शुक्रवार, ४ जुलै, २००८

कॉलेज लाईफ अर्थात कॉलेजातील दिवस !

कॉलेज लाईफ अर्थात कॉलेजातील दिवस !
मला वाणिज्य शाखेला प्रवेश घ्यायचा होता पोद्दार मधे , मार्क ७८% होते, ७५ % + मार्काला थेट प्रवेश मिळत होता. शाळेतुन निकालपत्र घेउन पोद्दारला आलो तर रांग पार माटूंग्याच्या कोपर्यापर्यंत पोचली होती ! इतर शाळा आदल्या दिवशीच निकालपत्र देत , ती मुले पहाटेपासूनच उभी होती ! साधारण चार तासांनी माझा नंबर आला आणि waiting list चालू झाली ! एक आठवडा वाट बघितली, प्राचार्यांनाही भेटलो पण ठाम आश्वासन मिळेना म्हणून वडाळ्याला नव्यानेच सुरू झालेल्या s.i.W.S. ची वाट धरली. पण तिथेही प्रवेश फुल्ल ! त्या प्राचार्यांना भेटलो. या वर्षी प्रथमच मराठी विषय तिथे सुरू होणार होता, प्रवेश मिळाला पण original certificate ठेउनच आणि दोनच दिवसात पोद्दार ला प्रवेश मिळाला, पण आता कॉलेज बदलायचा पर्याय बाद झाला होता. मला वाटते पुढील वर्षापासून दोन दिवस नुसते अर्ज वाटप आणि मग मेरीटप्रमाणे प्रवेश अशी पद्धत सुरू झाली !
SIWS अगदीच नवे होते. प्राध्यापक / स्टाफ बहुतेक दाक्षिणात्य पण प्राचार्य (गोवेकर) फक्त मराठी ! मराठी विषय घेतलेली आम्ही मोजून ४० टाळकी होतो, आश्चर्य म्हणजे अनेक मराठी मुलांनी हिंदी विषय घेतला होता पण एकाही अमराठी मुलाने मराठी घेतले नव्हते ! मराठी शिकवणार्या बुधकर मँडम त्यामुळे आम्हाला खूप जवळच्या वाटायच्या. मराठी फारसे कानावर पडत नव्हतेच पण बाकी प्रोफेसर vernacular medium ची मुले म्हणून आमची हेटाळणीच करायचे. organisation of commerce ला गिरी मँडम / मग गोखले मँडम , Economics ला मिस. उषा मँडम. अगदी राहवत नाही म्हणून सांगतो की यांचे लेक्चर कोणीही कधीही बंक केले नाही ! यांच्या लेक्चरला मुले पाठी उभी राहायची ! आमच्या बालमनावर फार परीणाम झाला यांच्यामूळे ! Secretarail Practice ला जोशी सर . हे मराठी नव्हते पण जोशी आडनावामुळे जवळचे वाटायचे ! शिकवायचे फारच छान ! English च्या मँडमचे नाव आठवत नाही पण पार डोक्यात शिरायच्या ! काँलेजचे कँण्टीन अगदीच बाल्यावस्थेत होते पण आमच्या सुदैवाने VJTI जवळच होते ! पुढे तेच आमचे official canteen झाले. तिकडच्या वाँचमनने आम्हाला कधीही ओळखपत्र विचारले नाही, आम्हाला वाटायचे चेहर्यावरून तरी आम्ही हूषार वाटत असावे ! तसा कोपर्यावर ईराणीही होताच. पानीकम चहाची ओळ्ख इथे झाली. पहील्याच दिवशी एका मित्राने आम्हाला mangola पाजला आणि पैसे द्यायच्या वेळी खिसे उलटे करून दाखविले ! आमक्या डोळ्यापुढे काजवे चमकले ! आम्ही म्हटले आमची I-CARD ठेउन घ्या , उद्या पैसे आणतो. पण मालक हसून म्हणाला, "इसकी कोई जरूरत नाही, कल देना पैसा !"
कॉलेज सुरू होउन काही दिवसच झाले होते. दूसर्या सत्रासाठी जात असताना raging चा प्रयोग रंगला होता. मला सगळ्या सिनीयर्स नी घेराव घातला होता. तेव्हा मी अगदीच बावळट, शामळू होतो (आताही काही फार फरक पडला नाही आहे !). उंची ४ फूट ९ ईंच, ह्डकूळा, कपडे साधेच, raging साठी अगदी आदर्श होतो ! पण एक चमत्कार झाला. त्या टोळक्यात माझ्या वरळीच्या लांबच्या नात्यतल्या बहीणीचा मित्र होता, साजन नावाचा. वरळीला गेलो असताना त्याची ओळख झाली होती. त्याने पटकन मला आपल्याकडे ओढून घेतले व म्हणाला "ये मेरा दोस्त है, इसे छोड दो" भाई असावा तो, लगेच माझी मुक्तता झाली ! अकरावीचे वर्ष असेच पार पडले, काहीही विशेष न घडता ! आम्ही मराठी मुले सतत घोळक्याने फिरायचो, एकमेकांचा आधार खूप मोलाचा वाटायचा. लेक्चर बंक निदान अकरावीला असताना तरी केल्याचे आठवत नाही. मराठी आधी भावे मँडम शिकवायच्या (बहुदा बातम्या वाचणार्या भाव्यांच्या पत्नी असाव्यात.) अगदी शेवटच्या सत्रात बुधकर मँडम आल्या आणि आम्ही मराठी मुलांना त्यांनी 'जागे' केले, आमच्यात नवा आत्मविश्वास ओतला ! आम्ही बारावीत गेल्यावर अकरावीत मराठी बँच आली त्यात अनेक उत्साही मुले होती. बुधकर मँडम यांचे मार्गदर्शनाने या नव्या दमाच्या मुलांना बेरोबर घेउन आम्ही कॉलेजात 'मराठी वाड्मय मंडळाची' रूजवात केली. उद घाटक होते कमलाकर व लालन सारंग हे कलाप्रेमी दांपत्य ! खूप छान झाला कार्यक्रम. मग आम्ही मागे वळून पाहीलेच नाही. मराठीतल्या अनेक नामवंत कलाकारांना आम्ही बोलावले आणि एक से एक कार्यक्रम सादर केले. मच्छीद्र कांबळी, लक्ष्मीकांत बेर्डे, रामदास आणि अपर्णा पाध्ये, व्.पु.काळे, यशवंत देव, नाना पाटेकर असे एकाहून एक दिग्गज कलाकार !
मी आमच्या सर्व कार्यक्रमांचे reporting करायचो. नवाकाळ मधे वडीलांमुळे ओळख होती. त्या मुळे आमचे सर्व वृतांत नवाकाळ सविस्तर छापायचा. 'SIWS मधे मालवणी' हा माझा मथळा तेव्हा खूप गाजला होता. मच्छीद्र कांबळी यांची ओळख तेव्हा आमचे प्राचार्य अय्यंगार यांनी मालवणीत करून देउन एकच धमाल उडवून दिली होती ! त्या बातमीचे कात्रण त्यांनी माझ्याकदून खास मागून घेतले होते. अनेक कलाकारांना जवळून बघता आले, त्यांचे नखरे, थेर, अडवणूक जवळून बघता आली. एक प्रसिद्ध कलाकाराची तासभर वाट बघून त्याला आणायला जेव्हा घरी गेलो तेव्हा स्वारी फूल टाईट होती ! उभे रहायचीही शुद्ध नव्हती ! कार्यक्रम रद्द करावा लागला !

दोन प्रोफेसर चांगल्या अर्थाने लक्षात राहीले आहेत. accounts शिकवणारे भाटकर सर आणि business law शिकविणारे साळवी सर ! प्रो. भाटकर यांनी स्वत:कडूनच पाच सहा बक्षिसे लावली होती त्यात एक हजेरी साठीचेही होते ! घाटकोपरवरून रोज टँक्सीने येत व जात ! आम्ही विचारायचो स्वत:ची गाडी का घेत नाही तर हसून म्हणायचे ज्याला व्यवहार समजतो तो हे कधीही करणार नाही. accounts चे सर्व problem तोंडी घालायचे ! ते पण रूपया पैशात ! त्यांची त्यात एकदाही चूक होत नसे ! सगळे आकडे त्यांच्या डोक्यात असत !साळवे सरांचे ईंग्रजी अगदी फर्डे होते ! ते ही वर्गात पुस्तक कधीही आणत नसत ! सगळी कलमे तोंडपाठ ! पहील्या लेक्चरची सुरवात "कायदा गाढव असतो" या वाक्याने करीत ! त्यांचे लेक्चर कधी संपूच नये असे वाटे !प्राचार्य अय्यंगार आम्हाला, fybcom ला , स्टँट्स शिकवत, त्याचेही ईग्रजी कानाला गोड वाटायचे ! traditional day ला महाषय चक्क लूंगी व शर्ट घालून आले होते ! एकदा आम्ही चक्क बाळासाहेब ठाकरे यांना एका कार्यक्रमासाठी आमंत्रण धाडले होते. हे कळल्यावर अय्यंगार हादरले, आम्हाला बोलावून घेतले व असे करू नका असे विनवले. आम्ही ते ऐकले पण त्या बदल्यात आमच्या कार्यक्रमांना निधी व कॉलेजचे सभागृह मिळवून घेतले !प्रा. बंडगर आमच्या NSS चे प्रमूख होते. पहीला कँम्प झाल्यावर मोटर सायकल विकत घेतली व सरळ सांगत की शिबीराच्या पैशातून 'बचत' करून घेतली म्हणून !

कॉलेजात असताना अगदीच सुमार रूप असलेला माझा एक मित्र rose day च्या दिवशी यच्चयावत सुंदरीना red rose द्यायचा ! मला कधी कोणाला पिवळे गुलाब देण्याचीही हिंमत झाली नाही (तसे मलाही कोणी कोठलेच गुलाब देण्याची तसदी घेतली नाही , ते अलाहीदा !) आणि हा पठ्ठ्या त्या दिवशी त्या सगळ्या सुंदर्यांबरोवर shake hand सुद्धा करायचा ! भले शाबास !अगदी अकरावी ते चौदावी, सलग चार वर्ष माझ्याच वर्गात शिकणारी एक मद्र्-सुंदरी होती. रोज कॉलनीत सकाळी दूधाच्या रांगेत आम्ही पाठी पुढे असायचो, पण एका शब्दानेही कधी बोललो नाही ! एकदा कॉलेजचे गँदरींग संपल्यावर एका मित्राने तिला बरोबर घेउन जाण्यास सांगितले तेव्हा मी चक्क वेळेआधीच कलटी मारली होती ! ती मात्र मला शोधत बराच वेळ थांबली होती !


अभ्यास बेतास बेत होता. NSS च्या १० मार्कानी बर्याचदा तारले ! हजेरी ७५% भरेल याची काळजी घ्यायचो तरी पण एकदा defaulter list मधे नाव आलेच, पण नशीबाने स्टाफ मधे माहेरचे मराठे आडनाव असेलेल्या एक मँडम होत्या त्यांनी घरी पत्र पाठवले नाही !वाचलो! NSS च्या कँपला जायचो, तेवढीच १० गुणांवर नजर ठेउन समाजसेवा ! BEST साठी रांगापण लावल्या ! शेवटच्या वर्षात मराठी मुलगा CR आणि पुढे UR म्हणून निवडला गेला आणि यशाचा कळस गाठून समाधानाने कॉलेज सोडले !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: