मंगळवार, २६ मे, २००९

शेन वॉर्न आणि सचिन, चकमक आणि युद्ध !

सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न – क्रिकेट मधली दोन दैवते ! चालत्या बोलत्या दंतकथा ! त्यांची थोरवी आता म्या पामराने काय वर्णावी ? क्रिकेटचा ओरिजिनल डॉन या दोघांनाच आपल्या वाढदिवसाचे एक्स्लुजिव आमंत्रण देतो यातच सर्व आले ! शेन सचिनला थोडा सिनियर असावा कारण आपल्या पदार्पणापासून सचिन त्याला झोडपतच मोठा झाला आहे. आता शेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन निवृत्ति पत्करून सुद्धा बराच काळ झाला आहे व त्याचा बळींचा विक्रम सुद्धा मुरलीधरनने मोडीत काढला आहे. मुरली चेंडू फ़ेकतो व शेनची शैली अगदी क्लीन होती. जेमतेम दोन पावले तो जे चालायचा त्याला रनअप असे म्हणणे सुद्धा अतिरेक होईल. फ़लंदाजाच्या ढेंगेमागुन दांडी उडवायचे कसब फ़क्त तोच करू जाणे ! सचिन मात्र अजूनही आपल्या बॅटचे पाणी पाजतच आहे व आता सिद्ध करण्यासारखे त्याला काहीही उरले नाही. जगज्जेत्ता सिकंदर , आता जिंकायला काही उरले नाही म्हणून (म्हणे) रडला होता, सचिनने सुद्धा फ़लंदाजीत काही करायचे शिल्लक ठेवलेले नाही, तसे कसोटी त्रिशतक किंवा लारासारखे चौशतक, वनडे मध्ये द्वीशतक बाकी आहे, पण त्याने काही त्याची महानता कमी होत नाही. शेन फ़लंदाज नव्हताच, सचिनने धावांचे डोंगर रचतानाच बळींच्या खात्यात पण चांगलीच भर घातली आहे, अनेक नामचीन फ़लंदाजांची डोकी त्याच्या शिकारखान्यात पेंढा भरून ठेवलेली आहेत.

दोन बड्यांची तुलना करायची खोड तशी जुनीच आहे. त्या मुळे शेन व सचिनची तुलना होतच राहीली. खरेतर सचिन फ़लंदाज अधिक उपयुक्त गोलंदाज व शेन निखळ गोलंदाज, तुलना करणार तरी कशाची ? पण मोह आवरत नाही. नुसती तुलना करून थांबतील ते क्रिकेटवेडे कसे ? त्यातही डावे-उजवे आलेच, कोण श्रेष्ठ ? दोघेही आपापल्या क्षेत्रात दिग्गज , प्रचंड लोकप्रिय, प्रतिस्पर्ध्याला पुरते नामोहरम करणारे, संघाचे तारणहार. शेन कधी कप्तान झालाच नाही आणि सचिन आपण कधी काळी कप्तान होतो हे विसरणेच योग्य समजेल. त्यांच्यातली साम्ये इथेच संपतात. मैदानवाहेर तर त्यांच्यात कमालीचा फ़रक आहे. सचिनचे पाय कायमच जमिनीवर राहीले, शेन उतला, मातला व घसरला सुद्धा ! ऐन विश्वचषकात अंमली पदार्थ घेतल्याचे सिद्ध झाल्याने त्याची जागतिक छी-थू झाली, काही काळ खेळण्यावर सुद्धा बंदी आली. शेन त्यातुनही सही-सलामत सुटला व यशस्वी पुनरागमन करता झाला. यशाच्या सर्वौच्च शिखरावर असतानाच सन्मानाने निवृत्त झाला , पण एक खंत मनात ठेउनच, सचिन त्याच्यापेक्षा काकणभर सरसच ठरला होता ! हे दोघे जेव्हा-जेव्हा आमने-सामने आले तेव्हा-तेव्हा सचिनने शेनला आपल्या बॅटचा हिसका दाखवलाच. स्वत: शेनने पण दिलखुलास कबुली दिली की सचिन आपल्या स्वप्नात पण येतो व सरसावत षटकार खेचतो ! दोघेही एकमेकांना मानतात, खुल्या दिलाने एकमेकांची तारीफ़ करतात पण त्यांच्या चाहत्यांना हे मान्य नाही. आतापर्यंत शेनची जादू सचिनवर कधीही चालली नाही, (सचिनच काय, तसे कोणाच भारतीयावर चालली नाही) तेव्हा शेन निवृत्त झाल्यावर हिसाब चुकता होणारच नाही याची खंत शेनच्या समर्थकांना स्वस्थ बसू देत नव्हती. जणु चमत्कार झाल्याप्रमाणे आयपीएल चे ऐलान झाले त्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार म्हणून शेनने पुन्हा अवतार घेतला, समोर सचिन मुंबई इंडीयन्सचा कर्णधार या रूपात उभा होताच. पहील्या स्पर्धेत शेनने असामान्य नेतृत्व गुण दाखवत सगळ्यात दुबळ्या संघाला विजयी केले, तिकडे सचिनचा संघ, मोठे-मोठे दिग्गज असतानाही भुईसपाट झाला. सचिन-शेनची आमने-सामने गाठच पडली नाही ! शेनवरील कलंक कायमच राहीला ! दूसर्या स्पर्धेत उभय संघातला पहीला सामना पावसाने वाहुन गेला. दूसरा सामना दोन्ही संघाच्या जीवन-मरणाचा प्रश्न होता म्हणूनच त्याला वेगळे आयाम लाभले, त्यात सचिन आणि शेन अशी लढत होणार होतीच वर त्यात ते आपापल्या संघाची धुरा वाहणार होते. परत असा योग येइल अशी फ़ारशी शक्यता नाही. दोन दिग्गजांमधील ती अंतिम लढाई होती. जखमी असूनही शेन, निव्वळ सचिनशी दोन हात करायची अंतिम संधी साधायचीच, याच इराद्याने मैदानात उतरला होता. दोघांचे चाहते धडधडत्या छातीने सामना डोळ्यात साठवत होते. अंतिम युद्ध !

मी टी.व्ही. ऑन केला तेव्हा सचिनने लागोपाठ तीन चौके हाणुन संघाला परत विजयाच्या वाटेवर आणले होते. धावगती आटोक्यात होती, विकेट सुद्धा शाबुत होत्या, सचिनने फ़क्त कॅरी करायची गरज होती. शेनने आधीच्या तीन षटकात फ़क्त १२ धावा दिल्या होत्या व दोन गडी टीपले होते. सचिन समोर असतानाच त्याने स्वत:च्या हातात चेंडू घेतला तेव्हा मी हादरलोच. शेन जुगारच खेळत होता. सचिनला सुर गवसला असताना त्याने खरेतर आपले षटक राखायला हवे होते , स्वत:च्या प्रतिष्ठेपायी संघाला धोका द्यायची काही गरज होती का ? पण तसेही त्याला दूसरा पर्याय तरी कोठे होता ? समोर सचिन भरात असताना इतर कोणाच्याही हाती चेंडू देणेच जास्त धोक्याचे होते. आणि तसे त्याच्या कडे गमावण्यासारखे होतेच काय ? सचिनने त्याला आधी अनेकदा फ़ोडले होते, त्यात फ़ारतर ’अजून एकदा’ असे झाले असते. पण सचिनला जर त्याला बाद करता आले असते तर मात्र त्याची पहीली पापे पार धुतली गेली असती, शेवटच्या संधीचे सोने शेनला करायलाच हवे होते !

आता सचिनच्या बाजुने विचार करू. तो आपल्या संघाचा कर्णधार होता. विजय त्याला हवाच होता. तो मैदानावर असेपर्यंत पराभवाचा विचारच कोणाच्या डोक्यात नव्हता. शेन जुगार खेळत होता म्हणून त्याला तो खेळायलाच हवा होता, असे काहीही नव्हते. जरा आठवा, निव्वळ सचिनचा करीष्मा जाणुन, “सचिनला फ़ोडले“ या मोठेपणापेक्षा संघाचा विजय महत्वाचा मानुन लारा, इंझमाम हक सारख्या फ़लंदाजांनी सचिनचे अख्खे षटक मान खाली घालुन तटवले होते ! सचिनला पण तो पर्याय खुला होता. शेनच्या पहील्याच चेंडूवर वाईड अधिक धावुन दोन अशा तीन धावा अनायसे मिळाल्याच होत्या. दूसरा चेंडू सचिन पार चकला होता, तेव्हाही त्याला स्वत:ला आवरता आले असते, पण शेनवर कायम हावी होण्याच्या नादात त्याचे भान सूटले. पुढचा चेंडू स्वीप करायचा त्याला प्रयत्न सपशेल फ़सला, चेंडू त्याच्या पॅडवर आदळला, शेनने जोरदार अपील केले व पंचाचे बोट आकाशाच्या दिशेने गेले ! सचिनचाच नाही, मुंबई संघाचाच निक्काल लागला होता जणू ! शेनने केलेला जल्लोश बघण्यासारखाच होता ! “बचेंगे तो और बी लडेंगे” याच खुमखुमीने दुखापती विसरून तो या अंतिम युद्धात उतरला होता व शेवटी निर्विवाद विजेता ठरला होता. अर्थात सचिनचा अपमान मात्र करण्यास तो धजावला नाही, एरवी दूसर्या कोणाही ऑसीने हा मोका सोडला नसता, अश्लील हावभाव करत, तोंडाने शिव्यांची लाखोली वहात ते सचिनवर धावून गेले असतेच असते. पण का कोणास ठाउक शेन या क्षणी तरी मातला नाही. सचिनला निराशा लपवता आली नाही पण पायचीतचा निर्णय त्याने खिलाडूपणे मान्य केला व आपल्या लौकीकाला जागला. जे सचिनने कर्णधार म्हणून केले नाही, त्याचीच नक्कल मग अजिंक्य रहाणेने केली, दोन षटकार खेचल्यावर स्टंप सोडून खेळायची काहीच गरज नव्हती. तसेच भज्जीला विकेट शिल्लकच नाही अशा स्थितीत , शेवटच्या चेंडूपर्यंत वाट बघता नसती का आली ? पण अर्थात या झाल्या जर-तरच्या गोष्टी, जिथे कप्तानच वाहवत जातो तिकडे शिलेदारांकडून अपेक्षा तरी का ठेवायची ? निर्णायक क्षणी शेनला आपली कामगिरी उंचावता आली, सचिन मात्र नेहमीसारखाच या बाबतीत या वेळीही कमीच पडला ! असंख्य चकमकी हरल्यानंतर , अंतिम युद्धात मात्र शेनच जेता ठरला. शेन वॉर्नच्या जिद्दीला माझा सलाम. कोणी हरो-जिंको, क्रीकेट जिंकले, फ़ायटींग स्पिरीट जिंकले , मला एवढेच पुरे !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: