बुधवार, २३ मार्च, २०११

जरा हटके !

नव्या भरतीतला ’अ’ नावाचा कर्मचारी व्यवस्थापकाकडे “आजचे काम काय ?” ते विचारायला गेला. व्यवस्थापकाने त्याला नदी पार करून जायचे काम दिले. ’अ’ ने ते काम मोठ्या उत्साहाने केले. काम झाल्यावर व्यवस्थापकाने त्याला “ठीक” असा शेरा दिला.

व्यवस्थापकाने ’ब’ ला पण तेच काम दिले पण नदी पार करतानाच त्याने नदीत गटांगळ्या खाणार्या आपल्या एका सहकार्याला सुद्धा वाचविले. त्याला “बरा” असा शेरा मिळाला.

काही दिवसाने “क” हा नवीन कर्मचारी कामावर रुजू झाला, त्याने सुद्धा व्यवस्थापकाला काम काय आहे ते विचारले. त्याला पण नदी पार करायची कामगिरी मिळाली. “क” ने आधीच्या दोघांनी ते काम कसे केले ते अभ्यासले. त्या दोघांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे अनुभवाचे बोल त्याने ऐकले. कामातले धोके त्याला कळले. सर्व माहिती घेवून त्याने एक कृती योजना बनविली व स्वत: त्याप्रमाणे नदी पार करून निर्धोक, कमी वेळेत नदी पार करून देणारी योजना त्याने कंपनीला सादर केली. व्यवस्थापकाने त्याला “चांगला” असा शेरा दिला.

मग आला “ड” कर्मचारी. त्याने आधी काय घडले त्याचा आढावा घेतला. “क” ने केलेले गाइड सुद्धा त्याने अभ्यासले. त्याला कळले की नदी पार करण्यासाठी पोहत जायची गरजच काय ? त्यात जोखीम आहे शिवाय वेळ सुद्धा वाया जातो. त्या पेक्षा या नदीवर एक पुल बांधला तर ? नुसती कल्पना करून तो थांबला नाही, स्वत: आराखडा बनवून त्याने अल्प काळात इतरांच्या मदतीने त्या पुलाची उभारणी सुद्धा केली. व्यवस्थापकाला तो एवढेच म्हणाला की हे काम आता परत कोणाला तुम्हाला द्यावेच लागणार नाही ! अर्थात त्याला व्यवस्थापकाने शेरा दिला “उत्तम” !

अ,ब , क व ड यांच्या कामाचे मूल्यमापन कसे करता येईल ? आपण बहुतेकदा दिलेले काम करताना चाकोरी बाहेरचे काही करून बघतच नाही. पाट्या टाकायचे काम वर्षानुवर्षे करून आपल्याला समाधान मिळते का ? आपण मोठी जबाबदारी निभावल्याचा आव आणतो पण माझ्या कामाची हवी तेवढी कदर झाली नाही असे सुद्धा म्हणतो.

ब ने दूसर्या बुडणार्याला वाचविले याने त्याचे कौशल्य अर्थात पणाला लागले. त्याचे काम अ पेक्षा नक्कीच उजवे होते.

क ने त्याच्याही पुढे जावून डाटा बँक बनविली. अनेकदा पुर्वतिहास न तपासताच आपण एखादे काम करतो. दूसर्याच्या चूका लक्षात घेवून आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे काम करता येते. हे सर्व करून पुढच्यांसाठी त्याची मार्गदर्शिका बनविणे हे काम नक्कीच बहुमूल्य आहे. आधीची माहिती संकलित करून ती चांगल्या प्रकारे वापरणे हे खरेच मोठे काम होते ! त्याने नदी पार करण्यातली जोखीम कमी झाली होती वर शिवाय वेळही वाचला होता. नव्याने येणार्या कामगारांसाठी छान वस्तूपाठच घालून दिला गेला. Learn to teach and teach to learn !

ड ने मात्र चाकोरीबाहेरचा विचार केला. त्याने नदी पोहून पार करणेच कालबाह्य करून टाकले ! म्हणूनच तो उत्तम ठरला.

ब, क, ड यांनी आपल्या कामाने संघभावनेचे महत्व दाखविलेच पण त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे त्यांनी आपल्या कामात “पुढाकार” घेतला !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: