शुक्रवार, २७ जून, २००८

हाती काय लागले ?

हाती काय लागले ?
गेली १६ वर्ष मी सलग संगणक विभागात कार्यरत आहे. मुंबई गोदीत संगणकयुग आणण्यात मोलाची कामगिरी केली पण कामाचे मोल झाले का ? कदर झाली का ?संगणक विभाग जेव्हा सुरू झाला तेव्हा बाहेरची अनेक प्रलोभने सोडून त्यात काम करायला कोणी तयार नसायचे. धरून आणलेली माणसे चष्मा आहे, A.C. बाधतो अशी कारणे सांगून लवकरात लवकर कटायला बघायची. नवा आलेला माणूस काम शिकायलाच ३ महीने घ्यायचा व तो पर्यंत त्याची जाण्याची वेळ आलेली असायची. संगणकीकरणाला छुपा विरोध होताच, याने आपली नोकरी जाईल ही भीती होतीच ! शेख साहेबांसारखे खंबीर अधिकारी होते म्हणूनच आम्हाला पाठबळ मिळाले व उघड विरोध कोणी केला नाही. संगणकाची गाडी रूळावर आल्यावर मात्र अनेक जण काम करायला पुढे होउ लागले. मग मराठेच तिकडे सलग एवढी वर्षे कसा, त्याचा त्यात काय interest आहे , अशा विचारणा होउ लागल्या. कुजबुज मोहीम आमची वार्षिक बदली व्हायची तेव्हा तीव्र व्हायची. अनेक दावेदार पुढे यायचे पण मग 'ये अपने बस की बात नाही' हे समजल्यावर दूसर्याच्या खांद्यावर बंदूक ठेवली जायची. वरीष्ठांकडे खोट्या-नाट्या तक्रारी जायच्या ! माझ्या वर माझ्या वरीष्ठांचा पूर्ण विश्वास होता आणि मी जबरदस्त results देत असल्याने निर्धोक असायचो. मला मूदतवाढ मिळायचीच. सलग १२ वर्ष हा उंदीर-मांजराचा खेळ चालल्यावर मीच कंटाळलो. नवीन प्रणाली आल्यावर जे प्रोग्रँमर होते त्यांनाच काही काम उरले नव्हते तर आमची काय कथा ! पण बदली झाली ती पण दूसर्या संगणक विभागातच. तिथलीही बरीच कामे online केली. तिथेही एकदा मुदतवाढ मिळाली. त्यानंतर कामगारांच्या विभागातील संगणकीकरणावर २ वर्ष काम केले व परत मूळ जागी आलो आहे. एक वर्तूळ पूर्ण झाले आहे !शिकायला तर भरपूर मिळाले. स्वत:वरचा विश्वास वाढला. माझ्यातच द्डलेल्या अनेक सुप्त गुणांची मलाच नव्याने ओळख झाली. एरवी कधी ज्यांच्यासमोर जायचीही भीती वाटायची त्या अधिकार्यांबरोबर चांगला परिचय झाला. Employess Son म्हणून नोकरी लागली होती, सगळे ज.गो.मराठे यांचा मुलगा म्हणून ओळखायचे. कोठेतरी मनात सल, खंत होती. संगणक विभागात काम केल्यामुळे 'एकनाथ मराठे' हे नाव गोदी विभागात सर्व-परिचीत झाले. आता मला कोणी ज.गों. चा मुलगा असे न म्हणता याने गोदी विभागाचे संगणकीकरण केले असे ओळखू लागले. एरवी आमच्या विभागाचे दूसर्या विभागांशी सख्य कधीच नसायचे पण कामाच्या निमित्ताने सर्व विभागातील लोकांशी चांगला परिचय झाला, काही जीवाभावाचे मित्र मिळाले ! तेव्हा मी समाधानी आहे पण कधी विचार येतो हेच काम जर आपण एखाद्या खाजगी कंपनीत केले असते तर आज आपण कोठे पोचलो असतो ? संगणक विभागात दाखल झालो तेव्हा मी टँली-क्लार्क होतो. त्यानंतर 'सब घोडे बारा ट्क्के' याच न्यायाने दुय्यम श्रेणी लिपिक झालो, अजूनही तोच आहे ! पगारात एका पैचीही वाढ मिळाली नाही ! १५ ऑगस्ट व २६ जानेवारी येतात आणि त्याच्या बरोबरच एखादा सन्मान मिळायची आशा सुद्धा मावळते. सरकारी यंत्रणेत सर्वस्व झोकून काम करणार्याची कशी कुचंबणा होते त्याचे हे मासलेवाईक उदाहरण आहे. गंमत म्हणजे अनेक वर्ष पाट्या टाकणारे सुद्धा म्हणतात की कशाला खपायचे, मराठे करून घ्यायचा आहे का ?जाउ दे - गीता कधी काळी वाचली होती, फार नाही, पण 'आपण कर्म करत रहावे, फळाची अपेक्षा करू नये' हे मात्र चांगले उमगले आहे !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: