (७३० ) व भारत (४५२)
  • सामन्यात विजय प्राप्त करण्याचे प्रमाण काढले तर ऑस्ट्रेलिया सर्वात भारी आहे (१.७७), त्या खालोखाल इंग्लंड व पाकिस्तानचा नंबर लागतो. सगळ्यांकडून मार खाणारा संघ आहे बांगलादेशचा, ६८ पैकी ५९ सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागलेला आहे.
  • डावातील सर्वांधिक धावसंख्या श्रीलंकेने उभारली आहे (९५२ ), त्यांच्या मागे आहेत इंग्लंड (९०३) व वेस्ट इंडीज (७९०)
  • सर्वात कमी धावात गुंडाळला गेलेला आहे न्युझीलंडचा संघ (२६ धावा ) त्या खालोखाल आहेत साउथ आफ्रिका (३० धावा ) व ऑस्ट्रेलिया (३६ धावा )
  • संघाच्या डावातील धावांची सरासरी काढली तर त्यात सरस भरणारा संघ आहे ऑस्ट्रेलियाचा (३४.०९ ) तर तळाला अर्थातच बांगलादेश (२१.६८ ) !
  • सर्वात जलद धावा ठोकणारा संघ आहे श्रीलंकेचा, षटकामागे ३.०८ धावा तर दूसरा नंबर धक्का देणारा आहे – चक्क बांगलादेश – त्यांची धावगती आहे ३ !
  • आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १९९९ कसोटीत फक्त दोन सामने बरोबरीत सूटले आहेत व त्या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलिया खेळलेली आहे भारत व वेस्ट इंडीज विरूद्ध !


     

मी कोणी आकडेमोड तज्ज्ञ नाही, सर्व माहिती espncricinfo.com या साइटच्या स्टॅटस्‍गुरू हा पर्याय वापरून मिळवलेली आहे. जसा वेळ मिळेल तसा अशा आकडेवारीचा वापर करून त्याचे वेगळ्या अंगाने विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहे. यातून सचिन वन-डेत पाठलाग करताना त्यातही २७५ पेक्षा अधिक धावांचे आव्हान असेल तर ) खरेच फाफलतो का ? कसोटीत चवथ्या डावात कोणता फलंदाज भारी ठरलेला आहे, शतक करूनही संघाचा पराभव बघण्याचे दुर्भाग्य कोणाकोणाच्या ललाटी आहे ? सर्वात जास्त वेळा त्रिफळा कोणाचा उध्वस्त झालेला आहे , कोणत्या फलंदाजाने किती वेळा संघाला विजयी करेपर्यंत मैदानात तळ ठोकला आहे – अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणार आहे.

सोमवार, १८ जुलै, २०११

अपवाद नसलेले नियम !

नियम म्हटला की त्याला अपवाद हा असतोच ! किंबूहना अपवादानेच नियम सिद्ध होतो असे म्हणतात. खालील नियमांना मात्र अपवाद नाही, अर्थात याने "अपवादाच्या नियमाला" बाधा येत नाही, पुष्टीच मिळते !


 

  1. यांत्रिकी नियम – तुमचे हात जेव्हा वंगणाने बरबटलेले असतील तेव्हाच नेमकी तुमच्या नाकाला खाज तरी सुटेल किंवा लघुशंकेची अतीव प्रबळ इच्छा होईल !


 

  1. गुरूत्वाकर्षणाचा नियम – तुमच्या हातून जेव्हा एखादे उपकरण, नट, ब्लोट, स्क्रू खाली पडतो तेव्हा तो घरंगळत जिकडे सहजी हात पोहचू शकणार नाही अशा जागी जावून थांबतो !


 

  1. संभाव्यतेचा नियम – तुमची कृती जेवढी येडपटपणाची तेवढी ती करताना तुम्हाला इतरांनी बघायची शक्यता जास्त !


 

  1. रामभरोसे शास्त्र – जेव्हा तुमच्याकडून चूकीचा नंबर फिरवला जातो तेव्हा तो कधीही व्यस्त असत नाही व कोणीतरी हमखास त्याला उत्तर देतोच !


 

  1. बनावाचा नियम – टायर पंक्चर झाल्यामूळे कामावर यायला उशीर झाला अशी थाप तुम्ही साहेबाला मारता तेव्हा दूसरेच दिवशी तुमचा टायर खरेच पंक्चर होतो.


 

  1. बदलाचा नियम – तुम्ही जेव्हा रांग बदलता ( किंवा वाहतुकीची लेन ) , तेव्हा तुम्ही ज्या रांगेत आधी होता ती रांग किंवा लेन तुम्ही नव्याने धरलेल्या रांगेपेक्षा /लेनपेक्षा अधिक वेगाने सरकू / धावू लागते !


 

  1. आंघोळीचा नियम – घरी एकटे असताना तुम्ही आंघोळीसाठी अंगावर पहिला तांब्या घेतलात रे घेतलात की लगेच दाराची वेल बाजते !


 

  1. अनपेक्षित भेटीचा योग – तुम्हाला ओळखणारी व्यक्ती अचानकपणे तुम्हाला भेटण्याची शक्यता सर्वांधिक असते जेव्हा तुम्ही अशा व्यक्तीबरोबर असता की तुम्ही तिच्या बरोबर असलेले दूसरे कोणी बघणे तुम्हाला अजिबात नको असते !


 

  1. बिघाडाचा नियम – आपले बिघडलेले उपकरण तुम्ही दूसर्या कोणाला दाखविता तेव्हा त्याने हात लावताच ते चालू होते !


     

  2. शरीर विज्ञानाचा नियम – खाजेची तीव्रता व तुमचा हात तिकडे पोहचण्याची शक्यता याचे प्रमाण नेहमीच व्यस्त असते !


 

  1. सिनेमागृह किंवा मैदानाचा नियम – कोठेही जा, बैठकव्यवस्थेत ज्यांची आसने जास्त लांब असतात ते सगळ्यात शेवटी येतात, हीच माणसे हजारवेळा आत-बाहेर करीत असतात, तसेच सामना किंवा खेळ संपण्याआधीच चालू पडतात. या उलट म्हणजे रांगेत अगदी सुरवातीला बसलेली माणसे सगळ्यात आधी येतात, आपली खुर्ची कधीही सोडत नाहीत, त्यांचे पाय चांगलेच लांब असतात नाहीतर पोट तरी सुटलेले असते आणि पडाद्यावर अगदी "दी एन्ड" दिसेपर्यंत वा सामन्याचा बक्षिस सभारंभ होईपर्यंत आपली जागा सोडत नाहीत. आणि हो, ही माणसे भांडकूदळ, उर्मट, उद्धट सुद्धा असतात !


 

  1. गरम चहाचा नियम –तुम्ही वाफाळत्या चहाचा कप तोंडाला लावताच साहेब तुम्हाला बोलावितो व चहाचे शीतपेय झाल्यावरच तुमची सूटका करतो.


 

  1. लॉकरचा नियम – लॉकर रूममध्ये जेव्हा दोनच माणसे असतात तेव्हा त्यांचे लॉकर एकमेकांच्या लगतच असतात.


 

  1. पृष्ठभागाचा नियम – कारपेट जेवढे महाग तेवढी तुमच्या हातून लोणच्याची बाटली त्याच्यावर पडायची शक्यता जास्त !


 

  1. तर्कशास्त्राचा नियम – तुम्ही जेवढे अतार्किक बोलाल तेवढे ते तर्कसंगत ठरते !


 

  1. तयार कपड्यांचा नियम – तुमच्या मापाचे तयार कपडे तुम्हाला केव्हाच शोभून दिसणार नाहीत !


 

  1. भाषणाचा नियम – न बोलून शहाणा !


 

  1. बाजारपेठेचा नियम – तुम्हाला आवडणार्या वस्तूचे उत्पादन हमखास बंद झालेले असते ( उदा. बजाजची एम-८० स्कूटर ! )


 

आजारपणाचा नियम – आजारी पडलात तर डॉक्टरकडे रांग लावा, नंबर लागेपर्यंत तुम्हाला खूपच आराम पडलेला असेल, पण जर तुम्ही घरीच राहीलात तर मात्र तुमचा आजार बळावेल !

शनिवार, १६ जुलै, २०११

“एन्ड गेम” चे पुनर्प्रकाशन.

एखादा पडलेला चित्रपट काही वर्षांनी नाव बदलून रिलिज करायचा प्रयत्न हिन्दी सिनेसृष्टीत होत असतो. तसे गाजलेले सिनेमे सुद्धा री-रन केले जातात. शोले हा सिनेमा अजूनही थिएटरला लावला तर निदान पहिला आठवडा तरी फुल्ल जाइल ! माझ्या ब्लॉगची वाचक संख्या 21000 पार झालेली आहे. ब्लॉगस्पॉट आपली पोस्ट किती जणांनी वाचली याची माहितीसुद्धा देते. मला वाटले होते की ही कथा नक्कीच पहिल्या दहात असेल ! पण आश्चर्य म्हणजे ही कथा अगदी पहिल्या वीसात सुद्धा नाही. नवीन वाचक सहसा जुन्या पोस्ट वाचायच्या भानगडीत पडत नाहीत म्हणूनच की काय मागच्या दोन वर्षात ही गोष्ट कोणी वाचलेलीच नाही ! तेव्हा मी मराठी ब्लॉग विश्वचा सुद्धा सभासद नव्हतो व त्यामुळे गोष्ट तेव्हा फारशी कोणाला कळली नसावी. अर्थात ज्यांनी ही गोष्ट वाचली ते बेहद्द खूश झाले होते. ही गोष्ट मी कोणतेही रफ वर्क न करता, थेट पोस्ट केली होती. गोष्टीतले प्रत्येक पात्र स्वत:च आपली ओळख करून देते व गोष्ट पुढच्या पात्राकडे सरकते. या गोष्टीत मी माझ्या खर्या आयुष्यातील प्रसंगाची बेमालूम मिसळण केलेली आहे. अनेकदा सांगूनही ही गोष्ट काल्पनिक आहे हे अजून अनेकांना पटलेले नाही ! आता असे वाटाते ही गोष्ट मी अजून दहा वर्षाने पोस्ट करायला हवी होती. कारण कितीही प्रयत्न केला तर एवढी चांगली गोष्ट उतरत नाही ! आता माझीही खात्री पटली आहे की या तोडीची थरारकथा माझ्याकडून लिहिली जाणे अशक्य ! तेव्हा एक प्रयोग म्हणून हीच गोष्ट परत प्रकाशित करीत आहे. नवीन वाचकांनी आपल्या पतिक्रीया जरूर कळवाव्यात ! धन्यवाद !

गोष्ट वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

मंगळवार, १२ जुलै, २०११

भज गोविंदम, भज गोविंदम , भज गोविंदम मूढमते !

    काल अनेक संस्कृत, मराठी स्तोत्रांची लिंक दिली होती. या सगळ्यात "भज गोविंदम" हे आद्य शंकराचार्यांचे नितांत सुंदर व अतिशय अर्थपूर्ण स्तोत्र राहूनच गेले. चूक दुरूस्त करतानाच या स्तोत्राचा मराठीत अनुवाद करायचे मनात आले. हे स्तोत्र मी अनेकदा ऐकतो पण त्याचा अर्थ मलाच माहित नव्हता. कानाला गोड लागत होते म्हणून ऐकत होतो एवढेच ! स्वत: अनुवाद करण्याएवढा माझा संस्कृतचा मूळात अभ्यासच नाही. मायाजालावर त्याचा मराठी अनुवाद कोठेही मिळाला नाही. इंग्रजी अनुवाद मात्र भरपूर सापडले. त्यातल्या त्यात सोप्या इंग्रजी अनुवादाचा मराठी अनुवाद करायला घेतला. श्लोक व त्याच्या खाली त्याचा अनुवाद द्यायचा असे ठरले. क्लिष्टपणा वाटू नये म्हणून शब्दश: अनुवाद करण्याचे टाळले अहे. काही चूक असल्यास जरूर निदर्शनास आणून द्यावी ही विनंती. देवनागरीत उपलब्ध असलेले तसेच युनिकोडपुरक स्तोत्र शोधण्यासाठी सुद्धा बरेच शोधावे लागले.

    शंकराचार्य म्हणजे माझ्या वडीलांचा दूसरा प्राण आहे. आद्य शंकराचार्य कोण हेच लोकांना माहित नाही मग त्यांच्या कार्याची माहिती कोणाला असणार ? नेमक्या याच गोष्टीची वडीलांना मनस्वी चीड येते व संताप सुद्धा ! या स्तोत्राचा मी केलेला मराठी अनुवाद मी त्यांनाच अर्पण करीत आहे.

प्रस्तावना - आद्य शंकराचार्य आपल्या शिष्यांबरोबर वाराणसीला आले होते. एका ठीकाणी एक वयोवृद्ध ब्राह्मण त्याच्या शिष्यांकडून व्याकरणाचे नियम घोकून घेत होता. शंकाराचार्यांना त्याची दया आली व त्या ब्राह्मणाला त्यांनी उपदेश केला की या उतार वयात व्याकरण घोकवून घेण्यापेक्षा थेट देवाची भक्तीच का करीत नाहीस. "भज गोविंदम" हे नितांत सुंदर व अर्थपूर्ण पद्य त्यांनी याच प्रसंगी रचले.


 

भज गोविंदम,भज गोविंदम,भज गोविंदम मूढ़मते|

संप्रप्ते सन्निहिते काले,नहि नहि सक्षति डुकृग्नूकरणे||

भज गोविंदम मूढ़मते| (१)

अरे मूर्खा, देवाचे भजन कर, जेव्हा अंत जवळ येइल तेव्हा हे व्याकरण तुझ्या काहीही कामाला येणार नाही.


 

मूढ़ जहीहि धनागम तृष्णा,कुरु सदबुद्धि मनसि वितृष्णाम|

यल्लभसे निजकर्मोपात्तं,वित्तं तेन विनोदय चित्तम||

भज गोविंदम मूढ़मते| (२)

अरे मूर्खा, धनसंचयाच्या मागे लागू नकोस,
धनाचा हव्यास सोड, आज तुला जे काही मिळाले आहे ते तुझे पुर्व-संचितच आहे. जे आहे त्यात समाधान मान.

नारीस्तनभरनाभिदेशं,दृष्टवा मागा मोहावेशम|

एतन्मांसवसादिविकारं,मनसि विव्हिन्तय वारंवारम||

भज गोविंदम्,मूढ़मते| (३)

विषय-भोगात गुंतून पडू नकोस, शरीर म्हणजे नुसता हाडा-मासाचा चिखल आहे हे आधी नीट समजून घे.

नदिनीदलगत जलमति तरलं,तदवज जीवित मतिशय चपलम|

विद्दि व्याध्यभिमान गस्तं,लोकं शोकहतं च समस्तम||

भज गोविंदम्,मूढ़मते|(४)

जीवन क्षणभंगूर आहे, जसे कमलपत्रावरील पाण्याचा थेंब. हे जग चंचलता, विषमता, दैन्य, दु:ख, व्याधींनी भरलेले आहे.

यावद् वित्तोपार्जन सक्तः,तावन् निज परिवारो रक्तः|

पश्चाज् जीवति जर्जर देहे,वार्ता कोपि न पृच्छति गेहे||

भज गोविंदम्,मूढ़मते|(५)

जो वरी पैसा, तो वरी बैसा ! जेव्हा तू कंगाल होशील तेव्हा हे जग तुझ्याकडे ढूंकूनही बघणार नाही !


यावत्पवनो निव्सिति देहे,तावत् पृच्छति कुशलं गेहे|

गतवति वायौ देहापाये,भार्या भिभ्यति तस्मिन्काये||

भज गोविंदम्,मूढ़मते| (६)

कुडीत जोवर प्राण आहे तो पर्यंत सगळेच तुझे सोबती असतील. तुझा श्वास थांबला की तुझे आप्त तुझ्या कलेवरचा सुद्धा धसका घेतील.


बालस्तावत् क्रीडासक्तः,तरुणस्तावत्तरुणी रक्तः|

वृध्धस्तावच्चिन्तामग्नः परमे ब्रह्मणि कोपि लग्नः||

भज गोविंदम्,मूढ़मते| (७)

बालकाचा ओढा खेळाकडे असतो तर तरूणांचा ओढा तरूणीकडे असतो , म्हातारपणी मात्र सगळे ओढग्रस्त / चिंताग्रस्त असतात ! परम ज्ञानाची आस मात्र कोणालाच नसते.


का ते कान्ता कस्ते पुत्रः,संसारोयमतीव विचित्रः|

कस्य त्वं कः कुत आयातः,तत्वं चिन्तय तदिह भ्रातः||

भज गोविंदम्,मूढ़मते| (८)

अरे कोठली बायको आणि कोठला मुलगा ! नसत्या विवंचनेत तू अडकून पडला आहेस. पण तू कोण ? कोठून आलास ? या सत्याचा कधी शोध घेणार आहेस ?


सत्संगत्वे निसंगत्वं,निसंगत्वे निर्मोहत्वम्|

निर्मोहत्वे निश्चलतत्वं,निश्चलत्वे जीवन्मूक्तिः||

भज गोविंदम्,मूढ़मते| (९)

सज्जनांशी संगत धरशील तर आसक्ती पासून सूटशील, अनासक्त झाल्यावर भ्रम तूटेल, भ्रम तूटला की तुझा निर्धार पक्का होइल व मग तुला मुक्तीचा मार्ग दिसेल.

वयसे गते कः कामविकारः,शुष्क नीरे कः कासारः|

क्षीणे वित्ते कः परिवारः,ज्ञाते तत्वे कः संसारः||

भज गोविंदम्,मूढ़मते| (१०)

तारूण्याचा बहर ओसरल्यावर कसले भोग भोगणार तू ? तळ्यातले पाणीच वाफ होवून गेल्यावर त्या तळ्याला तळे तरी कोण म्हणेल ? पैसा नसेल तेव्हा कोण तुमची सोबत करेल ? सत्याचाच शोध लागल्यावर आणखी कशाची गरजच काय ?

मा कुरु धनजन यौवनगर्वं,हरति निमेषात्कालःसर्वम्|

मायामयमिदमखिलं बुद्द्ध्वा,ब्रह्मपदं त्वं प्रविश विदित्वा||

भज गोविंदम्,मूढ़मते| (११)

संपत्ति, नातलग, तारूण्य यांचा गर्व धरू नकोस, हे सगळे एक क्षणात होत्याचे नव्हते होईल. ही सर्व माया आहे. हे सर्व सोडून दे व ब्रह्म जाणून घे.


दिनयामिन्यो सायं प्रातः,शिशिरवसन्तौ पुनरायातः|

कालःक्रिडति गच्छत्यायुः,तदपि न मुंचत्याशावायुः||

भज गोविंदम्,मूढ़मते| (१२)

दिवस आणि रात्र, संध्याकाळ आणि पहाट, थंडी आणि वसंत येतात आणि जातात. काळ काही कोणासाठी थांबत नाही. सृष्टीचे चक्र अव्याहतपणे चालूच आहे. तरीही आपल्या वासना मात्र सूटत नाहीत.


का ते कान्ताधनगतचिन्ता,वातुल किं तव नास्ति नियंता|

त्रिजगति सज्जनसंगतिरेका भवति भवार्णवतरणेनौका||

भज गोविंदम्,मूढ़मते| (१३)

अरे कशाला कांता आणि कनकाची काळजी करतोस ? जग-नियंत्याचा विचार कधी करणार ? त्रिकालात फक्त ज्ञानी माणसांची संगतच तुझी जीवन-नौका भवसागर पार करायला मदत करील.


जटिलो मुंडी लुंचित केशः,काषायाम्बर बहुक्रुत वेषः|

पश्यन्नपि च न पश्यति मूढः,ह्युदरनिमित्तं बहुकृतवेषः||

भज गोविंदम्,मूढ़मते| (१४)

काय पण सोंग आणले आहेस ! मुंडन काय केले आहेस, भगवी वस्त्रे काय ल्यायली आहेस, पोटासाठी हे सोंग आणले असलेस तरी मूर्खा तू स्वत:च फसलेला आहेस ! डोळे असून आंधळा झाला आहेस.


अंग गलितं पलितं मुंडं,दशनविहीनं जातं तुंडम्|

वृध्धो याति गृहित्वा दंडं,तदपि न मुंचत्याशा पिंडम्||

भज गोविंदम्,मूढ़मते| (१५)

अरे तुझे शरीर जर्जर झाले आहे, केस पिकले, तोंडाचे बोळके झाले आहे, काठीचा आधार घेतल्याशिवाय तुला चालताही येत नाही ! तरीही तुझ्या वासना काही मरत नाहीत !


अग्रे वह्निःपृष्ठे भानुः,रात्रो चुबुकसमर्पित जानुः|

करतलभिक्षस्तरुतलवासः,तद्दपि न मुंचत्याशापाशः||

भज गोविंदम्,मूढ़मते| (१६)

पुढे वणवा पेटला आहे तर मागे तुझी पापे. रात्री गुढघ्यात डोके लपवितोस, हात पसरून भीक मागून जगतो आहेस, कसातरी दिवस काढतो आहेस पण तरीही हे वासनांचे बाड फेकून द्यावे असे तुला वाटत नाही.

कुरुते गंगासागर गमनं,व्रतपरिपाल न मथवा दानम्|

ज्ञानविहीनः सर्वमतेन,भजति न मुकिंत जन्मसतेन||

भज गोविंदम्,मूढ़मते| (१७)

गंगेच्या संगमावर लोक तीर्थयात्रेसाठी जातात, धार्मिक विधी करतात, दान-धर्मही करतात. पण ज्ञानच झाले नसेल तर असे कर्मकांड अगदी शंभर जन्म करून सुद्धा मुक्ती मिळणार नाहीच !


सुरमन्दिर तरुमूल निवासः,शय्या भूतलमजिनं वासः|

सर्वपरिग्रह भोग त्यागः,कस्य सुखं न करोति विरागः||

भज गोविंदम्,मूढ़मते| (१८)

देवळात किंवा झाडाखाली राहिलास, जमिनीवर झोपलास, वल्कले नेसलीस, सर्वसंग परीत्याग केलास काय की सर्व सुखांवर पाणी सोडलेल काय , जो पर्यंत वासना आहे तो पर्यंत आनंद कसा मिळणार ?


योगरतोवा भोगरतोवा,संगरतोवा संगविहीनः|

यस्य ब्रम्हणि रमते चित्तं,नन्दति नन्दति नन्दत्येव||

भज गोविंदम्,मूढ़मते| (१९)

ध्यानधारणा करा किंवा विषयात रममाण व्हा, समाजात मिसळण्यात किंवा एकांतात सुख माना. पण आनंद, परमानंद , चिदानंद मात्र ब्रह्म जाणण्यानेच मिळणार आहे.


भगवद् गीता किंचिदधीता,गंगाजललवकणिका पीता|

सकृदपि येन मुरारिसमर्चा,क्रियते तस्य यमेन न चर्चा||

भज गोविंदम्,मूढ़मते| (२०)

गीतेचा एक अध्याय जरी शिकलात, गंगेचा एक थेंब जरी प्राशन केलात किंवा एकदा जरी मुरारीची (कृष्ण) पूजा केलीत तरीही तुम्ही यमावर विजय मिळवाल !

पुनरपि जननं पुनरपि मरणं,पुनरपि जननी जठरे शयनम्|

ईह संसारे बहुदुस्तारे,कृपयापारे पाहि मुरारे||

भज गोविंदम्,मूढ़मते| (२१)

जन्म-मरणाच्या फेर्यातुन फक्त कृष्ण-मुरारीच्या( मुरा नावाच्या राक्षसाचा वध करणारा तो मुरारी ) कृपेनेच तुम्ही मुक्त व्हाल.


रथ्याचर्पट विरचितकन्थः,पुण्यापुण्य विवर्जितपन्थः|

योगी योग नियोजीतचित्तः,रमते बालोन्मत्तवदेव||

भज गोविंदम्,मूढ़मते| (२२)

ज्याने वस्त्र म्हणून चिंध्या नेसल्या आहेत, पाप-पुण्याच्या जो पलिकडे गेलेला आहे, असा हा योगेश्वर सर्वांच्या ठायी वास करून आहे.


कस्त्वं कोहं कुत आयातः,का मे जननी कोमे तातः|

ईति परिभावय सर्वमसारं,विश्वं त्यक्त्वा स्वप्न विचारम्||

भज गोविंदम्,मूढ़मते| (२३)

तू कोण आहेस ? मी कोण आहे ? मी कोठून आलो ? माझी आई कोण ? पिता कोण ? हे जाणण्याच्या मागे लाग. बाकी सर्व माया आहे, स्वप्नवत आहे,तथ्यहीन आहे.


त्वयि मयिचान्यत्रैको विष्णुः,व्यर्थंकुप्यसि मय्यसहिष्णुं|

भव समचित्तःसर्वत्र त्वं,वांछस्यचिराधदि विष्णुत्वम्||

भज गोविंदम्,मूढ़मते| (२४)

तुझ्यात, माझ्यात, सर्वत्र एकच विष्णू वास करून आहे. उतावीळपणे माझ्यावर रागावू नकोस. सगळीकडे स्वत:ला पहा आणि अज्ञानाचा त्याग कर जो विषमतेचे कारण आहे.

शत्रो मित्रे पुत्रे बन्धौ,मा कुरु यत्नं विग्रहसन्धौ|

सर्वस्मिन्नपि पश्यात्मानं,सर्वत्रोत्सृज भेदाज्ञानम्||

भज गोविंदम्,मूढ़मते| (२५)

शत्रू, मित्र, मुलगा किंवा नातलग यांच्याशी भांडूही नकोस आणि सलगीही करू नकोस. तुला जर विष्णूस्वरूप व्हायचे असेल तर सगळीकडे समभाव ठेव.


कामं क्रोधं लोभंमोहं,त्यकत्वात्मानं पश्यति सोहम्|

आत्मज्ञानविहिना मूढाः,ते पच्यन्ते नरकनिगूढाः||

भज गोविंदम्,मूढ़मते| (२६)

काम, क्रोध, लोभ, मोह या सर्वांचा त्याग कर आणि मग स्वत:लाच विचार की मी कोण आहे. आत्मज्ञान झाले नाही तर नरक यातनाच भोगाव्या लागतात.


गेयं गीता नाम सहस्त्रं,ध्येयं श्रीपतिरुपजस्नम्|

नेयंसज्जनसंगे चित्तं,देयं दीनजनाय च वित्तम्||

भज गोविंदम्,मूढ़मते| (२७)

गीता गायन कर, विष्णू सहस्त्रनामाचे स्तवन कर, लक्ष्मीनारायणाचे ध्यान कर. सज्जनांची नेहमी संगत करावी, धन-दौलत गरजूंना वाटून टाकावी.

सुखतः क्रियते रामाभोगः,पश्चाद्धन्त शरीरे रोगः|

यद्यपि लोके मरणं शरणं तदपि न मुंचति पापाचरणम्||

भज गोविंदम्,मूढ़मते| (२८)

लोक शरीराचे चोचले पुरवितात पण त्यानेच शरीर व्याधिग्रस्त होते.मरण समोर दिसत असूनही माणूस पापाचरण मात्र सोडत नाही !


अर्थमनर्थं भावय नित्यं,नास्ति ततः सुखलेशःसत्यम्|

पुत्रादपि धनभांजां भीतिः,सर्वत्रैषा विहिता रीतिः||

भज गोविंदम्,मूढ़मते| (२९)

"अर्थाने अनर्थ होतो" हे नेहमीच प्रत्ययाला येते, पैसा मिळून कोणीही सुखी झालेला नाही. धनिकाला तर आपल्या मुलाची सुद्धा भीती वाटते.


प्राणायामं प्रत्याहारं,नित्यानित्य विवेक विचारम्|

जाप्यसमेत समाधि विधानं,कुर्ववधानं महदवधानम्||

भज गोविंदम्,मूढ़मते| (३०)

प्राणायामाचा अभ्यास करा, विषयातुन लक्ष काढून घ्या, शाश्वत आणि अशाश्वत यातला फरक जाणा, मंत्र सामर्थ्याने मनावर काबू मिळवा – हे सर्व समजून-उमजून करा.

भवमुक्तःगुरु चरणाम्बुज निर्भर भक्तः,संसारादचिराद् भवमुक्तः|

सेन्दिय मानस नियमादेवं,द्रक्ष्यसि निजह्यदयस्थं देवम्||

भज गोविंदम्,मूढ़मते| (३१)

गुरूच्या चरणकमलांची सेवा करूनच तुम्ही जन्म-मरणाचा वेढा तोडू शकाल. इंद्रीयांवर काबू मिळवून व मनाला आवर घालून तुम्ही तुमच्यातच वास करून असलेल्या परमेश्वरात सामावून जाल.

** समाप्त **

मायाजालात या स्तोत्राची एम.पी.3 उपलब्ध आहे पण त्यात फक्त 1, 3, 4, 7, 14, व 21 हेच श्लोक घेतले आहेत. अर्थात जिने कोणी हे गायले आहे तिचा आवाज मंत्रमुग्ध करून टाकणारा असाच आहे. उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा.