शनिवार, १६ मे, २००९

गुगली, दूसरा व तिसरा सुद्धा !

मी ज्या प्रकारे बेल दाबुन धरली त्यावरूनच आत सिग्नल गेला की स्वारीचे काहीतरी सॉलीड बिनसले आहे ! मग आत गेल्यावर लाडोबा आणि दिवट्या असा मुलांचा उद्धार न झाल्याने त्यावर शिक्का-मोर्तब झाले. मी चपला भीरकावल्या, डबा काढुन हीच्या हातात दिला व विस्कटल्याप्रमाणे खुर्चीवर पसरलो. “तू म्हणतेस ते आज पटले, अगदी कोणा-कोणावर सुद्धा उपकार करू नयेत, कातरलेल्या अंगठ्यावर मुतु सुद्धा नये. स्वार्थी बनले पाहीजे, रेस्ट न्यु वे चे स्वामी सांगत त्या अर्थाने नाही, लौकिक अर्थाने, अप्पलपोटी बनले पाहीजे !” मग कपडे बदलले, आंघोळ करून फ़्रेश झालो, जरा विसावलो तेव्हा मंडळी भक्तीभावाने, काय झाले ? असे विचारती झाली.

अग आज सकाळी स्टेशनला स्कूटर पार्क करत होतो तेव्हा एक बाई, कडेवर वर्षाचा मुलगा, त्यात परत दिवस गेलेले व हातात या अवजड दोन बॅगा, अशा अवस्थेत अगदी खुरडत चालल्या सारखी स्टेशनच्या दिशेने चालली होती. मला अगदी राहवले नाही, म्हटले मी तुमच्या बॅगा घेतो, तुम्हाला पुल पार करून देतो, तुम्हाला कोणती गाडी पकडायची आहे ? ती बोलली नेत्रावती, ठीक आहे, ती ५ नंबरला येते मी तिकडेच उतरून थांबतो ….
तरूण होती का रे ? - ही.
हो, तिशीची असेल, साउथची असावी – मी.
सुंदर असेल ना ? – ही.
हो – मी !
तरीच …! ही. विथ जळजळीत कटाक्ष ! ( इति गुगली )
असा राग आला, मुसलमान असतो तर तीन काय तीनशे वेळा तलाख-तलाख-तलाख असे म्हणालो असतो. पण परोपकाराचे मीच भरवलेले खुळ मुलांच्या डोक्यातुन जावे यासाठी मला गोष्ट पुरी करणे भाग होते !

तर तिचे सामान घेउन मी भरभर तो पुल पार केला व सामान फ़लाटावर ठेउन ती कोठवर आली आहे ते पाहु लागलो. इतक्यात “चोर, चोर” असे माझ्या कानी पडले. मी आसपास बघितले तर संशयास्पद कोणी दिसेना. ओरडणारा तो काळाकुट्ट मद्रासी चक्क मलाच बघुन चोर असे ओरडत माझ्या समोर उभा ठाकला. लगेच आसपासच्या माणसांनी आमच्या भोवती कोंडाळॆ केले. कधी नव्हे ते पोलीस सुद्धा आले व त्या मद्राशालाच चोर समजले व क्या चोरी किया बे, चल निकाल, असे म्हणाले. या वर तो मद्रासी माझ्याकडे बोट दाखवुन “मै नै, यैच चौर है” असे म्हणाला. पोलीस पण गडबडला, हा तर जंटलमन वाटतो असे भाव त्याच्या चेहर्यावर दिसत होते. इतक्यात मुदली, सेक्टर ३ मधला, माझा कामावरचा मित्र, आला. त्याने काय झाले म्हणून विचारले. मला जरा मग धीर आला. मद्रासी सांगत होता की “ये मेरा लगेज चोरी करके भाग रहेला है, पकडो साले को !” मग मी पण आवाज चढवला, अबे मदरासी, तेरी तो …, ये लगेज पीछे से एक औरत बच्चा लेके आ रही उसका है, मै उसकी मदत कर रहा था, चोर, लफ़ंगे तो तुम दिखते हो !” इतक्यात ती बाई मला पुल उतरताना दिसली. मी तीचे लक्ष वेधुन, इकडे या असे खुणावले. त्यावर तो म्हणतो कसा, “ ये तो मेरीच वाइफ़ है !” आता पब्लीक चेकाळले, त्याच्यावर नुसत्या शिव्यांचा भडीमार झाला, गरोदर बायकोला सामाना सकट मागे सोडून आपण मोकाट फ़िरतो, माणूस आहे का हैवान. एकाने तर त्याच्या कानफ़टातच भडकावली ! म्हणे पर्यंत त्याची बायको तिथे पोचली. त्या बरोबर तो मद्रासी तीच्या अंगावर धाउनच गेला. दात-ओठ खाउन तो तीला बरेच काही त्यांच्या भाषेत बोलला, मग तीने त्याला काहीतरी समजावले, मग तो एकदमच शांत झाला. निर्लज्जा सारखे हसला सुद्धा वर मला सॉरी, थँक्स म्हणत त्याच्या बायको बरोबर पुढे गेला.

मुदली आणि मी मग लोकल पकडायला गेलो तेव्हा मुदली म्हणतो कसा “मराठे, तेरे मे ना ये अजीब सुलेमानी किडा है, दुनियाका कंधे पे कायको लेता है ? बेचारे हजबंड ने खामका मार खाया.”
अबे, मुदली, त्याला तर तुडवायला हवा होता ….” माझा सात्विक संताप नुसता उफ़ाळून आला होता.
…मेरे को थोडा थोडा तमील आता है, उनका जो झगडा हुआ वो थोडा बहुत समझा मुझे.
…अरे वो हैवान तो उसकी जान भी ले सकता है, मुझे अब उसका ही डर लग रहा है !

यावर मुदली जो काय हसत सूटला, अगदी वेड लागल्यासारखा ! शेवटी मी त्याच्या थुलथुलीत पोटावर एक सणसणीत पंच मारला. तेव्हा, अबे सुन, गुस्सा क्यो होता है, म्हणत पुढचे सांगू लागला.
नवरा तीला म्हणत होता “छीनाल औरत, अपने जोरू को पराये आदमी के सामने जलील करती है, तुम्हारी तो चमडी निकालता हूँ, मै तुम्हे क्या बताया था, उधरीच खडी रह, मै कुली लेके आता हूं, फ़ीर भी वो हरामीकी मदत क्यो ली तुमने ?”
यावर ती बाई बोलली, “मै तो थोडा छांव की तरफ़ जा रही थी, वो आया, और सामान लूं क्या पुछा, आदमी शकलसे तो शरीफ़ लग रहा था, तो लो बोली. उतना कुली का पैसा बचेगा, ओर वैसे यहा कुली मिलता कहा है ? बकरा खुद मिल रहा था तो क्यो नही बोलने का ? उगीच तो नवरा हसला व तुला धन्यवाद, माफ़ करा नाही बोलला काही ! ( हा होता “दूसरा” )

हे ५० सेकंदाचे भाषांतर मुदलीकडून पुर्ण समजायला सीएसटी यायला लागले, मला मुदलीच्या हसण्याला ब्रेक मारायला त्याच्या पोटावर किमान चारदा पंच मारायला लागले. अख्खा डबा फ़िदीफ़िदी हसत होता !

सगळे सांगितल्यावर मात्र जरा हलके वाटले. आता कानाला खडा, दुनियादारी गेली बाराच्या भावात, आणि बायकांना तर अजिबात मदत नाही करणार. जेन्टस डब्यात आल्या तर अजिबात उभा राहणार नाही. लगेच ही बोललीच, “सुंदर आणि तरूण बायकांची तर अजिबातच करू नका ! “ (अग किती छळशील !)

हीच्या शेर्यांकडे दुर्लक्ष करत मी मुलांना म्हणालो,सगळॆ संस्कार विसरा पार, ही दुनिया चांगल्या माणसांची नाहीच आहे मुळी. काही कोणाला याच्या पुढे मदत करायची नाही, याद राखा ! जरा वेळ शांततेत गेला, मग प्रसाद बोलला, “ पण बाबा ती परमहंसाची गोष्ट नाही का तु सांगत .. गंगा नदी, वाहणारा तो विंचु.., त्याला वाचवणारे परमहंस.., तो त्यांना चावतो , सारखा सारखा पाण्यात पडतो .., ते त्याला वाचवत राहतात…आपणही आपला धर्म सोडू नये …!” चूप कार्ट्या, एकदम चूप ! त्याला चूप केल्यावर प्रियांका सरसावली, “अरे बाबा, मग तर तु ही गोष्ट अगदी कोणा-कोणाला सांगितली सुद्धा नाही पाहीजेस, कारण तुझ्या त्या गोष्टीत नाही का, सेवाभावी साधु असतो.., त्याचा अबलख घोडा.., चोराला तो हवा असतो.., लंगडा बनून वाटेत पडतो.., साधु फ़सतो.., चोर पळत असताना साधु म्हणतो चोरला नाही, दिला म्हणून सांग... नाहीतर पुढे लोक लंगड्यांना मदत नाही करणार !

आता मात्र माझा राग कोठल्या कोठे पळतो, मस्त प्रसन्न , अगदी फ़्रेश वाटते ! मग ही म्हणते “तुमचा बाबा काय परोपकार करण्याचे थांबणार आहे का ? अगदी उद्याच कोणी तरूण, तीशीची, सुंदर बाई दिसली की तीची पर्स सुद्धा हातात घेईल , माझी मात्र कधी सूटकेस पण हातात नाही घेतली ! काय तर म्हणे स्वावलंबी व्हा, आपले ओझे आपणच ओढा !”

रात्री हळूच म्हणाली, “तीचे काही नाही चुकले, त्या बाईच्या जागी मी असते ना तरी अगदी हेच केले असते ! पुढच्या जन्मी तु ना माझ्या शेजारणीचा नवरा हो, म्हणजे माझी पण खूप कामे हलकी होतील ! ( आणि हा “तिसरा” !)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: