शुक्रवार, २७ जून, २००८

गोष्टी - भाग २

कल्पवृक्ष !

चालून चालून दमलेला एक वाटसरू विश्रांतीसाठी एका झाडाखाली विसावतो. ते झाड असते कल्पवृक्षाचे ! मनातल्या सर्व इच्छा ताबडतोब पूर्ण करणारे ! त्याच्या मनात पहीला विचार येतो थंडगार पाण्याचा आणि काय आश्चर्य, कुठुनतरी थंडगार पाणी त्याच्या समोर हजर ! मग त्याला हवीशी वाटते मंद हवेची झुळूक आणि तत्क्षणी मंद वायूलहरी निर्माण होतात. आता त्याला पंच पक्वान्नाचे जेवण हवे होते आणि ते ही सत्वर हजर होते. मग असाच पंचगुणी विडा त्याला मिळतो व नंतर उंची मद्य ! मद्याचे घोट घेताना त्याला नवल वाटते की काय चाललय तरी काय ? ही भूताटकी तर नाही ? आणि मग भूत त्याच्या समोर अवतरते. माझी शंका खरी ठरली तर, आता हे भूत माझ्या मानगूटीवर बसणार ! आणि होते ही तसेच ! "आता हे भूत माझा गळा आवळून माझा जीव घेणार" मनात येते आणि --- खेळ खल्लास !

काळ , वेळ आणि स्थळ !

एका चिमणीला सकाळपासूनच मृत्यूची चाहूल लागली होती. जग़ण्याच्या आसक्तीने ते सैरभैर होउन इकडे तिकडे उडत होती. पण मृत्यूचे दूत काही तिचा पिच्छा सोडत नव्हते. एका गरूडाला तिची दया आली. त्याने तिला आपल्या पंखावर घेतले आणि प्रंचंड वेगाने तो हिमालयाकडे झेपावला. हिमालयातल्या सर्वात उंच शिखरावर त्याने तिला उतरवले. क्षणाधार्तच मृत्यूचे दूत तिथे प्रगटले व चिमणीचे प्राण त्यांनी हरण केले ! यमदूत गरूडाला बोलले या चिमणीचा काळ तसेच वेळ ही भरली होती. पण हीमालयाच्या नेमक्या याच शिखरावर तिचा मृत्यू लिहीलेला होता. आम्हाला काळजी वाटत होती की चिमुरडी चिमणी एवढ्या कमी वेळात या शिखरावर पोचणार तरी कशी ? पण तू ते काम सोपे केलेस ! काळ , वेळ व स्थळ तुझ्यामुळेच जुळले व आमचे काम झाले ! धन्यवाद !

उंटावरचा शहाणा !

एका शेतकर्याची म्हैस वैरणीच्या रांजणात तोंड घालते व ते तिला बाहेर काढता येत नाही ! त्या गावात एक उंटावरचा शहाणा असतो. समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्याला पाचारण करतात. घराला असते कुंपण ! शहाणा म्हणतो, मी उंटावरून खाली उतरतच नाही. सल्ला हवा असेल तर कुंपण पाडा, नाहीतर मी चाललो परत. कुंपण पाडून वाट केली जाते. शहाणा सल्ला देतो, यात काय विषेश आहे, आधी म्हशीची मान कापा! मान कापतात पण ती तर रांजणात अडकून पडलेली ! आता काय करायचे ? शहाणा सांगतो, सोप्पे आहे, आता मडके फोडा ! माझे काम झाले, मी चाललो !

देणारा कोण ?

एक धर्मपरायण शेटजी असतो. दूपारचे भोजन साधूसंतांबरोबर करायचे असे त्याचा नेमच असतो. गावात कोणी नवा साधू आला की त्याला बंगल्यावर भोजनाचे आमंत्रण मोठ्या अगत्याने दिले जाई. असाच निरोप मिळाल्यावर एक साधू मात्र उलटा निरोप पाठवतो "शेटजी तुम्ही मला आज जेवण देत अहात पण उद्या मला जेवण कोण देणार ?". शेटजीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतो. तो स्वत: सत्वर त्या साधूला भेटून त्याचे पाय धरतो व सांगतो, "साधू महाराज, तुम्हाला ज्याने काल जेउ घातले तोच आज तुम्हाला जेवण देणार आहे व नि:संशय उद्याही देईल !"

कोण राजा ? कोण भिकारी ?

एक मनमौजी साधू नगराच्या मुख्य रस्त्यातुन जात असतो. त्याच रस्त्यावरून त्या नगराचा राजा पण नेमका त्याच वेळी हत्तीवरून चाललेला असतो. राजाचे सैनिक रस्त्यावरील सर्वाना बाजूला हाकलत असतात व रस्ता मोकळा करत असतात. पण २ दंडूके लगावूनही साधू ह्टत नाही तेव्हा राजाच त्याला सामोरा जातो. मी या नगराचा राजा आहे, तू स्वत:ला समजतोस तरी कोण ? असे राजा त्या साधूला विचारतो. साधू म्हणतो "मी तर या दूनियेचा राजा आहे ! आणि राजा-राजा म्हणतोस तर तुझे कोण ऐकते ते तरी सांग ?". राजा सांगतो या नगरातले पान सुद्धा माझ्या आज्ञेशिवाय हलत नाही ! तसेच नगरातल्या कोणालाही मी ह्द्द्पार करू शकतो ! साधू म्हणतो मग तुझ्य1 नगरातल्या डासांना व चिलटांना हाकलून दाखवशील ! राजा निरूत्तर होतो व साधूला महालात येउन पाहुणचाराचे आमंत्रण देतो. असाच मस्तीत भटकत असलेला साधू राजाच्या महालासमोर उभा ठाकतो. त्याला राजाचे आमंत्रण आठवते व तो महालात प्रवेश करू लागतो, पण पहारेकरी त्याला अडवतात व सांगतात राजाला भेटण्यासाठी आधी वेळ घ्यावी लागेल. साधू म्हणतो मग हा कसला राजा तर एक सामान्य कैदी आहे व परत फिरतो ! हे राजाला कळताच तो धावत-पळत जाउन साधूचे पाय धरतो व त्याला महालात आणतो. त्याच रात्री राजा देवघरात प्रार्थना करून देवाजवळ सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य मागत असतो. साधू ते ऐकतो व जोराने म्हणतो ,"अरे तू तर भिकारी आहेस भिकारी ! मी इथे आता क्षणभरही थांबणार नाही !" आणि त्वरेने महालाबाहेर पडतो !

दारूचा नैवेद्य !

कसे कोण जाणे पण रामकृष्ण परमहंसाचा एक शिष्य दारूच्या आहारी गेला. अनेक प्रकारे समजाउनही तो व्यसनाच्या गर्तेत फसतच गेला. त्याला दारू सोडावी असे वाटतच नसल्यामुळे सर्व उपाय निरर्थक ठरत होते. शेवटी प्रकरण परमहंसाकडे गेले. कोणाला अमके कर असे सांगणे त्यांना मान्य नव्हते, पण तरीही परमहंस त्याला बोलावून निदान वर्षभरासाठी दारू सोडण्यास सुचवतात. व्यसनाच्या पूरता आहारी गेलेला तो साधक वर्ष काय एक दिवसही आपण दारू सोडू शकत नाही असे सांगतो ! तेव्हा परमहंस म्हणतात , ठीक आहे, हवी तेवढी पी पण एक कर ,पिण्यापुर्वी एक चमचाभर दारू देवासमोर प्रसाद म्हणून ठेवत जा ! साधक याला तयार होतो पण प्रत्यक्ष देवाला दारूचा प्रसाद दाखविताना त्याचा हात कापू लागतो, छे, काय तरीच काय, देवाला दारूचा प्रसाद ? दिवसातुन असे ४ ते ५ वेळा त्याला दारूची तलफ येते पण देवासमोर दारू ठेवायचे त्याला जमत नाही व त्या शिवाय दारू पिणेही जमत नाही. असे ३ ते ४ दिवस जातात. मग मात्र हा साधक परमहंसाच्या पायावर लोळण घेउन या अटीतुन सोडवा म्हणून विनवतो ! परमहंस सांगतात , अरे एक क्षण दारू सोडू न शकणारा तू ४ दिवस दारूचा थेंबही न घेता राहू शकत आहेस. मग असेच काही आठवडे, मग काही महीने, मग वर्षे राहणे काय कठीण आहे ? साधकाची दारू सूटते ती कायमचीच !

लाकूडतोडयाचा मुलगा !

लाकूडतोड्याचा मुंबईतला मुलगा प्रथमच बायकोला घेउन गावी आला होता. ज्या विहीरीत कु-हाड पडल्यामुळे सासर्याचा भाग्योदय झाला ती विहीर बघायची तिला फार ईच्छा होती. 'अय्या किती खोल आहे 'असे म्हणत असतानाच तोल जाउन ती विहीरीत पडते. आता देवाचा धावा करण्याची पाळी लाकूडतोड्याच्या मुलाची असते ! देव तत्परतेने बिपाशा बसूला बाहेर काढतो आणि ही का तुझी बायको ? असे विचारतो. लाकूडतोड्याचा मुलगी आधी हो मग नाही मग परत हो अशा अर्थाने माना हलवत राहतो व शेवटी निर्धाराने "हो" म्हणून सांगतो ! देव संतापून म्हणतो, कलीयुग म्हणतात ते हेच ! कोठे तुझा बाप आणि कोठे तू, या item girl ला आपली बायको म्हणून सांगतोस ! थांब तुला शापच देतो ! मुलगा धावत देवाचे पाय धरून आपले म्हणणे पूर्ण ऐकून तरी घ्या म्हणून विनवतो. "देवा, तुमची ही जुनीच खोड आहे, तुम्ही आधी बिपाशा, मग करीना आणि शेवटी माझी लग्नाची बायको बाहेर काढली असतीत, माझ्या प्रामाणिक पणाला भूलून तुम्ही या दोन फटाकड्यापण माझ्या गळ्यात बांधल्या असतात. कायद्याने याला बंदी आहेच वर या महागाईच्या काळात एक बायको सांभाळणे जड जाते तर तीन सांभाळताना माझे तीन-तेराच झाले असते.". हा खुलासा देवाला पटतो आणि बिपाशा बरोबर तो अदृष्य होतो. बराच वेळॅ थांबोन देव आपल्या मूळ बायकोला पण वर आणत नाही असे बघून "देवाची लीला अगाध आहे" असे म्हणत तो एकटाच घरी परततो !

न्यायबुद्धी !

लाक्षागृहाच्या आगीतुन पांडव बचावतात. पुढचा प्रवास भीषण अरण्यातुन असतो. दमलेल्या पांडवांना तहान लागते. युधीष्ठीर आपल्या सर्व भावंडाना पाणी आणण्यास पाठवतो पण यक्षाच्या शापाने सर्व मृत्यूमूखी पडतात ! पुढे यक्षाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देउन युधीष्ठीर त्याला प्रसन्न करून घेतो. हा कथाभाग सर्वाना माहीत आहे. पण त्या नंतर यक्ष सर्व पांडवांना एकदम जिवंत करत नाही. धर्माला तो आधी तुझा एकच भाउ जिवंत होईल असे सांगतो. धर्म तेव्हा नकुल किंवा सहदेव यातील कोणा एकाला जिवंत कर असे सांगतो. यक्षाचे रूप घेतलेला यम म्हणतो त्याहुन तू अर्जून किंवा भीमाला जिवंत करून घे, ते तुझे सख्खे भाउ आहेत, पराक्रमी आहेत, त्यांच्या सामर्थ्यावरच तू गतवैभव परत मिळवू शकशील ! धर्मराज ठाम पण नाही सांगतो. आम्ही तिघे कुंतीपुत्र आहोत व नकुल सहदेव माद्रीचे आहेत. कुंतीपुत्र म्हणून मी जिवंत आहेच म्हणून माद्रीचा कोणताही एक पुत्र जिवंत होणे जास्त न्यायपूर्ण आहे. या त्याच्या न्यायसंगत बोलण्यावर यमधर्म प्रसन्न होतो व माझी शेवटची परीक्षा पण तू उत्तीर्ण झालास असे सांगून सर्व मृत पांडवांना जिवंत करतो !

याचक !

एक राजा होता. विविध देवस्थानांना भेटी देउन तो भरपूर द्रव्य दान करायचा. पण या दानाची टिमकी वाजवायची त्याला वाईट सवय होती. देवस्थानांच्या पूजार्यांकडून आपली स्तुती ऐकून तो फार खूष व्हायचा ! असाच एक देवळाला तो सोन्याच्या नाण्यांनी भरलेले ताट दान करतो. पूजारी बहुदा कोब्रा असावा ! एकही शब्द न बोलता तो ते ताट देवा समोर ठेवतो. राजाला आश्चर्य वाटते. तो त्या पूजार्याला आढ्यतेने विचारतो "काय हो, माझ्या एवढा महान दाता तुम्ही या अधी कधी पाहीला होता का ?" ब्राह्मणाला त्याच्या बोलण्याचा रोख समजतो. आपल्या कनवटीला गुंडाळलेला बंदा रूपया तो त्या तबकात टाकतो व राजाला म्हणतो, "हे घे माझ्याकडून तुला दान ! लक्षात ठेव, माझ्यासारखा याचक पण तुला कधी भेटला नसेल !"

काय मागायचे ?

कृष्ण शिष्टाई फसते आणि कौरव व पांडव हे दोन्ही पक्ष सैन्याच्या जुळवाजुळवीला लागतात. आपल्याला सहानुभूती असलेले राजे हेरून दूतामार्फत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना आपल्या कडे वळविले जाते. स्वत: कृष्ण कोणाकडून यूद्धात सहभाग घेणार हे त्याने गुलदस्त्यातच ठेवलेले असते. कृष्णाला आपल्या बाजूला वळवण्यासाठी दूर्योधन व अर्जून हे दोघेही एकाच वेळी द्वारका गाठतात. ते जेव्हा कृष्णाच्या महालात प्रवेश करतात तेव्हा कृष्ण विश्रांती घेत असतो. अहंकारी दूर्योधन त्याच्या उशाला बसतो तर भक्त अर्जून त्याच्या पायाशी बसतो. कृष्ण उठल्यावर साहजिकच अर्जूनाला आधी पाहतो व त्याला येण्याचे प्रयोजन विचारतो. यावर दूर्योधन भडकतो व मी आधी आलो आहे तेव्हा माझे मागणे आधी ऐक असा ह्ट्ट धरतो. कृष्ण म्हणतो कोण कधी आले याच्याशी मला देणे घेणे नाही. मी अर्जूनाला आधी बघितले आहे. असो . आधी माझी भूमिका स्पष्ट करतो. तुम्ही दोघेही माझे आप्त आहत. हा गृहकलह टाळायचा मी प्रयत्न केला. आता मी कोणाही कडून यूद्धात भाग घेणार नाही. माझी नारायणी सेना मात्र यूद्धाल1 तयार आहे. तर तुम्हाला दोन पर्याय आहेत. एका बाजूला "न धेरी शस्त्र करी मी" असा मी आणि दूसरी कडे माझी नारायणी सेना. बोला तुम्हाला काय पाहीजे ? दूर्योधन पटकन नारायणी सेना हवी असे सांगतो व अर्जून मात्र जिथे श्रीकृष्ण तिथे विजय असे जाणून असल्यामुळे कृष्णाला आपल्या रथाचे सारथ्य करण्याची गळ घालतो. पुढे काय महाभारत होते ते आपल्या चांगले माहीतच आहे !

