शुक्रवार, ४ जुलै, २००८

पुण्यनगरीतील स्वप्नवत सत्कार !

पुण्यनगरीतील स्वप्नवत सत्कार !


मालकांच्या आदेशाप्रमाणे ठीक दूपारी २ वाजता पनवेल- नवीन पनवेल जोडणार्या उड्डाण पुलाच्या पायथ्याशी उभा होतो. बरोबर २ वाजता निळ्या रंगाची honda city रस्त्याच्या बाजूला उभी राहीली. निनाद, ऍडी, आदी, कर्मी, सौरभ (दोन्ही),मंगेश जोगळेकर असे आत दाटीवाटीने बसलेले होते. पुण्याला जायचे होते. आता मला हे पनवेल स्टॅण्ड वर सोडणार व लाल डब्याने पुण्याला या असे सांगणार अशी अटकळ मी बांधली. इतक्यात आदी खाली उतरला, अलिशान honda city च्या मागील भागातुन त्याने आपली मोटर सायकल (आमच्या मदतीने) काढली. शिरस्त्राण घालून तो तिच्यावर स्वार झाला. त्याच्या जागी मी बसलो ! ऍडी ने आता गाडी पिटाळली टोल नाक्यावर. तिकडे IRB चे संचालक 'जातीने' उपस्थित होते. आमच्याकडे (का माझ्याकडे ?) बघून ते गूढ हसले टोल टोलवून आम्ही पुण्याकडे कूच केले.
पुण्याची हद्द जवळ आली आणि जागोजागी लावलेल्या कट आउटस ने माझे लक्ष वेधून घेतले. २० फूट उंचीच्या त्या पोस्टरवर माझ्यासारखा कोणाचातरी फोटो होता. 'बडे भय्यांचे' पुण्यनगरीत स्वागत आहे असे लिहीले होते. अरे मग तो फोटो पण माझाच असणार ! कमाल आहे पुणेकरांची ! पुढे चितळ्यांची बाकरवडी हाताने खूण करून छान आहे असे सांगणारा माझा फोटो होता. त्या पुढे मस्तानीची चव बघताना माझा फोटो व खाली स्वागतेच्छूक "मणीसा" असे लिहीले होते. थोडे पुढे फोटोत हारा ऐवजी प्रचंड अजगर गळ्यात दाखवला होता, पायाशी सिंह, वाघ हे प्रेमळ प्राणी व हत्तीने मला सोंडेत धरले आहे असे दाखविले होते. या पोस्टरची कर्ती-धर्ती कोण हे वेगळे सांगायची गरजच नव्हती ! थोडे पुढे 'कोब्रा युवा संघाने' स्वागताची कमान उभारली होती व त्यावर माझे १२१ टॉपिक (व त्याला आलेल्या पोस्ट कंसात ) हाराच्या स्वरूपात दाखविले होते. अरविंद परांजपे यांच्या स्वागत फलकावर आकाशगंगा दाखविली होती व ते काठी घेउन 'एक' स्वयंभू तारा दाखवत होते. मग मला ऍडी म्हणाला की तुमचा भव्य नागरी सत्कार पुणेकरांनी ठेवला आहे. जिकडे लाखभर कोब्रा जमले होते त्याच मैदानात ! जंगी कार्यक्रम आहे, रंगारंग आणि खचाखच ! मजा आहे बुवा 'एका'ची !
पुणेकरांच्या या औदार्याने मी पार भारावून गेलो. आणि मग दिसू लागला गर्दीचा महापूर ! क्षणभर मला आपण दादरच्या चैत्यभूमीवर तर नाही ना आलो असा भास झाला ! पुण्य नगरीतले समस्त कोब्रा या सत्काराला आले होते. महा-संमेलनात ते का नाही आले याचा मला आता उलगडा झाला. खरंच किती समजूतदार ! व्यासपीठ भव्य व अत्यंत आकर्षक होते. प्रायोजक होते अत्तरवाले केळकर ! सभेला उपस्थित अनेकांनी माझा फोटो असलेले टी-शर्टस, त्यावर माझ्या गाजलेल्या टोपिक्स ची नावे, माझ्या नावाच्या टोप्या, बिल्ले लावले होते. प्रचंड उत्साह उतू जात होता नुसता !
मैदानाजवळ मी येताच सनई चौघडे वाजू लागले तर व्यासपिठाच्या पायर्या चढत असताना तुतारी ! सचिन परांजपे यांनी मला पुणेरी पगडी घातताच असंख्य कँमेर्यांचे फ्लॅश लखलखले. लगेच 'लखलख चंदेरी...' या गाण्याची धुन वाजली. व्यासपीठावर स्मित हास्य करीत शरद, गंभीर चेहरा करून मंदार, धीरगंभीर मुद्रेचे चंदेशेखर साने, ह्सतमुख मनीषा, हातात मांजर घेतलेली कांचन, कोर्या चेहर्याचा प्रसाद बसला होता. युवा प्रतिनीधी म्हणून गोड नचिकेत होता. तेजश्री ने सूत्रसंचालक म्हणून सूत्रे हाती घेतानाच सर्वाना कार्यक्रमाचा कॅफे झालेला खपवून घेणार नाही म्हणून बजावले ! स्वागत झाल्यावर करमणुकीचा कार्यक्रम झाला. त्यात माझ्या टॉपिकच्या नावांची अंताक्षरी, वन्य प्राणी व माणसांचा एकत्रित डान्स, 'चेहरा बोलतो' या कार्यक्रमात निवडक चेहर्यांचा खरा परीचय, वादग्रस्त टॉपिकच्या आठवणी असा मसाल होता. मालकांचा 'मी हे टॉपिक का उडवले' हा तर ऍडीचा 'लाल शाई' हे कार्यक्रम विशेष होते. त्या नंतर महीला कट्ट्याची 'स्लीवलेस, जीन्स आमचा हक्क' ही नाट्य छटा झाली. त्यातल्या सर्वच कलाकरांनी स्लीवलेस घातल्यामुळे औरंग्याचे पित्त खवळले व तो तडक 'निषेध, निषेध' असे ओरडत मैदानाबाहेर पडला. अरविंद परांजपे यांचा 'तारे जमीपर' पण सगळ्यांची दाद घेउन गेला ! वातावरण खरे तापले 'सावरकर व रा.स्व.संघ या परिसं'वादा'त ! श्री. साने व सौरभ आठवले (गॉड) यांच्यातला सुसंवाद मुद्यावरून गुद्यावर येणार असे दिसताच मनोरंजन कार्यक्रमच गुंडाळण्यात आला !
सर्व मनोरंजनाचे कार्यक्रम झाल्यावर व गर्दी पार कमी झाल्यावर माझ्या सत्काराच्या कार्यक्रमाची घोषणा झाली. आता सूत्रे अमित श्री यांच्या हाती होती. त्यांनी कट्ट्याला मरगळ आली असतानाच कोणा 'एका'च्या आगमनाने कसे नव-चैतन्याचे वारे वाहू लागले ते सांगितले. त्या नंतर सचिन परांजपे यांनी माझ्या टॉपिक मध्ये खानदानी आदब कशी असते ते सोदाहरण सांगितले. शरदने मला मराठीत लिहीण्यास कसे प्रवृत्त केले ते सांगितले. अभिरामने कॉलेज लाईफ ने मला कसा नॉस्टेल्जीयात नेले ते सांगितले व अजून काही अप्रकाशित किस्से सागितले ! मग नरेंन्द्र यांच्या हस्ते माझा शाल , श्रीफळ, मानपत्र देउन सत्कार करण्यात आला, तसेच 'बडे भैया', 'टॉपिक काका' 'टॉपिक नाथ' या पदव्या सुद्धा टाळ्यांच्या कडकडाट प्रदान करण्यात आल्या ! त्या नंतर गुणेश ने समस्त कट्ट्याच्या वतीने मला एक थैली अर्पण केली व फ्रेंच मध्ये काहीतरी बोलून ती काढून घेतली ! मी ती थैली कट्ट्याला दान दिली असा त्याचा अर्थ होता हे मला देवाने सांगितले! त्या नंतर मी ज्याची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आला. honda city च्या किल्लीची अलीशान प्रतिकृती सांभाळत निनाद आला. माझ्या 'चेहरा बोलतो' या टॉपिक ला १०,००० + पोस्ट मिळाल्यामुळे ती गाडी मला मिळाली होती ! स्वागताला उत्तर देण्यासाठी मी उभा राहीलो खरा पण माझ्याने एक शब्दही बोलवत नव्हता. नुसते हात जोडून टाळ्यांच्या कडकडात मी खाली बसलो ! या वेळी माझ्या झिंदाबादच्या घोषणात एका लहान मुलाने 'अमर रहे' चा सूर मिसळला होता !
कार्यक्रम संपल्यावर शरदच्या घरी श्रीखंड-पुरीवर आडवा हात मारला. त्या नंतर मस्तानी चा आस्वाद घेतला. सचिनने तोंडात एक फर्मास पान दिले. मग गाडीत बसून आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. मालक escort सारखे मागे होतेच ! नवीन पनवेलच्या पुलाजवळ येईपर्यंत रात्रीचे बारा वाजले. मला सन्मानाने उतरवून निनाद गाडी उडवत गेला . मग मला आठवले अरे आपलीच तर गाडी आहे ना, मग --- ?
पुलावर पाय टाकताच नाशिक बेंजो का कोंगो वाजू लागला आणि पुल रोषणाईने उजळून निघाला. त्या प्रकाशात मला माझ्या स्वागताच्या असंख्य कमानी दिसल्या, भव्य दिव्य, माझ्या उंचीहून (दोन्ही अर्थाने) उंच कट-आउटस, पताका, विविध शुभेच्छुकांचे बॅनर दिसले. खासदार रामशेठ ठाकूर, त्यांचा मुलगा नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर, आमदार विवेक पाटील भले मोठे हार घालुन मला माझ्या ४२ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते. मला पनवेल भूषण पुरस्कार देण्यात आला. एका पोस्टर वर माझा फोटो व 'हार्बरकरांचे राम नाईक, समस्त हार्बर प्रवाशांचे पाईक' असे लिहीले होते. त्या खाली मी हार्बरच्या प्रश्नांवर जी पत्रे लिहीली होती तीच्या कात्रणांच्या प्रती डकवल्या होत्या ! पुल पार केल्यावर 'ब्राह्मण सभा , नवीन पनवेल' ची संपूर्ण कार्यकारीणी व सभासद पुष्प-गुच्छ घेउन उभे होते. मग लगेचच ४२ सुवासिनींनी औक्षण करण्याचा कार्यक्रम चालू झाला. दुतर्फा नववारी साडीत, नटून थटून उभ्या असलेल्या सुवासिनी, सुहास्य वदनाने मला ओवाळत होत्या.
सगळ्यात शेवटी जी सुवासिनी होती ती मला थोडी ओळखीची वाटू लागली. ओवाळताना तीने अचानक हातवारे सुरू केले, हळू हळू बाकीचा सगळा माहोल धूसर-धूसर होउ लागला. मग मला गदागदा हालवणार्या त्या चेहर्याची ओळख 'चांगलीच' पटली, 'ही'च होती ती. अरे उठ, तुझा वाढदिवस आहे म्हणून गोदी बंद ठेवणार नाहीत ! त्याच वेळी रेडीओ वर 'स्वप्नात रंगले मी--' चालू झाले !

२ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

y keep it up-SwaM

Divine Spirit म्हणाले...

ekdam first class ha...
bade bhaiyya...

Kanchan