सोमवार, ३० जून, २००८

दाउद इब्राहिमला अनावृत्त पत्र.

कधी येशील परतून ?

दाउद इब्राहिमला अनावृत्त पत्र.

प्यारे दाउद ,सलाम आलेकूम, तुझ्या भावाला कोर्टाने बाईज्जत रिहा केले हे तुले कळले असेलच. मुबारक हो मियाँ. मागच्याच आठवड्यात तुझ्या बहीणालाही भारतातील नि:स्पृह न्यायालयात न्याय मिळाला. हिंदी चित्रपटात जसा खलनायक नायकाच्या आईला अथवा प्रेयसीला ओलीस ठेवतो तसेच आबांच्या पोलीसांनी तुझ्या बहीणीला अडकवायचा विडा उचलला होता. तू तिला वाचवायला आलास कि पोलीस तुझाच 'गेम' करणार होते ! पण हसीनाच्या करीष्म्याने आबांचा हिरमोड झाला ! शेवटी बहीण कोणाची ? मान गये भाई ! या पारायणात मुद्द्याचे राहून जायचे. या दोन प्रकरणातून 'दुखके दिन बीते रे भैया' हेच दिसून येते. तेव्हा स्वत:चा प्यारा हिंदोस्ता सोडून तू तरी का बाबा असा दर दर के ठोकरे खात हिंडतो आहेस ? परवा दुबई तर आज कराची ?देशातीला आर्थिक विषमता दूर व्हावी म्हणून प्रस्थापित सरकारविरूद्ध तू बंड पूकारलेस. सरकारी ससेमिरा पाठी लागल्यामुळे तुझ्यावर परागंदा व्हायची पाळी आली. तरी तुझी लोकप्रियता वाढतच होती. मग सरकारने ९३ च्या बॉम्बस्फोटात तुला गोवले व मुस्लीम अतिरेकी घोषित करून तुझे परतीचे दोरच कापून टाकले. तुझ्या निष्ठावंत सहकार्यात (सरकारी शब्द गँग) सर्वच धर्माचे लोक होते. (सरकारी शब्द सेक्यूलर) या आरोपानंतर तुझे हिंदू सहकारी बिथरले, तुझी साथ सोडली. (पण पोलीसांना हे कोठे पटायला ? त्यांनी त्यांचा एन्काउंटरच केला !)तुला गंमत सांगतो. शिवाजी महाराजही आम्हाला लहानपणी कट्टर हिंदूत्वनिष्ठ वाटायचे. त्यांनी मुस्लीम आक्रमकांपासून मुस्लीम धर्म वाचवला ,वाढवला असा गैरसमज झाला होता. मग सरकारी क्रमिक पुस्तकातिन कळले की महाराजही सर्वधर्मसहभावी होते. त्यांनी खानाचा कोथळा बाहेर काढला हे ही खोट्टं.मग हाच न्याय तुला का नाही ? तू बापडा पवार साहेबांना फोन लावून बाकी कसलेही आरोप करा पण देशद्रोहाचा कलंक लावू नका असे विनवलेस. पण साहेब पडले पक्के राजकारणी. त्यांनी तू मूळात न फोडलेल्या बॉम्बमध्ये आणखी एक अधिकचा फोडला व इनोसंट संजूबाबाला पण गोवला. तू कलेवर नि:स्सिम प्रेम करणारा, कलाकारांवर खैरात करणारा, म्हणून ते ही तुझ्यासाठी कूर्बान होण्यास तयार. विजनवासात तू असताना तुला रीझवायला कलावंत दुबईला यायचे. सरकारने त्यांनाही धमकावले.सच्चा भारतीयाप्रमाणे क्रिकेटवर तुझे जीवापाड प्रेम. वाळवंटात तू क्रिकेट फूलवलेस. आपल्या खेळांडूवर दौलतजादा करून त्यांना आपलस करून टाकलस. छळ तरी किती सोसावा ? बेटीची सगाई झाली, तीही जावेदमियाँच्या पोर्याबरोबर, पण लाडक्या लेकीची बिदाईही तुला करता आली नाही. कसा तीळ तीळ तूटला असशील ते एक बापाचे मनच जाणो. हीच शादी जर कोकणात झाली असती तर कोकणी माणसाच्या डोळ्याचे पारणे फिटले असते व घाटावरल्या लोकांचे डोळे उघडले असते. भारतात कोठे खुट्ट झाल तरी तुझ्यावर खापर फोडून पोलीस आपले तंबाखू मळायला मोकळे ! आपल्याने काही होत नाही म्हटल्यावर त्या अमेरिकेलाही तुझ्याविरूद्ध भडकवले. तुला बढती मिळून तू आंतरराष्ट्रीय दहशतवादी झालास ! जॉर्ज अंकलचा रोष नको म्हणून दुबईने तुझी पाठवणी केली भारत-पाक मैत्रीचे खंदे पुरस्कर्ते मुशर्रफ मियाँकडे. तिकडे तुझी चांगली बडदास्त आहे हे वाचून बरे वाटले. पण म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती ! तू भारतात शेर असलास तरी आंतरराष्ट्रीय राजकारणात प्यादेच ! मुशर्रफ मियाँ पक्का लबाड आहे. आपली सत्ता वाचविण्यासाठी तो तुला भारताच्या ताब्यात न देता 'जिंदा या मुर्दा' सँम अंकला ला नजर करेल आणि तुझा सद्दाम होईल ! तेव्हा भारतात न्यायसंस्था स्वायत्त आहेत तोपर्यंत परत ये रे बाबा, तुझीही अवस्था कराचीचा समुद्र बघून 'सागरा प्राण तळमळला' अशी झाली असताना मातृभूमीला परतून का येत नाहीस ?तुझा आणि तुझ्याच वाटेकडे डोळे लावून बसलेला कोकणी माणूस.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: