मंगळवार, १ जुलै, २००८

बोलणे सुंदर--वाचणे सुंदर -- लिहिणे सुंदर

बोलणे सुंदर--वाचणे सुंदर -- लिहिणे सुंदर--

बालके बाळबोध अक्षर घडसुनी करावे सुंदर

जे देखतांचि चतुर समाधान पावती

वाटोळे सरळ मोकळे वोतले मसीचे काळे

कुळकुळीत वळी चालिल्या ढाळे मुक्तमाळा जैशा

अक्षरमात्र तितुके नीट नेमस्त पैस काने नीट

आडव्या मात्र त्याहि नीट आकुर्ली वेलांड्या

पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपेतो पाहात गेले

येका टाकेचि लिहिले ऐसे वाटे

वोळीस वोळी लागेना आकुर्ली मात्रा भेदीना

खालिले वोळीस स्पर्शेना अथवा लंबाक्षर

पान शिषाने रेखाटावे त्यावरी नेमकचि ल्याहावे

दुरी जवळी न व्हावे अंतर वोळीचे

कोठे शोधासी आडेना चुकी पाहता सापडेना

गरज केली हे घडेना लेखकापासुनी

ज्याचे वय आहे नूतन त्याने ल्याहावे जपोन

जनासी पडे मोहन ऐसे करावे

भोवती स्थळ सोडून द्यावे मधेचि चमचमित ल्याहावे

कागद झडताही झडावे नलगेचि अक्षर

ऐसा ग्रंथ जपोनी ल्याहावा प्राणिमात्रास उपजे हेवा

ऐसा पुरूष तो पहावा म्हणती लोक

सुंदर अक्षर ल्याहावे पष्ट नेमस्त वाचावे

विवर विवरो जाणावे अर्थांतर

अभ्यासे प्रगट व्हावे नाही तरी झाकोन असावे

प्रगट होउन नासावे हे बरे नव्हे

अक्षरे गाळून वाची कां ते घाली पदरिंची

नीगा न करी पुस्तकाची तो येक मूर्ख

आपण वाचीना कधी कोणास वाचावया नेदी

बांधोन ठेवी बंदी तो येक मूर्ख

समूळ ग्रंथ पाहिल्याविण उगाच ठेवी जो दूषण

गुण सांगतां अवगुण पाहे तो येक पढतमूर्ख

आधीच सिकोन जो सिकवी तोचि पावे श्रेष्ठ पदवी

गुंतल्या लोकांस उगवी विवेकबळे

अक्षर सुंदर वाचणे सुंदर बोलणे सुंदर चालणे सुंदर

भक्ति ज्ञान वैराग्य सुंदर करून दावी

अखंड येकांत सेवावा ग्रंथमात्र धांडोळावा

प्रचित येईल तो घ्यावा अर्थ मनी

विद्या उदंडचि सिकला प्रसंगमान चुकतचि गेला

तरी मग तये विद्येला कोण पुसे

1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

वाचून छान वाटले! ही रामदासांची रचना आम्हाला ई.४थी च्या क्रमिक पुस्तकात होती. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.