शनिवार, ९ जुलै, २०११

काय हवे ? संपत्ति, यश की प्रेम ?

एका गृहिणीला आपल्या घराबाहेर भरपूर पांढरीशुभ्र दाढी वाढलेले तिन म्हातारे दिसतात. ती काही त्यांना ओळखत नव्हती तरीही कदाचित ते भुकेलेले असतील असे वाटून तिने त्यांना चार घास खायला घरात बोलाविले.


 

घरातील कर्ता पुरूष घरी आहे ? असा प्रश्न त्या तिघांनी एकदमच विचारला. "नाही, तो कामासाठी बाहेर गेला आहे" असे तिने सांगताच "तो असल्याशिवाय आम्ही घरात पाऊलही टाकणार नाही" असे उत्तर देवून ते म्हातारे बाहेरच बसून राहिले.


 

संध्याकाळी नवरा घरी आल्यावर तिने त्याला त्या म्हातार्यांबद्दल सांगितले. नवर्याने लगेच त्यांना आता घेवून यायला सांगितले. त्या गृहीणीने त्या तिघांना सांगितले की घरातला कर्ता पुरूष, तिचा नवरा घरी आलेला आहे व आता तुम्हाला आत यायला हरकत नाही.


 

यावर म्हातारे म्हणाले "आम्ही तिघेही कोणाच्या घरात केव्हाच एकत्र जात नाही !" त्या गृहीणीने त्याचे कारण विचारताच त्यातल्या एकाने इतर दोन म्हातार्यांकडे बोट दाखवून सांगितले की हा म्हणजे संपत्ति व तो दूसरा म्हणजे यश व आपण स्वत: प्रेम आहोत. तेव्हा आत जा व नवर्याबरोबर चर्चा करून कोणाला आत घेणार ते ठरवा.


 

नवर्याचे म्हणणे पडले की संपत्तिला आत घेवूया म्हणजे आपल्याला पैशाची कधी ददात पडणार नाही, बायकोचे म्हणणे पडते की त्यापेक्षा यशालाच आपण आत घेवूया. त्यांची सुन मात्र सांगते की आपण प्रेमालाच घरात बोलवूया म्हणजे आपले घर प्रेमाने भरून जाईल ! सुनेचे म्हणणे ऐकण्याचे शेवटी नवरा-बायको ठरवितात.


 

गृहीणी घराबाहेर येवून प्रेमाला आदरपुर्वक आत बोलावते. आश्चर्य म्हणजे प्रेम घरात शिरू लागतात त्याच्या मागोमाग संपत्ति व यश सुद्धा आत येवू लागतात. गृहीणी विचारते की मी फक्त प्रेमाला आत बोलाविले आहे, तुम्ही का मागोमाग येत आहात ?


 

यावर तिन्ही म्हातारे एकमुखाने सांगतात की तुम्ही जर संपत्ति किंवा यशाला आत बोलाविले असते तर इतर दोघे बाहेरच थांबले असते. पण जिकडे प्रेम असते तिकडे बाकी दोघे आपसूकच जातात. प्रेम असेल तिकडे संपत्ति व यश असतेच असते !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: