रविवार, ९ मे, २०१०

दाद का हो चोरता ?

दुष्काळ हा तसा आपल्या पाचवीलाच पुजलेला असतो. वीजेचा , घरांचा, जीवनावश्यक वस्तुंचा, पाण्याचा, मासळीचा , लाच न खाणार्या नेत्यांचा व सरकारी नोकरांचा, न्यायाधीशांचा, चांगल्या कार्यक्रमांचा, चांगले साहित्य, याचा आणि त्याचा ! अकलेचा दुष्काळ सुद्धा सार्वत्रिकच आहे पण मला चिंता वाटते ती टाळ्यांच्या दुष्काळाची !

कानाचा पडदा फाटावा, सभागृहाचे छत खाली येते की काय असे वाटणारा टाळ्यांचा कडकडाट शेवटचा कधी ऐकला ते आता खरेच आठवत नाही ! नुसत्या टाळ्याच नाहीत तर त्याच्या जोडीला गडगडाटी हसणे, तोंडात बोटे घालून वाजविलेली सणसणीत शीळ (अशी शीळ वाजविता येणार्यांचा सुद्धा दुष्काळ आहे !), “वन्स मोअर” अशी दिलेली दिलखुलास दाद सुद्धा दुर्मिळ झाली आहे ! खूप खूप वर्षापुर्वी शाळा व महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन, गणपती उत्सव, राजकिय सभा, दिग्गज साहित्यीकांची भाषणे अशा ठीकाणी टाळ्या व हश्या यांचा महापूर असायचा ! एखादी गोष्ट थेट काळजाला भिडली की पब्लिक कोणतीही भीडभाड न बाळगता टाळ्यांचा कडकडाट करून दिलसे दाद द्यायचा ! संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील आठवणी बाबा आम्हाला सांगत तेव्हा त्यातली प्रत्येक व्यक्तीरेखा आमच्या समोर जिवंत उभी रहायची. अत्र्यांचे धिप्पाड व्यक्तीमत्व, त्यांच्या सभांना होणारी प्रचंड गर्दी, त्यांच्या भाषणाला मिळणारी लोकांची उत्स्फुर्त दाद, सदोबा, यशवंतराव च”व्हाण”, ह.रा.महाजनी यांचा हराम असा उल्लेख, नरराक्षस मोर्या असा मोरारजींचा उल्लेख होताच पब्लिकचे पिसाळणे, शत्रूपक्षाच्या नावाने शिव्यांची लाखोली --- अगदी सगळे सगळे बाबा निव्वळ शब्दातुन आमच्या समोर उभे करीत ! या सर्वात कान फूटतील , आकाश खाली येते की काय असा टाळ्यांचा कडकडाट असायचाच ! त्यानंतर टाळ्या वसूल करणारे म्हणजे बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजनी, अटलजी ! लोकांचा टाळ्यांचा कडकडाट संपेपर्यंत वक्त्यांना थांबायला लागायचे एवढे लोक बेभान झालेले असत. मग बाळासाहेब म्हणायचे, “आता पुरे, ही काँग्रेसची सभा नाही !” नाटकातल्या कलाकारांची नावे वाचताना “…. आणि श्रीराम लागू वा काशिनाथ घाणेकर” असे कानावर पडायचा अवकाश, लोक नाट्यगृह डोक्यावर घेत ! पडद्यावर वा रंगमंचावर ज्यांच्या नुसत्या एंट्रीने टाळ्यांचा कडकडाट होत असे, असे दिग्गज कलाकार गेले तरी कोठे ? का बरे लोकांनी टाळ्या वाजविणे अगदी बंदच करून टाकले असावे ? टाळ्या वाजविणे हा प्रकारच संघात निषिद्ध आहे ! संघाच्या कार्यक्रमात, विशेषत: बौद्धिक चालू असताना टाळ्या वाजवायच्या नसतात अशी तंबी आधीच दिली जाते ! तसेही संघाचे बौद्धिक ऐकताना कोणी जागा राहू शकत असेल वा अगदी राहिलाच तर टाळ्या वाजवत असेल असे निदान मला तरी वाटत नाही. टाळ्या वाजविणे हा प्रकारच संघात निंदनीय आहे ! असो ! स्काउट - गाइडमध्ये टाळ्या वाजवायच्या असतात पण मोजून मापून व रीदम मध्ये ! एक-दोन-तिन, एक ---- दोन ---- तिन, एक-दोन-तिन अशा तालात !

फर्डे म्हणावे असे वक्ते काँग्रेसजवळ केव्हाच नव्हते ! नेहरू-गांधी परीवाराला पब्लिक पाहण्यासाठी गर्दी करायचे / करते, ऐकण्यासाठी केव्हाच नाही ! म्हणूनच सोनियाजी, प्रियांका व राहुल नुसते रोड शोच करतात ! गावातल्या सभेत गळ्यातले हार पब्लिकमध्ये भिरकावायचे, एखादे नागडे मुल उचलून चमकोगिरी करायची, एखाद्या झोपडीत शिरून शिळी भाकरी खायची की बास ! शहरात थोडी वेगळी ट्रीक, एटीमची रांग लावा, बेस्टने फिरा, प्रथमवर्गाच्या डब्यातुन साध्या वेषातल्या पोलिसांसह प्रवास ! जनता-पब्लिक खुष ! मतांचा पाउस व पुढची ५ वर्षे सत्तेच्या किल्ल्या ! पण तरीपण सभा तर लावाव्या लागतातच ना ? सभा म्हटली की पब्लिकसुद्धा हवेच ना ? नुसते पब्लिक नको, वक्त्यानी पॉज घेतला की टाळ्या सुद्धा वाजवायला हव्यात ना ? त्या शिवाय सभा यशस्वी झाली असे कसे म्हणणार ? यावर उपाय काय तर पैसे देवून गर्दी जमवायची , खुण झाली की टाळ्या वाजवायला पढवून ठेवायचे ! मग रोमनमध्ये लिहिलेले हिन्दी भाषण सोनियाजी वाचणार, मग मेरी सास मरी – टाळ्या, मेरा फति मरा – जोरदार टाळ्या व मै विधवा बनी असे वाचले की प्रचंड टाळ्या ! लोक पावसात भीजत असताना ही वाचणार “आप कडी धूप मे मुझे सुन रहे हो” लोक आपले मिळालेल्या पैशाला जागून टाळ्या वाजविणार ! आधी वक्ते आपल्या अमोघ वक्तृत्वाने टाळ्या वसूल करायचे आता पब्लिक टाळ्यांचे पैसे आधीच आयोजकांकडून वसूल करून ठेवते ! जे सभेत झाले तेच पडद्यावर , रंगमंचावर सुरू झाले. एखादा विनोदी कार्यक्रम बनवायचा, लोकांनी कोठे हसावे हे कळण्यासाठी त्यात लाफ्टर टाकून द्यायचा, लाफ्टर आहे म्हणजे आता आपण हसावे असे मग लोकांना निदान समजू तरी लागले ! मग छोट्या पडद्यावर लाइव लाफ शोचे खूळ आले ! या शोचे पितामह नवजोत सिद्धू व शेखर सुमनच एवढे खदाखदा हसतात की बघणार्याला यांचे डोके तर नाही ना फिरले अशी शंका येते ! मोले घातले रडाया हे ठीक आहे हो पण हसण्यासाठीचे मोल किती मिळत असेल या दुकलीला ? सारेगमपत पल्लवी जोशी पण प्रेशकांना वारंवार “टाळ्या वाजवा” असे विनवत असते. ( का दमात घेत असते ? ) पल्लवीला लाडे लाडे दाद मागण्यासाठी, अवधूत गुप्तेला बहुदा दाद देण्याचे नाटक करण्यासाठी पैसे मिळत असावेत, देवकी पंडीत सोबत झी ने केलेल्या करारात तसा क्लॉज नसावा बहुदा ! लोक सुद्धा पक्के बिलंदर ! आपल्यावर कॅमेरा रोखला गेला आहे असे वाटले तरच उगाच काहीतरी हात खाजविल्यासारखे करतात ! केव्हातरी पल्लवी “परत एकदा जोरदार टाळ्या हव्यात” असे सांगते तेव्हा मात्र मला जाम हसू येते ! अग बये आधी कधी टाळ्या वाजल्याच नव्हत्या तर आता परत कशा (आणि कशाला ) वाजतील ? कॅच पकडला तेव्हा जर तो कॅमेर्यात टीपला गेला नसेल तर रीप्लेत तरी तो कसा दिसणार ?

कार्यक्रमांचा दर्जा घसरला आहे म्हणून टाळ्यांची दाद मिळत नाही हे सुद्धा पुर्णपणे खरे नाही. आमच्या मुलांच्या शाळेचे स्नेहसंमेलन खरेच बहारदार असते. पटांगण अगदी तुडुंब भरलेले असते. दरवर्षी एक थीम घेवून कार्यक्रम केले जातात आणि ते सरसच असतात. पण आलेले रसिक पालक मात्र शोकसभेला बसल्यासारखे बसलेले असतात. जसे काही कार्यक्रम संपल्यावर शाळा फी डबल करणार आहे ! अर्धेअधिक लोक फूकट आहे म्हणून आलेले असतात, काही त्यांची मुले कार्यक्रमात असतात म्हणून तरी किंवा त्यांच्या पाल्याला एखादे बक्षिस मिळणार म्हणून आलेले असतात. अर्थात तेवढी इवेंट झाली की ते गुलच होतात ! माझ्यासारखा एखादा रसिक कार्यक्रम आवडला म्हणून बेहोश होवून टाळ्या वाजवू लागतो तेव्हा बायको कोपर ढोसते व डोळ्याने दटावून “पुरे आता” अशी खुन्नस देते, आसपासचे लोक याला काही मॅनर्स-बिनर्स आहेत की नाहीत का थोडी ढोसून आला आहे अशा नजरेने बघतात. लवंगी फटाके , ते सुद्धा ओले झालेले असल्यावर फूटताना जसा आवाज येते तसा टाळ्यांचा आवाज येतो व मग शांततेत पुढचा कार्येकम चालू होतो ! दाद देणे सुद्धा हल्ली मोजून मापून करावे लागते ! दिलखुलास दाद देणे म्हणजे अशिष्टपणा असा नवा संकेत रूढ झाला आहे ! हेच लोक छोट्या पडद्यावरची खोटी , घसीटी पसीटी ष्टोरी, पांचट विनोद, बटबटीत प्रसंग घराच्या चार भींतींत बघताना मात्र सुस्कारे सोडत असतात, अश्रू टीपून भिजलेला रूमाल व पदर वा ओढणी पिळत असतात वा खोटे खोटे हसत असतात ! लोकांची विनोदाची जाण कमी होत चालली आहे, काय चांगले व काय वाईट समजतच नाही , दर्जा म्हणजे काय याची व्याख्या सुद्धा बदलत चालली आहे. लोकांना फक्त कमरेखालचे इनोदच समजतात, शारिरीक विनोदाच्या पुढचा तरल विनोद इथे कोणाला कळतच नाही ! मध्यमवर्गीय कोणत्या सार्वजनिक कार्यक्रमाला जातच नाही, तिकडे पैसे मोजूनच गर्दी जमवावी लागते. तिकिट काढून कार्यक्रम बघणारे, “आयला, आमचा वेळ व पैसा खर्च करून तुमच्या कार्यक्रमाची महागडी तिकिटे विकत घेवून आलो वर टाळ्या सुद्धा वाजवायच्या, दाद सुद्धा द्यायची ? बहोत नाइन्साफी है !” अशा तोर्यात कार्यक्रम बघतो. एखादी जाडी नटी पडद्यावर दिसली , कोणी घसरले, कोणाचे काही घसरले तरी लोक हसतात, शाब्दिक विनोदातले द्वयर्थी विनोदच लोकांना समजतात, चित्र-विचित्र अंगविक्षेप (किंवा तद्दन अश्लील हावभाव ) करणारा गोविंदा वा त्या कुवतीचा कलाकार महान अभिनेता गणला जातो ! मराठीत लक्ष्मीकांत बेर्डे स्टार होता व आता भरत जाधव वा मकरंद अनासपुरे. भरत जाधवला “गोरी गोरी पान” वर केलेला नाच अजून किती वर्षे पुरणार आहे व मकरंद अनासपुरेचा ग्रामीण बाज पब्किलला अजून किती वर्षे हसविणार आहे कोण ? मायबाप पब्लिकलाच माहीत ! दुरदर्शनमुळे घरातच दुरचे सर्व काही दिसू लागल्यामुळे सभा, कार्यक्रमांना सुद्धा कोणी जात नाही, गेले तर पुर्णवेळ थांबत नाही, थांबले तर टाळ्या वाजवायच्या फंदात कोणी पडत नाही. कार्यक्रम सुरू कधी होतो व संपतो कधी हेच समजत नाही !

कविवर्य बोरकरांनी दाद चोरणार्या पब्लिकला “सुर आम्ही का चोरतो ? मग दाद का हो चोरता ? अशा शब्दात फटकारले आहे. पण बोरकरांना जावून सुद्धा बरीच वर्षे झाली. तेव्हापासून भेडसावणारा टाळ्यांचा दुष्काळ आता अधिकच भीषण झाला आहे. माणूस नुसते घेत सूटला आहे पण देणे, दिलखुलास दाद देणे मात्र साफ विसरला आहे. जो तो कुढतो आहे आतल्या आत ! आता कोणी “भले शाब्बास “ म्हणून पाठीवर दणदणीत थाप सुद्धा घालत नाही, “दे टाळी” असे म्हणून कोणी पुढे हात केला तर त्याला साथच मिळत नाही. एका हाताने मग टाळी वाजणार तरी कशी ? “वन्स मोर” अशी फर्माइश सुद्धा कोणी करीत नाही आणि केली तर कलाकार ती पुर्ण करायच्या फंदात पडत नाही, त्याला एकदाच गायचे पैसे मिळालेले असतात ! हसरे चेहरे, दाद देणारे दर्दी आता दिसतच नाहीत. जो तो आपल्या चेहर्याची चौकोनी घडी व त्यावर चढवलेली मेक-अपची पुटे सांभाळण्यात दडलेला, मुखवटा व चेहरा आता एकच भासतो आहे. हल्ली फक्त हिजडेच टाळ्या वाजविताना दिसतात, म्हणूनच कदाचित टाळी कानावर पडली की दचकायलाच जास्त होते !

ता.क. कंटाळा आला असेल व भाषण बंद पाडायचे असेल तर टाळ्या वाजवायच्या असा नवा ट्रेंड सध्या आला आहे. बोलबचन अमिताभला पाहण्यासाठी व त्याचे भ्रष्ट “गर्जतो मराठी” ऐकण्यासाठी पुणेकरांनी याचा फारच प्रभावी वापर केला. सर्व सभासंकेत गुंडाळून अध्यक्ष, निमंत्रक अशा स्वकियांचीच भाषणे पुणेकरांनी टाळया वाजवून बंद पाडली ! धन्य जाहला असेल तो अमिताभ !

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

दाद शब्दांपेक्षा कृतीने दिली जाणे अधिक योग्य आहे.

hanuman waghmare म्हणाले...

सहमत ! फार छान लिहिलंय ....