रविवार, २० सप्टेंबर, २००९

किस्सा खुर्सी का !

एकदा अचानक काहितरी काम निघाले म्हणून मी हापिसला दांडी मारली होती. दूसर्या दिवशी कामावर जाताच श्रॉफ म्हणाला, “मराठे, तुझी खुर्ची बरोबर नाही. तू एवढे महिने तिच्यावर बसून काम करतोस म्हणजे नवलच आहे. माझी तर पाठ काल एक दिवसातच कामातुन गेली. तक्रार दिली आहे माणसे येतीलच एवढ्यात.” खुर्ची हा एकच शब्द मला थेट भूतकाळात, १९८६ मध्ये घेउन गेला.

१९८६ मध्ये गोदी विभागात कामाला लागलो. डॉकयार्ड ते बॅलार्ड पियर एवढ्या विस्तीर्ण भागात जहाजांचे धक्के आहेत. धक्क्याजवळ तेवढ्याच अवाढव्य शेड. जहाजाने आणलेला माल त्यात ठेवला जातो. निर्यात करायचा माल सुद्धा तिकडेच आधी उतरवला जातो. टॅली घेणे म्हणजे या मालाच्या चढ-उताराची व्यवस्थित नोंद ठेवणे. आमच्यासाठी घडी करता येणार्या खुर्च्या असायच्या. शेड मधुन त्या ताब्यात घेउन धक्क्यापर्यंत न्यायला लागायच्या. अनेक क्लार्क त्या फ़रफ़टत नेणेच पसंत करत ! खुर्ची एक, त्यावर बसणार दोघे ! मुंबई बंदराचे प्रतिनीधी म्हणून आम्ही, टॅलीक्लार्क आणि जहाज एजंटाचे प्रतिनिधित्व करणारे बोर्डाचे क्लार्क ! हे क्लार्क एक नंबरचे कामचूकार ! शिफ़्ट सुरू होताना ते जे तोंड दाखवुन काळे करत ते काम संपतानाच उगवत. आमच्या नोंदीची नक्कल करून ते मोकळे होत. हेच काम विमा कंपन्याचे सर्व्हेयर सुद्धा करत. त्या बिचार्यांची अवस्था अगदीच खराव होती. पंधरा रूपये रोजावर ते काम करत. बोर्डाचा माणूस गुल असला तरी यांना आम्हाला माणुसकी म्हणून अर्धी खुर्ची द्यावीच लागे. ती खुर्ची शेवटी मोडायची. आमचेच अनेक क्लार्क काम संपल्यावर खुर्ची अशीच धक्क्यावर सोडून देत व मग ती अनायसेच भुरट्या चोरांच्या ( ट्रकचे क्लिनर ती सरळ गाडीत टाकून देत ! ) हाती पडे. कितीही वेळा नव्या खुर्च्या दिल्या तरी एका आठवड्यात “खुर्ची नाही” अशी स्थिती असायची ! मग हातगाडीवर, धान्याच्या गोणीवर कोठेही बसून टॅली घ्यायला लागायची. अर्थात प्रामाणिक पणे काम करणार्यांनाच याचा त्रास होई, अनेक जण सर्व्हेयरच्या जिवावर क्लबमध्ये खेळत बसत व शिफ़्ट संपताना परत येउन शेवटचा स्ट्रोक मारून मोकळे होत. एखादा दिवस जरी संपूर्ण खुर्ची, ती पण धड अवस्थेत असलेली बसायला मिळाली तरी चैन वाटायची ! तशी खुर्चीकरता अनेकदा आंदोलने झाली पण “आपलेच दात आणि आपलेच ओठ” अशी अवस्था असल्याने ती कधी तडीस गेली नाहीत.

१९९२ साली संगणक विभागात आल्यावर पहिले समाधान होते स्वत:ची चांगल्या स्थितीत असलेली लाकडी खुर्ची, ती सुद्धा पुर्णवेळ मिळाल्याचे ! संगणकावर काम करण्यासाठी वेगळी खुर्ची असते हे तेव्हा नुसते ऐकुनच ठावकी होते ! दोन वर्षानंतर नव्या इमारतीतला एक संपूर्ण मजलाच संगणक विभागाला देण्यात आला. माझे बस्तान इथे हलले. सेंट्रल एयरकंडीशनिंगचे मला एवढे नवल वाटले नाही पण साधारण ३७०० रूपयाची, गोदरेजची व्हील असलेली खुर्ची बघुन मी अगदी हरखुनच गेलो ! त्या खुर्चीत बसल्यावर जणू इंद्रपदच मिळाल्यासारखे वाटले ! खुर्चीत बसून स्वत: भोवती गिरक्या मारणे, ती खालीवर करून बघणे, व्हिलचा वापर करून एका जागेवरून दूसरीकडे जाणे हे सगळे आमचे खेळच झाले होते. तिची पाठ सुद्धा हवी तशी पाठी-पुढे करता येत असे. असल्या खुर्चीत बघून आम्हाला काम करताना बघून अनेकांचा तेव्हा जळफ़ळाट होत असे ! खुर्चीचा मान व माज म्हणजे काय असतो हे मला तेव्हा कळले ! मी तिकडे आठ वर्षे मनमुराद अधिकार गाजवला. अनेक जण त्याचा उल्लेख पेशवाई असाच करतात. नंतर माझी रवानगी त्याच इमारतीत चवथ्या मजल्यावर झाली. तिकडचे वातावरण अगदी उबग आणणारे होते. अपुर्या जागेत तब्बल १० माणसे काम करीत. अगदी एकमेकांच्या पाठीला पाठ लावुनच काम करावे लागे. सर्वत्र पसारा पडलेला होता. एसी नुसते नावाला होते. आणि हो , संगणक खुर्च्या पार मोडलेल्या होत्या. व्हील मोडलेली, बॅलन्स गेलेली होती, कुशन निघालेले होते, आर्म रेस्ट मोडलेले होते, खुर्चीची उंची कमी जास्त करणारी यंत्रणा बाद झालेली होती.

त्या वातावरणात काम करणे अगदीच असह्य व्हायचे. अगदी घुसमट हो़उ लागली. एका शनिवारी एक तास आधी कामावर येउन , सगळा पसारा बाहेर फ़ेकून दिला. मोडके संगणक, भंगारात निघालेले रॅक बाहेर काढले. नुसता एसी हवा म्हणून आत बसणार्यांना बाहेर हुसकावुन लावले. बसायची रचना बदलली. एवढे झाल्यावर आधीची कोंदट जागा अगदी ऐसपैस व हवेशीर वाटू लागली. एसी सुद्धा दुरूस्त करून घेतला. मग लक्ष वळले खुर्च्यांकडे ! गेली १० वर्षे नव्या खुर्च्या आल्याच नव्हत्या, तसा कोणी प्रयत्न सुद्धा केला नव्हता. आधीचा इन-चार्ज स्वत:पुरती चांगली खुर्ची (त्यातल्या त्यात) घेउन बसायचा, शक्य असूनही त्याने दूसर्यांना खुर्ची देण्यासाठी काहीही केले नाही. सनदशीर मार्गाने मी नव्या खुर्च्यांची मागणी लावुन धरली. बरेच कागदी घोडे नाचल्यावर मायबाप व्यवस्थापनाने प्लास्टिक खुर्च्या देण्याची तयारी दाखविली. मी तो प्रस्ताव धुडकावला व संगणक खुर्ची ही चैन नव्हे हे त्यांना समजावले. मी खूपच ताणून धरले तेव्हा माझ्याच जुन्या कार्यालयातुन एक खुर्ची मला देउ करण्यात आली. अर्थात मी त्याला सुद्धा नकार दिला. खुर्ची मिळत नाही म्हटल्यावर मी स्टुलावर बसून काम करण्याचा निर्णय घेतला व त्याची भरपूर बोंब सुद्धा केली. मोडक्या खुर्चीत बसून काम करण्यापेक्षा स्टुलावर बसून करणे खूपच सोपे होते. आमचा साहेव जेव्हा जेव्हा कामासाठी माझ्याकडे यायचा तेव्हा तेव्हा मला स्टुलावर बसलेले बघुन तो जरा वरमायचाच. त्याच्या बरोबर अनेक बडे अधिकारी सुद्धा असायचे. संगणक विभागाचा प्रमुख स्टुलावर बसून काम करतो म्हटल्यावर ते सुद्धा चमकायचेच ! शेवटी स्वत:च्या खास अधिकारात ५००० रूपये मंजूर करून खुर्च्या द्यायला ते तयार झाले. अर्थात सगळे पेपर-वर्क मी करायचे अशी अट घालूनच ! मला एकूण ६ खुर्च्या हव्या होत्या. गोदरेजची एक खुर्चीच ४००० रूपयाची होती. तेव्हा मी मशीदबंदर जवळील अनब्रँडेड खुर्च्यांच्या बाजारात गेलो. चांगल्या दर्जाची खुर्ची निदान १८०० रूपयाच्या खाली नव्हती. तेव्हा आधी दोन घेउ, अशा दोन दोन करत सगळा कोटा पुर्ण करायचे ठरले. सगळे सोपस्कार पार पडल्यावर जेव्हा पैसे घ्यायला गेलो तेव्हा ऑडीटने खुसपट काढून, खुर्ची फ़र्निचर मध्ये मोडते, आकस्मिक निधीतुन ती घेता येणार नाही असा नियम दाखवला ! सगळे मूसळ केरात !

याच काळात माझ्या खास ओळखीचे शेख साहेब बढती मिळून उप-गोदी प्रबंधक झाले. त्यांच्या कानावर सगळा प्रकार घालताच त्यांनी लागलीच गोदी विभाग प्रमुखांकडून १०,००० रूपये मंजूर करायचे आश्वासन दिले. मी लगेच माझ्या कार्यालयातुन तशी शिफ़ारस रवाना केली. एका आठवड्याने स्वत: शेख साहेबांनी फ़ोन करून १०,००० रूपये मंजूर झाल्याची खूषखबर दिली ! परत बाजार पालथा घातला. आधी १८०० रूपयाला उपलब्ध असलेल्या खुर्च्या आता २२०० रूपये झाल्या होत्या ! वॅट - मुल्यावर्धित विक्रीकर लागू झाल्याचा तो फ़टका होता ! निराश हो़उन मी दूकानातुन बाहेर पडत असतानाच मालकाने मला बोलावणे धाडले. मी त्याला दहा हजारात सहा खुर्च्या बसवायची गळ घातली. या वर त्याने सरकारी काम असल्याने पावती तर करावीच लागणार, पण तुम्ही रोख पैसे द्यायला तयार असाल तर जमेल कारण चेक घ्यायला आम्हाला महीनाभर खेटे घालावे लागतात वर वीस टक्के कट द्यावा लागतो असे सूचित केले. मी लगेच मला तुमची फ़ूटकी कवडी सुद्धा नको, पावतीसह ६ खुर्च्या तुम्ही पोचत्या करणार असाल तर मी तुम्हाला सगळे पैसे आगाउ द्यायला तयार आहे असे सांगितले. त्याने लगेच हसून ’डन’ केले ! अर्थात त्यासाठी त्याला हजार रूपयाचा ऍडवान्स मला माझ्या खिषातुनच द्यावा लागला. त्याच्याकडून मी रितसर कोटेशन घेतले व मोठ्या उत्साहात कामावर परतलो. सगळ्यांनी एकच जल्लोश केला. पण खरी लढाई पुढेच होती !

झारीतले शुक्राचार्य म्हणजे काय याचा अनुभव मला लेखा विभागात टेबलो-टेबली आला. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी “खांब खांब खांबोली खेळावे” लागले. जसे काही खुर्च्या मी माझ्या घरीच घेउन चाललो होतो. एवढा उत्साह दाखविलास तर सतर्कता विभाग तुझी चौकशी करेल असेही धमकावले गेले. ( चौकशी चालु आहे ती इतरांनी ४००० रूपयाला घेतलेल्या खुर्च्या मी त्याच्याही अर्ध्या किमतीत व त्याहून चांगल्या दर्जाच्या कशा घेतल्या याची ! कदाचित यालाच सगळे संबंधित घाबरले असावेत ! ) मी या सगळ्यांना पुरून उरलो. तब्बल तिन दिवस खेटे, हेलपाटे घातल्यावर , टक्के-टोमणे सहन केल्यावर हातात दहा हजार रोख पडले एकदाचे ! मग त्या दूकानात फ़ोन करून खुर्च्या तयार ठेवायला सांगितले. सहा खुर्च्या टॅक्सीच्या टपावर बांधून मी विजयी वीराच्या थाटात गेटवर आलो. इकडे पांढरा बगळा म्हणजे कस्टमचा अधिकारी आडवा आला. एक तास त्याच्याशी हुज्जत घातल्यावर मला त्याने खुर्च्या आत घेउन जायला मोकळिक दिली. लिफ़्टने खुर्च्या वर जात असताना सगळा स्टाफ़ ते दृष्य विस्मयाने बघत होता. कोणाच्या नजरेत कौतुक होते तर कोणाच्या असूया ! कामावर त्या खुर्च्यांची चक्क पूजा करण्यात आली. मोठ्या जल्लोशात आम्ही सगळे त्या खुर्च्यांवर स्थानापन्न झालो. माझ्या चिकाटीचे अनेकांनी खुल्या मनाने कौतुक केले पण त्यात सुद्धा “आता मराठेच्या घरी सुद्धा अशी खुर्ची असेल” असे कोणी फ़ूत्कार सोडलेच ! दुर्दैवाने त्याच आठवड्यात आमच्यातल्या चार जणांची बदली झाली, मला मुदतवाढ मिळाली. नव्या आलेल्यांना अनायसेच नव्या खुर्च्या मिळाल्या. मुदतवाढ मला सुद्धा मानवली नाही. खुर्चीच्या लढाईत अनेकांशी वैर पत्करावे लागले होतेच. कोणेतीही सूचना न देता माझी बदली तडकाफ़डकी श्रम विभागात झाली. इथे लाकडी खुर्च्या होत्या. परत संघर्ष करून नव्या खुर्च्यांसाठी मंजूरी मिळवली पण शेवटच्या टप्प्यात सायबाचीच बदली झाली व तो प्रस्ताव दफ़्तरजमा झाला ! लगोलग माझी सुद्धा नव्याने सुरू झालेल्या प्रकल्पात बदली झाली. माझ्या सुरवातीच्या कार्यालयातच ! माझ्या खुर्चीचा प्रश्न आला नाही ! पण इकडे मी “जिकडे संगणक तिकडे संगणक खुर्ची हवी” असा पण करून पाठपुरावा चालु केला. युनियनच्या मदतीने तो आता अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच तब्बल ३०० नव्या संगणक खुर्च्या सगळ्यांना मिळतील !

तिकडून झालो थेट चेयरमनचा पीए ! या खुर्चीचा दरारा तो काय वर्णावा ! माझी खुर्ची बिघडली आहे असे कळताच एखाद्या गंभीर आजारी रूग्णाला बघायला जशी गर्दी होते तसे अनेक जण गंभीर चेहर्याने ये़उन गेले. थोडे तेलपाणी केल्यास आहे तिच खुर्ची चांगली होईल हे माझे सांगणे कोणी मनावर घेतले नाही. शेवटी नवी खुर्ची मला देण्याचा निर्णय झाला. अवघ्या १० मिनिटात मी नव्या कोर्या खुर्चीवर स्थानापन्न झालो होतो ! संस्कृत सुभाषितात कळसावर बसल्याने कावळा गरूड होत नाही असे भले म्हटले असेल, सरकारी कार्यालयात मात्र अधिकाराच्या खुर्चीवर बसलेला आपोआपच महान होतो ! खुर्चीमुळे माणूस मोठा समजला जातो की कामामुळे ? कोणी सांगेल का मला ?

1 टिप्पणी:

समीक्षक म्हणाले...

अतिशय सोप्या आणि सुंदर पद्धतीने आपण आपला अनुभव रेखाटला आहे. खरोखरीच खुर्चीची किमया काही न्यारीच. खुर्चीसाठी एवढे कष्टही घ्यावे लागतात हे वाचून दुःख झाले. आपला लिखाणाचा प्रयत्न वाखाणण्याजोगा होता. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा.