Monday, June 8, 2009

३५ टक्क्याला पास ?

ब्रिटीशांनी भारतातल्या सध्याच्या शिक्षण पद्धतीचा पाया घातला त्याला शतक तरी उलटले असेल. गोर्या साहेबाला मदत म्हणून कारकुन्डे पैदा व्हावेत हाच त्या शिक्षणाचा हेतू होता. कारकुनाला जुजबी बेरीज, वजाबाकी, गुणाकार व कागद-पत्रांची नक्कल करता येणे एवढे जमले तरी साहेब खुष होता. ब्रिटीश सत्ता गेल्यानंतर शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल अपेक्षित होता, नवा इतिहास लिहायला हवा होता, पण दुर्दैवाने ते झाले नाही व अजूनही शिवरायांचा इतिहास थोडक्यात आटपून आपल्याला ब्रिटीश, फ़्रेंच, रशियन क्रांतीचा अभ्यास करावा लागतो व अमेरीकन यादवी अभ्यासावी लागते. पहील्या आणि दूसर्या महायुद्धाच्या दुष्परीणामातुन युद्ध खेळलेले सगळे देश बाहेर पडले , आपण मात्र अजून त्याचा अभ्यास करतो आहोत !
तसे बदल झालेच नाही असे नाही, अनेक वेळा अभ्यासक्रम बदलला गेला, वेगवेगळे शैक्षणिक आकृतिबंध अभ्यासले गेले, अनेक पॅटर्न आले आणि गेले, शिकवावे कसे यावर पण बरेच चर्वित-चर्वण झाले, परीक्षा कशा घ्यायच्या ( का घ्यायच्याच नाही ?) व त्याचे निकाल (!) कसे लावायचे यातही भरपूर प्रयोग झाले. पण गंमत म्हणजे पुढच्या यत्तेत ढकलायचा निकष, ३५ % ला पास, यात टक्कामात्रही बदल झाला नाही ! अगदी काश्मीर ते कन्याकुमारी, कोठेही जा, ३५ % ला पास यात मात्र कमालीचे एकमत ! कधी काळी पहीला येणारा ७५ % मार्क मिळवायचा, सध्या पहील्या येणार्याची टक्केवारी १०० % च्या घरात पोचली आहे, उत्तीर्णांचे प्रमाण ३०-३५ % वरून थेट ६०-७० % झाले आहे, ( मुंबई विभागात तर ८० % ! ), अधिकाधीक मुले पास कशी होतील ही एकच चिंता सर्व धुरीणांना पडली आहे पण तरीही ३५ ची वेस मात्र कोणी बदलत नाही.(कमी करत नाही हेच नवल !)
शिकवले त्याचे मुलाला किती आकलन झाले हे कळण्याची फ़ूटपट्टी म्हणजे टक्केवारी. वर्षभरात जे काही शिकवले त्यावर आधारीत तोंडी व लेखी परीक्षा घेतली जाते व त्यात त्याचे १/३ हून किंचित थोडे गुण मिळाले की तो विद्यार्थी ( की गुणार्थी ? ) पास, नाहीतर नापास ! सध्या २०% गुण शाळाच मुलांना देणार आहेत आणि त्यात शाळा सहसा कंजुशी करत नाहीत, अगदी ’दे दान सूटे गिर्हाण’ च्या धर्तीवर २०% गुणांची बेगमी आधीच झालेली असते. लेखी परीक्षेत रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा. चूक की बरोबर, एका वाक्यात उत्तरे द्या, असे प्रश्न सोडवून सर्वसाधारण विद्यार्थी पास-नापासाच्या फ़ेर्यातुन सहज सूटू (निसटू!) शकतो. या एक मार्काच्या निदान पाच प्रश्नांची उत्तरे इतर प्रश्नात सापडतात ! टापटीपीला पण म्हणे पाच गुण दान केले जातात ! एकूण तीस मार्काची शीडी लावून पास करायचा प्रघात आहेच ! प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांना पर्याय ही भरपूर दिलेले असतात. प्रत्येक गटात विचारलेल्या एकूण प्रश्नांपैकी / पर्यायांपैकी फ़क्त अर्धेच सोडवायचे असतात. कोणत्या धड्यावर किती मार्काचे प्रश्न येणार याची सुद्धा कल्पना दिलेली असते त्यामुळे अनेक धडेच्या धडे ऑप्शनला टाकता येतात. थोडक्यात वर्षभरातल्या एकूण धड्यापैकी अर्धे धडे जरी धड केले तरी चालसे ! शिकण्याचा आनंद मिळावा, विषयाची गोडी लागावी या धोरणालाच या मुळे हरताळ फ़ासला जातो व विद्यार्थी फ़क्त गुणार्थी होतो ! परीक्षेमध्ये विद्यार्थाच्या ज्ञानाचा कस लागावा असे काही विचारलेच जात नाही. निबंध, पत्र-लेखन, सारांश लेखन यांचे विषय सुद्धा गाइड बघूनच दिले जातात ! मग पदवी धारण केलेल्या तरूणाला साधा अर्ज भरता येत नाही, एखाद्या विषयावर आपली मते मांडता येत नाहीत, स्वत:चे मत बनवता येत नाही तेव्हा मला तरी आश्चर्य वाटत नाही. काही वर्षापुर्वी सरकारनेच ग्रामीण भागातल्या आठवीतल्या मुलांची गुणवत्ता जोखली होती तेव्हा त्या मुलांना साधी अक्षर-ओळख सुद्धा झालेली नाही हे नागडे सत्य बाहेर आले होते. शहाण्याचे तिशीकडे या उक्तीप्रमाणे सरकारने उपाय मात्र भलतेच केले ते अलाहीदा !
अभ्यासक्रमाची मार्कात विभागणी, प्रश्नांचे स्वरूप बघितले तर ३५ टक्क्याला पास हे खरे तर २०% एवढेच भरते. म्हणजे शिकवलेल्यापैकी १/५ जरी डोक्यात शिरले तर पुढच्या यत्तेचा मार्ग मोकळा होतो. पुढे पाठ , पाठी सपाट हे सुद्धा आपल्या शिक्षण पद्धतीचे अव्यवच्छेदक लक्षण आहे. तेव्हा पदवीधर तरूणाची खरी यत्ता कोणती हे तुम्हीच ठरवा आता. याचे दुष्परीणाम समजतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो. सनदी सेवच्या नोकर्या, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा यांचे निकाल जेमेतेम २ ते ३ % असतात यातच सगळे आले. बहुजनांपर्यंत शिक्षण पोचावे या नुसत्या बाता झाल्या, खरे तर राजकारण्यांच्या विना-अनुदानीत शाळा-कॉलेजांना ( शिक्षणखाने !) मुबलक कच्चा माल मिळावा म्हणून मायबाप सरकार चवथी पर्यंतच्या परीक्षाच रद्द करणार आहे, गणोबा व इंग्रजी हे विषय सुद्धा ऑप्शनला टाकायचे सरकार दरबारी घाटत आहे. शिक्षणाचे शिक्शाण कसे करता येइल याच विचारात अगळॆ असताना मी जर माझे मत मांडले तर माझीच यत्ता विचारली जाइल यात शंकाच नाही पण तरीही मला ठामपणे वाटते की किमान दर्जा राखायचा असेल तर पहीली पासून ३५ टक्क्याची वेस दहावीपर्यंत निदान ५० टक्क्यापर्यंत व पदवीसाठी ६० टक्क्यापर्यंत वाढवावी लागेल. गुणावान विद्यार्थी हवे असतील तर गुणदान बंद करून ३५ टक्क्याची सीमारेषा लांबवावीच लागेल.

Thursday, June 4, 2009

इतिहास का शिकायचा ?

इतिहास – साधा सोपा अर्थ “जे घडले ते असे घडले” ! व्यासांच्याच वाक्यात सांगायचे तर महाभारत हा “जय” नावाचा इतिहास आहे ! माझ्या मते तो जगातला पहीला आणि शेवटचा इतिहास आहे बाकी सगळा विपर्यास आहे ! महाभारतात व्यास आपण अनैतिक संबंधातुन जन्मलो हे लपवून ठेवत नाहीत, युधीष्ठीराचे अवगुण सांगताना दुर्योधनाचे सदगुण सुद्धा नमूद करतात ! भीष्म ’अर्थस्य पुरूषो दासा” म्हणत द्रौपदी वस्त्रहरण प्रकरणात हात झटकतात, गीता सांगताना कृष्ण अर्जुनाला गांडू (क्लैब्य) असे म्हणतो ! कोठेही लपवाछपवी नाही, कोणाचे भलते उदात्तीकरण नाही ! याला म्हणतात इतिहास. आता हाच इतिहास झाला आहे !

इतिहासाला विंग्रजीत History म्हणतात, बरोबर आहे his or her story ! जेत्यांचा इतिहास. तर असा हा इतिहास आपल्या माथी अगदी शालेय जीवनापासून मारला जातो. सनसनावल्या लक्षात ठेवताना अनेकांची साले निघतात. इतिहास का शिकायचा तर म्हणे चुकांची पुनरूक्ती हो़उ नये म्हणून ! हेच मुळात साफ़ चूक आहे ! पहील्या महायुद्धा नंतर दूसरे झालेच ना ? युद्धात जिंकणारे मराठे तहात हरतात हा सुद्धा इतिहासच आहे ना ? तसे या वाक्यात मराठे या शब्दा ऐवजी हिंदू, भारत हे शब्द वापरलेत तरी इतिहास बदलणार नाही ! शिवरायांना मोघलांनी जेवढे छळले नाही तेवढे स्वकीयांनी छळले हा सुद्धा इतिहासच ना ? गद्दारी / फ़ितुरी कोणी, कोणाशी आणि केव्हा केली हे इतिहासात शिकून वर्तमानात (वर्तनात सुद्धा !) काही फ़रक पडला का ? सापाला दूध पाजले तरी तो विषारी फ़ुत्कारच सोडणार, हे सुद्धा इतिहासच सांगतो ना ?

बरे जो काही इतिहास म्हणून आहे त्यात तरी एकवाक्यता आहे का ? शिवाजी सेक्युलर होते की हिंदुत्ववादी ? समर्थ रामदास शिवरायांचे गुरू होते की औरंगजेवाचे हेर ? महाराजांनी खानाचा कोथळा काढला की कुरवाळले, पैगंबर पळाला की त्याने यशस्वी माघार घेतली ? संभाजी बदफ़ैली होता की धर्मवीर ? आर्य मुळचे कोणते ? १८५७ चे बंड हे भटा-बामणांचे, गादी टीकवण्यासाठीचे प्रयत्न होते का स्वातंत्र्य-समर ? इतिहास कोणात्याच प्रश्नावर निर्विवाद मत मांडत नाही, मत बनवायचा प्रयत्न मात्र जरूर करतो. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या ! मग परत समाजात दुफ़ळी निर्माण होते, आपलाच इतिहास खरा, जाज्वल्य, त्यांचा विपर्यास, रचलेला , रंजक हे सिद्ध करण्यासाठी नवा रक्तरंजित इतिहास रचला जातो ! इतिहासाबरोबरच भूगोल सुद्धा बदलला जातो. सरकार बदलले की इतिहास सुद्धा बदलतो !

तरीही आपल्याला इतिहास शिकायलाच लागतो, तो तरी कोणाचा ? शिवरायांचा इतिहास वा भारतीय मातीत घडलेला इतिहास चवथीपर्यंतच गुंडाळला जातो व मग जगाचा इतिहास ’पढवला’ जातो ! अमेरीकन यादवी, दोन महायुद्धे – त्यांची कारणे – परीणाम (युद्धाच्या अंतातच युद्धाचे बीज असे ) इंग्रज, फ़ेंच, रशियन राज्यक्रांत्या तर अगदी वांत्या आणतात. कित्येक हजारो वर्षे सहीष्णुता या मातीत रुजलेली आहे, इतिहास शिकवतो की ती फ़्रेंच राज्यक्रांतीची देन आहे ! भारताबाहेरच्या मुलांना असा दूसर्यांचा इतिहास खचितच पढवला जात असेल ! अडकलेली फ़ीत जशी पुन्हा पुन्हा वाजत राहते तसा तोच इतिहास पुन्हा पुन्हा नव्याने जन्म घेतो ! अगदी पहीले पाढे पंचावन्न ! अमेरीका लादेन नावाचा भस्मासुर पोसते आणि इकडे भारतातले राज्यकर्ते मतांच्या राजकारणासाठी जात्यंध हीरवी किड कुरवाळतील, अगदी दूसरी फ़ाळणी इतिहासाजमा होईपर्यंत, मग परत तिसरीचे खोदकाम !

इतिहासापासून कोणीच, कोणताच धडा केव्हाच कसा घेतला नाही हे शिकण्यासाठी मात्र इतिहास जरूर शिका ! इतिहासच साक्षी आहे !

इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेउन ना नाचा,
करा उल्लंघन त्याचे आणिक रचा इतिहास नवा !

’इति’श्री !

Wednesday, June 3, 2009

खेळीया !

संध्याकाळी पाच वाजता कॅन्टीन मध्ये बसुन चहाचे घोट घेत असताना मला आता पुढे काय याची काळजी पडली होती. मित्राला मी हेच सांगत होतो की काय साली आडवेळेची गाडी आहे, पहाटे ३.३० वाजता ही काय एक्सप्रेस सोडायची वेळ झाली का ? इतका वेळ मुंबई सेंट्रलच्या परीसरात सामान सांभाळत काढावा लागणार होता. एवढ्यात एक प्रसन्न व्यक्तीमत्वाचा माणूस आम्हाला सामोरा आला. अत्यंत अदबीने तो बोलला “माफ़ करना, आपकी बाते मुझे सुनाई दे रही थी. इस नाचीज को विवेक शर्मा कहते है, आप मेरे घर तशरीफ़ लिजीये, मेरा घर स्टेशन के पास ही है. आप मेरे घर पधारे, भोजन के बाद, कुछ गपशप करेंगे , मै आपको सही समय स्टेशन छोड दूँगा”. मी पण तेवढ्याच नम्रतेने “माफ़ किजीये, न्योते का शुक्रीया, लेकिन मै आपको पहचानता भी नही …” माझे वाक्य त्याने अर्धवट तोडले व म्हणाला की मी तुमच्या बोराडे साहेबांचा मित्र आहे व तुमच्या बद्दल सुद्धा बरेच ऐकून आहे, संकोच बाळगायचे कारणच नाही. तेव्हा माझ्या वतीने बोराडेने परस्परच होकार देउन टाकला व विचार कसला करतोस, जाच, याची बायको साक्षात अन्नपूर्णा आहे ! माझा होकार ग्राह्य धरून त्याने केव्हा निघायचे असे विचारले व काही काम नसल्यामुळे मी कधीही, आता निघालो तरी हरकत नाही असे सांगितले . तो ही तयार झाला. रस्त्यावर त्याने टॅक्सी थांबवली व आम्ही आत बसलो. मी अहो कशाला उगाच, ट्रेनने गेलो असतो की, असे म्हणताच परत तो अदबीने म्हणाला की आप तो अब हमारे मेहमान है, आपको कतई भी तकलीफ़ नही होनी चाहीये ! प्रवासात त्याचा चांगला परीचय झाला. त्याला दोन मुले होती. त्याची बायको संगणकातली पदवीधर असून सुद्धा गृहीणी होती, त्यानेच तीला घरासाठी नोकरी सोडायला लावली होती, अर्थात त्याच्या शब्दा बाहेर ती नव्हती ! हे सर्व ऐकल्यावर मला त्याच्या बद्दल नेमके मत बनवणे जड जात होते. मला राहुन राहुन आश्चर्य सुद्धा वाटत होते की पुर्णपणे अपरीचीत माणसाकडे जायला मी तयार तरी कसा झालो ?

घराचा दरवाजा उघडला जाताच मला जाणीव झाली वातावरणात भरून राहीलेल्या दडपणाची ! त्याच्या बायकोने हसून स्वागत केले. मी जवळच्या सोफ़्यावर बसलो, चप्पल बाजूला काढली, माझी बॅग तिने आत नेउन ठेवली. मग मात्र भन्नाट प्रकार घडू लागले. तिने नवर्याच्या पायातले बूट काढले, ते रॅकमध्ये ठेवले, आम्हा दोघांना ट्रे मधून पाणी आणले, आमच्या हातात काय दिले, रिकामे ग्लास परत स्वत: घेउन ट्रे मध्ये ठवले. चहा देताना पण तेच, आमचा चहा पिउन होईपर्यंत ती तिकडे उभीच होती. मग नवरोजी हात पाय धुवायला गेले तेव्हा ती चक्क बाहेर नॅपकीन घेउन उभी होती. मग त्याच्या हातावर तिने परीटघडीचे कपडे ठेवले. मला तर वाटले तो एरवी तिच्या कडून ते घालुन पण घेत असावा ! मी सुद्धा हातपाय धुउन फ़्रेश झालो पण तिने द्यायच्या आत शिताफ़ीने नॅपकीन घेउन तसाच परत ठेवला. यावर यजमान जरा नाराज झाला, आप क्यो तकलीफ़ लेते हो, घर अपनाही है समझो, हम तो मेहमान को भगवान समझते है ! आत मुलांचा कल्ला चालु होता, मी तिकडे गेलो. नुसता पसारा पडला होता. तो बघुन त्याने बायकोला हाक मारली व मुलांची खोली आवरायला सांगितले. मुले काही अगदीच लहान नव्हती. तिने आतुनच आवाज दिला, आ रही हूँ ! म्हणजे ही सगळी मेहमान नवाझी तिच्या जीवावर चालली होती. घरातला बाकी कोणी इकडची काडी सुद्धा तिकडे करत नव्हता. मी काही निश्चय केला. सुरवात मुलांपासून करणेच योग्य होते. मी मुलांना विचारले, कहानी किसे सुननी है, दोघे अगदी एका सुरात मुझे असे ओरडले. तो फ़ीर ये सब अपनी जगह पे रखो पहीले. लगेच सर्व पसारा दूर झाला. मी गोष्ट चालु केली कृष्णाची. त्याचे बालपणीचे पराक्रम , खोड्या, मित्रांबरोबर मस्ती असे सांगत सांगत मी ट्रॅक वळवला त्याच्या सर्वात मोठ्या गुणाकडे – स्वावलंबन. तो कसा पहाटे लवकर उठायचा, गुरे स्वत: चरायला घेउन जायचा, त्यांची निगा राखायचा, राजाचा मुलगा असूनही सगळी कामे करायचा, शिकत असताना लाकडाच्या मोळ्या सुद्धा आणायचा, मोठेपणी आपल्या घोड्यांना स्वत: खरारा करायचा, राजसूय यज्ञाच्या पंक्तीत तर त्याने चक्क उष्टे-खरकटे काढले होते. का कोण जाणे, काहीतरी जबरदस्त इम्पॅक्ट निर्माण करण्यात मी यशस्वी झालो होतो. मुले अगदी तल्लीन झाली होतीच पण यजमान सुद्धा त्याचा आनंद लूटत होता.

इतक्यात वर्दी आली, खाना तयार है ! बाहेर येउन बघतो तो काय तीने एकटीनेच सगळी मांडामांड केली होती. आम्ही पानावर बसलो, ती वाढायला थांबली. मी, तुम्ही पण आमच्या बरोबर बसा असे आग्रहाने सांगताच ती एकदम कावरी-बावरी झाली, नवर्याकडे तिने बघितले, त्याने नजरेनेच होकार देताच तिला धक्काच बसला. आता मला वातावरणातला मोकळेपणा जाणवू लागला होता. एकदम फ़्री वातावरणात आमच्या गप्पा रंगल्या. आणि खरेच ती अन्नपूर्णा होती ! तिच्या सुगरणपणाचे गोडवे गाताना मला शब्द अपुरे पडत होते. जेवण संपत येतानाच मी मुलांना विचारले, कृष्ण कसा होता ? एकासुरात उत्तर आले, स्वावलंबी ! मग आजपासून सगळ्यांनी आईला सगळे आवरायला मदत करायची ! चक्क यजमानसाहेब सुद्धा मग आवरायला लागले. आवरे पर्यंत अकरा वाजले, मुले अजून काही गोष्टी ऐकून झोपी गेली. मग आमचा गप्पांचा फ़ड जमला. त्याची बायको विलक्षणच होती. तिचे वाचन व पाठांतर अफ़ाट असेच होते. ती बोलत असताना तिचा नवरा तिच्याकडे कौतुक मिश्रीत नजरेने बघत होता. तिची एक नवीच ओळख त्याला होत होती जणु ! २.३० वाजले. निरोपाची वेळ आली ! वातावरण एकदम भावुक बनले. असह्य शांतता पसरली. मग त्याने माझा हात हातात घेउन बोलायला सुरवात केली, गदगदलेल्या स्वरात तो म्हणू लागला की तुम्ही तर मेहमान नाही भगवानच आहात. माझ्या अहंकाराचा तुम्ही पार चकनाचूर करून टाकला. तुमच्या गोष्टी ऐकताना काही वेगळाच फ़ील येत होता. आजसे मै बीबीका हर काम मे हाथ बटाउंगा, मेरे काम खुद करूंगा, ये मेरा आपसे वादा है. भगवान की लिला भी अजब है, बिना पहचान मै आपको बुलाता क्या और आप भी बिना हिचकीच आ जाते हो , सब अजिब है ! और सबसे बडी बात, आपने मेरे बीबी को मानो नया जनम दिया, उसे इतना खुश, एवढे भरभरून बोलताना, मोकळेपणे हसताना मैने आजतक कभी नही देखा था. त्याच्या बायकोच्या डोळ्यातुन तर अश्रूंची नुसती संततधार लागली होती. जणु “सजल नयन जलधार बरसती”

चलो भाभी, चलता हूँ, आप सब अब पनवेल आना , असा न्योता देउन बाहेर पडलो. एक करो, ये नेम-प्लेट बदली करो, नया बनाओ, जिसपर भाभी का भी नाम हो ! यावर तो “जरूर” असे प्रसन्न पणे बोलला. भाभीला काहीतरी बोलायचे होते, पण तिच्या तोंडून आवाजच फ़ूटत नव्हता, बर्याच मुष्कीलीने तिच्या तोंडून “भय्या …” एवढेच आर्त पणे बाहेर पडले. आता मात्र मला स्वत:ला भावनावश होण्यापासून सावरण्यासाठी तडक निघणे भागच पडले.

शनिवारीच त्याने फ़ोन केला होता, आवाजात प्रचंड उत्साह, आम्ही सगळे तुमच्या कडे रविवारी येत आहोत, अगदी तुझ्या भाषेत, सहकुटूंब सहपरीवार ! और बच्चोंका मेसेज है की जितनी स्टोरी आती है, सब तय्यार रखना !

घरी बायकोला हे रात्री सांगणार एवढ्यात त्याचा परत फ़ोन आला, माफ़ करना, मेरी नानी गुजर गई है, हम सब पुना जा रहे है, फ़िर कभी. रात्री अकरा वाजत परत फ़ोन, बच्चोंको आपके घर छोडता हूँ, वो माहौल में बच्चे …और कल दोपहर हम दोनो आते है. मी म्हणालो, ठीक है, लेके आओ, मै पनवेल डेपो के पास आता हूँ. मी त्यांच्या सुमोची वाट बघत पनवेल डेपो जवळ उभा होतो. ११:३० वाजता पुन्हा फ़ोन, अरे भाई, माफ़ करना, मै रास्ता भूल गया, कळंबोली सर्कल से मुझे पुराने हाय-वे - पनवेल डेपो की ओर मुडना था, मै स्पीड मे आदतसे सीधा एक्सप्रेस हायवे पर आ गया. बादमे ध्यान मे आया, अब लेट हो जायेगा, वैसे बच्चे भी सो गये है ! मी एकटाच घरी परतलो.

सकाळी पेपर चाळत होतो. सकाळाच्या टुडे पुरवणीत सुमोला झालेल्या अपघाताची बातमी फ़ोटोसह दिली होती. अजस्त्र डंपरच्या धडकेने तिचा पार चेंदा-मेंदा झाला होता. सुमोतले अख्खे कुटुंब, नवरा, बायको व दोन लहान मुले, ऑन दी स्पॉट ठार झाली होते. मृतांची ओळख पटली असून, मुंबई बंदरात कामाला असलेले …….

Tuesday, June 2, 2009

आठवले ? आठवले !

आठवले का आठवले ?
कोण आठवले ? काय आठवले ?
नाही बुवा आठवले ! ॥धृ॥

अहो ते हो, कोणे एके काळचे
सिद्धार्थ वसतिगृहात राहणारे
आंबेडकरी जनतेचे कैवारी, लढवय्ये पॅन्थर ? -- १
अहो ते हो, शरदाच्या कृपाप्रसादाने
एका रात्रीत न्हाउन निघालेले
समाजकल्याण खात्याची झुल चढलेले ? -- २
अहो ते हो, वाघाच्या गुहेत शिरलेले,
नामांतर प्रश्नी त्याचे मन वळवणारे,
मग नामविस्तारावर तोड करणारे ? -- ३
अहो ते हो, रमाबाई नगरामध्ये
आपल्याच माणसांकडून थोबाड फ़ूटलेले,
तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाल्लेले ? -- ४
अहो ते हो, विधानसभा निवडणुकीत
राणा भीमदेवी थाटात,
दोनशे जागा लढणार म्हणणारे ? -- ५
अहो ते हो, दूसर्याच दिवशी कलटी मारणारे,
दोनशे नुसते म्हणायचे असते,
२५ पण लय झाल्या म्हणणारे ? -- ६
अहो ते हो, मराठा सरदारांच्या
जागा वाटपाच्या पंक्‍ती चालू असताना
आशाळभूत पणे बाहेर उभे असलेले ? -- ७
अहो ते हो, सरदारांनी झिडकारताच
कोपलेले, बंडाची भाषा करणारे
शेवटी कलानीला निळा टीळा लावणारे ? -- ८
अहो ते हो, गुढघ्याला बाशिंग बांधलेले
केंद्रात कॅबीनेटच पायजेल म्हणून रूसलेले
निदान राज्यमंत्री करा म्हणून विनवणारे ? -- ९
ना सोनियाचा प्रकाश, शरदाचे चांदणेही नाही
सहनही होत नाही सांगताही येत नाही
ज्यांना गल्लीतही कोणी विचारत नाही ? -- १०
अहो ते हो, मायावतीला घाबरलेले
आधी धम्म स्वीकारा म्हणून सांगणारे
डोळ्यावर पट्टी बांधुन हत्ती चाचपणारे ? -- ११
अहो ते हो, लोकांनी झिडकारलेले
पराभव न पचल्याने राडा करणारे
गद्दारी झाली म्हणून पेटलेले ? -- १२
अहो ते हो, दिल्लीश्वरांनी लाथाडलेले,
मंत्री नाहीतर राज्यसभेवर पाठवा म्हणणारे
नाही तर दूसरा विचार करू म्हणणारे ? -- १३
ते का ? अहो आता आठवले !
शरदाच्या चांदण्यात कोमेजलेले
भरकटलेले ,खचलेले ,संपलेले आठवले ! -- १४

Wednesday, May 27, 2009

आंब्याचे अर्थकारण !

कोकण म्हटले की निसर्गसंपन्न प्रदेश समोर उभा रहातो पण त्याच वेळी मागासलेला व दरीद्री ही विशेषणे सुद्धा आठवतात। लहानपणी केव्हातरी “पिकवतोले परब व खातोलो अरब” असे काहीसे कानी पडले होते. पुढे आजोबांबरोबर आंबा विक्रीच्या पैशाची वसूली करण्यासाठी दलालांच्या घरची , जे सर्व घाटावरचेच असत, पायपीट करताना खात्री पटली की “खपतो रायबा आणि गबर होतो घाटबा” हेच योग्य आहे. कोकणातल्या आंब्याची चव हंगामात सगळ्यात आधी श्रीमंत अरब जरूर चाखतो पण फ़ूकट नक्कीच नाही. मग हे पैसे जातात कोठे तर अडत्यांच्या घशात !
माझे आजोबा, वडीलांचे चुलते, तसे मुंबईला आंबा पाठवण्याचे धाडस करणारे पहील्या पिढीचे मँगो मर्चंट ! धंद्यातले अनेक बारकावे आत्मसात केलेले मुरब्बी आंबा उत्पादक / व्यापारी। मुंबईत भाव मिळत नाही असे समजल्यावर लगोलग माल मिरजेच्या वा बेळगावच्या बाजारात पाठवायची कल्पकता पण त्यांचीच. दरवर्षी जुन-जुलै मध्ये त्यांची मुंबईवारी असे. हेतू एकच, घाटावरच्या दलालांनी थकवलेले पैसे वसूल करणे. आधी बाबा त्यांची सोबत करत, मी मोठा झाल्यावर व मुंबईची चांगली माहीती झाल्यावर बाबांनी माझ्यावरच ते काम सोपवले. ( साधारण १९८० ते १९९०) आजोबा तेव्हा मुंबईतल्या निदान ५ दलालांकडे आपला माल पाठवत. दलाल पट्ट्या पाठवत पण हिशोब चूकता करण्यात बरीच टंगळ-मंगळ करत, त्यांच्या उरावर बसल्याशिवाय वसूली होत नसे ! आमची मोहीम सकाळी १० वाजता चालू होई. बहुतेक व्यापारी महात्मा फ़ुले मार्केट मधले असत. गाळ्यावर त्यांना गाठले कि सांगत पेढीवर जा व पेढीवर गेलो की सांगत गाळ्यावर जा ! कधी आताच तुमचा ड्राफ़्ट बनवायला माणूस गेला आहे अशीही लोणकढी थाप मारत. पण आजोबा पक्के खमके होते. उद्या येतो ड्राफ़्ट काढल्याची व पोस्ट केल्याची पावती तयार ठेवा म्हणून खडसावत. मग तो दलाल, तुम्ही आता एवढे आलाच आहात तर ड्राफ़्ट रद्द करतो, उद्या संध्याकाळी रोकड घेउन जा म्हणून सांगे ! पुढची पिढी आता मुंबईला माल पाठवतच नाही. सांगली, मिरज व बेळगावच त्यांना जवळचे वाटते, नाहीतर कॅनिंग आहेच !
मधल्या प्रवासात आजोबांशी अनेक बाबींवर चर्चा होई आणि आंब्याचा धंदा करणे येर्यागबाळ्याचे काम नाही हे उमगे ! आधी मला वाटे आजोबा या धंद्यात बखळ पैसा कमवतात। साधा हिशोब होता, मुंबईत आलेला पहीला आंबा हजार ते दोन हजार रूपयाला पेटी या भावाने खपत असे, मग साधारण १००० पेट्यांचे किती ? मग मी पट्ट्या तपासल्या तेव्हा थक्कच झालो. जास्तीत जास्त भाव ३०० रूपडे होता व कमी म्हणाल तर पार ५० रूपये , त्यात लाकडी पेटीचीच किंमत २५ रूपये असे ! हे पैसे पण सगळे मिळत नसतच, दलाल हिशोब करताना सतराशेसाठ कलमे लावून त्यातले बरेच पैसे वळते करून घेत ! आजोबांना मी अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडे व त्यातुनच उमगलेले आंब्याचे अर्थकारण असे,
कोकणातले आंबा उत्पादक पुर्वापार दलालांच्या मार्फ़तच आंबा विकतात। हे दलाल एकजात सर्व घाटावरचे आहेत. आंब्याचा हंगाम जरी एप्रिल-मे असा असला तरी त्यासाठी वर्षभर खपावे लागते. कलमांना वेळोवेळी फ़वारणी , खते देणे, बागेतली तणे उपटणे या साठी पैसा लागतो. कोकणातल्या माणसाला कडकीने कायमचे घेरलेले. त्याची ही अडचण बघुन घाटावरले दलाल जानेवारीच्या आसपास कोकणात येतात व बाग मालकांना आगाउ रक्कम देउन बांधून घेतात. उत्पादकाला अगदी सुरवातीला चांगल्या भावाच्या पट्ट्या पाठवतात व मग मात्र भाव पाडून त्याला चांगलेच कोंडीत पकडतात. बरे हे पैसे सुद्धा द्यायला त्याला अनेक खेटे घालावे लागतात. माल कोवळा निघाला, ट्रकला अपघात झाला, गोदीतल्या संपाने भाव कोसळला ही व अशी हजारो कारणे त्यांच्याकडे तयार असतात. ३०० ते ५० हा पेटीला भाव देणारे दलाल याच पेट्या बड्या धेंडाना अवाच्या सवा भावाने विकतात व गबर होतात. आता तर स्थिती अशी आहे की परप्रांतातले व्यापारी , ज्यांना आंब्यातले काडीही समजत नाही, ते सुद्धा आंबा मोहरण्याच्या सुमारास येउन बागाच्या बागा खरेदी करतात ! कोकणी माणूस सुद्धा धंद्यातल्या अनिश्चिततेला घावरून जे मिळेल ते घेउन गप्प बसतो. यापुढे कोकणात गेल्यावर खायला आंबाच मिळणार नाही असे झाल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही !
हल्ली कोकणातला आंबा उत्पादक कॅनिंगच्या कच्छपि गेला आहे. सब घोडा बारा टक्का, या न्यायाने कॅनिंगवाले किलोच्या भावाने कलमी आंबा विकत घेतात व रोकडा पैसा देतात. आंबा उत्पादक म्हणतो मस्त आहे, आंबा नुसता उतरवायचा, प्रतवारी करायची गरज नाही, पेट्यात भरायची कटकट नाही, दलालांकडून फ़रपट नाही. पोत्यात आंबा भरा व रोकडे मोजून घ्या ! तसेही आमराईत खपायला, राखायला गडी कोठे मिळ्तात ?
सहकारी पतपेढ्या जवळपास नाहीतच ! आजोबांच्या घरी अनेकवेळा जिल्हा सहकारी संस्थचे गट विकास अधिकारी येत व सांगत की बोगस का होईना, सहकारी संस्था स्थापन करा, सर्व सभासदांच्या नावाने कर्ज घ्या व खुषाल बुडवा, निधी परत चालला आहे, पण छे ! काही उपयोग होत नसे. आंबा उत्पादक कधी संघटीत झालेच नाहीत, तसे प्रयत्न झाले , आप्पासाहेब गोगटे , जे पुढे रत्नागिरीचे आमदार सुद्धा झाले, त्यांचे कार्य नक्कीच उल्लेखनीय आहे, पण तो पॅटर्न कोकणभर राबवला गेला नाही, घाटावरच्या दलालांची मक्तेदारी तुटली नाही. आंबा पिकतो, रस गळ्तो पण कोकणचा राजा स्वत: झिम्मा खेळत नाही, नुसते बघतो ! शिमगा मात्र करतो ! या शापित प्रदेशाला काही उ:शाप आहे की नाही ?

गीतेचा खप कसा वाढवावा ?

गीता, आपला धर्मग्रंथ, एवढेच आपल्याला माहीती असते, त्या पुढे घरी एखादी गीतेची प्रत असणे, त्याचे वाचन करणे, मनन, आचरण या खूपच लांबच्या बाता झाल्या. तसे चोप्रांच्या करणीने “कर्मण्ये वाधिका रस्ते” हे सुद्धा बर्याच लोकांना ठावकी झाले आहे, पण गीता पाठ करण्यापेक्षा तिच्याकडे पाठ करणेच अनेक जण पसंत करतात. तसे गीता हे नाव म्हणून भलतेच पॉप्युलर आहे पण नाव ठेउन गीतेची गोडी वाढली असा काही अनुभव नाही. अथर्वशीर्ष पाठ केल्यावर आवर्तने करून चार पैसे कनवटीला मारता येतात, त्याची फ़लश्रूती सुद्धा आहे तेव्हा साहजिकच लोकांचा ओढा तिकडेच जास्त. गीता शिकून मला काय मिळणार असा रोकडा सवाल आल्यावर गीतेचा प्रचारक निरुत्तरच होतो. तसे मध्ये छापून आले होते की गीता संपूर्ण पाठ असलेल्याचा कांची-कामेठी पीठाचे शंकराचार्य रोख पुरस्कार देउन सत्कार करतात, पण त्याची खातरजमा प्रयत्न करूनही होत नाही आहे. हल्ली माझे बाबा मात्र असे प्रश्न विचारण्याला शौचाला जाउन तुला काय मिळते ?’ असा बिनतोड उलट प्रश्न विचारतात.

गीतेचा पुस्तक रूपाने तरी प्रचार व्हावा म्हणून अनेक संस्था झटत आहेत, त्यात गीता प्रेस, गोरखपुरचे योगदान प्रचंड आहे. कल्पकतेने, अनेक प्रकारे गीतेची पुस्तके त्यांनी बाजारात आणली आहेत, जसे गीता डायरी, खिषात राहील अशी गीता, मोठ्या टायपातली गीता, सर्व भारतीय भाषांमध्ये अर्था सहीत गीता. दर्जेदार छपाई असूनही त्यांच्या किमती सुद्धा विश्वास बसणार नाही एवढ्या कमी आहेत. सर्व प्रमुख शहरात त्यांची दूकाने आहेत, पण त्यात बहुदा कोणी फ़िरकत सुद्धा नाही. हरे राम पंथीयांनी मग यातुनच बोध घेतला व गल्लोगल्ली मोटारचा वापर करून गीता व त्यावर आधारीत पुस्तके विकायला सुरवात केली. किमती माफ़क ठेउन सुद्धा लोकांनी तिकडेही पाठच फ़िरवली , तशा अगरबत्ती, जपाची माळ असे आयटम खपल्याने विकणारे खपले नाहीत एवढेच ! लोक रस्त्यावर गीता घेत नाहीत मग आपण थेट ती लोकलमध्येच जाउन का विकु नये , असे वाटून आता त्या पंथाचे तरूण प्रचारक लोकलच्या डब्या डब्यातुन गीतेची पुस्तके विकताना दिसतात. बिचारे अगदी कळवळुन गीता घ्या असे लोकांना सांगत असतात पण लोक काही वळत नाहीत. अहो विकत घेउ नका, निदान चाळून तरी बघा, निदान हातात तरी घ्या असे सांगत ते जेव्हा गीता लोकांच्या हातात ठेवतात तेव्हा लोक झुरळ झटकल्याप्रमाणे ते पुस्तक झटकून टाकतात !

हे रोज रोज बघुन माझी एक अजब घुसमट होत होती. असाच डब्यात एक प्रचारक हताश हो़उन माझ्या जवळच बसला. मी विचारले की साधारण किती पुस्तके खपतात ? त्याचे उत्तर होते, दिवसभरात फ़ारतर दोन ते चार , एखादा दिवस तर एकही प्रत विकली जात नाही ! पनवेल यायला अजून १५ तरी मिनीटे होती, डबा सुद्धा भरलेला होता. माझ्यात काय संचारले कोणास ठाउक, त्याची पुस्तकानी भरलेली झोळी मी माझ्या गळ्यात अडकवली, डब्याच्या मधोमध उभे राहुन सर्वांना खणखणीत आवाजात प्रश्न विचारले .. किती जण स्वत:ला हिंदू समजतात ? त्यांनी हात वर करा .. बहुसंख्य हात आपसूकच वर गेले. मग आपला धर्मग्रंथ कोणता ? गीता असे अनेक जण पुटपुटले ! मग मी विचारले की डब्यात कोणी ख्रिश्चन, मुस्लीम , शीख असतील तर त्यांच्या घरात बायबल, कुराण, ग्रंथसाहेबा असतील व ते त्यांनी वाचलेही असतील असे विचारायला हवे का ? सुदैवाने असे इतर धर्माचे सुद्धा कोणी ना कोणी होते व त्यांनी एकमुखाने हे आमच्या घरी आहे व ते वाचले नाही तर आम्ही आमचा धर्म सांगू कोणत्या तोंडाने, असेही सुनावले ! मग थोडा पॉज घेउन मी किती हिंदूच्या घरी निदान एक तरी गीतेची प्रत आहे ? असे विचारतात लोकल मध्ये सन्नाटा पसरला. स्वत:ला हिंदू समजता व आपल्या धर्मग्रंथाची प्रत शोभेला सुद्धा आपल्या घरात नाही असे सांगताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही असे कडाडताच डब्यात खळबळ उडाली ! अहो गीता वाचु नका निदान घरात ठेवा तरी असे शेवटी कळकळीने आवाहन करताच, मला द्या, मला द्या असा एकच गलका उडाला. २० रूपयाला एक प्रमाणे झोळीतले शेवटचे पुस्तक संपले तेव्हा गाडी पनवेल स्थानकात शिरत होती. साधारण शंभर पुस्तके हातोहात खपली होती. अनेक लोकांना पुस्तक हवे असूनही मिळाले नव्हते.

पनवेल स्थानकात एका बाकड्यावर बसून मी रिकामी झोळी व सर्व पैसे त्या प्रचारकाच्या ताब्यात दिले तेव्हा त्याची अवस्था बघण्यासारखी होती. डोळ्यातुन अश्रू घळाघळा वहात असतानात माझा हात हातात घेउन त्याने “ किशनजी की लीला अगाध है” एवढेच उदगार काढले. लोकल परत सीएसटीच्या दिशेने रवाना होण्यापुर्वीच त्याने ती पकडली व मार्गस्थ झाला. गीता प्रचाराच्या प्रवित्र कार्यात आपली सुद्धा एक मुठ पडली या विचारातच मी घर गाठले.

बाय द वे, तुमच्या घरे आहे का हो गीता ?

Tuesday, May 26, 2009

शेन वॉर्न आणि सचिन, चकमक आणि युद्ध !

सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न – क्रिकेट मधली दोन दैवते ! चालत्या बोलत्या दंतकथा ! त्यांची थोरवी आता म्या पामराने काय वर्णावी ? क्रिकेटचा ओरिजिनल डॉन या दोघांनाच आपल्या वाढदिवसाचे एक्स्लुजिव आमंत्रण देतो यातच सर्व आले ! शेन सचिनला थोडा सिनियर असावा कारण आपल्या पदार्पणापासून सचिन त्याला झोडपतच मोठा झाला आहे. आता शेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन निवृत्ति पत्करून सुद्धा बराच काळ झाला आहे व त्याचा बळींचा विक्रम सुद्धा मुरलीधरनने मोडीत काढला आहे. मुरली चेंडू फ़ेकतो व शेनची शैली अगदी क्लीन होती. जेमतेम दोन पावले तो जे चालायचा त्याला रनअप असे म्हणणे सुद्धा अतिरेक होईल. फ़लंदाजाच्या ढेंगेमागुन दांडी उडवायचे कसब फ़क्त तोच करू जाणे ! सचिन मात्र अजूनही आपल्या बॅटचे पाणी पाजतच आहे व आता सिद्ध करण्यासारखे त्याला काहीही उरले नाही. जगज्जेत्ता सिकंदर , आता जिंकायला काही उरले नाही म्हणून (म्हणे) रडला होता, सचिनने सुद्धा फ़लंदाजीत काही करायचे शिल्लक ठेवलेले नाही, तसे कसोटी त्रिशतक किंवा लारासारखे चौशतक, वनडे मध्ये द्वीशतक बाकी आहे, पण त्याने काही त्याची महानता कमी होत नाही. शेन फ़लंदाज नव्हताच, सचिनने धावांचे डोंगर रचतानाच बळींच्या खात्यात पण चांगलीच भर घातली आहे, अनेक नामचीन फ़लंदाजांची डोकी त्याच्या शिकारखान्यात पेंढा भरून ठेवलेली आहेत.

दोन बड्यांची तुलना करायची खोड तशी जुनीच आहे. त्या मुळे शेन व सचिनची तुलना होतच राहीली. खरेतर सचिन फ़लंदाज अधिक उपयुक्त गोलंदाज व शेन निखळ गोलंदाज, तुलना करणार तरी कशाची ? पण मोह आवरत नाही. नुसती तुलना करून थांबतील ते क्रिकेटवेडे कसे ? त्यातही डावे-उजवे आलेच, कोण श्रेष्ठ ? दोघेही आपापल्या क्षेत्रात दिग्गज , प्रचंड लोकप्रिय, प्रतिस्पर्ध्याला पुरते नामोहरम करणारे, संघाचे तारणहार. शेन कधी कप्तान झालाच नाही आणि सचिन आपण कधी काळी कप्तान होतो हे विसरणेच योग्य समजेल. त्यांच्यातली साम्ये इथेच संपतात. मैदानवाहेर तर त्यांच्यात कमालीचा फ़रक आहे. सचिनचे पाय कायमच जमिनीवर राहीले, शेन उतला, मातला व घसरला सुद्धा ! ऐन विश्वचषकात अंमली पदार्थ घेतल्याचे सिद्ध झाल्याने त्याची जागतिक छी-थू झाली, काही काळ खेळण्यावर सुद्धा बंदी आली. शेन त्यातुनही सही-सलामत सुटला व यशस्वी पुनरागमन करता झाला. यशाच्या सर्वौच्च शिखरावर असतानाच सन्मानाने निवृत्त झाला , पण एक खंत मनात ठेउनच, सचिन त्याच्यापेक्षा काकणभर सरसच ठरला होता ! हे दोघे जेव्हा-जेव्हा आमने-सामने आले तेव्हा-तेव्हा सचिनने शेनला आपल्या बॅटचा हिसका दाखवलाच. स्वत: शेनने पण दिलखुलास कबुली दिली की सचिन आपल्या स्वप्नात पण येतो व सरसावत षटकार खेचतो ! दोघेही एकमेकांना मानतात, खुल्या दिलाने एकमेकांची तारीफ़ करतात पण त्यांच्या चाहत्यांना हे मान्य नाही. आतापर्यंत शेनची जादू सचिनवर कधीही चालली नाही, (सचिनच काय, तसे कोणाच भारतीयावर चालली नाही) तेव्हा शेन निवृत्त झाल्यावर हिसाब चुकता होणारच नाही याची खंत शेनच्या समर्थकांना स्वस्थ बसू देत नव्हती. जणु चमत्कार झाल्याप्रमाणे आयपीएल चे ऐलान झाले त्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार म्हणून शेनने पुन्हा अवतार घेतला, समोर सचिन मुंबई इंडीयन्सचा कर्णधार या रूपात उभा होताच. पहील्या स्पर्धेत शेनने असामान्य नेतृत्व गुण दाखवत सगळ्यात दुबळ्या संघाला विजयी केले, तिकडे सचिनचा संघ, मोठे-मोठे दिग्गज असतानाही भुईसपाट झाला. सचिन-शेनची आमने-सामने गाठच पडली नाही ! शेनवरील कलंक कायमच राहीला ! दूसर्या स्पर्धेत उभय संघातला पहीला सामना पावसाने वाहुन गेला. दूसरा सामना दोन्ही संघाच्या जीवन-मरणाचा प्रश्न होता म्हणूनच त्याला वेगळे आयाम लाभले, त्यात सचिन आणि शेन अशी लढत होणार होतीच वर त्यात ते आपापल्या संघाची धुरा वाहणार होते. परत असा योग येइल अशी फ़ारशी शक्यता नाही. दोन दिग्गजांमधील ती अंतिम लढाई होती. जखमी असूनही शेन, निव्वळ सचिनशी दोन हात करायची अंतिम संधी साधायचीच, याच इराद्याने मैदानात उतरला होता. दोघांचे चाहते धडधडत्या छातीने सामना डोळ्यात साठवत होते. अंतिम युद्ध !

मी टी.व्ही. ऑन केला तेव्हा सचिनने लागोपाठ तीन चौके हाणुन संघाला परत विजयाच्या वाटेवर आणले होते. धावगती आटोक्यात होती, विकेट सुद्धा शाबुत होत्या, सचिनने फ़क्त कॅरी करायची गरज होती. शेनने आधीच्या तीन षटकात फ़क्त १२ धावा दिल्या होत्या व दोन गडी टीपले होते. सचिन समोर असतानाच त्याने स्वत:च्या हातात चेंडू घेतला तेव्हा मी हादरलोच. शेन जुगारच खेळत होता. सचिनला सुर गवसला असताना त्याने खरेतर आपले षटक राखायला हवे होते , स्वत:च्या प्रतिष्ठेपायी संघाला धोका द्यायची काही गरज होती का ? पण तसेही त्याला दूसरा पर्याय तरी कोठे होता ? समोर सचिन भरात असताना इतर कोणाच्याही हाती चेंडू देणेच जास्त धोक्याचे होते. आणि तसे त्याच्या कडे गमावण्यासारखे होतेच काय ? सचिनने त्याला आधी अनेकदा फ़ोडले होते, त्यात फ़ारतर ’अजून एकदा’ असे झाले असते. पण सचिनला जर त्याला बाद करता आले असते तर मात्र त्याची पहीली पापे पार धुतली गेली असती, शेवटच्या संधीचे सोने शेनला करायलाच हवे होते !

आता सचिनच्या बाजुने विचार करू. तो आपल्या संघाचा कर्णधार होता. विजय त्याला हवाच होता. तो मैदानावर असेपर्यंत पराभवाचा विचारच कोणाच्या डोक्यात नव्हता. शेन जुगार खेळत होता म्हणून त्याला तो खेळायलाच हवा होता, असे काहीही नव्हते. जरा आठवा, निव्वळ सचिनचा करीष्मा जाणुन, “सचिनला फ़ोडले“ या मोठेपणापेक्षा संघाचा विजय महत्वाचा मानुन लारा, इंझमाम हक सारख्या फ़लंदाजांनी सचिनचे अख्खे षटक मान खाली घालुन तटवले होते ! सचिनला पण तो पर्याय खुला होता. शेनच्या पहील्याच चेंडूवर वाईड अधिक धावुन दोन अशा तीन धावा अनायसे मिळाल्याच होत्या. दूसरा चेंडू सचिन पार चकला होता, तेव्हाही त्याला स्वत:ला आवरता आले असते, पण शेनवर कायम हावी होण्याच्या नादात त्याचे भान सूटले. पुढचा चेंडू स्वीप करायचा त्याला प्रयत्न सपशेल फ़सला, चेंडू त्याच्या पॅडवर आदळला, शेनने जोरदार अपील केले व पंचाचे बोट आकाशाच्या दिशेने गेले ! सचिनचाच नाही, मुंबई संघाचाच निक्काल लागला होता जणू ! शेनने केलेला जल्लोश बघण्यासारखाच होता ! “बचेंगे तो और बी लडेंगे” याच खुमखुमीने दुखापती विसरून तो या अंतिम युद्धात उतरला होता व शेवटी निर्विवाद विजेता ठरला होता. अर्थात सचिनचा अपमान मात्र करण्यास तो धजावला नाही, एरवी दूसर्या कोणाही ऑसीने हा मोका सोडला नसता, अश्लील हावभाव करत, तोंडाने शिव्यांची लाखोली वहात ते सचिनवर धावून गेले असतेच असते. पण का कोणास ठाउक शेन या क्षणी तरी मातला नाही. सचिनला निराशा लपवता आली नाही पण पायचीतचा निर्णय त्याने खिलाडूपणे मान्य केला व आपल्या लौकीकाला जागला. जे सचिनने कर्णधार म्हणून केले नाही, त्याचीच नक्कल मग अजिंक्य रहाणेने केली, दोन षटकार खेचल्यावर स्टंप सोडून खेळायची काहीच गरज नव्हती. तसेच भज्जीला विकेट शिल्लकच नाही अशा स्थितीत , शेवटच्या चेंडूपर्यंत वाट बघता नसती का आली ? पण अर्थात या झाल्या जर-तरच्या गोष्टी, जिथे कप्तानच वाहवत जातो तिकडे शिलेदारांकडून अपेक्षा तरी का ठेवायची ? निर्णायक क्षणी शेनला आपली कामगिरी उंचावता आली, सचिन मात्र नेहमीसारखाच या बाबतीत या वेळीही कमीच पडला ! असंख्य चकमकी हरल्यानंतर , अंतिम युद्धात मात्र शेनच जेता ठरला. शेन वॉर्नच्या जिद्दीला माझा सलाम. कोणी हरो-जिंको, क्रीकेट जिंकले, फ़ायटींग स्पिरीट जिंकले , मला एवढेच पुरे !

Monday, May 18, 2009

प्रोटोकॉल !

चेयरमनचा पीए म्हणून नियुक्ती झाल्याला काही महीनेच झाले होते. कामाची हळूहळू माहीती होत चालली होती, वावरण्यात आत्मविश्वास, आवाजात नम्रता आणि ठामपणा येउ लागला होता. डोक्यावर बर्फ़ ठेउन, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जायची मनाची तयारी होत होती. अति-महत्वाच्या व्यक्तींचे फ़ोन कसे घ्यायचे , त्यांचे प्रोटोकॉल काय असतात, याच्या बर्याच टीप्स आधीपासूनच तिथे असलेल्या सहाकार्यांनी दिल्या होत्या त्याचा तर खूपच उपयोग होत होता. असाच एका माजी खूप बड्या अधिकार्याने फ़ोन केला. अत्यंत उर्मटपणे माझ्या गोदी व रोड पासचे काय झाले अशी विचारणा केली. मी त्यांचे नाव अदबीने विचारून घेतले व चौकशी करून, स्वत: फ़ोन करून कळवतो म्हणून सांगितले. लगोलाग फ़ोना-फ़ोनी करून सर्व माहीती काढली तेव्हा कळले की त्यांचे जुने पास संपून काही दिवसच झाले होते पण त्यांना त्याच्या नूतनीकरणासाठी अर्ज केलाच नव्हता. मी त्यांना फ़ोन करून हे सांगितले व एक अर्ज द्या , सोबत आपले जुने पास पण पाठवुन द्या म्हणून सांगितले. आता त्यांनी माझे नाव विचारले व मराठे, म्हणजे मराठी माणूस, असे म्हणत एवढा वेळ फ़र्ड्या इंग्रजीत बोलणारे ते मराठीत बोलु लागले. पण टोन तोच ! “अहो, तुम्हाला कळते आहे माझा पास संपला आहे, तर तुम्ही तो स्वत:हुन नूतनीकरण करून मला का नाही पाठवला, का पेन्शनर देतो तसे हयात प्रमाणपत्र द्यायचे होते मी ? बरे, मी अर्ज करतो पण उद्याच मला पुण्याला जायचे आहे तेव्हा माझ्यासाठी वनडे पास बनवा. “ त्यांचा मुद्दा अजबच होता, पण करतो काय, माजी बडे अधिकारी पडले ते ! मी त्यांना समजावले की एका दिवसात पास देणे अशक्य आहे, तरीही मी सर्व गेटला , तसेच टोल नाक्याच्या दोन्ही टोकांना फ़ोन करून सूचना देउन ठेवतो, मला तुमचा गाडी नंबर द्या, आणि साधारण वेळ कळवा. या वर ते एकदम खुष झाले व व्हेरी गुड असे म्हणाले. जरा वेळाने त्यांनी परत फ़ोन करून माझा मोबाईल नंबर घेतला का तर वाटेत कोठे अडचण आली तर ? मी सर्व गेटना फ़ोन करून त्यांचा गाडी नंबर दिला, साधारण वेळ दिली, त्यांच्याकडे कोणताही पास नाही पण ते माजी बडे अधिकारी असल्याने त्यांना आडकाठी करू नका असे सांगितले. दूसर्या दिवशी रविवार होता तरी घरून फ़ोन करून ते व्यवस्थित मार्गस्थ झाल्याची खात्री करून घेतली. चार दिवसानी परत त्यांनी अगदी पहाटे फ़ोन केला व मी आता पुण्याहुन परत निघालो आहे, तेव्हा जाताना केलीत तशीच व्यवस्था करायला सांगितले, ते पण काम केले तेव्हा साहेव एकदम खुष झाला ! दोन दिवसानी त्यांनी रितसर अर्ज केला, मी तो माझ्या साहेबांची सही घेउन संबंधित दोन विभागांकडे पाठवुन सुद्धा दिला.

असाच एकदा मला त्यांनी रजेच्या दिवशी, अवेळी फ़ोन केला. तुमचा गेटचा स्टाफ़ ओळख दाखवुनही मला आत सोडत नाही अशी तक्रार केली. मी चौकशी केल्यावर कळले की पास त्यांचा एकट्याचाच आहे, सोबत चालक आहे, बायको आहे एकवेळ त्यांनाही सोडू पण अजून एक आहे त्याला कसे सोडू ? तेव्हा मी बड्या साहेबांना समजावले की सुरक्षा सध्या थोडी कडक आहे, कृपया सहकार्य करा, तुम्ही बाहेरच्या रस्त्याने आमचा टोल नाका गाठा. थोड्या वेळाने परत फ़ोन, “तुम्ही काय माझा सतत पाण़उतारा करायचे ठरवले आहे काय ? मी कोण आहे माहीत आहे ना ? तुमचा हा फ़डतूस क्लार्क म्हणतो माझ्याकडचा पास इकडे चालणार नाही म्हणून, काय चाललाय काय ? चौकशी केल्यावर कळले की त्यांना अजून रोड पास दिलाच गेला नाही आहे. अर्थात ही चूक आमचीच असल्याने मी परत फ़ोनवरच सूचना देउन त्यांचा मार्ग मोकळा केला, जायचा व यायचा सुद्धा ! मग कामावर पोचल्यावर त्यांच्या रोड पासचे लाल फ़ितीत अडकलेले काम सुद्धा मार्गी लावले.

त्या नंतर २६/११ घडले, सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी फ़क्त एकच गेट उघडे ठेवले गेले, त्याचा एक अनपेक्षित फ़ायदा झाला ! फ़ोर्ट मधुन कल्याण, पुणे दिशेला जायचे असेल तर पी.डीमेली रोड, वाडीबंदर येथे प्रचंड वाहतुक कोंडीचा सामना करायला लागतो. बडे अधिकारी आमचा गोदी पास फ़्री घेउन फ़ोर्टे च्या ग्रे-गेट मधुन आत प्रवेश करून थेट माझगावला बाहेर पडत, पुढे लगेच आमचा रस्ता आहे तो थेट माहुलला जातो ! गोदीतल्या कंटेनर वाहतुक जलद व्हावी म्हणून तो बांधला गेला, आधी तो पुर्ण त्याच कामासाठी होता. पुढे गोदीतली कंटेनर वाहतुक जवळ जवळ बंदच पडल्याने, त्याची देखभाल परवडावी म्हणून तो टोल घेउन सर्वाना मोकळा केला गेला. अर्थात बड्यांना त्याचाही फ़्री पास द्यायला लागतो. आता कर्नाक बंदरचे एकच गेट उघडे असल्याने गोदी पास निरर्थकच ठरला होता. हे झाल्यावर गोदीत एक कार्येक्रम होता, त्याचे ठीकाण ग्रे-गेट कडून अगदी जवळ होते, साहेबाना तिकडे जायचे होते. वळसा वाचावा म्हणून ग्रे-गेट समोर गाडी उभी करून ते उघडायची तयारी चालु झाली. तेव्हा साहेब गाडीतुन खाली उतरले. माझ्यासाठी सुद्धा कोणताही नियम मोडायची गरज नाही. गाडी बाहेरच राहू दे, मी चक्रीने आत जातो ! योग्य तो सिग्नल गोदीला मिळाला ! नियम म्हणजे नियम ! काही दिवसानी कस्टम्सच्या एका पायलट बोटीचे अनावरण करायचे होते. त्यांनी विशेष बाब म्हणून ग्रे-गेट उघडायची विनंती(?) केली. साहेवांनी ती नम्र पणे फ़ेटाळली. मग सुरू झाले दबावाचे राजकारण, साहेबानी त्यालाही भीक घातली नाही. तेव्हा गेटच्या बाहेर एक ,व आत एक गाडी उभी करून तो पेच सोडवला गेला.

काही दिवसांनी परत ’त्यांचा’ फ़ोन आला. तुमचा स्टाफ़ मला आत घेत नाही. हा काय प्रकार आहे ? मी त्यांना समजावुन सांगितले की आत जाउन तुमचा काहीही फ़ायदा नाही, कारण त्याच गेटने तुम्हाला बाहेर पडावे लागेल, हकनाक वळसा पडेल. मग हा पास फ़ूकटच आहे म्हणजे ! असा खवचट शेरा ऐकावा लागला .( हे दूसर्या अर्थाने सुद्धा खरेच होते !) मग बर्याच महीन्यानी त्यांचा परत फ़ोन आला, तुमचा स्टाफ़ मला बाहेर सोडत नाही म्हणून. वर तुमचे नाव सांगितल्यावर ओळखत नाही असे गुर्मीत म्हणतो ! तुम्ही एवढे चेयरमनचे सचिव आणि तुम्हाला ओळखत नाही म्हणजे काय ? मी चकीत झालो, बाहेर पडायला हे मूळात आत शिरले तरी कसे ? नवी व्यवस्था त्यांना माहीत होती. त्यांना मी याची नम्रपणे जाणीव करून दिली तेव्हा ते चुकून आलो, आता एवढा आलोच आहे, तर एकवेळ सोडा ! मला खूप घाई आहे. आणि माझे जाउ दे हो, तुम्हाला पण तो किंमत देत नाही म्हणजे काय ? त्याचा रीपोर्टच करा ! बोलण्याच्या ओघात ते असेही बोलून बसले की या आधी तुमचे नाव सांगितल्यावर दोनदा मला सोडले गेले आहे ! मला क्षणात सर्व परीस्थीतेचे आकलन झाले. त्यांचा चूकलो, हा सरळ सरळ कांगावा होता, उलट माझे नाव सांगून तो दोनदा असे गेला होता, सोकावला होता ! मला आता हरभर्याच्या झाडावर चढवुन आपले काम होईल असे त्याला वाटले असावे. मी त्यांना सांगितले की आपण स्वत: जबाबदार माजी अधिकारी आहात, नियम तुम्हीच तोडणार असाल तर त्याला अर्थ काय ? आमचे साहेब स्वत: या बाबतीत आदर्श घालुन देत असताना आम्ही तुमचा तरी अपवाद का करायचा ? तुम्ही कृपया गाडी परत फ़ीरवा व आलात तसेच बाहेर जा. लगेच मी इंटरकॉम वरून फ़ोन करून गेट-कीपरला सक्त ताकीद दिली कि कोणत्याही स्थितीत गेट उघडायचे नाही ! पाच मिनीटाने त्या गेट कीपरने फ़ोन केला व साहेब तो जामच तमाशा करतोय, थयथयाट चालला आहे नुसता, मोठी मोठी नावे घेत आहे, सोडू का एक वेळ ? मधल्या मध्ये आमच्यावर संक्रात ओढवायची, तुम्ही नामा-निराळे व्हाल. मी म्हटले अजिबात नाही. मी तुमच्या पाठीशी आहे, निर्धास्त रहा ! ते गेट तोडू तर नक्कीच शकणार नाहीत. तुम्ही त्यांना कोणतेही उत्तर देउ नका, अगदीच वेळ आली तर मला फ़ोन करा. पुढची सलग दहा मिनीटे तो बडा माझा मोबाईल ट्राय करत होता, मी तो घेतला पण नाही. मग त्यांचा संयम संपला व त्यांनी चक्क एसेमेस केला “you bloody fool, I will teach you a lesson”. मग मात्र मी त्यांना उलट फ़ोन करून ठामपणे सांगितले “इनफ़ इज इनफ़ ! एसेमेस करून तुम्ही मला भक्कम पुरावा दिलात त्याबद्दल धन्यवाद ! तमाशा बंद करा, गुमान गाडी परत फ़िरवा, दहाव्या मिनीटाला तुम्ही बाहेर नाही पडलात, तर मी हा सर्व प्रकार चेयरमन साहेबांना कळवीन. तुमचा रोडचा पास मग रद्द सुद्धा होईल, mind this well ! मग मात्र तो जमिनीवर आला, ते गेट बाहेर गेल्याचा मेसेज दूसर्याच मिनीटाला मिळाला. काही वेळाने फ़ोन करून त्यांनी चक्क माफ़ी मागितली, झाले गेले विसरून जा, प्रकरण वाढवू नका अशी गळ घातली.

या एकाच प्रसंगातुन बरेच शिकता आले. हे शक्य झाले अर्थात साहेबांनी स्वत:च्या आचरणातुन एक आदर्श घालुन दिला होता म्हणूनच !

ओझे !

जन्माला येताना काही पौंडाचा का असेना, बोज बनून आलेलेच असतो आपण सर्व, पुढे खायला काळ आणि भुईला भार होतो ते अगदी खरा काळ येईपर्यंत. त्यातही हिंदू असाल तर तुमच्या नश्वर देहाची राख तरी होते, एरवी तो ही थडग्याचे अधिकचे ओझे अंगावर घेउन कयामतच्या दिनाची वाट पहात राहतो ! हे अजडाचे ओझे मग पेलतो आधी जडाकडे वळतो.

मल स्वत:ला कोठेही सडाफ़टींग जायला आवडते, अगदीच नाइलाज असेल तर किमान ओझेच मी नेतो. कोठे जाण्यासाठी आम्ही मित्र स्टेशनला जमलो की मित्रांना मी काहीच कसे घेतले नाही याचा धक्का बसतो, मला त्यांचे सामान बघून नक्की किती दिवस जायचे आहे असा प्रश्न पडतो ! आजपर्यंत मला कधीही कुली करावा लागला नाही. नाही, पैसे तर वाचतातच पण आपले ओझे दूसर्याच्या मानेवर द्यायला नाही आवडत, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे ! तसे जाताना माझे ओझे असते त्यापेक्षा कमीच होते कारण मी बाहेर शॉपिंग कधीही करत नाहीच शिवाय माझ्या काही वस्तु तिकडेच सोडून सुद्धा यतो, अर्थात विसरून !
ओझी सुसह्य व्हावी म्हणून बाजारात विविध प्रकार आहेत, वळकट्या , ट्रंका, पेटारे, एयर बॅग्स, सॅक, सूटकेसेस, त्यात परत त्यांना चाके लावायची सोय सुद्धा असते ! पण त्यांचेही स्वत:चे काही वजन असतेच ना ? अजून हास्यास्पद म्हणजे त्यांना कुलपे सुद्धा असतात ! अरे जर आत सोने असेल आणि कुलुप उघडत नसेल तर चोर काय बॅग कापून किती नुकसान होईल याचा विचार करत बसणार का ? बरे अगदी ऐन वक्ताला त्या धोका देतातच. कधी त्यांचे बंद तूटतात, चेन फ़सते, किल्ल्या हरवतात, मुठ हातामध्ये येते व मग जी त्रेधा उडते ती बघण्यासारखीच असते ! त्यांचे आकार सुद्धा रेल्वेचा किंवा बसचा रॅक, मोटारची डीकी यात नीट बसावे असे प्रमाणित नसतात आंइ मग पायाला साखळी बांधल्या सारखे ते घेउन बसावे लागते.

औरंगाबादला माझे लग्न झाले, आता संसाराचे ओझे पेलावे लागणारच होते पण “ही” सोबत जी आली ती चार सूटकेस घेउन ! बाबांनी माझ्याकडे पाहीले व माझा क्रोधाग्नी भडकायच्या आत त्यांनी मला नजरेने दामटले, मी गप्प बसलो. लग्न झाल्यावर डबा नियमित मिळू लागला. तो न्यायला आधी पाउच होता, पण तो विसरायची भीती होती म्हणुन हीने मला एक एयर बॅग घ्यायला लावली. मग आता जागा आहेच तर एक लहान पाण्याची बाटली, एक फ़ळ, नॅपकीन, बिस्कीटचा पुडा, काही सामान येताना आणायला सांगितले तर एक नायलॉनची पिशवी ! ही सगळी भर तिने घातल्यावर मी तरी का मागे राहु ? मी सुद्धा लोकलमध्ये वाचण्यासाठी गीतेचे पुस्तक, चष्मा – जो मी कधीही लावला नाही, अधिकची पेने, मोबाईल चार्जर, त्याचा इयरफ़ोन, कोरे कागद , चेक बुक , डायरी अशी भर घातली. आता त्या एयर बॅगचेच ओझे एवढे झाले आहे की डबा नसेल तेव्हा ही मी ती घेउन जातो, कारण अगदी हलके वाटून करमत नाही म्हणून ! मुलांना ती अलीबाबाची गुहाच वाटते !

अनेक बाबतीत आमची टोकाची मते आहेत, त्यात कोठे जाताना लगेज किती न्यायचे यावर प्रचंडच मतभेद आहेत. हीच्या मते जेवढे दिवस मुक्काम तेवढे कपड्याचे जोड हवेत, माझ्या मते एक दांडीला व एक … ! तेच कपडे पुन्हा घातले तर आपल्याला कोण ओळखतो आहे बाहेर गावी ? पण हल्ली वाद नको म्हणून मी कोठे मुक्कामाला जायचे असले की तिलाच सामान भरायला सांगतो. रात्री सगळ्या तयारीचा आढावा घेताना लगेजची तपासणी होते. कपड्यांच्या दोन मोठ्या सूटकेस, खाण्याची एक पिशवी, पिण्याच्या पाण्याची एक पिशवी, भेट-वस्तुंची एक पिशवी, एक अधिकची बॅग , येताना काही आणण्यासाठी, एक स्लीपरची पिशवी , आणि हे काय, पारलेची बिस्कीटे २ किलो ? ती नाही का तिकडे मिळत ? आणि एवढ्या प्रवासात त्यांचा चुरा नाही का होणार ? यावर तिचे उत्तर, अरे, पार्ले बिस्किटच्या फ़ॅक्टरीत गेले होते ना, तिकडे घेतली, स्वस्त मिळतात ! त्यातलीच थोडी(?) आईला घेउन चालली आहे ! मी कपाळावर हातच मारला. आता मी निक्षून सांगतो, हे जरा जास्तच होते आहे, थोडे कमी कर. ही तितक्याच ठामपणे सांगते, उलट हे कमीच आहे, लोकं जातात तेव्हा बघा जरा ! तुला ना कसली हौसच नाही ! मग माझी प्रश्नांची फ़ैर … हमाली करायची कसली आली हौस ग ! एवढे खाणे कशाला, दुष्काळी भागात चाललो आहोत का ? प्रवासात बिसलेरी घेता येत नाही का ? भेटींची ओझी इकडून नेण्यापेक्षा तिकडेच काही घेउन द्यावे नाहीतर सरळ रोख पैसे का देत नाहीस ? लोकांना मुंबईवरून काही आणले याचे कौतुक असते कळले का, असे एकाच प्रश्नाचे उत्तर देउन बाकी प्रश्नावर ती अर्थात मौन पाळते.
माझे किती कपडे घेतले आहेस ? माझा पुढचा प्रश्न,
चार जोड आहेत.
मग त्यातले दोन कमी कर, माझा फ़ायनल आदेश.
ही तणतणत माझे कपडे परत कपाटात ठेवते पण येताना त्या बदल्यात आपले दोन व लेकीचे दोन जोड घेउन येते !

तु नाही तर आम्ही तरी घेतो मिरवुन लग्नात !

शेवटी सगळे सामान बॅगात कोंबताना नाकी ऩउ येतात. प्रसाद-प्रियांका सूटकेस वर उभे राहतात तेव्हाच त्या बंद करता येतात. मग बाहेर पडताना ही हातात फ़क्त पर्स घेउन लेकी सोबत पुढे जाते. मी दोन हातात दोन सूटकेस, दोन्ही खांद्यावर एयर बॅगा घेतल्यावर प्रसाद बाकीचे उचलतो ! हमाल न करणे हे तुझे तत्व आहे ना मग कर हमाली !

ता.क. :- आत्ताच ही माहेरून आली. सोबत प्रचंड ओझे, कल्याणला उतरून पनवेलसाठीच्या बसमध्ये सामानासह चढणेच अशक्य झाले ! एक तास हेच चालले होते. गर्दी वाढतच चालली होती. शेवटी स्पेशल रीक्षा करून, ३०० रूपये मोजून बाईसाहेब आल्या ! ( औरंगाबाद ते कल्याण – एक्सप्रेसचे तिघांचे भाडे होते २८० रूपये ! ) काय ग ? एवढे ओझे ? आईकडून सगळे मसाले करून आणले आहेत, पापड , चिकवड्या , शेवया सुद्धा आहेत !