रविवार, २२ जुलै, २०१२

पुन्हा एकदा “भज गोविंदम” !

साधारण वर्षभरापुर्वी मी आद्यशंकराचार्यांच्या “भज गोविंदम” या स्तोत्राचा मराठी अनुवाद पोस्ट केला होता. सोबत एका प्रसिद्ध दाक्षिणात्य (नाव आता आठवत नाही) गायिकेच्या आवाजातील एम.पी.3 चा दुवा सुद्धा दिला होता. ही पोस्ट प्रसिद्ध झाल्यावर साधक या नावाने एक प्रतिक्रीया आली होती व त्यात एम.पी.3 तला आवाज “Childish” आहे असे म्हटले होते ! हे स्तोत्र पंडीत जसराज यांच्या आवाजात ऐका असे सूचवले होते व त्या गाण्याची लिंक सुद्धा दिली होती. पंडीत जसराजांच्या आवाजातले ते स्तोत्र ऐकता येत होते पण उतरवता येत नव्हते. मी अनेक खटपटी-लटपटी करून ते उतरवण्यात एकदाचा यशस्वी झालो व ते माझ्या मोबाइलवर सुद्धा उतरवून घेतले. पहिल्यांदा लोकल प्रवासात ते गाणे ऐकायला घेतले तेव्हा त्याची सुरवात अगदी संथ वाटली व ते बंदच करून दूसरे गाणे ऐकायला घेतले. मग पुन्हा कधी ते गाणे ऐकण्याच्या फंदात पडलो नाही.

 काहि दिवसापुर्वी लोकल प्रवासात शफल करून गाणी ऐकत असताना गाणे वाजू लागले व काय ब्याद आहे असे म्हणत ते गाणे स्किप करायच्या ऐवजी फॉरवर्ड झाले व एक दणदणीत आवाजातली तान ऐकू आली. मी त्या आवाजाने थरारलोच ! हे काही तरी वेगळे आहे असे समजले व जसराजांच्या आवाजातले “भज गोविंदम” पहिल्यापासून ऐकायला घेतले.
हे ध्वनी-मुद्रण निश्चितपणे एका भव्य मैफिलीतले असणार. आधी संथ लयीत व हळूवार आवाजात “भज गोविंदम” ची सुरवात होते. सुरवातीचा श्लोक असाच म्हटलेला आहे. पंडीतजी व त्यांच्या साथीदारांनी ( चेल्यांनी ?) या दरम्यान आपला आवाज व वाद्ये लावून घेतली असावीत ! मग मात्र आवाजाची पट्टी वाढू लागते, साथीला एकेका वाद्यांची सुद्धा भर पडते. दमदार ताना, आरोह-अवरोह, पलटे, आवाजातले चढ-उतार यातून गायन रंगत जाते, खुमासदार होते, अगदी कान तृप्त होतात ! नादब्रह्म म्हणजे काय याचा साक्षात्कार होतो ! भज गोविंदम हे स्तोत्र आहे पण ते एका आगळ्याच ढंगात म्हटले आहे व शेवट तर चक्क भजनात केला आहे ! तब्बल 24 मिनिटे देहभान विसरून आपण ऐकत राहतो ! पंडीत जसराजांची गायकी ऐकताना आपण स्वरांच्या अभिषेकात डुंबतो, भक्तीरसात चिंब भिजतो, अगदी धन्य पावतो, भरून पावतो ! हे ऐकल्यावर अगदी ब्रह्मानंदी टाळी लागते. या तंद्रीतुन आपण बराच काळ बाहेर येवूच शकत नाही. अजून काही ऐकूच नये असे वाटावे असे कान तृप्त झालेले असतात ! अंगावर रोमांच उभे करणारा हा अनुभव आहे ! अर्थात हे सगळे वाचायचे नाही तर अनुभवायचे असे आहे. हा घ्या दुवा व दुवा द्या सुद्धा ! http://ge.tt/5WJHOrK/v/1
अगदी असाच अनुभव पंडीत जसराज यांनी गायलेले “भज नंदन” ऐकताना सुद्धा येतो. त्याचा दुवा खाली दिलेला आहे. हे ध्वनिमुद्रणसुद्धा त्याच मैफिलितले असावे. कालावधी 26 मिनिटांचे आहे. हे सगळे ज्यांनी लाइव कन्सर्ट मध्ये ऐकले असेल ते किती नशीबवान असतील नाही ? http://www.ge.tt/5WJHOrK/v/0?c

२ टिप्पण्या:

ॐकार केळकर म्हणाले...

I have heard "Bhaja Govindam" in the voice of "Bharatratn MS Subbulakshmi"...
Its amazing!
you can google "Bhaja Govindam MS Subbulakshmi" & you will easily get audio & videos also.

अनामित म्हणाले...

मागील उत्तराबद्दल धन्यवाद! तुम्ही भज गोविन्दम बद्दल लिहिले आहे ते गाणे मी ऐकले पण मला काही ते इतके मनास भावले नाही आवडले नाही तसेच तुम्ही अबिदा परवीन बेगम यांची गाणी ऐकली आहेत काय? सध्या दूरदर्शन सूरक्षेत्र ह्या कार्यक्रमात त्या परीक्षक म्हणून काम करीत आहे. कबीराचे दोहे त्यांच्या तोंडून ऐका तुम्हाला काय तंद्री लागेल ते पहा! याला श्री . गुलजार यांचे निवेदन लाभले आहे. तुमच्या उपयोगा करिता direct link देत आहे.
मला सगळ्यात जास्त आवडलेले "मन लागो यार काबिरी मे" हे गाणे जे सुरेश वाडकर याच्या "विठ्ठल आवडी प्रेमभावो" आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या "सावळे सुंदर रूप मनोहरी" या सारख्या भक्ती रसातल्या गाण्य सारखे अवीट वाटते.
१) मन लागो यार काबिरीमे :- http://music.cooltoad.com/music/download.php?id=३७१८४३
२) सोवू तो सपने :- http://music.cooltoad.com/music/download.php?id=371845

तुमच्या मित्रांपैकी ज्योती - राजहंस आणि ऍडी यांचे ब्लोग वाचतोय ऍडी ब्लोगमधील पती पत्नीमधील मजकूर वाचताना खूप धमाल येतेय. त्याची भाषा शैली सुहास शिरवळकर यांच्याशी जुळते.
तर ज्योती यांच्या ब्लोग वरून श्रद्धा भोवड यांच्या ब्लोगची माहिती मिळाली तर त्यांचे परीक्षण पर लेख वाचून मन थक्क होते. हळू हळू मला मराठीतले सगळे ब्लोग वाचण्याचे वेड लागणार बहुतेक. माझी किमान ५००० च्या वर अवांतर पुस्तक वाचून झाली आहेत. पण font size लहान असल्यामुळे पुस्तक वाचनाला मर्यादा येतात म्हणून ब्लोग आणि रोजचे वर्तमान पत्र आता इंटरनेटवरच वाचतो. दुसरे असे कि तुम्ही दोन भ्रमणध्वनी क्रमांक दिले आहेत मग कोणत्या क्रमांका वर तुम्हाला sms द्यायचे ते कळ्वा. धन्यवाद!