गुरुवार, ३ सप्टेंबर, २००९

शंकर दिग्विजयाचे अग्रलेखांच्या बादशहाकडून अनोखे कौतुक !


माझ्या वडिलांनी विद्यारण्यविरचित शंकर दिग्विजय या संस्कृत काव्य ग्रंथाचे मराठीत भावांतर केले आहे. त्याची माहिती मी तुम्हाला आधी दिलेली आहेच.

वेगळ्या विषयावरचे पुस्तक असल्याने वितरक त्याला हात सुद्धा लावणार नाहीत हा आमचा कयास खराच ठरला. तसे हा ग्रंथ थेट पद्धतीनेच वितरीत करायचा व तो सुद्धा कोणाला भीड न पडता हे आधीच ठरवले होते. कोणीही तो भीडेखातर न घेणेच चांगले. जाणकारांच्या घरीच त्याचे योग्य स्थान आहे. या ग्रंथाची प्रेस नोट मी महाराष्ट्रात प्रसिद्ध होणार्या तब्बल ११ दैनिकांना पाठवली होती. चार ओळींची ही प्रेस नोट फ़क्त प्रहार व लोकमत ने छापली ! पुस्तकावर यथायोग्य परिक्षण लिहावे म्हणून सर्व संबंधिताना त्याची प्रत भेट म्हणून पाठवलि होती पण त्याची पोच सुद्धा कोणी दिली नाही. आणि अचानक नवाकाळच्या संपादकांनी स्वत: वडीलांच्या घरी फ़ोन करून उद्याचा अग्रलेख वाचा, तुमच्या ग्रंथावरच लिहेलेला आहे, असे शुभ वर्तमान दिले ! एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तुमच्या ग्रंथाचे छापील ५०० रूपयाचे मुल्य मी तुम्हाला बक्षिस म्हणून देणार आहे असेही घोषित केले ! माझ्या मते एखाद्या ग्रंथावर अग्रलेख लिहायचा प्रसंग विरळाच व तो बहुमान माझ्या वडीलांना मिळाला !

३१ ऑगस्टच्या नवाकाळमध्ये, आद्य शंकराचार्यांच्या रंगीत छायाचित्रासह पहिल्या पानवर छापलेला अग्रलेख दिसताच आम्ही सगळॆ हरखूनच गेलो. विरारला अंक सकाळी ९ च्या पुढे मिळतो, मला स्वत:ला अंक सीएसटीला मिळेपर्यंत १० वाजले ! पण विरारचा फ़ोन मात्र सकाळी ६ वाजल्यापासूनच अखंड खणखणत होता ! माझी १२ वर्षाची पुतणी, तिच्या नावानेच (’सानिका प्रकाशन’) ग्रंथ प्रकाशित झाला आहे, फ़ोनजवळच बसून होती, अगदी पुढचे २ दिवस ! त्या दिवसात तब्बल १०० पेक्षा जास्त प्रतींची विक्री झाली ! घरी येउनच तीसएक प्रती दर्दी वाचक घेउन गेले ! अनेक पुस्तक विक्रेते, अगदी दादरचा आयडीयल बुक डेपो सुद्धा, प्रती पाठवुन द्या म्हणून आर्जवाने सांगत होते ! पुस्तक विक्रीतुन फ़ायदा कमवायचा हेतु नव्हताच, तेव्हा शंकाराचार्यांचे सगळेच साहित्य माय मराठीत आणण्याचा वडीलांचा संकल्प दृढ झाला आहे. आता छोटीशी जाहिरात मोहीम सुद्धा राबवायचा विचार चालु आहे.

नवाकाळशी तसा आमचा घरोब्याचा संबंध आहे. वडील तब्बल १६ वर्षे नवाकाळ-संध्याकाळ साठी राशी-भविष्य लिहित होते. त्यांच्या खुशखुषीत लेखन शैलीवर वाचक फ़िदा होते व ते वाचण्यासाठी लोकांच्या उड्या पडत. वडीलांचे बोट धरून मी सुद्धा अनेकवेळा नवाकाळमध्ये जात असे. भाउंनी कधीतरी पाठीवर धपाटा सुद्धा मारला असेल तर कधी गाल ओढले असतील ! अर्थात या जवळकीतुन मी आमच्या कॉलेजातील मराठी. वाङय मंडळाचा वृत्तांत छापायला दिला होता. नवाकाळने तो कौतुकाने छापला होता व कॉलेजमध्ये प्राचार्यांनी कौतुक केल्याने माझी जी घौडदौड चालु आहे ती अगदी आजतागायत ! नवाकाळकारांना लाख लाख धन्यवाद ! तुम्ही आम्हाला कायमचे ऋणी करून ठेवले आहे !

मित्रांनो तुमचा प्रतिसाद सुद्धा हुरूप वाढवणारच आहे, धन्यवाद ! कृपया आपल्या भागातील ग्रंथालयाचा नाव, पत्ता, फ़ोन नंबर कळवत रहावा ही मात्र कळकळीची विनंती !

कळावे लोभ आहेच, तो उत्तरोत्तर वृद्धींगत व्हावा ही बिनती !!

३ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

'नवाकाळ'च्या संपादकांचं नाव मला माहित असावं, पण खात्री नाही. आचार्य अत्र्यांनंतर ज्यांना अग्रलेखांचे बादशहा म्हणता येईल, आणि अत्र्यांपेक्षा जास्त अभ्यासू, अशा गोवंदराव तळवलकरांचंही नाव महाराष्ट्रात सर्वपरिचित होतं असं सांगता येणार नाही. तेव्हा कृपया संपादकांविषयी माहिती द्या.

शिरीष म्हणाले...

मनापासून या ग्रंथात आम्हांला विशेष स्वारस्य आहे.

त्या ग्रंथाची माहिती आपण आपल्या संस्थळावर प्रसिद्ध केल्याबद्दल शतशः आभार...

ग्रंथ हातात मिळवण्याच्या प्रयत्नांति परमेश्वर असेल ही खात्री आहे...

प्रशांत म्हणाले...

पुस्तक प्रकाशित करणं आणि त्याची विक्री करणं अत्यंत अवघड आणि रिस्की गोष्ट आहे. तुमच्या वडिलांच्या कष्टाचं चीज झालं याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन!
-प्रशांत