बुधवार, २३ मार्च, २०११

सचिनचा कथित झेल, माझा मात्र त्रिफळा !

विंडीज विरूद्धच्या सामन्यात सचिन पंचाच्या निर्णयाची वाट न बघता तंबूत परतला. मी काही ते दृष्य पडद्यावर बघितले नव्हते. दूसर्या दिवशीच्या वर्तमानपत्रात मात्र या कृतीचे खिलाडूवृत्ती म्हणून कौतुक झाले होते तसेच सचिनने मैदान सोडले नसते तर फेरनिर्णय मागितला असता तरी तो बाद असल्याचे निर्विवाद सिद्ध झाले नसते अशीही पुस्ती जोडली गेली होती. सचिन याच्याही आधी अनेकदा पंचाच्या निर्णयाची वाट न बघता तंबूत परततो असेही दाखले दिले गेले होते.

घरी बायकोने मथळा वाचताच, “यात कसली आली आहे खिलाडूवृत्ती ? मिंधे पत्रकार सचिनचा उदो-उदो करायची एकही संधी सोडत नाहीत !” अशी मल्लीनाथी करताच मी भडकलो. “मग टी.व्ही. फोडणे, शिव्या घालणे ही खिलाडूवृत्ती का ?” या माझ्या प्रतिसवालावर बायकोने पलटवार केला. आमच्या घरात मग दोन गट पडले, मी व मुलगी विरूद्ध सौ. व मुलगा !

सौ – खेळात अंपायर , वर लागलाच तर तिसरा अंपायर कशासाठी असतो ?
मी – मान्य, पण दोषी व्यक्तीने स्वत:हून पद सोडणे चांगले की न्यायालयाने लाथ घातल्यावर ? सचिनला वाटले आपण बाद आहोत, त्याने लगेच मैदान सोडले, यात त्याचा मोठेपणाच दिसतो, त्याच्यासारख्या थोड्यांमुळेच अजूनही हा खेळ सभ्य माणसांचा म्हणून ओळखला जातो !
सौ – याच्या आधी सचिनने कधी पंचाच्या निर्णयावर नाराजी दाखविलीच नव्हती का ? अगदी या आधीच्याच सामन्यात आपण पायचीत नव्हतो असे त्याला वाटत होते. निर्णयाविरूद्ध दाद मागण्यापुर्वी त्याने कोहलीशी चर्चा केली, जेव्हा कोहली त्याचा उपयोग होणार नाही असे बोलला तेव्हा तो निर्णय त्याने मान्य केला. अंपायर नेहमीच बरोबर असेल असेही नाही तसेच तो कायम चूकेल असेही नाही, अंपायर देईल तो निर्णय आदळ-आपट न करता मान्य करणे म्हणजेच खिलाडूवृत्ती !

मुलगी – अग पण त्याला वाटले आपण बाद आहोत तर अंपायरच्या निर्णयाची वाट त्याने कशाला बघायची ? पायचीतच्या निर्णयात चेंडू स्टंपवर गेला असता का हे फलंदाजाला कसे कळणार ? त्या साठी हॉक-आय तंत्राची मदत घेण्यात काय चूक ? आपल्या बॅटची कड लागून चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला हे मात्र फलंदाजाला सगळ्यात आधी समजते.

मुलगा – त्याला स्वत:चे मोठेपण दाखवायचे होते ! दूसरे काय ? आपण सामना जिंकलो म्हणून ठीक आहे पण हरलो असतो तर हे नको तिकडे दातृत्व संघाला किती महाग पडले असते ? एरवी सचिन “संघासाठीच मी खेळतो” असे टुमणे वाजवित असतोच ना ? त्यानेच हल्ली सांगितले होते की स्लेजिंग मला मान्य नाही पण एका सामन्यात संघाने ठरविले म्हणून मॅकग्राला त्याने “तुला मी मैदानाच्या बाहेर फेकणार आहे” असे सुनावले होते ! अंपायरने बाद दिल्याशिवाय मैदान सोडायचे नाही हे धोरण संघासाठी नक्कीच योग्य आहे. असे केल्याने खिलाडूवृत्तीला कोणतीही बाधा येत नाही.

मी – एरवी तुम्हीच बोंब मारता ना की सचिनने शतक काढले की भारत हरतो म्हणून ? या सामन्यात म्हणूनच तो मुद्दाम लवकर तंबूत परतला असेल. त्याच्या दोन शतकी खेळीवर पाणी ओतल्याचा त्याने असा निषेध केला असेल !

सौ – पण मग तेच सिद्ध झाले ना ? सचिनने हौतात्म्य पत्करले पण युवराज चमकलाच ना ? मॅच जिंकलो ना शेवटी ? सचिन सलग दोन सामन्यात कधीही यशस्वी ठरत नाही. त्याने हाच मोका साधला व स्वत: भोवती आरत्या ओवाळून घेतल्या !

मी – तुम्ही काही म्हणा, सचिन हाच आता या खेळातला शेवटचा सभ्य माणूस आहे. अर्थात त्याचा आदर्श आहे सुनील गावस्कर, सुनील सुद्धा कधी अंपायरने बोटाने “चालते व्हा” असा इशारा करेपर्यंत थांबला नाही !

सौ – काय पण उदाहरण दिले आहे ! याच तुमच्या सुनीलने ऑस्ट्रेलियात अंपायरच्या निर्णयाचा निषेध म्हणून सामनाच सोडायचा आततायी निर्णय घेतला होता ना ?

मी – शेवटी ते दोघेही हाडामासाची माणसेच आहेत. तेवढ्या एका प्रसंगाने ते रडे असल्याचे कसे म्हणता येइल ? मराठी माणसाचे हेच चूकते, गुणांची पूजा करावी, दोष का उगाळत बसता ? शंकराचा निळा गळा हा त्याचा कलंक ठरत नाही मग सचिन-सुनीलला एकाच प्रकरणामुळे का झोडपता ?

मुलगा - बाबा, तुला आता एकच प्रसंग सांगतो – दूध का दूध पानी का पानी ! सचिन खेळातला सभ्य माणूस आहे ना ? अगदी तो चेंडू कुरतडत असल्याची फिल्म बघून सुद्धा लोकांनी तो नखाने शिवणीच्या भोवतालची माती साफ करत होता हा त्याचा खुलासा मान्य केला, पण मंकीगेट प्रकरणाचे काय ?

मी – मला अमेरिकेतले वॉटरगेट माहीत आहे. मंकीगेट काय ?

मुलगा – बाबा, उगीच वेड पांघरून पेडगावला जावू नकोस ! हरभजनने एका सामन्यात सायमंडसला मंकी असे चिडवले होते. हा उघड उघड वर्ण-व्देषी शेरा आहे. स्टंप जवळच्या कॅमेर्याने भज्जी चांगलाच गोत्यात आला होता, भारताची इभ्रत सुद्धा पणाला लागली होती. या प्रसंगात सचिनचा वापर साक्षीदार म्हणून केला गेला व त्याने मंकी असे आपण ऐकले नाही, “मां की” असे काहीसे ऐकू आले असे सांगून हरभजनच्या पापावर पांघरूण घातले ! या वेळी जर तो ठामपणे भज्जीचे चूक आहे, त्याने वर्णव्देषी टीका करून क्रिकेटला बट्टा लावला आहे असे सांगता तर तो खरा खिलाडू ठरला असता – तेव्हा कोठे गेला होता तुमच्या सचिनचा धर्म ?

त्रिफळा उडल्यावर थांबण्याची गरजच काय ? मी लगेच हापिसला जायला उशीर होत आहे असे सांगून मैदान सोडले !

४ टिप्पण्या:

saanasi म्हणाले...

मला वाटते,'नरो वा कुंजरा' असे उत्तर तर प्रत्यक्ष धर्मराज युधिष्ठिराने दिले होते. मग सचिनने दिले तर बिघडले कुठे?

THE PROPHET म्हणाले...

हरभजनसिंग 'मंकी' अशी इंग्लिश शिवी(?) हासडेल ही बिलिव्हेबल गोष्ट वाटत नाही..
तो मांकी निश्चितच म्हणालेला असू शकतो! :)

सिद्धार्थ म्हणाले...

अहो म्हटले मंकी तर काय बिघडले. "आधीच सायमॅंड्स त्यात दारू प्यायला" अशी म्हणच आहे. सायमॅंड्स म्हणजे कुणी साधू संत लागून गेला की काय? व्हाणेन मारला तरी कमीच.

हेरंब म्हणाले...

बाबा आणि सिद्धार्थला अनुमोदन..
बाकी, बाप्पा जेव्हा उद्या शंभरावं शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकपच्या बाहेर हाकलेल तेव्हा काय बोलायचं याचा टीकाकारांनी आत्तापासूनच सराव केलेला बरा.