शनिवार, १२ सप्टेंबर, २००९

बावळट , अगदी बाय डीफ़ॉल्ट !

चि.प्रसादची आणि माझी गाठ हल्ली जाता-येताच पडत असते. म्हणजे तो जात असतो तेव्हा मी घरी येत असतो व मी जात असतो तेव्हा तो घरी येत असतो ! मुलगा मोठा झाला याची अजून एक खूण ! तर, कामावरून आल्यावर जरा विसावत होतो तेवढ्यात चिरंजीव बाहेर जाताना दिसले. अर्धवट इन केलेला, पट्टयाचे एक टोक बाहेर लोंबकळत होते, जीनचा एक पाय अर्धवट वर दुमडलेला होता. त्याच्या निदर्शनास या बाबी आणताच त्याने, अरे बाबा .. असे म्हणून अटलजींप्रमाणे एक जीवघेणा पॉज घेतला .. मी तसे मुद्दामच केले आहे, बावळट दिसायची हल्ली फ़ॅशन आहे ! माझे प्रबोधन करून बाहेर सटकण्यापुर्वी “तू बनियन उलटा घेतला आहेस – (पॉज) – नेहमीसारखाच !” असा तोफ़गोळा टाकलाच त्याने !

बावळट दिसायची फ़ॅशन ? तरीच हल्ली बरेच तरूण केस अर्धवट कापलेले, दाढीची खुंट वाढलेले, ढगाळ शर्ट घातलेले, शर्ट अर्धवट खोचलेले, विजारींचे पाय खालीवर असणारे, चप्पल सुद्धा थोडी आत-बाहेर असलेले दिसतात – म्हणजे हे सगळे मुद्दाम केले जाते तर ! अर्थात हे माझ्या हातुन जेव्हा व्ह्यायचे तेव्हा मात्र न्हाव्याने फ़ूकटात डोई केली आहे का ? वडीलांचा शर्ट घातला आहे का ? कापड कमी पडले का ? चप्पल देवळातुन आणली आहे का ? असे टोमणे कानावर आघात करायचे. अर्थात मी कधी हे ठरवून करत नव्हतोच ! वेंधळेपणा, विसरभोळेपणाच्या जोडीला बावळटपणाचा शिक्का माझ्यावर अगदी बालपणापासूनच बसला आहे. या मुळे मला कधीच कोणी गंभीरपणे घेत नाही. माझ्याकडे बघून प्रथमदर्शनी तरी हा काही कामाचा आहे असे अगदी कोणा-कोणालाच वाटत नाही ! मी कोणी आहे / असू शकेन अशी धूसर शक्यता सुद्धा कोणाच्या मनात कधी येत नाही. बूटकेपणामुळे मी अगदी कॉलेजात जाउ लागलो तरी अनेकांना मी चवथी-पाचवीत, फ़ारतर सातवीतला विद्यार्थी वाटत असे. नंतर उंची बर्यापैकी वाढली पण त्या मानाने शरीरयष्टी अगदीच किरकोळ आहे. अगदी १९ व्या वर्षी नोकरी लागल्यावर सुद्धा गेटवर मला अडवून माझ्या ओळखपत्राचे बारकाईने निरीक्षण होत असे.

“यंदा कर्तव्य आहे” असे जाहिर केल्यावर अनेक कन्यका आगाउ सूचना न देता घरी येत, मी तेव्हा हमखास बनियन व लुंगीवर असे. बराच वेळ शांततेत गेल्यावर मुलीकडचा कोणीतरी नवरा-मुलगा कोठे आहे ? असे विचारत ! लग्न ठरल्यावर पार्ल्यात एका दूकानात चि.सौ.का. ला साडी घ्यायला गेलो होतो. जाताना रखवालदाराने हीच्यासाठी दार उघडले, कडक सलाम ठोकला व जाताना खरेदीच्या पिशव्या मात्र माझ्या हातात कोंबल्या होत्या ! “देखणी बायको दूसर्याची” हे दूसर्या अर्थाने सुद्धा बरोबर आहे. अर्थात लग्न झाल्यावर या गोष्टींची सवयच जडली. मुले झाली, ती शाळेत जाउ लागली. त्यांना कधी शाळेत सोडायचा प्रसंग यायचा. तेव्हा प्रियांका खूप श्रीमंत आहे, नोकर तिला सोडायला येतो अशी कुजबुज व्ह्यायची. त्या नंतर मला शाळेत नेण्यापुर्वी प्रियांका माझी १० मिनिटे आधी तयारी करून घ्यायची, आता मात्र तू माझ्या शाळेत यायचेच नाही असे तिने बजावुन सांगितले आहे ! कधी काळी फ़स्ट क्लासचा तिमाही पास काढायचो तेव्हा सुद्धा “विदाउट तिकिट घुमते है, वो भी फ़स्ट क्लास मे ? क्या डेरींग है ! असे ऐकायला लागायचे. चुकून कधी टीसी आलाच तर तो माझ्याकडे विजयी मुद्रेने यायचा. आसपासचे “बरी अद्दल घडली” असे म्हणायचे. अर्थात मी तिमाही पास दाखवल्यावर मात्र नक्की कार्यालयाकडून फ़ूकट मिळाला असणार असे तर्क व्हायचेच ! सेकंड एसीने सहकुटूंब प्रवास करताना टीसी माझ्याकडे “गडी माणसाला कशाला एसीने न्यायचे ? तो आला असता की जनरल मधून “ असा अविर्भाव चेहर्यावर आणतात . एकदा इस्त्रीचे कपडे आणायचा प्रसंग आला. कामावरून परस्परच गेलो होतो. इस्त्रीवाल्याने विचारले, मालकिणबाई बाहेरगावी गेल्या आहेत वाटते , साल्या बिनधास्त मालकाचे कपडे घालून मिरवतोयस ते ?” चक्की वाल्याकडे दळण न्यायला एकदा गेलो होतो तेव्हा तर “तुम नौकर लोग पीठ बदली करते हो और मेमसाब हमे डाटती है” असे एकावे लागले होते !

घरी असताना मी कधी सहसा दार उघडायच्या फ़ंदात पडत नाही. कारण “साब घरमे है क्या ?” असा किंवा मेमसाब को बुलाव, असा आदेश ऐकायला लागतो . असून मालक खास घरचा, नोकर समजती त्याला ! याचा एक मात्र फ़ायदा होतो, देणगी मागायला कोणी आले असेल तर मी बिनधास्त “साब और मेमसाव घर मे नही है !” असे सांगून दणकन दार लावून टाकतो. एकदा ब्राह्मण सभेची माहिती घ्यायला एक जोडपे घरी आले होते. मी त्यांचे आगत-स्वागत केले. त्यांना सगळी माहिती दिली. यावर ते म्हणाले, “तुझ्याकडूनच एवढी माहिती मिळाली, आता अध्यक्ष काय वेगळे सांगणार ? तरी आलोच आहोत तर निदान त्यांची तोंड-ओळख तरी करून दे.” मी ते बाहेरगावी गेले आहेत असे सांगून त्यांची बोळवण केली.

मुंबई बंदरात काम करताना संगणक युग आणणार्या टीम मध्ये माझा मोठा वाट होता. मला भेटायला अनेक जण तेव्हा यायचे. चूकूनही कोणी मला “तुम्हीच मराठे का ?” असे विचारले नाही. प्रश्न यायचा “मराठे साहेव आज कामावर नाही आले वाटते ?” आता चेयरमनचा पीए आहे, पण तसे काय बोर्ड घेउन फ़िरू का ? अगदी सुरवातीला सिक्युरिटी वाले पास विचारून हैराण करायचे. आता सलाम मारतात पण तो जुलमाचा वाटतो ! सालं काय पण नशीब असते एकेकाचे, असा चेहरा करून ! रजा, क्लेम असे काही काम असेल तर ते फ़ोनवर सुद्धा हो़उ शकते. पण मी मात्र स्वत:च त्या करीता हेलपाटे घालतो. संबंधित क्लार्क माझी मस्त बोळवण करतो. मी परत जात असताना त्याला कोणीतरी खाणाखुणा करून मी कोण आहे ते सांगतो. मग तो धावत पळत मला गाठतो , अगदी माफी सुद्धा मागतो पण चेहर्यावर मात्र प्रश्नचिन्ह असतेच !

अर्थात हा बावळटपणाचा शिक्का पुसायचा मी कोणताही प्रयत्न करत नाही. दैवी देणगी म्हणून मी ती स्वीकारली आहे. बावळट वाटावे म्हणून सुद्धा मला काही वेगळे करावे लागत नाही. मी आहे हा असाच आहे, दिसायला अगदी बा व ळ ट ! उलट हे सगळे मी मस्त एंजॉय करतो ! माझी खरी ओळख पटल्यावर समोरच्याचा तोंडात मारल्यासारखा झालेला चेहरा बघितला की मस्त मजा येते ! अर्थात माझ्या बरोबर काम केले की माझी खरी ओळख त्यांना होतेच व ती ते कधीही विसरणार नसतात. समर्थांनी म्हटलेच आहे, “वेष असावा बावळा परी अंतरी नाना कळा !”

२ टिप्पण्या:

साळसूद पाचोळा म्हणाले...

खुपच मजेदार आहे, त्याहुनही ते वास्तव आहे त्यामुळे वाचताना प्रचम्ड मजा आली, हसलो.....
लिखानात कुठलिच अतिशोयोक्ती जानवली नाही हे अति महत्त्वाचे.... यातिल कैक प्रसंग आम्हिही अनुभवलेत, आनी लोकांना अनुभवताना पाहिलेत..... तुम्ही मनशोक्तपणे ते एंजॉय करता आहात हेच तुमचे वेगळेपण....
.
गोदीच्या "मनोहर कोतवाल (भाइ कोतवाल) वाचलेत मी....
.

मी ही.. तुमच्यासारखाच .. बावळट , अगदी बाय डीफ़ॉल्ट !

साधक म्हणाले...

वाह वाह. एवढे सगळे प्रसंग खरे असतील तर अगदी मोकळ्या मनाने सांगायला धाडस पाहिजे बुवा!
समर्थांचा दाखला देउन शेवटही छान केलात.