सोमवार, १८ मे, २००९

प्रोटोकॉल !

चेयरमनचा पीए म्हणून नियुक्ती झाल्याला काही महीनेच झाले होते. कामाची हळूहळू माहीती होत चालली होती, वावरण्यात आत्मविश्वास, आवाजात नम्रता आणि ठामपणा येउ लागला होता. डोक्यावर बर्फ़ ठेउन, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जायची मनाची तयारी होत होती. अति-महत्वाच्या व्यक्तींचे फ़ोन कसे घ्यायचे , त्यांचे प्रोटोकॉल काय असतात, याच्या बर्याच टीप्स आधीपासूनच तिथे असलेल्या सहाकार्यांनी दिल्या होत्या त्याचा तर खूपच उपयोग होत होता. असाच एका माजी खूप बड्या अधिकार्याने फ़ोन केला. अत्यंत उर्मटपणे माझ्या गोदी व रोड पासचे काय झाले अशी विचारणा केली. मी त्यांचे नाव अदबीने विचारून घेतले व चौकशी करून, स्वत: फ़ोन करून कळवतो म्हणून सांगितले. लगोलाग फ़ोना-फ़ोनी करून सर्व माहीती काढली तेव्हा कळले की त्यांचे जुने पास संपून काही दिवसच झाले होते पण त्यांना त्याच्या नूतनीकरणासाठी अर्ज केलाच नव्हता. मी त्यांना फ़ोन करून हे सांगितले व एक अर्ज द्या , सोबत आपले जुने पास पण पाठवुन द्या म्हणून सांगितले. आता त्यांनी माझे नाव विचारले व मराठे, म्हणजे मराठी माणूस, असे म्हणत एवढा वेळ फ़र्ड्या इंग्रजीत बोलणारे ते मराठीत बोलु लागले. पण टोन तोच ! “अहो, तुम्हाला कळते आहे माझा पास संपला आहे, तर तुम्ही तो स्वत:हुन नूतनीकरण करून मला का नाही पाठवला, का पेन्शनर देतो तसे हयात प्रमाणपत्र द्यायचे होते मी ? बरे, मी अर्ज करतो पण उद्याच मला पुण्याला जायचे आहे तेव्हा माझ्यासाठी वनडे पास बनवा. “ त्यांचा मुद्दा अजबच होता, पण करतो काय, माजी बडे अधिकारी पडले ते ! मी त्यांना समजावले की एका दिवसात पास देणे अशक्य आहे, तरीही मी सर्व गेटला , तसेच टोल नाक्याच्या दोन्ही टोकांना फ़ोन करून सूचना देउन ठेवतो, मला तुमचा गाडी नंबर द्या, आणि साधारण वेळ कळवा. या वर ते एकदम खुष झाले व व्हेरी गुड असे म्हणाले. जरा वेळाने त्यांनी परत फ़ोन करून माझा मोबाईल नंबर घेतला का तर वाटेत कोठे अडचण आली तर ? मी सर्व गेटना फ़ोन करून त्यांचा गाडी नंबर दिला, साधारण वेळ दिली, त्यांच्याकडे कोणताही पास नाही पण ते माजी बडे अधिकारी असल्याने त्यांना आडकाठी करू नका असे सांगितले. दूसर्या दिवशी रविवार होता तरी घरून फ़ोन करून ते व्यवस्थित मार्गस्थ झाल्याची खात्री करून घेतली. चार दिवसानी परत त्यांनी अगदी पहाटे फ़ोन केला व मी आता पुण्याहुन परत निघालो आहे, तेव्हा जाताना केलीत तशीच व्यवस्था करायला सांगितले, ते पण काम केले तेव्हा साहेव एकदम खुष झाला ! दोन दिवसानी त्यांनी रितसर अर्ज केला, मी तो माझ्या साहेबांची सही घेउन संबंधित दोन विभागांकडे पाठवुन सुद्धा दिला.

असाच एकदा मला त्यांनी रजेच्या दिवशी, अवेळी फ़ोन केला. तुमचा गेटचा स्टाफ़ ओळख दाखवुनही मला आत सोडत नाही अशी तक्रार केली. मी चौकशी केल्यावर कळले की पास त्यांचा एकट्याचाच आहे, सोबत चालक आहे, बायको आहे एकवेळ त्यांनाही सोडू पण अजून एक आहे त्याला कसे सोडू ? तेव्हा मी बड्या साहेबांना समजावले की सुरक्षा सध्या थोडी कडक आहे, कृपया सहकार्य करा, तुम्ही बाहेरच्या रस्त्याने आमचा टोल नाका गाठा. थोड्या वेळाने परत फ़ोन, “तुम्ही काय माझा सतत पाण़उतारा करायचे ठरवले आहे काय ? मी कोण आहे माहीत आहे ना ? तुमचा हा फ़डतूस क्लार्क म्हणतो माझ्याकडचा पास इकडे चालणार नाही म्हणून, काय चाललाय काय ? चौकशी केल्यावर कळले की त्यांना अजून रोड पास दिलाच गेला नाही आहे. अर्थात ही चूक आमचीच असल्याने मी परत फ़ोनवरच सूचना देउन त्यांचा मार्ग मोकळा केला, जायचा व यायचा सुद्धा ! मग कामावर पोचल्यावर त्यांच्या रोड पासचे लाल फ़ितीत अडकलेले काम सुद्धा मार्गी लावले.

त्या नंतर २६/११ घडले, सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी फ़क्त एकच गेट उघडे ठेवले गेले, त्याचा एक अनपेक्षित फ़ायदा झाला ! फ़ोर्ट मधुन कल्याण, पुणे दिशेला जायचे असेल तर पी.डीमेली रोड, वाडीबंदर येथे प्रचंड वाहतुक कोंडीचा सामना करायला लागतो. बडे अधिकारी आमचा गोदी पास फ़्री घेउन फ़ोर्टे च्या ग्रे-गेट मधुन आत प्रवेश करून थेट माझगावला बाहेर पडत, पुढे लगेच आमचा रस्ता आहे तो थेट माहुलला जातो ! गोदीतल्या कंटेनर वाहतुक जलद व्हावी म्हणून तो बांधला गेला, आधी तो पुर्ण त्याच कामासाठी होता. पुढे गोदीतली कंटेनर वाहतुक जवळ जवळ बंदच पडल्याने, त्याची देखभाल परवडावी म्हणून तो टोल घेउन सर्वाना मोकळा केला गेला. अर्थात बड्यांना त्याचाही फ़्री पास द्यायला लागतो. आता कर्नाक बंदरचे एकच गेट उघडे असल्याने गोदी पास निरर्थकच ठरला होता. हे झाल्यावर गोदीत एक कार्येक्रम होता, त्याचे ठीकाण ग्रे-गेट कडून अगदी जवळ होते, साहेबाना तिकडे जायचे होते. वळसा वाचावा म्हणून ग्रे-गेट समोर गाडी उभी करून ते उघडायची तयारी चालु झाली. तेव्हा साहेब गाडीतुन खाली उतरले. माझ्यासाठी सुद्धा कोणताही नियम मोडायची गरज नाही. गाडी बाहेरच राहू दे, मी चक्रीने आत जातो ! योग्य तो सिग्नल गोदीला मिळाला ! नियम म्हणजे नियम ! काही दिवसानी कस्टम्सच्या एका पायलट बोटीचे अनावरण करायचे होते. त्यांनी विशेष बाब म्हणून ग्रे-गेट उघडायची विनंती(?) केली. साहेवांनी ती नम्र पणे फ़ेटाळली. मग सुरू झाले दबावाचे राजकारण, साहेबानी त्यालाही भीक घातली नाही. तेव्हा गेटच्या बाहेर एक ,व आत एक गाडी उभी करून तो पेच सोडवला गेला.

काही दिवसांनी परत ’त्यांचा’ फ़ोन आला. तुमचा स्टाफ़ मला आत घेत नाही. हा काय प्रकार आहे ? मी त्यांना समजावुन सांगितले की आत जाउन तुमचा काहीही फ़ायदा नाही, कारण त्याच गेटने तुम्हाला बाहेर पडावे लागेल, हकनाक वळसा पडेल. मग हा पास फ़ूकटच आहे म्हणजे ! असा खवचट शेरा ऐकावा लागला .( हे दूसर्या अर्थाने सुद्धा खरेच होते !) मग बर्याच महीन्यानी त्यांचा परत फ़ोन आला, तुमचा स्टाफ़ मला बाहेर सोडत नाही म्हणून. वर तुमचे नाव सांगितल्यावर ओळखत नाही असे गुर्मीत म्हणतो ! तुम्ही एवढे चेयरमनचे सचिव आणि तुम्हाला ओळखत नाही म्हणजे काय ? मी चकीत झालो, बाहेर पडायला हे मूळात आत शिरले तरी कसे ? नवी व्यवस्था त्यांना माहीत होती. त्यांना मी याची नम्रपणे जाणीव करून दिली तेव्हा ते चुकून आलो, आता एवढा आलोच आहे, तर एकवेळ सोडा ! मला खूप घाई आहे. आणि माझे जाउ दे हो, तुम्हाला पण तो किंमत देत नाही म्हणजे काय ? त्याचा रीपोर्टच करा ! बोलण्याच्या ओघात ते असेही बोलून बसले की या आधी तुमचे नाव सांगितल्यावर दोनदा मला सोडले गेले आहे ! मला क्षणात सर्व परीस्थीतेचे आकलन झाले. त्यांचा चूकलो, हा सरळ सरळ कांगावा होता, उलट माझे नाव सांगून तो दोनदा असे गेला होता, सोकावला होता ! मला आता हरभर्याच्या झाडावर चढवुन आपले काम होईल असे त्याला वाटले असावे. मी त्यांना सांगितले की आपण स्वत: जबाबदार माजी अधिकारी आहात, नियम तुम्हीच तोडणार असाल तर त्याला अर्थ काय ? आमचे साहेब स्वत: या बाबतीत आदर्श घालुन देत असताना आम्ही तुमचा तरी अपवाद का करायचा ? तुम्ही कृपया गाडी परत फ़ीरवा व आलात तसेच बाहेर जा. लगेच मी इंटरकॉम वरून फ़ोन करून गेट-कीपरला सक्त ताकीद दिली कि कोणत्याही स्थितीत गेट उघडायचे नाही ! पाच मिनीटाने त्या गेट कीपरने फ़ोन केला व साहेब तो जामच तमाशा करतोय, थयथयाट चालला आहे नुसता, मोठी मोठी नावे घेत आहे, सोडू का एक वेळ ? मधल्या मध्ये आमच्यावर संक्रात ओढवायची, तुम्ही नामा-निराळे व्हाल. मी म्हटले अजिबात नाही. मी तुमच्या पाठीशी आहे, निर्धास्त रहा ! ते गेट तोडू तर नक्कीच शकणार नाहीत. तुम्ही त्यांना कोणतेही उत्तर देउ नका, अगदीच वेळ आली तर मला फ़ोन करा. पुढची सलग दहा मिनीटे तो बडा माझा मोबाईल ट्राय करत होता, मी तो घेतला पण नाही. मग त्यांचा संयम संपला व त्यांनी चक्क एसेमेस केला “you bloody fool, I will teach you a lesson”. मग मात्र मी त्यांना उलट फ़ोन करून ठामपणे सांगितले “इनफ़ इज इनफ़ ! एसेमेस करून तुम्ही मला भक्कम पुरावा दिलात त्याबद्दल धन्यवाद ! तमाशा बंद करा, गुमान गाडी परत फ़िरवा, दहाव्या मिनीटाला तुम्ही बाहेर नाही पडलात, तर मी हा सर्व प्रकार चेयरमन साहेबांना कळवीन. तुमचा रोडचा पास मग रद्द सुद्धा होईल, mind this well ! मग मात्र तो जमिनीवर आला, ते गेट बाहेर गेल्याचा मेसेज दूसर्याच मिनीटाला मिळाला. काही वेळाने फ़ोन करून त्यांनी चक्क माफ़ी मागितली, झाले गेले विसरून जा, प्रकरण वाढवू नका अशी गळ घातली.

या एकाच प्रसंगातुन बरेच शिकता आले. हे शक्य झाले अर्थात साहेबांनी स्वत:च्या आचरणातुन एक आदर्श घालुन दिला होता म्हणूनच !