बुधवार, २७ मे, २००९

आंब्याचे अर्थकारण !

कोकण म्हटले की निसर्गसंपन्न प्रदेश समोर उभा रहातो पण त्याच वेळी मागासलेला व दरीद्री ही विशेषणे सुद्धा आठवतात। लहानपणी केव्हातरी “पिकवतोले परब व खातोलो अरब” असे काहीसे कानी पडले होते. पुढे आजोबांबरोबर आंबा विक्रीच्या पैशाची वसूली करण्यासाठी दलालांच्या घरची , जे सर्व घाटावरचेच असत, पायपीट करताना खात्री पटली की “खपतो रायबा आणि गबर होतो घाटबा” हेच योग्य आहे. कोकणातल्या आंब्याची चव हंगामात सगळ्यात आधी श्रीमंत अरब जरूर चाखतो पण फ़ूकट नक्कीच नाही. मग हे पैसे जातात कोठे तर अडत्यांच्या घशात !
माझे आजोबा, वडीलांचे चुलते, तसे मुंबईला आंबा पाठवण्याचे धाडस करणारे पहील्या पिढीचे मँगो मर्चंट ! धंद्यातले अनेक बारकावे आत्मसात केलेले मुरब्बी आंबा उत्पादक / व्यापारी। मुंबईत भाव मिळत नाही असे समजल्यावर लगोलग माल मिरजेच्या वा बेळगावच्या बाजारात पाठवायची कल्पकता पण त्यांचीच. दरवर्षी जुन-जुलै मध्ये त्यांची मुंबईवारी असे. हेतू एकच, घाटावरच्या दलालांनी थकवलेले पैसे वसूल करणे. आधी बाबा त्यांची सोबत करत, मी मोठा झाल्यावर व मुंबईची चांगली माहीती झाल्यावर बाबांनी माझ्यावरच ते काम सोपवले. ( साधारण १९८० ते १९९०) आजोबा तेव्हा मुंबईतल्या निदान ५ दलालांकडे आपला माल पाठवत. दलाल पट्ट्या पाठवत पण हिशोब चूकता करण्यात बरीच टंगळ-मंगळ करत, त्यांच्या उरावर बसल्याशिवाय वसूली होत नसे ! आमची मोहीम सकाळी १० वाजता चालू होई. बहुतेक व्यापारी महात्मा फ़ुले मार्केट मधले असत. गाळ्यावर त्यांना गाठले कि सांगत पेढीवर जा व पेढीवर गेलो की सांगत गाळ्यावर जा ! कधी आताच तुमचा ड्राफ़्ट बनवायला माणूस गेला आहे अशीही लोणकढी थाप मारत. पण आजोबा पक्के खमके होते. उद्या येतो ड्राफ़्ट काढल्याची व पोस्ट केल्याची पावती तयार ठेवा म्हणून खडसावत. मग तो दलाल, तुम्ही आता एवढे आलाच आहात तर ड्राफ़्ट रद्द करतो, उद्या संध्याकाळी रोकड घेउन जा म्हणून सांगे ! पुढची पिढी आता मुंबईला माल पाठवतच नाही. सांगली, मिरज व बेळगावच त्यांना जवळचे वाटते, नाहीतर कॅनिंग आहेच !
मधल्या प्रवासात आजोबांशी अनेक बाबींवर चर्चा होई आणि आंब्याचा धंदा करणे येर्यागबाळ्याचे काम नाही हे उमगे ! आधी मला वाटे आजोबा या धंद्यात बखळ पैसा कमवतात। साधा हिशोब होता, मुंबईत आलेला पहीला आंबा हजार ते दोन हजार रूपयाला पेटी या भावाने खपत असे, मग साधारण १००० पेट्यांचे किती ? मग मी पट्ट्या तपासल्या तेव्हा थक्कच झालो. जास्तीत जास्त भाव ३०० रूपडे होता व कमी म्हणाल तर पार ५० रूपये , त्यात लाकडी पेटीचीच किंमत २५ रूपये असे ! हे पैसे पण सगळे मिळत नसतच, दलाल हिशोब करताना सतराशेसाठ कलमे लावून त्यातले बरेच पैसे वळते करून घेत ! आजोबांना मी अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडे व त्यातुनच उमगलेले आंब्याचे अर्थकारण असे,
कोकणातले आंबा उत्पादक पुर्वापार दलालांच्या मार्फ़तच आंबा विकतात। हे दलाल एकजात सर्व घाटावरचे आहेत. आंब्याचा हंगाम जरी एप्रिल-मे असा असला तरी त्यासाठी वर्षभर खपावे लागते. कलमांना वेळोवेळी फ़वारणी , खते देणे, बागेतली तणे उपटणे या साठी पैसा लागतो. कोकणातल्या माणसाला कडकीने कायमचे घेरलेले. त्याची ही अडचण बघुन घाटावरले दलाल जानेवारीच्या आसपास कोकणात येतात व बाग मालकांना आगाउ रक्कम देउन बांधून घेतात. उत्पादकाला अगदी सुरवातीला चांगल्या भावाच्या पट्ट्या पाठवतात व मग मात्र भाव पाडून त्याला चांगलेच कोंडीत पकडतात. बरे हे पैसे सुद्धा द्यायला त्याला अनेक खेटे घालावे लागतात. माल कोवळा निघाला, ट्रकला अपघात झाला, गोदीतल्या संपाने भाव कोसळला ही व अशी हजारो कारणे त्यांच्याकडे तयार असतात. ३०० ते ५० हा पेटीला भाव देणारे दलाल याच पेट्या बड्या धेंडाना अवाच्या सवा भावाने विकतात व गबर होतात. आता तर स्थिती अशी आहे की परप्रांतातले व्यापारी , ज्यांना आंब्यातले काडीही समजत नाही, ते सुद्धा आंबा मोहरण्याच्या सुमारास येउन बागाच्या बागा खरेदी करतात ! कोकणी माणूस सुद्धा धंद्यातल्या अनिश्चिततेला घावरून जे मिळेल ते घेउन गप्प बसतो. यापुढे कोकणात गेल्यावर खायला आंबाच मिळणार नाही असे झाल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही !
हल्ली कोकणातला आंबा उत्पादक कॅनिंगच्या कच्छपि गेला आहे. सब घोडा बारा टक्का, या न्यायाने कॅनिंगवाले किलोच्या भावाने कलमी आंबा विकत घेतात व रोकडा पैसा देतात. आंबा उत्पादक म्हणतो मस्त आहे, आंबा नुसता उतरवायचा, प्रतवारी करायची गरज नाही, पेट्यात भरायची कटकट नाही, दलालांकडून फ़रपट नाही. पोत्यात आंबा भरा व रोकडे मोजून घ्या ! तसेही आमराईत खपायला, राखायला गडी कोठे मिळ्तात ?
सहकारी पतपेढ्या जवळपास नाहीतच ! आजोबांच्या घरी अनेकवेळा जिल्हा सहकारी संस्थचे गट विकास अधिकारी येत व सांगत की बोगस का होईना, सहकारी संस्था स्थापन करा, सर्व सभासदांच्या नावाने कर्ज घ्या व खुषाल बुडवा, निधी परत चालला आहे, पण छे ! काही उपयोग होत नसे. आंबा उत्पादक कधी संघटीत झालेच नाहीत, तसे प्रयत्न झाले , आप्पासाहेब गोगटे , जे पुढे रत्नागिरीचे आमदार सुद्धा झाले, त्यांचे कार्य नक्कीच उल्लेखनीय आहे, पण तो पॅटर्न कोकणभर राबवला गेला नाही, घाटावरच्या दलालांची मक्तेदारी तुटली नाही. आंबा पिकतो, रस गळ्तो पण कोकणचा राजा स्वत: झिम्मा खेळत नाही, नुसते बघतो ! शिमगा मात्र करतो ! या शापित प्रदेशाला काही उ:शाप आहे की नाही ?

1 टिप्पणी:

घातक म्हणाले...

Sunder lekh ahe... Ambyach "arth" karan nkki kay asat he atyant suspasht varnile ahe..