सोमवार, १२ जानेवारी, २००९

शक के दायरे मे हमेशा --- !

शक के दायरे मे हमेशा --- !

सटवाई आपल्या ललाटावर कोणत्या भाषेत लिहीते कोणास ठाउक, आपल्याला काय ते वाचता येत नाही पण काय खरडले असेल याच अंदाज नक्कीच बांधता येतो। माझ्या बाबतीत म्हणाल तर मी 'सतत संशय ग्रस्तच असतो' ! अहो, मला नाही हो कोणाचा डाउट येत, लोक माझ्यावर अकारण संशय घेत राहतात ! काहीही, कोठेही झाले तरी संशयाची पहीली सुई आपली माझ्यावर रोखली जाते ! तसा मी कधीच कोणाच्या अध्यात मध्यात असत नाही, आपण बरे की आपले काम बरे हा माझा उसूल, नाकासमोर चालणारा, सरळ मार्गी ! पण तरीही मला कायम सफ़ाई द्यायला लागते ! संशय तरी किती प्रकारचे म्हणून सांगावे, दोन माणसे भांडली तर मीच काडी केली, एकत्र आली तरी मीच दिल-जमाइ केली ! कोणाची बदली झाली, कोणाला बढती मिळाली, कोणाच्या पाठी चौकशीचा ससेमिरा लागला, कोणी ब्लॉग लिहीला तरी मीच त्याचा कर्ता-करविता ? लग्न झाल्यानंतर तरी हे थांबेल अशी एक भाबडी आशा होती पण संशयाच्या प्रकारात भरच पडली उलट ! बायकांचे पण अजब आहे बुवा ! ज्याला लफ़डी करायला वेळ सुद्धा नाही त्याच्यावर सदा संशय आणि खरेच बारा भानगडी करणारे मात्र करून सवरून नामा निराळे !

वडाळ्याला ऑफ़ीसच्या जागेत असतानाची गोष्ट। सकाळी कामावर जाताना माझी दोन्ही मुले मला बाबा असे ओरडून टाटा करायची। त्या आवाजाने सगळी इमारत जागी व्हायची। अनेक कच्ची-बच्ची सुद्धा माझ्या मुलांच्यात सूर मिसळून 'बाबा' असे ओरडून मला टाटा करायची। असे दोन दिवस चालू होते। तिसर्या दिवशी मात्र 'बाबा' या हाकेपाठोपाठ धपाट्यांचे आवाज ऐकू आले आणि मग मी बाहेर पडताना संचारबंदी जारी होउ लागली. ना माझा काही दोष ना त्या निष्पाप मुलांचा पण --- ! लग्न झाल्यावर आम्ही काही काळ वडाळ्याला रहायला होतो. मला काही कामच नसायचे व मी डबा दिलेला असला तरी तो तसाच ठेउन अगदी ९ च्या आत घरी यायचो ! बायकोला संशय आला की मला नोकरी नाही व त्यांना फ़सवले गेले आहे. पगाराची स्लीप सलग तीन महीने बघितल्यावर व मग फ़ंडाची स्लीप, वारस म्हणून तीच्या नावासह, दाखवल्यावर हा संशय शमला ! पण असे प्रकार विरळाच ! मी बदफ़ैली आहे, माझ्या बाहेर बारा भानगडी आहेत हा तीचा संशय, एकही पुरावा नसताना ( या मुळेच तील म्हणे दाट डाउट येतो, म्हणजे ,पुरा पोचलेला वगैरे !) गेली १६ वर्षे मी डोक्यावर घेउन फ़िरत आहे. फ़क्त एकदाच , नाही दोनदा, हो, तब्बल दोनदा मला तीच्या डोक्यातले संशयाचे भूत उतरवण्यात यश आले. ऐका ती ष्टोरी !

असाच एकदा कामावरून घरी आलो। थंडे स्वागत झाले। सटवीचा फ़ोन आला होता असे सुनावले गेले, विचारले कोण ? तर उत्तर आले एक असेल तर नाव कळेल ना ? नाव नाही बोलली, तू नाहीस म्हटल्यावर फ़ोन कट केला ! मी लक्ष दिले नाही। दूसर्या दिवशी भांड्यांची आदळ-आपट व फ़ोन आल्याचा निरोप, नाव नाहीच सांगितले। तिसर्या दिवशी अबोला, आदळ आपट प्लस वरण भात प्लस डोळ्याला पदर ! माझे मेलीचे नशीबच फ़ूटके—ची सोबत आळवणी ! प्रकरण फ़ारच विकोपाला जात आहे म्हटल्यावर मी चक्क दांडी मारून खर्या-खोट्याचा फ़ैसला करण्याचा निर्णय घेतला। ठरल्या वेळी त्या सटवीचा फ़ोन आला. आधी मी तो हीलाच घ्यायला दिला. आवाज 'तोच' असल्याची खात्री पटल्यावर हीने मग तो माझ्याकडे दिला. 'ती' चक्क मार्केटींग करणारी कोणी तरूणी होती. मी तीला चांगलेच फ़ैलावर घेतले, तुमच्या मुळे माझा काडीमोड होण्याची वेळ आली होती तेव्हा बायकोशी आधी तुम्ही कोण ते सांगा असे खडसावले. बायकोने पण तीला चांगलेच सुनावुन फ़ोन कट केला ! हुशश !

दूसर्या प्रकरणात आम्ही सगळे एस्सेल वर्ड ला गेलेलो होतो। तिकडे कामतच्या हॉटेलात इडल्या चापत असता कोणी मद्रसुंदरी मला अगदी खेटूनच बसली ! मी दाक्षिणात्य विद्यालयात शिकलो आहे, मला वाटले असेल मला ओळखणारी कोणी तेव्हाची मैत्रीण. काय करता, इकडे नेहमी येता का, कोठे राहता, ही समोरची बायकोच का तुमची ? असा वार्तालाप चालू असताना मी 'ती कोण' हे आठवायचा प्रयत्न करीत होतो तर ही माझे अजून एक लफ़डे उघड झाले अशा नजरेने मला निरखत होती. निघायच्या वेळेला ती कोण याचा खुलासा झाला. ती त्या हॉटेलची मॅनेजर (सहायक) होती व आलेल्या माणसांशी प्रेमाने(!) बोलून त्यांचा फ़ीडबॅक घेण्याचे तीचे काम होते !

आता तुम्हाला शंका आली असेलच, हे सगळॆ खरे की---- !!