गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०१४

लोकशाहीचा गाडा का अडला ? मतदार न फिरकल्यामुळे !

घोडा का अडला ? भाकरी का करपली ? पाणी का अडले ? या सगळ्यांचे उत्तर एकच आहे “न फिरवल्यामुळे” ! तसेच लोकशाहीचेही आहे ! लोकशाहीचा गाडा का अडला ? मतदार न फिरकल्यामुळे ! जिकडे लोकशाही रूळली आहे अशा देशात मतदानाचे प्रमाण 94 ते 98 % आहे व आपल्याकडे ते अजूनही 60 % च्या वर जात नाही ! आपल्या एका मताची किंमत मतदाराला अजूनही कळलेली नाही व ती कळावी या साठी प्रयत्नही करायची गरज सत्ताधार्यांना वाटत नाही ! जेव्हा जेव्हा विक्रमी मतदान होते तेव्हा तेव्हा सत्तांतर होते हा इतिहास असताना मतदानाचा टक्का वाढावा म्हणून कोणता पक्ष प्रयत्न करेल ? ही जबाबदारी निवडणुक आयोगानेच घ्यायला हवी. नुसते मतदार यादीत नावे आले म्हणून समाधान मानण्यात काय अर्थ आहे, मतदानही दणदणीत व्हायला हवे.

आपल्याकडे मतदान सक्तीचे नाही. जेमेतेम 60 % मतदान होते. काही राज्यात, मुंबईसारख्या शहरात तर ते 40 % एवढे कमी होते. या उदासीनतेतुन निवडून येणारा काय लायकीचा असतो व त्यातुन बनणारे सरकार कसे काम करते हे आपण बघतोच आहोत.  देशात जर खर्या अर्थाने लोकांचे प्रातिनिधिक सरकार असेल तर सरकारच्या प्रत्येक निर्णयला जनता विरोध कसा करते / होतो ? याचा सरळ अर्थ आहे की उमेदवार + सरकार तांत्रिक दृष्ट्या बहुमत मिळवून झालेले असते. लोकांचा मनसे पाठींबा त्याला नसतोच. सध्याच्या निवडणुक पद्धतीतला हा दोष दूर करायलाच हवा.

सरासरी 50-60 % मतदान होते तेव्हा काय होते ? ज्याच्याकडे अगदी 10-15 % ( जात, धर्म, झोपडपट्टी, दादागिरी ) मतांची वोट-बँक आहे तो निवडून यायची शक्यता खूपच वाढते. 10-15% त्याची स्वत:ची मते, 10 % प्रचार करून, आश्वासने देवून व 2- 5% गैरमार्गाने ( विकत !) – अशी मतांची बेगमी केली की झाला विजय निश्चित ! निवडून यायची पात्रता हा एकमेव निकष तिकिट देताना पक्ष बघतात तेव्हा तिकिटे अभ्यासू उमेदवाराला मिळण्याची शक्यता उरतच  नाही व तो निवडून यायचा प्रश्नच येत नाही ! राजकारणातुन सज्जन माणसे हद्दपार होतात ती अशी ! मग गल्लोगल्लीचे गुंड, काळा पैसा असलेले धंदेवाइक, जाती-पातींचे पुढारी हेच निवडणुक रिंगणात उतरतात. मतदारसंघात किमान 10 उमेदवार असतात, त्यातले मात्तबर असे चार ते पाच असतात, बाकी सगळे मते खायला उभे असतात / केलेले असतात. म्हणजे 30 % मतांची बेगमी झाली की विजय निश्चित ! जाती-पातीचे राजकारण मग बंद कसे होणार ?  मतदारसंघात कोणत्या जातीचे किती प्राबल्य आहे हे बघूनच उमेदवार निवडला जातो. सर्वसाधारणपणे एखाद्या मतदारसंघात  30 ते 40 % मते एखाद्या जातीचीच असतात. आपल्या जात-भाईसाठी मतदार हिरीरीन मतदान करतातच ! बाकीचे उदासीन असतात. असा उमेदवार जेव्हा निवडून येतो व सरकार जेव्हा बनते तेव्हा तो / ते  आपली वोट-बॅंकच मजबूत करणार. 25-30 % मतदारांचे भले करणारे निर्णय बाकी 70 % लोकांवर लादले जाणार व त्याला विरोध होणार, विकास खुंटणार, जाती-पातीच्या दलदलीत लोकशाहीचा गाडा रूतत जाणार ! का ? तर  मतदार न फिरकल्याने !

हेच जर 80 % पेक्षा जास्त मतदान सातत्याने होत राहिले तर ? सगळ्यात मुख्य म्हणजे बोगस मतदान बंद पडेल वा त्याचा प्रभाव निकालावर पडणार नाही ! जाती-पातीची गणिते चालणार नाहीत, भावनिक आवाहनांचा परिणाम होणार नाही, मते विकत घेवूनही फायदा होणार नाही वा परवडणार नाही ! या सगळ्यांची गोळा-बेरीज म्हणजे चांगला उमेदवार, सर्व थरातुन पाठींबा असलेला, जातीच्या बाहेर विचार करणारा उमेदवार विजय होइल, असे उमेदवार देणारा  पक्ष सत्तेत येइल व मग व्यापक हिताचे निर्णय घेतले जातील. लोकशाही मजबूत होइल.

सध्या मतदानाच्या दिवशी रजा दिली जाते. याचा टक्का वाढण्यासाठी काहीही उपयोग होत नाही ती आधी बंद करायला हवी.  त्यातही गंमत म्हणजे एकाच दिवशी सगळ्या राज्यात मतदान नसेल तेव्हा येते. माझे कार्यालय आहे मुंबईत तर मुंबईत मतदान आहे तेव्हा मला सुट्टी मिळते व मी मतदान करणार पनवेलला तेव्हा तिकडे मतदान वेगळ्या दिवशी असेल तर परत मला 2 तासाचे कन्सेशन मिळते !  ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी दोन तासाची सवलत द्या , तेवढी पुरे आहे.  काम बंद ठेवल्याने करोडो रूपयांचे  नुकसान देशाचेच होते.

मतदानाची वेळ साधारण 7 ते 5 अशी असते. ती अशी मर्यादित ठेवण्यापेक्षा मतदारसंघात बुथ/केंद्र निहाय  80 % मतदान होइपर्यंत चालू ठेवायला हवीत ! भले दोन दिवस सुरू ठेवा की मतदान, काय प्रोब्लेम आहे ? एरवीही बंद मतपेट्या 5 दिवस कडी-कुलपात ठेवल्या जातातच ना ? मतदान केंद्राबाहेर फलक लावून मतदानाची टक्केवारी प्रदशित करावी, स्थानिक केबल नेटवर्क वापरून ती सर्वाना कळेल अशी सुद्धा व्यवस्था करता येइल. 7 ते 5 या वेळेत 80 % मतदान झाले तर ते केंद्र बंद करा नाहीतर सुरू ठेवा. काही दिवस थांबूनही टक्केवारी गाठली जात नसेल तर तिकडची प्रक्रीयाच स्थगित करा. याचा अर्थ त्या भागातल्या लोकांना लोकशाहीत रस नाही, तिकडचा कारभार प्रशासकावर सोडा ! त्या भागात कोणतीही विकासकामे करू नका ! आपले जात-भाईच नाही तर मतदारसंघातले  जास्तीत-जास्त मतदार मतदान करतील ही जबाबदारी आपसूकच उमेदवारावर व पक्षावर पडेल ! कोणतीही सक्ती न करता मतदानाचा टक्का वाढेल !

फिरवल्यामुळे भाकरी करपणार नाही, घोडा बुजणार नाही, पाणी अडणार नाही तसेच मतदार मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी फिरकला तर लोकशाहीचा गाडा सुद्धा अडणार नाही !

सर्व मतदारांना नम्र विनंती – स्वत: मतदानाचा हक्क बजावा व महाराष्ट्रात यंदा 80% + मतदान होइल या साठी प्रयत्न करा ! धन्यवाद !