एका पैशाचे दान !

रोज काबाडकष्ट करून कमाई करणार्या तरूणाचा एक नेम असतो. रात्री झोपायच्या आत कमावलेले सगळे खर्च करून टाकायचे ! एका रात्री त्याला काही केल्या झोप लागत नाही. याचा खुलासा त्याला सकाळी होतो. आदल्या दिवशी २ पैसे शिल्लक राहीलेले असतात ! हे दोन पैसे तो एका भिकार्याला देउ करतो तर भिकारी दोन पैशाची भीक घ्यायला चक्क नकार देतो ! एका वकीलाला सल्ला विचारतो तर तो म्हणतो आधी सल्ल्याची ३०० रू. फी दे ! त्या राहीलेल्या दोन पैशापायी बिचार्या तरूणाच्या झोपेचे पार खोबरे होते. ते पैसे खर्च व्हावेत म्हणून तो आपला सगळे प्रयत्न करून बघतो, पण व्यर्थ ! असंच त्याच्या कानावर येते की आपल्या देशाचा राजा शेजारच्या राजावर आक्रमण करणार आहे. त्याल वाटते नक्कीच राजा गरीब आहे. आपले दोन पैसे त्यालाच देउन टाकू आणि मोकळे होउ. राजाला भेटून तो सगळा वृतांत कथन करतो. माझे दोन पैसे घ्या मग हे युद्ध टळेल, अनावश्यक प्राणहानि टळेल असे विनवतो. राजाचे डोळे उघडतात. कोठे रोजच्या रोज श्रम करणारा हा तरूण आणि आपल्या हव्यासापोटी प्रजेला संकटात लोटणारे आपण ! युद्ध टळते. संभाव्य हानि सुद्धा !

सगळे तुमचे, पाप मात्र देवाचे ?

एक असतो शेठजी. भला मोठा बंगला आणि भोवती त्याने स्वत: कष्टाने जोपासलेली बाग ! शेठजीला आपल्या कर्तबगारीचा सार्थ अभिमान. येणार्या जाणार्या प्रत्येकाला तो आपली बाग जरूर दाखवायचा. एकदा एक गाय त्याच्या बागेत शिरते व नासधूस सुरू करते. शेटजी रागावतो. हातातली काठी त्या गाईवर फेकतो. काठी नेमकी गाईच्या वर्मी बसते व ती गतप्राण होते. गोहत्येचे पाप शेटजीच्या पाठी पडते. पण तो पक्का वस्ताद, त्या पापाला सांगतो, काठीमूळे गाय मेली, पड तिच्या पाठी ! काठी म्हणते मी तर निर्जीव वस्तू, मी कशी गाय मारेन, मला हाताने गती दिली, धर त्या हाताला जबाबदार ! हात म्हणतो, माझ्यात शक्ती देतो इंद्र, तेव्हा तोच पापाचा धनी ! इंद्र म्हणतो, विष्णू सृष्टीचा पालनकर्ता, त्याच्याच आदेशावरून मी चराचरात शक्ती उत्पन्न करतो, तेव्हा तोच खरा या पापाचा धनी ! शेवटी पाप विष्णूकडे येते. विष्णू वेष बदलून शेटजीच्या बंगल्यावर येतो. शेटजी त्याचे छान आगत-स्वागत करतो. त्याला आपले सगळे वैभव दाखवितो, बंगला, घोडा, गाड्या आणि सगळ्यात शेवटी आपण कष्टाने फुलवलेली बाग ! सगळीकडे मी व माझे ! फिरत फिरत ते त्या मेलेल्या गाईजवळ येतात. विष्णू विचारतो ,अरे ही गाय कोणी मारली ? शेटजी म्हणतो काठीने ! विष्णू संतापून म्हणतो, वा शेटजी ! बंगला, गाडी, घोडा व बाग सगळे 'तुमचे' पण गाय मात्र काठीमुळे मेली ! ते काही नाही, गोहत्येचे पाप तुमच्याच माथी बसणार !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: