शनिवार, १ मे, २०१०

असा साकारला संयुक्त महाराष्ट्र !

आज आपण मुंबईसह स्थापन झालेल्या आपल्या मराठी भाषिक महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहोत. १मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तरी त्याची बीजे अगदी १९०६ पासून रोपली गेली होती. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील महत्वाचे टप्पे -

v १९०६ मधेच लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्र राज्याची संकल्पना मांडली होती

v १९१९ मध्ये लोकमान्य टिळकांनीच कॉंग्रेसच्या जहिरनाम्यात सुद्धा महाराष्ट्र राज्याची मागणी केली होती.

v १ ऑक्टोबर १९३८ मध्ये मध्य प्रांताच्या विधान परीषदेने मुंबई राज्यापासून विदर्भ वेगळा करण्याचा ठराव पास केला होता.

v याच वर्षी १५ ऑक्टोबर रोजी, स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या साहित्य संमेलनात विदर्भासह वेगळ्या मराठी भाषिक राज्याचा ठराव पास झाला होता.

v २८ जानेवारी १९४० मुंबईत स्थापन झालेल्या संयुक्त महासभेने साहित्य संमेलनात पास झालेल्या ठरावाचा पाठपुरावा केला होता.

v १९४० ते १९४५, दूसरे महायुद्ध व “चले जाव” चळवळ जोरात असल्याने संयुक्त महाराष्ट्राचा लढा मागे पडला होता.

v १२ मे १९४६ रोजी बेळगाव येथे भरलेल्या साहित्य संमेलनात, माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली परत एकदा संयुक्त महाराष्ट्राचा ठराव संमत झाला व सर्वश्री माडखोलकर, पोतदार, शंकरराव देव, केशवराव जेधे आणि नवरे यांच्या समितीवर ठरावाची अंमलबजावणी करण्याचे काम सोपविले गेले.

v २८ जुलै १९४६ – याच समितीने महाराष्ट्र एकिकरण परिषदेचे गठन केले. याचे आयोजक होते स.का. पाटील आणि अध्यक्ष होते शंकरराव देव. आचार्य दादा धर्माधिकारी यांनी मांडलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या ठरावाला, विविध भागातुन आलेल्या २०० प्रतिनिधींनी पाठींबा जाहीर केला.

v डिसेंबर १९४६ मध्ये भाषावर प्रांतरचनेला पाठींबा असलेल्या लोकांची दिल्लीत एक बैठक झाली , तिचे नेतृत्व केले होते पट्टाभि सीतारामय्या यांनी.

v १३ एप्रिल १९४६ रोजी “संयुक्त महाराष्ट्र एकिकरण परीषदेने जळगावात एक अधिवेशन भरवले होते.

v ऑगस्ट १९४७ मध्ये शंकरराव देव आणि माधव अणे यांच्यात झालेल्या अकोला करारानुसार “महाराष्ट्र एकिकरण परिषदेने” महा विदर्भ, मराठवाडा, मुंबई आणि महाराष्ट्रासह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी करण्याचे ठरले.

v १७ जुलै १९४८ रोजी केंद्र सरकारने श्री. धर यांच्या अध्यक्षतेखाली वेगळ्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ व कर्नाटक या राज्यांच्या स्थापनेच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी घटनात्मक समितीची स्थापना केली.

v १० डिसेंबर १९४८ मध्ये धर समितीने आपला अहवाल सादर केला व भाषेच्या आधारावर केली जाणारी वेगळ्या राज्यांची मागणी राष्ट्रविरोधी असल्याचे सांगून साफ फेटाळली.

v डिसेबर १९४८ रोजी जयपुर अधिवेशनात काँग्रेसने भाषावर राज्य रचनेला तत्वत: मान्यता दिली व नेहरू, पटेल व सितारामय्या यांची समिती धोरणाचा फेरविचार करण्यास नेमली.

v ऑक्टोबर १९५३ मध्ये वेगळ्या आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली.

v ४ नोव्हेंबर १९५३ रोजी शंकरराव देव यांनी नेहरूंना पत्र लिहून संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्याची मागणी केली.

v २९ डिसेंबर १९५३ रोजी केंद्र सरकारने फाझल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य फेर-रचना आयोगाची स्थापना केली.

v ऑगस्ट १९५४ मध्ये नागपुर, चांदा, अकोला, अमरावती, पुणे आणि मुंबईचा दौरा करून फाजल अली यांनी आपला अहवाल सादर केला.

v १९ ऑक्टोबर १९५५ ला अहवाल जाहीर करण्यात आला. त्यात बॉम्बे व विदर्भ या दोन राज्यांच्या स्थापनेची शिफारस केली होती. बॉम्बे राज्यात दोन विभाग असतील, गुजरात विभागात कच्छ व सौराष्ट्र तर महाराष्ट्र विभागात मराठवाडा. संयुक्त महाराष्ट्र परिषदेने हा अहवाल फेटाळला.

v १९ ऑक्टोबर १९५५ रोजी नेहरूंनी पुढाकार घेवून ३ राज्यांच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडला. विदर्भ व मराठवाडा यांचा समावेष असलेला संयुक्त महाराष्ट्र, कच्छ, सौराष्ट्रसह महागुजरात व बॉम्बे. तथापि धनंजयराव गाडगीळ व शंकरराव देव यांनी मात्र मराठवाठा, विदर्भ, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आणि कच्छ, सौराष्ट्र असलेला महागुजरात अशी दोनच राज्यांची मागणी केली.

v ८ नोव्हेंबर १९५५ रोजी काँग्रेस कार्यकारीणीने नेहरूंनी प्रस्तावित केलेला त्रैभाषिकाचा ठराव संमत केला.

v १८ नोव्हेंबर १९५५ रोजी डाव्या पक्षांनी मुंबई बंद पाळला.

v २० नोव्हेंबर १९५५ रोजी मोरारजी देसाई व स.का. पाटलांनी गिरगाव चौपाटीवर सभा घेवून संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणार्यांना आवाहन दिले.

v २१ नोव्हेंबर रोजी डाव्या पक्षांनी विधानभवनावर मोर्चा काढला. फ्लोरा फाउंटन ( सध्याचे हुतात्मा स्मारक ) जवळ पोलिसांनी मोर्चा अडवायचा प्रयत्न करताच दगडफेक झाली व पोलिसी गोळीबारात १५ लोक हुतात्मा झाले तर २०० जण जखमी झाले. मोर्चाचे वार्तांकन करीत असलेला जन्मभूमि या गुजराती वर्तमानपत्राचा पत्रकार चिमणभाई शेठ या वेळी मारला गेला.

v नोव्हेंबर १९५५ मध्ये बिगर काँग्रेसी पक्षांनी “संयुक्त महाराष्ट्र समिती”ची पुण्यात स्थापना केली.

v १ डिसेंबर १९५५ रोजी यशवंतराव चव्हाण यांनी नेहरू की संयुक्त महाराष्ट्र असा प्रश्न असेल तर आपण नेहरूंचीच साथ करू असे जाहीर केले.

v १६ जानेवारी १९५६ रोजी नेहरूंनी बॉम्बे केंद्रशासित प्रदेश जाहीर करताच त्याच्या विरोधात हिंसक चळवळ उभी राहीली.

v २२ जानेवारी १९५६ रोजी केंद्रीय अर्थमंत्री असलेल्या चिंतामणराव देशमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व नेहरूच्या मनात महाराष्ट्राविषयी आकस असल्याचा आरोप केला.

v ३ जुन १९५६ रोजी नेहरूंनी बॉम्बे पुढील ५ वर्षे केंद्रशासित प्रदेश राहिल असे जाहीर केले तसेच ती महाराष्ट्राची राजधानी असणार नाही असे सांगत तिन्ही राज्यांसाठी उच्च न्यायालय तसेच लोक सेवा आयोगाची घोषणा केली.

v ऑगस्ट १९५६ मध्ये लोकसभेने ठराव पास करून बॉम्बे या महा-द्वैभाषिकाची स्थापना केली. याच राज्यात संयुक्त महाराष्ट्र व महा-गुजरातचा समावेश केला गेला.

v नोव्हेंबर १९५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीने सत्याग्रहाचे रणशिंग फुंकले.

v २८ मार्च १९६० रोजी बॉम्बे या महा-द्वैभाषिकाचे विभाजन करणारा प्रस्ताव मांडला गेला व २१ एप्रिल १९६० ला त्याला मान्यता मिळाली.

v १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.

काही ठळक नोंदी -

Ø शिव सेनेची संकल्पना आचार्य अत्रे यांनी १९६० मध्येच मांडली होती. अशा संघटनेमार्फत तरूणांना एकत्र करून संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालवायचा त्यांचा मानस होता. बाळासाहेबांनी १९६६ मध्ये स्थापन केलेल्या राजकिय पक्षाचे नामकरण प्रबोधनकारांनी शिवसेना असेच केले.

Ø महाराष्ट्र राज्याची स्थापना १ एप्रिल १९६० रोजीच होणार होती, कामगार नेते श्रीपाद अमृत डांगे यांना मात्र १ मे हा जागतिक कामगार दिन असल्याने त्याच दिवशी स्थापना व्हावी असे वाटत होते. तसेच या लढ्यात कामगार वर्गच अग्रणी होता. पुढे नेहरूंची भेट झाल्यावर जगात १ एप्रिल हा मुर्खांचा दिवस म्हणून ओळखला जातो तेव्हा आम्हाला मुर्ख बनवायचा तुमचा विचार आहे का ? असे हसत हसत विचारल्यावर नेहरूंनी खिलाडूपणे १ मे हा दिवस निश्चित केला.

Ø मोरारजी व स.का पाटील यांनी संयुक्त महाराष्ट्राला विरोध करण्यासाठी गिरगाव चौपाटीवर सभा घेतली होती. या सभेत सका पाटलांनी ५००० वर्षेच काय . आकाशात चंद्र सुर्य आहेत तोवर महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही असे फुत्कार काढले होते. अर्थात अशी गरळ ओकताच सभेला जमलेल्या गिरणी कामगारांनी त्यांच्यावर दगडांचा वर्षाव केला व त्यांना पळवून लावले. सभा उधळली ! चौपाटीच्या वाळूत दगड कसे आले हे आधी पोलिसांना उमजेना, मग कळले की कामगारांनी आपल्या जेवणाच्या डब्यातुनच दगड आणले होते !

Ø १५ सप्टेंबर १९५८ रोजी, संयुक्त महाराष्ट्र समितीने हुतात्मा स्मारक बांधण्याची मागणी केली होती पण तशी काही गरज नसल्याचे सांगत सरकारने ती फेटाळली होती. समितीने सत्याग्रह करून तात्पुरत्या स्वरूपाचे स्मारक २१ नोव्हेंबर १९६० रोजी हुतात्मा चौक येथे उभारले. सध्या असलेल्या स्मारकाचे उद्घाटन १ ऑगस्ट १९६३ रोजी झाले.

Ø इंदीरा गांधींचे पती फिरोझ गांधी मुंबईसह महाराष्ट्राच्या विरोधात होते. हिंदुस्तान टाइम्स मध्ये इन्साफ या टोपणनावाने ते लिहित. अत्रे त्यांना नवयुगमधून तोडीस-तोड उत्तर देत. मुंबई महाराष्ट्राला दिल्यास मुंबईतील गुजराती महिलांची सुरक्षितता धोक्यात येइल असे मत फिरोज गांधी मांडत. २१ नोव्हेंबर १९५६ रोजी हुतात्मा चौकाजवळ झालेल्या गोळीबारात अनेक आंदोलक हुतात्मा झाले होते. या कामगिरीवर नेहरू खूष झाले असून सका पाटील व मोरारजी यांना लवकरच केंद्रात बढती मिळणार असल्याचा गौप्यस्फोट फिरोझनी केला होता.

Ø महाराष्ट्र राज्याचा स्थापना समारोह चार दिवस चालला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून निवड झालेल्या यशवंतराव चव्हाणांनी सर्वप्रथम २७ एप्रिल रोजी शिवनेरीवर जावून छ. शिवाजी महाराजांना आदरांजली अर्पण केली. दूसर्या दिवशी ओवल मैदानात फटाक्यांची आतषबाजी झाली. २९ तारखेला, क्रॉस मैदानात भरलेल्या, भविष्यातल्या महाराष्ट्राचा वेध घेणार्या एका प्रदर्शनाचे उद्घाटन यशवंतरावांनीच केले. १ मेच्या पुर्व संध्येला गिरगाव चौपाटी तसेच शिवाजी पार्कला झालेल्या महा-सभेत स्वत: नेहरू सामील झाले होते. आधी काळे झेंडे दाखविणार्या लोकांनीच यावेळी नेहरूंचे स्वागत, कटूता बाजूला ठेवून, फुलांची उधळण करीत केले.

Ø मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य करण्यासाठी महाराष्ट्राला ५६ कोटी व ३०० गावे गुजरातला देण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला होता. मुंबई महाराष्ट्रात जाणार तेव्हा तिकडे गुंतविलेल्या पैशाची नुकसान भरपाई गुजराती व्यापार्यांना हवी होती. अर्थतज्ज्ञ चिंतामणराव देशमुखांनी “एक छदाम सुद्धा देणार नाही” या शब्दात ही मागणी धुडकाविली होती. पण त्यांचा विरोध डावलून केंद्राने महाराष्ट्राला गुजरातला ५६ कोटी व ३०० गावे देणे भाग पाडले. अजब योगायोग बघा – पाकिस्तानला सुद्धा भारताने फाळणीनंतर ५६ कोटीच दिले होते.

Ø भाषावर प्रांत रचनेची मूळ कल्पना मोतीलाल नेहरू यांनी १९२९ मध्येच मांडली होती. त्यांच्याच अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या एका आयोगाने असा अहवाल सादर केला होता.

सौजन्य व आभार – डी.एन.ए.

३ टिप्पण्या:

THANTHANPAL म्हणाले...

एक मे महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव .मोठ्या शहरात जोरात साजरा होत आहे. आम्ही सुद्धा आजच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो. कारण सरकारी उत्सवाला साजरा करण्या करता वीज बंद केली जात नाही. पण हाय घड्याळात सकाळचे ६ वाजले आणि लाईट गेली ती ११ वाजे ला आली त्या मुळे सकाळची देशभक्तीपर गाणे मेरे देश की धरती वगेरे ऐकण्याची संधी गेली. यामुळे उत्सव आहे असे वाटलेच नाही. आजकाल कोंबड ओरडण्याची वाट पहावी लागत नाही आमचे घड्याळ वीज जाणे येणे यावरच लावली जातात.
यापुढची सत्य घटना सांगतो.मुलाचा पुण्यातील IT कंपनीत काम करणारा मित्र आई-वडिलांना भेटण्यास बऱ्याच दिवसांनी गावाकडे आला होता. सकाळी गुल झालेली लाईट ११ वाजता आली. गप्पा मरत असताना लगेच घंट्या भरात वीज गुल. घामाच्या धारा सुरु. त्याने थोडा वेळ सहन केले. नंतर माझ्या कडे तावातावाने आला. काका , आता लाईट कधी येणार मी शांतपणे सांगितले ५.३ वाजता. तो चिडला , काका तुम्ही लोक इतके शांत कसे बसू शकता, लोक धिंगाणा करत नाही का? नेत्यांना , MSEB च्या लोकांना मारत का नाही. या ४५ डिग्री तापमानात पंख्या, कुलर शिवाय कसे राहतात . आमच्या कडे लाईट जात नाही. गेली तर अधिकाऱ्यांची खेर नाही. लोक ठोकून काढतात. ४ दिवसा साठी आलेला त्याने आजच्या रात्रीचे वातानुकुल बस चे परतीचे तिकीट काढले.
यावर मी जास्त टीका टिप्पणी करू इच्छित नाही. हे काम आपल्यावरच सोपवतो. अखंड महाराष्ट्रात सर्वाना समान कायदा,सेवा सुविधा सारख्या प्रमाणात मिळाव्यात अशी मागणी केली तर तो परत बटबटीत पणा भडक पणा वाटेल .

अनामित म्हणाले...

Many Many Thanks for sharing this valuable information. I feel most of the readers specially youngsters are not aware of many of these details and secondly this kind of step by step info is not available anywhere.

gr8 work and research done by you.

AA

अनामित म्हणाले...

लोकभाषेत राज्यांचा कारभार चालला पाहिजे या तत्त्वानुसार लोकमान्यांचा सर्वच भाषिक राज्याना पाठिंबा होता, केवळ महाराष्ट्राला नव्हे.