रविवार, ९ सप्टेंबर, २०१२

ना”पास” !

माझ्या विसरभोळेपणाबद्द्ल आधीच बरेच लिहून झाले आहे. आधुनिक तंत्र वापरून, जसे मोबाइल मध्ये रिमाइंडर लावून बायकोचा व तिच्या नातलगांचा वाढदिवस लक्षात ठेवणे, सर्व बिलांच्या बाबतीत “ऑटो पेमेंटचा” पर्याय सक्रीय करणे असे उपाय करून मी माझे जगणे बरेच सुसह्य केले आहे. रेल्वेचा पासाचे नूतनीकरण करणे मात्र रिमाइंडर लावूनही जमत नव्हते. कारण रिमाइंडर जरी वाजले तरी मी नेमका तेव्हाच रेल्वे स्टेशनच्या आसपास हवा ना ? असलो तर पासाच्या खिडकीवर गर्दी कमी असावी, असल्यास तेवढे पैसे माझ्या खिषात असायला हवेत, त्यातही 711 रूपयामधला रूपया तरी सुटा हवाच , नाहीतर खिडकीवरचा क्लार्क सुट्यासाठी तंगविणार ! शेवटी व्हायचे काय की पास संपलेला आहे हे तिकिट तपासनीस अडवायचा तेव्हाच लक्षात यायचे. रेल्वेच बहुदा माझ्याकडून दंड वसूल करून कंटाळली व ऑनलाइन पास काढायची सोय काही वर्षापुर्वी उपलब्ध करून दिली गेली. यात 10 दिवस आधी पास काढता येतो व पास अगदी घरपोच मिळतो. एकदा आपण असा ऑनलाइन पास काढला की रेल्वे तो संपायच्या आधी नूतनीकरणासाठी 10 दिवस आधी इमेल पाठवून आठवण सुद्धा करते ! या सोयीमुळे मधली काही वर्षे तरी पासाचा घोळ झाला नाही. अचानक रेल्वे प्रशासनाचे काय डोके फिरले कोणास ठावूक, पास घरपोच करण्याच्या भागातुन आमचा पनवेल/नवीन पनवेल विभागच काढून टाकण्यात आला. काही काळ मी कार्यालयीन पत्त्यावर पास मागवू लागलो पण व्हायचे असे की मी जागेवर नसतानाच तो कुरीयरवाला पास आणायचा किंवा कधी सलग सुट्ट्या आल्याने माझे कार्यालय नेमके पास नूतनीकरण करायच्या दिवसातच बंद असायचे. यावर मी तोडगा काढला तो म्हणजे रेल्वेचे स्मार्ट कार्ड वापरून पासाचे नूतनीकरण करण्याचा. हा सुद्धा तोडगा तकलादू ठरला कारण हव्या त्या वेळी स्मार्ट कार्ड मध्ये रकमेचा आधी भरणा करणे, तो झाला तर चालू स्थितीतील मशीन मिळणे व तसे मिळालेच तर नूतनीकरणासाठी आपण टाकलेला पहिल्या पासाचा नंबर मशीनने स्वीकारणे या सगळ्या गोष्टींचा मेळ जुळेना. पासाच्या बाबतीत सगळे मुसळ केरात जावून ये रे माझ्या मागल्या असेच चालू झाले.

विसरभोळेपणासोबतच मला अजून एक उपशाप मिळालेला आहे तो म्हणजे नको त्या वेळी नको ती गोष्ट आठवणे ! दोन आठवड्यापुर्वी कामावरून घरी परतत होतो. वाशीच्या खाडीवर लोकल असतानाच आपला पास केव्हा संपतो आहे ते बघायची मला अवदसा आठवली. पासावर तारीख होती 15/8/2012, म्हणजे मी दोन आठवड्यापुर्वीच पास काढला आहे ! नो वरी ! पण मग आठवले की आपण दोन आठवड्यापुर्वी पास नक्कीच काढलेला नाही. ती तारीख परत परत बघितल्यावर लक्षात आले की खरे तर आपला पास दोन आठवड्यापुर्वीच संपलेला आहे ! आधी हे झालेच कसे ? म्हणजे रेल्वेसुद्धा स्मरण-मेल पाठवायला विसरली की काय ? मग आठवले की संपलेला पास आपण काउंटरवरून काढलेला आहे, रेल्वे कशाला स्मरण करेल ? म्हणजे आता डब्यात टी.सी आला तर आपली काही खैर नाही. आला तर आला, फाडू गुमान दंडाची पावती असा विचार आला आणि खिसे चाचपडले तर काय, माझ्याजवळ पुरते 100 रूपये सुद्धा नव्हते. चार बँकाची एटीएम होती पण या प्रसंगात त्यांचा उपयोग शून्य होता. आता मात्र गंभीर स्थिती ओढवली होती. सोबत कोणी मित्र सुद्धा नव्हता. आणि याच संपलेल्या पासावर मी दोनदा यात्रा-विस्तार तिकिट काढले होते, सीएसटीला उभ्या असलेल्या टीसींच्या पथकाच्या डोळ्याला डोळा भिडविला होता, गाडीत येवून “तिकिट प्लिज” असे विचारणार्या टीसीला रूबाबात खिषाला हात लावून “पास आहे” असे उत्तर दिले होते व तो “इटस्‌ ओके” म्हणून गुमान चालू पडला होता. पण हे सगळे केव्हा, तर मला माझा पास संपला आहे याची जाणीवच नव्हती तेव्हा ! आता मात्र माझा चेहरा पार दीनवाणा , बापुडवाणा झाला होता. टीसीला माझ्याकडे नुसते बघितले तरी हा विदाउट तिकिट असल्याची खात्रीच पटणार होती. एव्हाना पास बघताना माझा चेहरा बघून तो संपलेला आहे याची खात्री आजूबाजूच्या सगळ्यांना झालेली होतीच. नेत्रपल्लवीने सगळ्या डब्यात हा मेसेज गेला. मला घाबरवायला मग टीसी आला अशा पुड्या सुटू लागल्या. कोणी आज स्पेशल धाड आहे व जे सापडतील त्यांना अडाणी कोर्टातच उभे करणार असल्याचे सांगू लागला. कोणी “दंड पाचशे रूपये वर 3 महिने तुरूंगवास सुद्धा “ असा कडक नियम झाला आहे म्हणून सांगू लागला. कोण दंड वाढल्यापासून टीसींचा कोटा भरत नाही म्हणून ते तोड-पाणी करीत नाहीत व दंडाचे पैसे नसतील तर सरळ रेल्वे पोलिसांच्या हवाली करतात, अडाणी कोर्ट सकाळी अकरा वाजता उघडते व तोपर्यंत लॉक-अप मध्ये कसे सडावे लागते याचे भयंकर वर्णन करीत होता. एकजण तर हे जंटलमन सारखे दिसणारे लोक केव्हाच तिकिट काढीत नाहीत व टीसी त्यांचे कपडे बघून कधी तिकिटच विचारत नाहीत अशीही खंत व्यक्त करीत होता.

ही सर्व चर्चा ऐकून मी चांगलाच हादरलो. सिग्नलला गाडी कोठे थांबली तर खाली उतरून पळ काढायचा असाही एक विचार केला पण गाडी आज अगदीच सुसाट होती. मानसरोवर तसे नवे स्थानक आहे तिकडे कदाचित टीसी नसतील , तिकडे उतरूया असा एक विचार मनात आला पण मध्ये कोठे खाली उतरायची रिस्क घेण्यापेक्षा पनवेललाच काय होईल ते होवू दे असा पक्का विचार केला. पनवेलला मागे उतरलो तर टीसी असायची शक्यता कमी होती पण मग तिकडे काळोख असतो व अलिकडे प्रवाशांना लूटायच्या घटना घडल्याचे वाचलेले आठवले. चेन-बिन वा रोकड काही नसली तरी माझ्याकडे महागडा मोबाइल होताच की ! त्यातुन वाचलो तर रेल्वे लाइन ओलांडली म्हणून रेल्वे-पोलिसांकडून धरपकड होत असतेच. “इकडे आड तिकडे विहीर” नाहीतर “आगीतुन फोफाट्यात ! “ . “दगडापेक्षा वीट बरी” या न्यायाने चोर व रेल्वे पोलिस यापेक्षा टी.सी. परवडला. टीसीने अडविले तर बिनधास्त पास आहे म्हणून सांगायचे व अगदीच पास दाखवा म्हणाला तर पास त्याच्या पुढे धरायचा. त्याला जर कळले की तो संपला आहे तर साळसूदपणाचा आव आणून “अरे खरेच की ! माझ्या लक्षातच नाही आले” असे म्हणायचे. नाहीतर सरळ सांगायचे की मी रेल्वेतले वरिष्ठ अधिकारी राजीव गुप्तांचा पीए आहे म्हणून, त्याला नाही पटले तर मोबाइलमधला त्यांचा नंबर त्याला दाखवायचा !

या व अशा अनेक उलट-सूलट विचारांच्या कल्लोळात असतानाच गाडी पनवेल स्थानकात लागली. पनवेलला उतरणारी माणसे कमीच होती व बाहेरगावची गाडी सुद्धा आलेली नसल्याने एवढे भव्य स्थानक अगदीत सुने वाटत होते. थोडा वेळ कानोसा घेतला व खात्री पटली की टीसीचे अगदी नामोनिषाण सुद्धा नाही. तरीही धाकधुक कमी होत नव्हती. हळूच मी तिकिट खिडकी गाठली ! हुश्श ! आता मात्र मी अगदी सेफ झालो होतो. चला आधी पास काढायला हवा ! मी जवळच असलेल्या एटीएम मधून पैसे काढले व तिकिट खिडकीवर गेलो. गर्दी फारशी नव्हतीच. माझा नंबर लगेचच आला. आजचा दिवस तर पार पडलेला होताच तेव्हा उद्यापासूनचा पनवेल ते सीएसटी तिमाही पास दे असे मी काउंटरवरच्या क्लार्कला सांगितले. यावर त्याने पहिला पास मागितला. मी पहिला पास कशाला हवा, 10 दिवस आधी पास काढता येतो असे त्याला सांगितले. तो पण खमक्या होता. 10 दिवस आधी पासाचे नूतनीकरण करता येते, नवीन काढता येत नाही असा नेमका नियम त्याने मला सांगितला. मला माझीच मग लाज वाटली, आधीच मी दोन आठवडे विदाउट तिकिट फिरत होतो व आता एका दिवसासाठी रडत होतो ! त्याने मला आजचीच तारीख टाकून पास दिला व संगणकावर पास देताना आजचीच तारीख येते, नूतनीकरण करत असाल तर आपोआपच पास संपल्यापासूनची पुढ्ची तारीख पडते असे सुद्धा समजावून सांगितले. मी गुमान तो पास घेवून स्टेशनच्या आतल्या जिन्याने वर जायला निघालो. आता मला कोणतेच टेंशन नव्हते !

पुलावर येताच साध्या वेशातील टीसीने मला हटकले. त्याला पास बघायचाच होता ! मी दाखविताच त्याने तारीख अगदी नीट तपासली व आजच काढलेला दिसतो असेही बोलून दाखविले. मी सूटलो असे मनातल्या मनात म्हणत व त्या क्लार्कचे आभार मानत पुल उतरायला लागलो ! पण नक्की नियम काय आहे ? फक्त नूतनीकरणच दहा दिवस आधी करता येते की नवीन पास सुद्धा तसा काढता येतो ? घरी गेल्यावर रेल्वेची वेबसाइट उघडली व पासा संबंधी नियम तपासले. त्यात स्पष्टपणे renewal असाच शब्दप्रयोग आहे. रेल्वेचे सगळेच नियम जाचक नसतात तर !

शनिवार, ८ सप्टेंबर, २०१२

स्वामीत्व हक्कासंबंधी !


सोशल नेटवर्किंग साइटसवर अनेक प्रकारची माहिती कॉपी पेस्ट करून शेयर केली जाते. या वरून अनेकदा वादंग निर्माण होतात. मी मला आलेले इमेल जसेच्या तसे  फॉरवर्ड केले असे सांगून जबाबदारी झटकून मोकळे होण्याचा प्रयत्न केला जातो. पण अप्रत्यक्षपणे का होइना आपण चोरीला प्रोत्साहनच देत असतो. चोरी करणारा जसा दोषी असतो तसा मदत करणारा सुद्धा असतोच असतो.

कायद्याच्या बडग्यापेक्षा मला नैतिकता जास्त महत्वाची वाटते. "उचलली जीभ लावली टाळ्याला" या धर्तीवर आलेले इमेल कोणतीही शहानिशा न करता मित्रांना फॉरवर्ड केले जाते. अनेकदा लेखकाचे नाव सोडून बाकी सगळी पोस्ट कॉपी पेस्ट केली जाते. नकळत का होइना असे केल्याने संभ्रम निर्माण होतोच. अशा प्रसंगी, तळ टीप म्हणून "इदं न मम ( हे मी लिहिलेले नाही )" असे लिहिणे अधिक नैतिक आहे. (टीप - असे लिहायची  कल्पना माझी नाही !)

KCBC Cafe Reunion -  या फेसबुकच्या फोरमवर स्वामीत्व हक्कासंबंधी चर्चा चालू असतानाच माझे मित्र व नेहरू तारांगणचे संचालक श्री. अरविंद परांजपे यांनी एक वेगळाच विचार मांडला. त्यांनी त्यांचे सगळे लेखन स्वामीत्व हक्क मुक्त ठेवले आहे. कोणीही ते कॉपी-पेस्ट करावे, त्यांच्या नावाचा उल्लेख केला तर आनंदच आहे, आग्रह वा सक्ती नाही !मला स्वत:ला हा विचार खूपच भावला. लेखन हे काही माझ्या पोटा-पाण्याचे साधन नाही. स्वान्त-सुखाय मी लिहित असतो, एखाद्याला ते आवडले व आपल्या नावावर खपवावे असे वाटले तर काय हरकत आहे ! माझा विचार अनेकांपर्यंत पोहचत तर आहे ? विचारांचा प्रसार होणे जास्त महत्वाचे आहे. सुर्य कोणाच्याही आरवण्याने का होइना उगवला हे जास्त महत्वाचे !

या क्षणापासून मी माझे ( तसे माझे म्हणून तरी काय आहे ? हे सर्व तुमचेच आधी केव्हातरी घेतलेले आहे ते या माध्यमातुन तुम्हाला परत करतो आहे ! ) म्हणून या ब्लॉगवर टाकलेले सर्व लेखन स्वामीत्व हक्काच्या बेडीतुन मुक्त करीत आहे. ज्या कोणाला हे आवडेल त्याने त्याला जसे वाटेल तसे ते शेयर करावे, त्याला कोणतीही आडकाठी नाही. 

धन्यवाद !

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१२

गावस्करच्या “त्या” 36 धावा !

सुनील गावस्कर हे क्रिकेटमधील एक बडे नाव ! सलामीचा तंत्रशुद्ध फलंदाज ज्याने त्याच्या काळातील जगातील सर्वात भेदक, सर्वात वेगवान गोलंदाजांचा बेडरपणे सामना केला व तो सुद्धा शिरस्त्राण न घालता ! सुनील भारताचा एक यशस्वी कर्णधार सुद्धा होता , ज्याने आपल्या नेतृत्वगुणाने ऑस्ट्रेलियातला मिनी वर्डकपवर भारताचे नाव कोरले होते. हा विजय आपल्या आधीच्या व हल्ली जिंकलेल्या स्पर्धा विजेतापदांपेक्षा सरस होता. या स्पर्धेत भारत एकही सामना हरला नव्हता. भारताचे सर्व खेळाडू एकदाही बाद झाले नव्हते व आपण प्रतिपक्षाला कामय गुंडाळले होते. याच स्पर्धेत आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला आपण दोनदा शब्दश: लोळविले होते. एकदा साखळीत व एकदा अंतिम फेरीत ! कसोटीतले यच्चयावत विक्रम त्याच्या नावावर जमा होते. सचिनने त्याचे बहुतेक विक्रम मोडले असले तरी सामन्याच्या दोन्ही डावात सुनीलने तब्बल तीनदा शतक (त्यात एकदा तर शतक व द्विशतक !) झळकावले आहे तर सचिनला तसे एकदाही करता आलेले नाही. आज सचिन जेवढा लोकप्रिय आहे (की होता ?) तेवढाच सुनीलही होता व अजूनही आहे. आपले क्रिकेटमधले यश त्याने चांगले एनकॅश करून घेतले व मोप पैका सुद्धा कमावला. जाहिराती, स्तंभलेखन, कार्यक्रमात सहभाग, सिनेमात काम, गायन या सर्वच क्षेत्रात त्याने मिरवून घेतले. क्रिकेटमधून पैसा कसा कमवायचा याचा वस्तूपाठच त्याने सगळ्या खेळाडूंना घालून दिला. 

 सुनीलला सुद्धा बोचरी टीका झेलावी लागली पण टीकाकारांना त्याने नुसत्या बॅटनेच नाही तर लेखणीने व जीभेने सुद्धा थोबाडफोड उत्तर दिले ! सर्वाधिक शतके, सर्वाधिक धावा त्याच्या नावावर झाल्या. यशाच्या शिखरावर असताना अंतिम कसोटीत दूसर्या डावात चिवट खेळून त्याने 96 धावा केल्या पण दुर्दैवाने पाकिस्तानविरूद्ध संघाला विजय मिळवून देवू शकला नाही. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना त्याने क्रिकेटमधून निवृत्ति जाहीर केली. इथे त्याचा पहिला डाव संपला, समालोचक म्हणून त्याने दूसरी इनिंग चालू केली व इथेही तो अल्पावधीत यशाच्या शिखरावर पोहचला आहे. आता क्रिकेटचे समालोचन करताना एखाद्या खेळाडूच्या तंत्राची, पक्क्या व कच्च्या दुव्याची चर्चा ओघाने आलीच. गावस्करसारख्या अनुभवी खेळाडूने आपले कान उपटले तर त्या खेळाडूने स्वत:ला भाग्यवान समजायला हवे, पण होते उलटेच. अर्ध्या हळकूंडाने पिवळे झालेले खेळाडू त्याचेच माप काढायला लागतात ! गावस्करला झोडपायला मग विश्वकरंडकातल्या त्याच्या पुरी 60 षटके खेळून केलेल्या 36 धावांचा उल्लेख केला जातो. एकाने केला, म्हणून मग कोणीही सोम्या-गोम्या त्या खेळीचा खोचक उल्लेख करतो. एरवी आपल्या हजरजबाबीपणाने सर्वाना गार करणार गावस्कर या खेळीविषयी काही बोलत नाही. त्याच्या बरोबर खेळलेले सुद्धा काही बोलत नाही. बरे ही टीका गावस्कर खेळत असताना व तो निवृत्त झाल्यावर सुद्धा बराच काळ कोणी केली नव्हती हे सुद्धा खासच. परवा गावस्करने सचिनची उणीदुणी काढल्यावर पलटवार करताना सचिनभक्तांनी त्याच्या “त्या” खेळीचा खोचक उल्लेख केलाच.

 यावेळी मात्र मीच या टीकेच्या मुळाशी जायचा प्रयत्न केला. नेटची मदत घेवून मला बरीच माहिती मिळाली. गावस्कर तडाखेबंद , घणाघाती, मास्टर ब्लास्टर ही बिरूदे मिरवणारा फलंदाज म्हणून ख्यातनाम कधीच नव्हता तरी कारकिर्दीच्या उत्तरार्धात तो बराच आक्रमक झाला होता. वनडेत पहिल्या पंधरा षटकात गोलंदाजाला टप्प्यावर उचलून मैदानाबाहेर फेकण्यात तो चांगलाच माहीर झाला होता. त्याचे प्लेसमेंट उत्तम असल्याने एकेरी धावा चोरून तो धावफलक हलता ठेवत असे. श्रीकांतच्या साथीने भारतातल्या विश्वचषकाच्या उपांत्य-पुर्व सामन्यात किविजविरूद्ध त्याने काढलेले तूफानी शतक कोण विसरेल ? किविज गोलंदाजांची त्याने पिसे काढताना 3 षटकार व 10 चौकारांनी, 88 चेंडूतच 103 धावा चोपल्या होत्या व भारताला उपांत्य फेरीत पोहचवले होते. याच दरम्यान विश्वचषकातले सर्वात वेगवान शतक त्याने आपल्या नावावर कोरले होते. या विवेचनावरून गावस्कर वनडेत सुद्धा फटकेबाजी करायचा हे नक्की. आता त्याच्या “त्या” कुर्मगती खेळीकडे वळू. आधी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की 1975 सालीच काय, अगदी 1983 सालीसुद्धा, आपण जेव्हा वनडेचा विश्वकप जिंकला तेव्हा सुद्धा आपण या प्रकारातले कच्चे लिंबूच होतो. तेव्हा 60 षटकांचे सामने व्हायचे पण 220-240 चे लक्ष सुद्धा आव्हानात्मक व निर्णायक ठरत असे. अगदी अलिकडे पर्यंत 50 षटकांच्या सामन्यात सुद्धा 270-280 हे लक्ष अशक्यप्रायच असायचे. टी20 नंतर मात्र धावगती कमालीची वाढली आहे व 300 धावांचा पाठलाग अगदी आरामात केला जावू लागला आहे.

 या प्रस्तावने नंतर “त्या” सामन्याकडे वळू. “तो” सामना 1975 साली इंग्लंडला झालेल्या पहिल्या विश्वचषकातला पहिलाच सामना होता. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती व भारतीय गोलंदाजांचे धिंडवडे काढीत 60 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात 334 धावांचा हिमालय उभारला होता. तो काळ व तेव्हाची आपली ताकद बघता आपल्या पराभवाचा नुसता उपचार बाकी होता ! 60 षटके पुरती खेळपट्टीवर उभे राहिले तरी तो सुद्धा आपला विजयच ठरावा अशी एकूण परिस्थिती होती. गावस्करने अगदी तेच केले ! 174 चेंडू खेळून त्याने फक्त 36 धावा जमविल्या ! सलामीला गावस्कर बरोबर मैदानात उतरलेल्या एकनाथ सोलकरने बाद होण्यापुर्वी 34 चेंडूत फक्त 8 च धावा केल्या होत्या. अंशुमन गायकवाड ( 46 चेंडूत 22 ) व गुंडाप्पा विश्वनाथ (59 चेंडूत 37) यांनी त्यातल्या त्यात थोडाफार प्रतिकार केला पण मग आलेल्या पटेलने सुद्धा 57 चेंडूत 16 धावा जमवून गावस्करला तोडीस तोड साथ देताना खेळपट्टीवर नांगर टाकणेच पसंद केले. या दोघांनी चिवट खेळी करून , भारताला लवकर गुंडाळून सामना जिंकण्याचे इंग्लंडचे मनसुबे पार धुळीला मिळविले व त्यांना अगदी पुरी 60 षटके पिदवले तसेच इंग्लंडला निर्विवाद विजय मिळू दिला नाही ! अगदी आजही पराभव अटळ असेल तर नेट रनरेटचा विचार करून हरणारा संघ निदान सगळी षटके खेळून काढायचा प्रयत्न करतोच. गावस्करची ही पहिली वनडे नव्हती. आपल्या वनडे पदार्पणात, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड विरूद्धच 35 चेंडूत 28 धावा फटकावल्या होत्या व त्यात 3 चौकार व एक षटकार सुद्धा हाणला होता. ही धावगती भरते 80 ! म्हणजे वनडेत कसे खेळावे हे त्याला शिकवायची तेव्हाही काही गरज नव्हती. 34 धावांची कासवछाप खेळी त्याने इंग्लंडला पिदवायला व संघहित ध्यानी धरूनच केली यात काही शंकाच नाही. चारच दिवसांनी याच स्पर्धेत भारताची गाठ पुर्व आफ्रिकेशी पडली. 60 षटकात 120 धावा करून जिंकायचे आव्हान आपल्याला मिळाले. इथे मात्र गावस्करने इंजिनियरच्या साथीने सलामीला येताना 85 चेंडूत 65 धावा काढल्या, इंजिनियरने सुद्धा तेवढेच चेंडू खेळून 54 धावा केल्या व आपण 10 गडी राखून दणदणीत विजय मिळविला. वनडेतला आपला बहुदा पहिलाच व पहिल्या दोन विश्वकरंडकातला एकमेव विजय होता. या विजयात गावस्करचे योगदान भरीव होते व धावगती सुद्धा त्या काळाप्रमाणे चांगलीच होती. हा सामना आपण 30 षटके व एक चेंडू राखून जिंकला होता. त्या सामन्याच्या आधीच्या व नंतरच्या सामन्यात जलद धावा करणारा गावस्कर त्याच एका सामन्यात हळू समजून-उमजून खेळला पण पुढे भविष्यात टीकाकार हे समजून न घेता त्याला झोडपणार हे मात्र त्याला तेव्हा समजले नाही ! 

 अर्थात हे सगळे वाचूनही कोणी गावस्करला “त्या” खेळीसाठी बोल लावणार असेल तर गावस्करच्याच शब्दात म्हणावे लागेल “बोडके !”

 गावस्करची वनडे कारकिर्द थोडक्यात अशी, 
 Mat  Inns   NO  Runs   HS         Ave        BF       SR   100   50    0 
 108    102   14   3092    103*     35.13     4966    62.26   1    27    8
 (आकडेवारी साठी आधार ESPNcricinfo )