शनिवार, ५ जुलै, २००८

विसरभोळेगिरी !

विसरभोळेगिरी !
लक्षात ठेवायची क्षमता प्राप्त झाल्यापासूनच मी विसभोळेगिरी करतो आहे ! म्हणजे नक्की कोणत्या वर्षी काय विसरलो हे ही विसरलो. लग्न झाल्यापासून एक बरे झाले, मी केव्हा केव्हा आणि काय काय विसरलो हे हीच्या चांगलेच लक्षात आहे त्यामुळे ते आता लक्षात ठेवायला लागत नाही !
लहानपणी मी चपला विसरायचो. कोठेही गेलो की चपल तिकडेच विसरायचो. एरवी ती परत मिळायची पण सहलीला गेलो असेन तर मात्र ती जायची ती जायचीच. मग बरेच दिवस अनवाणी फिरायला लागायचे. एकदा एक मित्राची चप्पल घातली होती , ती ही विसरलो होतो ! दहावीनंतर संघाचे एक महीन्याचे (OTC) शिबिर केले होते. त्या शिबिराच्या पहील्याच दिवशी आंघोळ करताना बनियन बरोबर जानवे ही बाहेर निघाले. ते परत घालायचे विसरलो ते अगदी आजतागायत ! तसे काही मंगलकार्य असेल तर तात्पुरते घालतो, मग मात्र न विसरता काढतो ! पण ते बरेच झाले, सोवळे आणि जानवे म्हणजे ब्राह्मण्यत्व नव्हे हे तसे लवकरच कळले !
सतत न विसरता सलग २६ वर्षे मी छत्री विसरत आहे. त्यात पण वैविध्य आहे, कधी ट्रेन मध्ये, कधी कामावर, कधी दूकानात, कधी रिक्षात, अजून कोठे कोठे ते मात्र आठवत नाही, हे मात्र विसरलो ! बरे दर वर्षी एकच छत्री विसरावी असा काही दंडक नव्हता, त्यामूळे कधी दोन तरी कधी तीन सुद्धा विसरून बसलो आहे. मागच्या वर्षी छत्री हरवल्यावर स्कूटर चालवताना पण उपयोगी पडतो म्हणून रेनसूट घेतला होता, तो या वर्षी पाउस पडायच्या आधीच ट्रेनमध्ये विसरलो ! परत नवा घेतला आहे. विरारला असताना सगळ्या कुटंबाकरता ४ छत्र्या घेतल्या होत्या. उतरताना त्या ट्रेनच्या रॅकवरच राहील्या. रिक्षात बसत असतानाच आठवले आणि जीवाच्या आकांताने परत फिरलो. छत्र्या मिळाल्या ! असे काही परत मिळायची ती एकमेव घटना !
दिवाळीत अनेक एजंट भेट-वस्तू द्यायचे त्यातल्या फार थोड्या घरी पोचल्या, बहुतेक ट्रेनच्या रॅकवरच विसावल्या ! पनवेलला आल्यावर विरारच्या घरी दिवाळीचा फराळ घेउन चाललो होतो. बायकोने टपरवेयरच्या ५ किलोच्या दोन डब्यात सगळा फराळ व्यवस्थित भरून दिला होता. हजारदा बजावून सांगितले होती की ही पिशवी मांडीवरच ठेवायची ! ट्रेनमध्ये बसल्यावर हेच पहीले विसरलो ! रॅक वर ठेवलेली ती पिशवी अर्थातच वडाळ्याला गाडी बदली करताना विसरलो. पुढे बांद्रयाला विरार गाडी पकडली, भाईंदरची खाडी पार केल्यावर काय विसरलोय ते आठवले ! तेव्हा धावपळ करून काहीही उपयोग नव्हता ! विरारला उतरल्यावर मग कॅडबरीचा गिफ्टपॅक घ्यावा लागला होता. ही पिशवी ज्याला मिळाली असेल तो खरंच किती भाग्यवान असेल ! पिशवी अधिक दोन ५ किलोचे टपरवेयरचे डबे अधिक स्वादीष्ट फराळ ! आयुष्यभर तो ही गोष्ट विसरणार नाही !
लोकलचा पास काढणे ही सुद्धा एक विसरायचीच गोष्ट ! दर महीन्याला विसरायला लागू नये म्हणून मी तिमाही पास काढतो. lifetime पास मिळणार असेल तर तो मात्र मी न विसरता काढीन ! आधी पास संपल्याचे तिकीट तपासनीस सांगायचा तेव्हाच कळायचे. मग कधी पावती फाडून , कधी चिरी-मीरी कधी सरकारी ओळखपत्र दाखवून सूटका व्हायची. लग्न झाल्यानंतर बायको आठवण करून देउ लागली, मग मोबाईल रिमाईंडर व आता दहा दिवस आधीच online पास काढतो त्यामुळे ही समस्या आता सूटली आहे.
कामावरच डबा विसरणे हे अजून एक प्रकरण ! कधी पूर्ण डबा, कधी झाकण, कधी चमचा असे सतत काहीतरी विसरतच असतो. आधी एक डबा विसरलो की ही दूसरा डबा द्यायची पण एकदा ते दोन्ही डबे विसरलो आणि मग हीने कठोर धोरण स्वीकारले, पहीला डबा आणल्याशिवाय डबा मिळणार नाही ! अर्थात मी डबा विसरल्यावर कामावरच्या माझ्या महीला सहकारी न विसरता घरून माझ्यासाठी काही चांगले-चुंगले करून आणतात , मला प्रेमाने भरवतात हे कळल्यावर मात्र ---- !!
तीच गोष्ट पेनाची ! आतापर्यंत मला पेनाची रीफील कधीही घ्यायला लागली नाही आहे, यातच सगळे आले ! आता एक बरे आहे, पेन हरवले असे कबूल न करीता मुलांनीच घेतले असणार असे म्हणून बचाव करता येतो.मोबाइल चार्ज करण्याकरता कामावर ठेवला की तो सुद्धा तिथेच विसरायचो मग घरी गेल्यावरच मोबाईल चार्ज करतो. तसे घड्याळ आणि मोबाईल घरी विसरतो पण त्यात तापदायक प्रकार असा की हे नेमके VT ला उतरताना आठवते आणि आधी शंका येते कोणी 'हात की सफाई' दाखविली की काय ? मग कामावर पोचल्यावर घरी फोन करणे, हीने अगदी अंत बघायला लावून, भरपूर तोंडसूख घेउन 'आहे घरीच' असे सांगणे, मगच सूटलो असे वाटते. स्कूटरची किल्ली तशीच सोडून जाणे हे आणखी एक ! हे पण गाडी सूटल्यावरच लक्षात येते. मग कोणा शिफ्टवाल्या मित्राला फोनाफोनी करून तिकडे पिटाळणे व ती किल्ली ताब्यात घ्यायला सांगणे व हे घरी सांगू नकोस हे बजावणे . एकदा मात्र चावी तशीच राहीली आहे हे परत स्कूटरजवळ येई पर्यंत आठवले नव्हते, विसरावे तर असे विसरावे !
नवीन लग्न झाल्यावर घरी फोन नव्हता, हीचा तेव्हा पत्रव्यवहार भारी होता. पोस्ट-पाकीटे संपल्यावर पुन्हा आणून ठेवायला मी विसरायचो, हीने लिहून पोस्टात टाकायला दिलेली पत्रे मी आठवडा- आठवडा विसरायचो. पुढे ती वरच्या खिषात ठेउ लागलो, मग मित्र आठवण करू लागले व पुढे पुढे स्वत:च ती पोस्ट करू लागले !
माझ्याकडे ज्यांनी ज्यांनी रजेचे अर्ज दिले त्यांच्या रजा केव्हाच पास झाल्या नाहीत, कारण ते अर्ज मी योग्य ठीकाणी द्यायलाच विसरायचो, यात माझेही अर्ज असायचेच ! असाच एक पनवेलचा मित्र घरी वैद्यकीय रजेचा अर्ज घेउन आला. सात दिवसाची ती रजा होती. मी अर्ज घेतला आणि घरी विसरेन म्हणून त्याच्या समोरच बॅगेत ठेवला, अगदी न विसरता ! सात दिवसाने त्याचा फोन आला की मला कामावर घेत नाही आहेत, अर्ज कोणाकडे दिला होतास ? अर्ज अजूनही माझ्या बॅगेतच होता ! मग मीच पळापळ करून ती भानगड निस्तरली !
असेच एकदा धावपळीत कामावर जायला निघालो आणि दारच उघडेना. अजबच प्रकार झाला होता. बाहेर पडायचा दूसरा मार्गच नव्हता, शेजार्यांना हाक देउनही उपयोग नव्हता कारण बाहेर सेफ्टी दरवाजा बसवला आहे. शेवटी मोठा स्क्रू ड्रायवर घेउन, ३० मिनीटे घाम गाळून दाराचे लॅच पूर्ण उचकटले, बघतो तर काय दारालाच बाहेरून चावी लावून ठेवलेली. ती लॉक कशी झाली हे अजूनही एक गूढच आहे ! रात्री उशीरा सगळे घरी आलो, लॅच उघडून आत आलो पण किल्ली परत काढून घेतलीच नाही ! माझ्या भरवशावर दरवाजे / खिडक्या बंद करणे बायको कधीही सोडत नाही कारण मी एकटा असताना दार नुसते लोटून झोपलेलो होतो किमान तीनदा ! एका वेळी तीच सकाळी घरी आल्यावर दार उघडे पाहून घाबरून गेली होती, मी मात्र आत झोपलेलो होतो !
तशी मी माझ्याकडून पुरेपूर काळजी घेतो, आधुनिक तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग करतो. reminder लावून ठेवतो (पण तो कशाकरता लावला आहे हे मात्र कधी कधी विसरतो !). सगळी बिले , विम्याचे हप्ते , लॉकरचे भाडे ECS/Auto Debit ने भरतो, मुदतीच्या ठेवी काढताना auto renewal पर्यायाला न विसरता YES करतो ! एकदा ते करायला विसरल्यामुळे मात्र ठेव संपून ६ महीने मोडल्यामुळे एका बॅकेला स्मरणपत्र पाठवावे लागले होते !
तसे एकदा(?) लग्न झालय हे (चांगलेच) लक्षात आहे, दोन मुले आहेत हे ही लक्षात आहे, त्यांना कोठे घेउन गेल्यावर विसरत नसे (आता ती मोठी झाल्यामुळे हे ती मला विसरू देत नाहीत हे वेगळे !). तसे सूरळीत चालू आहे !
या वरून एक विनोद मात्र चांगला लक्षात राहीला आहे. एक विसरभोळा शास्त्रज्ञ पॅराशूट बनवतो. त्याची चाचणी घेण्याकरता विमानातून उडी मारतो. थोड्या वेळाने त्याला समजते की आता आपण 'वरच' जाणार आहोत, कारण आपण उडी मारण्यापुर्वी पॅराशूट घ्यायलाच विसरलो आहोत !
अरे कमाल आहे ! काय विसरलो हे लिहायला बसल्यावर बरेच आठवत आहे की ! अजून काय बरे ---- ?? अरे बापरे ! हे सगळे सेव करायला विसरलो आहे ! आता हो काय करायचे ???

२ टिप्पण्या:

धोंडोपंत म्हणाले...

नमस्कार बंडोपंत,

ब्लॉग अप्रतिम झाला आहे. मनापासून अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.

आपला,
(स्नेही) धोंडोपंत

प्रशांत म्हणाले...

वाह! बहुत खूब बडे भैया.

हेल्मेट विसरण्याचे प्रकार दोन वेळा झाले होते. साधारणपणे आठ वर्षांपूर्वी एकदा स्कुटरची क्लचवायर तुटली असताना एका मेकॅनिककडे विसरलो होतो. ते तब्बल आठ दिवसांनी लक्ष्यात आलं व त्या मेकॅनिकला गाठलं. सुदैवानं ते हेल्मेट सुरक्षित होतं.
नंतर पुन्हा एकदा हेल्मेट विसरलो ते साधारणपणे दोन वर्षांपूर्वी एक दिवस एन.सी.एल.मधून व्हायोलिन क्लासला परस्पर जायचं होतं. सिंबायोसिसजवळ पोहोचलो तेव्हा अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे भांडारकर रस्त्यावरील "रंगोली"मध्ये चहासाठी थांबलो. पाऊस थांबला व मी हेल्मेट "रंगोली"मध्येच विसरून क्लासला गेलो. क्लास झाला व घरी निघालो तेव्हा हेल्मेट नाही हे लक्ष्यात आलं. तेव्हा बरंच आठवून पाहिल्यावर ते "रंगोली"तच राहिलं असल्याचा अंदाज आला व त्याप्रमाणॆ तिथे ते मिळालं देखील.

ते हेल्मेट माझ्याच भाग्यात असावं. इतकं विसरूनही पुन्हा मलाच मिळावं हा निव्वळ योगायोग नाही वाटत.

मस्तच जमला आहे तुमचा लेख.