रविवार, १२ जून, २०११

बिनडोक बंडू !

बंड्या भलताच खूष होता आज. कारणही तसेच भारी होते. त्याला चक्क एक करोड डॉलरची लॉटरी लागली होती. त्याचा इमेल आयडी मायक्रोसॉफ्ट कंपनीला भलताच आवडला होता व त्यासाठी काढलेल्या लकी ड्रॉ मध्ये तो लकी ठरला होता. संपर्कासाठी दिलेल्या इमेलवर त्याने लागलीच संपर्क साधला व आपण एक करोड डॉलरचे बक्षिस क्लेम करत असल्याचे सहर्ष कळवून टाकले. लॉटरी कंपनीच्या एका एजंटाने त्याला उत्तर देताना अमक्या खात्यात प्रक्रीया खर्च म्हणून फक्त एक लाख रूपये भरा की लागलीच तुमच्या खात्यात ऑन-लाइन एक करोड डॉलर जमा झालेच म्हणून समजा असे कळविले होते. अर्थात बाबांना सांगण्यात काहीही अर्थ नव्हता कारण ते याला मूर्खपणा असे म्हणून मोकळे झाले असते. पण बाबांच्या खात्याचा ऑनलाइन युजर आयडी व पासवर्ड बंड्याला माहीत होता व बाबांचे खात्यासंबंधी येणारे अलर्ट ज्या मोबाइलवर यायचे तो मोबाइल सुद्धा बंड्याच्या ताब्यातच होता ! बाबांच्या खात्यात कसेबसे एक लाख रूपये होते पण मिनिमम बॅलन्स २५००० रूपये आवश्यक असल्याने तो ते ट्रान्सफर करू शकत नव्हता.

अर्थात स्वस्थ बसेल तो बंड्या कसला. त्याने त्या एजंटलाच कळवून टाकले की काही दिवस कळ काढा, बाबांचे काही चेक जमा झाले की आपण हा व्यवहार पुरा करू. एजंटने लगेच कळवून टाकले की ७५००० हजार दिलेत तरी हरकत नाही, स्पेशल केस म्हणून मी माझ्या अधिकारात हा व्यवहार पुरा करू शकतो. आजच व्यवहार पुरा करा नाहीतर तुमचा क्लेम रद्द होईल !

बंड्या कसाही असला तरी दिल्या शब्दाला पक्का होता व व्यवहाराला अगदी चोख ! त्याने कळविले की व्यवहार म्हणजे व्यवहार, तुम्हाला लाखापेक्षा मी एक पैही कमी देणार नाही पण तुम्ही काही दिवस थांबणार असाल तर तुम्हाला मी लाखच काय दहा लाख द्यायला तयार आहे. काहीही करा पण या व्यवहाराला थोडी वाढीव मुदत मिळवा. सोबत पुरावा म्हणून बाबांच्या खाते उतार्याची पीडीफ प्रत त्याने अटॅच केली होतीच व सोबत एजंटने दिलेले खाते पेयी लिस्ट मध्ये अ‍ॅड केल्याची व त्या नावावर चार दिवसानंतर १ लाख ट्रान्सफर करायची सूचना नोंदविल्याची नोंद सुद्धा त्याने जोडली होती.

एजंटला सुद्धा बंड्याची सच्चाई कोठेतरी भिडली असावी. त्याने स्वत:हून बंड्याच्या बाबांच्या खात्यात २५००० रूपये जमा करायची तयारी दर्शविली. बंड्याने सुद्धा संकोच वाटत असला तरी हा प्रस्ताव मान्य केला पण या उपकाराच्या ओझ्याखाली दबलो गेल्यामुळे एक लाखाच्या ऐवजी दोन लाख त्या एजंटला देवू केले व तशी सूचना दुरूस्त केल्याचा पुरावा सुद्धा त्याला इमेलने सत्वर धाडला ! एजंटने सुद्धा लगोलग त्याच्या बाबांच्या खात्यात रूपये २५००० जमा केले..
.

.


.

.

.
.
.
.

.
.
.
.आधीच्या एका प्रकरणातले २५००० व हे २५००० हजार मिळून बंड्याने बजाजची भारी बाइक घेतली आहे व बबलीला बॅकसीटला बसवून तो भटकत असतो हल्ली बेलापुर पर्यंत ! बंड्या बिनडोक आहे असे म्हणणार्या बाबांची बोलती बंद झाली आहे !

६ टिप्पण्या:

Raj म्हणाले...

रोचक किस्सा. ब्लॉग छान आहे. लिहीत रहावे.

Nil म्हणाले...

मस्त ट्विस्ट !

Nil म्हणाले...

मस्त ट्विस्ट !

Nil म्हणाले...

मस्त ट्विस्ट !

क्षितिज देसाई म्हणाले...

मस्तय !!
'खोसला का घोसला' ! सही !

अनामित म्हणाले...

Maan gaye bhidu....
...shiva