रविवार, १३ जुलै, २००८

पत्ते पिसता पिसता !

पत्ते पिसता पिसता !
साधारणपणे वयाच्या तिसर्या चवथ्या वर्षापासून पत्याच्या खेळाशी आपली ओळख होते. सुरवात भिकार सावकार पासून होउन , गुलाम चोर, सात-आठ, पाच-तिन-दोन, मेंढी कोट, चॅलेंज, नॉट ऍट होम, रमी, बदाम सात, झब्बू, लेडीज , ब्रीज अशा अनेक डावात आपण पारंगत होतो. सूट्ट्या सूरू झाल्या की घरा-घरात मित्र-मंडळींचे अड्डे जमवून पत्ते कूटणे चालू होते. लांबच्या प्रवासात पत्त्यांचा जोड आठवणीने बरोबर नेला जातोच. लहानपणी आपलासा केलेला खेळ पुढे म्हातारपणी एकटेपणा घालवायला ही तेवढाच उपयोगी पडतो ! खरंच , या बावन्न पानांच्या खेळाने जगाचा कानाकोपरा व्यापला आहे. मला वाटत नाही की जगात असा एखादा भाग असेल जिकडे पत्ते खेळले जात नसतील.


चित्रपट आणि पत्ते यांचा पण अतूट संबंध आहे. खलनायकाचे चित्रपटातले पहीले दर्शन बहुदा एखाद्या क्लबमध्ये पत्ते, त्यातही तीन-पत्ता खेळतानाच होते ! (मला तरी मेंढीकोट खेळताना कोणाला चित्रपटात तरी बघितलेले आठवत नाही. )मग पत्ते लावणे, दूसर्याचे पत्ते चोरून बघणे, पत्ते बदलणे आणि शेवटी शो करून टेबलावरचे सगळे पैसे आपल्या कवेत ओढून घेणे हे सगळे दाखविले की खलनायकाची प्रतिमा लोकांवर ठसायची. पुढे पुढे नायक लोक पण पत्ते खेळण्यात तरबेज झाले. मग पत्यांतले शह-काटशह अधिकच रंजक होउ लागले. रमी , रम आणि रमणी असे अनोखे काँबिनेशन मग कोणत्याही देमार चित्रपटाचा अविभाज्य भागच बनून गेले, नायकाने शो केल्यावर हाणामार्यांचे प्रसंग कथानकात चपखल बसू लागले.


काही वर्षापुर्वी आम्ही तिन कुंटुंब दक्षिण भारतात सहलीला गेलो होतो. आमची मुले चॅलेंज खेळत होती. मी त्यांचा खेळ बघत होतो. पण खोटे पत्ते कोणीच लावत नव्हते ! कोणी चॅलेंजही करत नव्हते ! मग मी त्यांच्यात सामील होउन चॅलेंज कसे खेळतात हे दाखवून दिले. पत्त्यांत कोणतेही पान जास्तीत जास्त चार असताना मी 'और --' करत बारा-बारा पाने लावत असे हे बघून मुलांनी तोंडात बोटेच घातली. आणि मग जो खेळ रंगलाय विचारता !


पत्त्यांचा खेळ आपल्यावर नकळत अनेक संस्कार करीत असतो तसेच आपले शिक्षणही करत असतो. माणसे जोखायची, पारखायची किमया सुद्धा पत्ते पिसता पिसता सहज साध्य होते. पटत नाही ? मोजणीची आपली कल्पना पत्त्यांमुळे पक्की होते, नियम म्हणजे काय हे ही कळते, त्यांचा अर्थ समजतो, वर्गवारी करता येते, तर्कशक्ती वाढते, स्मरणशक्ती वाढते. कमी आणि जास्त मूल्य म्हणजे काय, एखाद्या एक्क्या पेक्षा हूकमाची दूरी प्रसंगी कशी जड ठरते हे हे शिकायला मिळते. संयम पण शिकता येतो, जोडीने खेळायच्या खेळात आपल्या भिडूला सांभाळून घ्यायची सवय लागते, पत्यांमधल्या जादू आत्मसात करून मित्रांची वाहवा मिळवते येते, त्या दूसर्यांना शिकवून त्या बदल्यात त्यांच्या जादू आपल्याला शिकता येतात. परंतू या ही पुढे जाउन माणसे निरीक्षणाने आपण जोखू शकतो. घरात पत्याचा जोड ज्या स्थितीत असतो त्या वरून त्या घरातली शिस्त, टापटीप पणा पहीले-छूट लक्षात येतो. पत्यांचे कोपरे दुमडलेले, जोकरचा वापर हरवलेल्या पानांना बदली पान म्हणून केलेला असेल , त्यातही मूळ पान परत सापडल्यावर, जोकरवर खाडाखोड करून 'आता हे पान असे आहे' अशा सूचना असतील तर त्याचा काय अर्थ घ्याल ? साधे पत्ते पिसणे किंवा त्यांना कतरी मारणे घ्या ! खूप जणांना हे काम सफाईने करता येत नाही. कोणाचे पत्ते पिसताना घरभर उडत असतात, लागेलेली पाने मिसळतच नाहीत. कतरी मारताना पण एका गठ्ठ्याच्या एकापानावर दूसर्या गठ्ठ्यातले पान पडले पाहीजे. पाने वाटताना पण आधीच्या पानावरच दूसरे पान पडले पाहीजे, पाने उडता कामा नयेत, ती कोणालाच दिसता कामा नयेत, रमीची प्रत्येकी तेरा पाने वाटताना ती परत मोजायची गरज वाटलीच नाही पाहीजे आणि हे सर्व जलद व्हायला हवे. तीच सावधगिरी पाने उचलून घेताना बाळगली पाहीजे. आपली पाने दूसर्याला न दिसणे हे मुख्य, त्यानंतर पाने बघून त्यांची वर्गवारी लावणे, त्यांची ताकद जोखणे, ती डोक्यात घट्ट बसणे हे जमले पाहीजे. काहीजणांना प्रत्येकवेळी पानांचा पिसारा करून पानी का बघावी लागतात तेच कळत नाही. पानांचा पिसारा पण आटोपशीर असला पाहीजे. पाने बघितल्यावर चांगली असतील तर काहीजणांना आनंद तर काहींना दु:ख लपविता येत नाही पण चेहरा कोरा ठेवणे जमले पाहीजे ! बदाम सात सारख्या खेळात काहींना बदाम सत्ती आपल्याकडे आहे हेच पटकन कळत नाही. या खेळात पाने बघितल्या बघितल्याच गेम प्लान ठरविता आला पाहीजे. अनेक जण ज्या रंगाचा राजा आपल्याकडे आहे तीच सत्ती अडवून आपल्याच पायावर धोंडा मारून घेतात ! काही तर लावण्यासारखे पान असूनही 'पास' म्हणत बसतात आणि मग ओशाळवाणे होतात. मेंढीकोट सारख्या खेळात काही जण धडाधड एक्के काढून सुरवात करतात आणि जोडीदारा कडे ती मेंढी नसली की जोडा मारल्यासारखे तोंड करतात. एकाच रंगाची एक्का आणि राणी आली असेल तर नीट खेळल्यास विरूद्ध पक्षाच्या राजाचा 'गेम' करता येतो. हाताचे महत्व असलेल्या खेळात काहीजण मध्येच खेळतात किंवा पान आधीच हातात घेउन ठेवतात, अशांना हरवणे मग कठीण जात नाही. आपली पाने दूसर्याला न दिसता त्याची पाने आपण बघणे ही कला सगळ्यांना जमत नाही. एकाची पाने दूसरा बघतोय आणि तिसरा दूसर्याची पाने बघतोय असेही बघायला मिळते. हूकूम बनवणे, ठेवणे सुद्धा सगळ्यांनाच जमत नाही. काहीजण नुसता एक्का असेल तरी त्या रंगाचा हूकूम बोलून बसतात व मग पस्तावतात. काहीजण उतरी करताना एवढा वेळ लावतात की हे पत्ते खेळत आहेत की चेस असाच प्रश्न पडतो. काहींचे खेळात लक्षच नसते, उतरी कोणती आहे, जड पान कोणाचे आहे, मेंढ्या किती बाहेर आहेत या विचारातच ते वेळ वाया घालवतात. खोटा खेळ खेळणारेही अनेक असतात पण त्यांचा खोटारडेपणा त्यांच्या गळ्यात मारणारेही काही कमी नसतात. माझे आजोबा पाउणशेव्या वर्षी सुद्धा सगळे हात लक्षात ठेवत असत ! रमी हा खेळ पण भन्नाटच आहे. नशीबाचा भाग सोडला तर समोरच्याला हवे असलेले पान दाबून ठेवणे, रमी कल्पकतेने फिरवणे/जमवणे, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना शो करणे हा एक कौशल्याचाच भाग आहे. Truly mind game !


मुंबईच्या लोकलमध्ये पत्ते खेळणार्या टोळक्यांनी बराच उच्छाद मांडला होता. त्यांचे उपद्रव मूल्य सोडले तर शिकण्यासारखे त्यांच्याकडून बरेच होते. ईतक्या कमी जागेत हे पत्ते कसे खेळतात याचे मला आश्चर्यच वाटे. रमी असेल तर पॉइंट पण बरोबर लिहीले जात,खोटरडेपणा कोणी करत नसे, आणि जर केलाच तर सरळ त्याच्या कानाखाली जाळ काढला जाई. एक डाव संपून पाने पिसून, कतरी मारून, सात-आठ जणात गोंधळ न होता पाने कधी वाटली जात ते कळत पण नसे, विलक्षण सफाई असायची या सर्वात ! आमच्या गोदीत पत्ते फारसे निषिद्ध नाहीत. कामगार लोक तर तो अगदी कोठेही खेळताना दिसतात. जहाजावर केबिनमध्ये पत्ते खेळताना असेच गुंग झाल्यामुळे जहाज गोदीच्या बाहेर पडलेले सुद्धा काही कामगारांना कळले नव्हते व नोकरी जायचा प्रसंग त्यांच्यावर ओढवला होता ! मुमरी हा गोदीतला अतिशय लोकप्रिय खेळ आहे. लॅडीज सारखेच याच्यात हात बोलायचे असतात (सगळे तेरा हात बोलणे म्हणजे मुमरी ) , फरक एवढाच की जो जास्त हात करणार असतो त्याच्या भीडूने आपले पाने उघडी करायची असतात,त्याच्या सूचनेप्रमाणे खेळायचे असते. या खेळाने काहीकाळ मला पार झपाटून टाकले होते. एकदा आम्ही कन्याकूमारीला जात असताना गाडीत हा खेळ खेळत होतो आणि आमच्या आरडा-ओरड्याने अख्खा डबा या खेळाच्या प्रेमात पडला होता !


पत्त्यांचे अनेक खेळ संगणकावर आहेत पण ते एकट्यालाच खेळता येतात. एक बरे असते, पत्ते आवरायची, हरवायची , वाटायची कटकट नसते, हवे तेवढे undo, redo, restart करता येते, हरल्याचे दु:ख नसते !माझ्याकडे एक solsuite 2004 म्हणून खेळ आहे, त्यात विविध प्रकारचे ४१२ खेळ खेळता येतात. खेळाचे नियम बदलता येतात, नवीन खेळ बनवता येतात. आपण खेळलेल्या प्रत्येक खेळाची साद्यंत आकडेवारी मिळते !


आता घरी खेळताना बायको आणि मुलगी व मी व मुलगा असे पार्टनर असतो. मायलेकींना रडीचा डाव चांगलाच जमतो, खाणाखुणा करून कोणत्या मेंढ्या आहेत, कशाला कट आहे हे व्यवस्थित communicate केले जाते व आमच्यावर कोटावर कोट चढत जातात. चांगली पाने नसतील तर सरळ डाव फोडून मोकळ्या होतात ! बदाम सात खेळताना पण त्या संगनमताने खेळतात व आमची चांगलीच दमछाक करतात. प्रियांका बरोबर सात-आठ खेळताना तर ती अनेकदा माझे सगळे हात सुद्धा ओढते ! मूंगूस खेळताना त्या दोघी अगदी सतर्क असतात व पेनल्टी खाउन खाउन आमचे गठ्ठे वाढतच असतात. पण पत्यांत हरायला सुद्धा एक वेगळीच मजा येते. हीच्या बरोबर रमी खेळतो तेव्हा सुद्धा मला हरायलाच आवडते कारण चूकून जिंकलोच तरी चीटींग चा आरोप काही चूकत नाही. तसा आयुष्याचा लग्न हा एक मोठा जूगार तर जिंकलोच आहे ! मग या पराभवाचे दु:ख कशाला ! अपने पे भरोसा है तो एक दांव लगा ले !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: