रविवार, ९ सप्टेंबर, २०१२

ना”पास” !

माझ्या विसरभोळेपणाबद्द्ल आधीच बरेच लिहून झाले आहे. आधुनिक तंत्र वापरून, जसे मोबाइल मध्ये रिमाइंडर लावून बायकोचा व तिच्या नातलगांचा वाढदिवस लक्षात ठेवणे, सर्व बिलांच्या बाबतीत “ऑटो पेमेंटचा” पर्याय सक्रीय करणे असे उपाय करून मी माझे जगणे बरेच सुसह्य केले आहे. रेल्वेचा पासाचे नूतनीकरण करणे मात्र रिमाइंडर लावूनही जमत नव्हते. कारण रिमाइंडर जरी वाजले तरी मी नेमका तेव्हाच रेल्वे स्टेशनच्या आसपास हवा ना ? असलो तर पासाच्या खिडकीवर गर्दी कमी असावी, असल्यास तेवढे पैसे माझ्या खिषात असायला हवेत, त्यातही 711 रूपयामधला रूपया तरी सुटा हवाच , नाहीतर खिडकीवरचा क्लार्क सुट्यासाठी तंगविणार ! शेवटी व्हायचे काय की पास संपलेला आहे हे तिकिट तपासनीस अडवायचा तेव्हाच लक्षात यायचे. रेल्वेच बहुदा माझ्याकडून दंड वसूल करून कंटाळली व ऑनलाइन पास काढायची सोय काही वर्षापुर्वी उपलब्ध करून दिली गेली. यात 10 दिवस आधी पास काढता येतो व पास अगदी घरपोच मिळतो. एकदा आपण असा ऑनलाइन पास काढला की रेल्वे तो संपायच्या आधी नूतनीकरणासाठी 10 दिवस आधी इमेल पाठवून आठवण सुद्धा करते ! या सोयीमुळे मधली काही वर्षे तरी पासाचा घोळ झाला नाही. अचानक रेल्वे प्रशासनाचे काय डोके फिरले कोणास ठावूक, पास घरपोच करण्याच्या भागातुन आमचा पनवेल/नवीन पनवेल विभागच काढून टाकण्यात आला. काही काळ मी कार्यालयीन पत्त्यावर पास मागवू लागलो पण व्हायचे असे की मी जागेवर नसतानाच तो कुरीयरवाला पास आणायचा किंवा कधी सलग सुट्ट्या आल्याने माझे कार्यालय नेमके पास नूतनीकरण करायच्या दिवसातच बंद असायचे. यावर मी तोडगा काढला तो म्हणजे रेल्वेचे स्मार्ट कार्ड वापरून पासाचे नूतनीकरण करण्याचा. हा सुद्धा तोडगा तकलादू ठरला कारण हव्या त्या वेळी स्मार्ट कार्ड मध्ये रकमेचा आधी भरणा करणे, तो झाला तर चालू स्थितीतील मशीन मिळणे व तसे मिळालेच तर नूतनीकरणासाठी आपण टाकलेला पहिल्या पासाचा नंबर मशीनने स्वीकारणे या सगळ्या गोष्टींचा मेळ जुळेना. पासाच्या बाबतीत सगळे मुसळ केरात जावून ये रे माझ्या मागल्या असेच चालू झाले.

विसरभोळेपणासोबतच मला अजून एक उपशाप मिळालेला आहे तो म्हणजे नको त्या वेळी नको ती गोष्ट आठवणे ! दोन आठवड्यापुर्वी कामावरून घरी परतत होतो. वाशीच्या खाडीवर लोकल असतानाच आपला पास केव्हा संपतो आहे ते बघायची मला अवदसा आठवली. पासावर तारीख होती 15/8/2012, म्हणजे मी दोन आठवड्यापुर्वीच पास काढला आहे ! नो वरी ! पण मग आठवले की आपण दोन आठवड्यापुर्वी पास नक्कीच काढलेला नाही. ती तारीख परत परत बघितल्यावर लक्षात आले की खरे तर आपला पास दोन आठवड्यापुर्वीच संपलेला आहे ! आधी हे झालेच कसे ? म्हणजे रेल्वेसुद्धा स्मरण-मेल पाठवायला विसरली की काय ? मग आठवले की संपलेला पास आपण काउंटरवरून काढलेला आहे, रेल्वे कशाला स्मरण करेल ? म्हणजे आता डब्यात टी.सी आला तर आपली काही खैर नाही. आला तर आला, फाडू गुमान दंडाची पावती असा विचार आला आणि खिसे चाचपडले तर काय, माझ्याजवळ पुरते 100 रूपये सुद्धा नव्हते. चार बँकाची एटीएम होती पण या प्रसंगात त्यांचा उपयोग शून्य होता. आता मात्र गंभीर स्थिती ओढवली होती. सोबत कोणी मित्र सुद्धा नव्हता. आणि याच संपलेल्या पासावर मी दोनदा यात्रा-विस्तार तिकिट काढले होते, सीएसटीला उभ्या असलेल्या टीसींच्या पथकाच्या डोळ्याला डोळा भिडविला होता, गाडीत येवून “तिकिट प्लिज” असे विचारणार्या टीसीला रूबाबात खिषाला हात लावून “पास आहे” असे उत्तर दिले होते व तो “इटस्‌ ओके” म्हणून गुमान चालू पडला होता. पण हे सगळे केव्हा, तर मला माझा पास संपला आहे याची जाणीवच नव्हती तेव्हा ! आता मात्र माझा चेहरा पार दीनवाणा , बापुडवाणा झाला होता. टीसीला माझ्याकडे नुसते बघितले तरी हा विदाउट तिकिट असल्याची खात्रीच पटणार होती. एव्हाना पास बघताना माझा चेहरा बघून तो संपलेला आहे याची खात्री आजूबाजूच्या सगळ्यांना झालेली होतीच. नेत्रपल्लवीने सगळ्या डब्यात हा मेसेज गेला. मला घाबरवायला मग टीसी आला अशा पुड्या सुटू लागल्या. कोणी आज स्पेशल धाड आहे व जे सापडतील त्यांना अडाणी कोर्टातच उभे करणार असल्याचे सांगू लागला. कोणी “दंड पाचशे रूपये वर 3 महिने तुरूंगवास सुद्धा “ असा कडक नियम झाला आहे म्हणून सांगू लागला. कोण दंड वाढल्यापासून टीसींचा कोटा भरत नाही म्हणून ते तोड-पाणी करीत नाहीत व दंडाचे पैसे नसतील तर सरळ रेल्वे पोलिसांच्या हवाली करतात, अडाणी कोर्ट सकाळी अकरा वाजता उघडते व तोपर्यंत लॉक-अप मध्ये कसे सडावे लागते याचे भयंकर वर्णन करीत होता. एकजण तर हे जंटलमन सारखे दिसणारे लोक केव्हाच तिकिट काढीत नाहीत व टीसी त्यांचे कपडे बघून कधी तिकिटच विचारत नाहीत अशीही खंत व्यक्त करीत होता.

ही सर्व चर्चा ऐकून मी चांगलाच हादरलो. सिग्नलला गाडी कोठे थांबली तर खाली उतरून पळ काढायचा असाही एक विचार केला पण गाडी आज अगदीच सुसाट होती. मानसरोवर तसे नवे स्थानक आहे तिकडे कदाचित टीसी नसतील , तिकडे उतरूया असा एक विचार मनात आला पण मध्ये कोठे खाली उतरायची रिस्क घेण्यापेक्षा पनवेललाच काय होईल ते होवू दे असा पक्का विचार केला. पनवेलला मागे उतरलो तर टीसी असायची शक्यता कमी होती पण मग तिकडे काळोख असतो व अलिकडे प्रवाशांना लूटायच्या घटना घडल्याचे वाचलेले आठवले. चेन-बिन वा रोकड काही नसली तरी माझ्याकडे महागडा मोबाइल होताच की ! त्यातुन वाचलो तर रेल्वे लाइन ओलांडली म्हणून रेल्वे-पोलिसांकडून धरपकड होत असतेच. “इकडे आड तिकडे विहीर” नाहीतर “आगीतुन फोफाट्यात ! “ . “दगडापेक्षा वीट बरी” या न्यायाने चोर व रेल्वे पोलिस यापेक्षा टी.सी. परवडला. टीसीने अडविले तर बिनधास्त पास आहे म्हणून सांगायचे व अगदीच पास दाखवा म्हणाला तर पास त्याच्या पुढे धरायचा. त्याला जर कळले की तो संपला आहे तर साळसूदपणाचा आव आणून “अरे खरेच की ! माझ्या लक्षातच नाही आले” असे म्हणायचे. नाहीतर सरळ सांगायचे की मी रेल्वेतले वरिष्ठ अधिकारी राजीव गुप्तांचा पीए आहे म्हणून, त्याला नाही पटले तर मोबाइलमधला त्यांचा नंबर त्याला दाखवायचा !

या व अशा अनेक उलट-सूलट विचारांच्या कल्लोळात असतानाच गाडी पनवेल स्थानकात लागली. पनवेलला उतरणारी माणसे कमीच होती व बाहेरगावची गाडी सुद्धा आलेली नसल्याने एवढे भव्य स्थानक अगदीत सुने वाटत होते. थोडा वेळ कानोसा घेतला व खात्री पटली की टीसीचे अगदी नामोनिषाण सुद्धा नाही. तरीही धाकधुक कमी होत नव्हती. हळूच मी तिकिट खिडकी गाठली ! हुश्श ! आता मात्र मी अगदी सेफ झालो होतो. चला आधी पास काढायला हवा ! मी जवळच असलेल्या एटीएम मधून पैसे काढले व तिकिट खिडकीवर गेलो. गर्दी फारशी नव्हतीच. माझा नंबर लगेचच आला. आजचा दिवस तर पार पडलेला होताच तेव्हा उद्यापासूनचा पनवेल ते सीएसटी तिमाही पास दे असे मी काउंटरवरच्या क्लार्कला सांगितले. यावर त्याने पहिला पास मागितला. मी पहिला पास कशाला हवा, 10 दिवस आधी पास काढता येतो असे त्याला सांगितले. तो पण खमक्या होता. 10 दिवस आधी पासाचे नूतनीकरण करता येते, नवीन काढता येत नाही असा नेमका नियम त्याने मला सांगितला. मला माझीच मग लाज वाटली, आधीच मी दोन आठवडे विदाउट तिकिट फिरत होतो व आता एका दिवसासाठी रडत होतो ! त्याने मला आजचीच तारीख टाकून पास दिला व संगणकावर पास देताना आजचीच तारीख येते, नूतनीकरण करत असाल तर आपोआपच पास संपल्यापासूनची पुढ्ची तारीख पडते असे सुद्धा समजावून सांगितले. मी गुमान तो पास घेवून स्टेशनच्या आतल्या जिन्याने वर जायला निघालो. आता मला कोणतेच टेंशन नव्हते !

पुलावर येताच साध्या वेशातील टीसीने मला हटकले. त्याला पास बघायचाच होता ! मी दाखविताच त्याने तारीख अगदी नीट तपासली व आजच काढलेला दिसतो असेही बोलून दाखविले. मी सूटलो असे मनातल्या मनात म्हणत व त्या क्लार्कचे आभार मानत पुल उतरायला लागलो ! पण नक्की नियम काय आहे ? फक्त नूतनीकरणच दहा दिवस आधी करता येते की नवीन पास सुद्धा तसा काढता येतो ? घरी गेल्यावर रेल्वेची वेबसाइट उघडली व पासा संबंधी नियम तपासले. त्यात स्पष्टपणे renewal असाच शब्दप्रयोग आहे. रेल्वेचे सगळेच नियम जाचक नसतात तर !

३ टिप्पण्या:

विजय शेंडगे म्हणाले...

एबीपी माझा : ब्लॉग माझा स्पर्धा.पुरस्काराबद्दल मनःपूर्वक अभिंनदन.
तुमचा ब्लॉग आणि पोस्ट मनापासून आवडली.

विजय शेंडगे म्हणाले...

एबीपी माझा : ब्लॉग माझा स्पर्धा.पुरस्काराबद्दल मनःपूर्वक अभिंनदन.
तुमचा ब्लॉग आणि पोस्ट मनापासून आवडली.

Milind Dharap म्हणाले...

अरे वा काका मस्तच ... नेहमीप्रमाणे ..