रविवार, २९ मे, २०११

भारतरत्न कोण ?

देशासाठी सर्वोच्च त्याग करणार्या किंवा भारताची किर्ती जगभरात वृद्धीगंत करणार्या व्यक्तीस भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देवून गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे व अशा गौरविलेल्या व्यक्तींचे सरासरी वय नक्कीच ६५ च्या वर असेल.. आतापर्यंत समाज सेवा, कला, साहित्य, विज्ञान व तंत्रज्ञान, कारखानदारी ही क्षेत्रे व सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींनाच हा पुरस्कार दिला गेला आहे. राजीव गांधी व एम.जी. रामचंद्रन ही दोन नावे वगळली तर हा सन्मान ज्यांना दिला गेला त्याच्या योग्यतेबद्द्ल कोणताही वाद नाही. अर्थात योग्यता असूनसुद्धा निव्वळ दळभद्री राजकारणामुळे स्वा. सावरकरांना हा पुरस्कार दिला गेला नाही याची बोच पुढची अनेक वर्षे सलत राहणार आहेच. कोणत्याही क्रिडापटुला या पुरस्काराने गौरविले गेलेले नाही. किंबुहना तसे कोणालाही सचिनने नाव या पुरस्कारासाठी घेतले जावू लागले तो पर्यंत वाटलेही नव्हते. पेपरात आलेल्या बातमीप्रमाणे या पुरस्काराच्या मानकात क्रिडा हे क्षेत्रच नसल्याने हा मान कोणाही क्रिडापटूला देताच येणार नाही ! अर्थात यात काहीच तथ्य नाही, कला या सदरात खेळ धरायला काहीच हरकत नाही. क्रिडापटूला हा पुरस्कार द्यायचा झाला तर अगदी ध्यानचंद , सुनील गावस्कर, कपिल देव, अनिल कुंबळे , पी.टी. उषा, मिल्खा सिंग व विश्वनाथन आनंद यांना डावलून तो थेट सचिनला देणे हास्यास्पद ठरेल.

खेळाडू , जास्त करून क्रिकेटपटू असे काय करतो की त्याला या सर्वोच्च पुरस्काराने गौरवावे ? धोंडो केशव कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, खान अब्दुल गफार खान, विश्वेश्वरय्या , जे.आर.डी. टाटा यांच्या रांगेत सचिनला बसवायची नुसती कल्पना सुद्धा करवत नाही. व्रत आणि व्यवसात यात निश्चित फरक आहे ! डोळसपणे हे केल्यास सचिन या पुरस्कारासाठी अगदीच अपात्र आहे.
जो खेळ उणेपुरे आठ देश खेळतात तो जागतिक समजला जाणे हेच बावळटपणाचे आहे ! देशासाठी खेळण्यापेक्षा पैशासाठी खेळायला सचिनने नेहमीच प्राधान्य दिले आहे. अगदी हल्लीच आयपीएलचा तमाशा खेळून झाल्यावर विश्रांती हवी म्हणून त्याने विंडीज दौर्याला कलटी मारली आहे. अर्थात भारतीय क्रिकेट संघाला टीम इंडीया म्हणणे हेच मुर्खपणाचे आहे. भारतातल्या क्रिकेटवर १०० % नियंत्रण बीसीसीआय या खाजगी संस्थेचे आहे . भारत सरकारचे या संस्थेवर अगदी काडीचेही नियंत्रण नाही. भारतातले क्रिकेटवेड व्यवस्थित एनकॅश करून या संस्थेने बख्खळ पैसा कमविला आहे खेळाडूंनाही पैशाने न्हाऊ घातले आहे. या क्षेत्रात आपलीच एकाधिकारशाही रहावी म्हणून प्रतिस्पर्धी संस्थेचा कसा काटा काढला हे सर्वज्ञातच आहे. क्रिकेटमध्ये पैशाचा महापूर व बाकी देशी खेळांची परवड सुरू आहेच. भारतात क्रिकेटने बारसे धरले आहे ते त्यातल्या निखळ पैशामुळे . देशासाठी हातात बंदूक घेणारे निधडे तरूण , तगड्या पगाराच्या खाजगी नोकरीवर लाथ मारून सरकारी सेवा पत्करणारे , खाजगी प्रॅक्टीसचा मोह टाळून एखाद्या ठार खेड्यात लोकसेवेचे व्रत स्वीकारणारे , लोकांनी दगड मारले तरी स्त्री शिक्षणासाठी हयात वेचणारे, साठ वर्षापुर्वी कुटूंब नियोजनाचा प्रसार करणारे एका बाजूला व पैसा मिळतो म्हणून हातात बॅट धरणारे व त्यात चालणार्या बीसीसीआय पुरस्कृत गैरप्रकारावर मौन पाळणारे, मनमानीवर चकार शब्द न उच्चारणारे एका बाजूला – कशी वाटते तुलना ? कलेच्या , साहीत्याच्या, समाजसेवेच्या क्षेत्रात पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींनी त्यासाठी आपली हयात घातली आहे, सचिनचे तर तेवढे अजून वय सुद्धा नाही !

पैसा कमवू नये असे कोणीच म्हणणार नाही, पण पैसा की देश असा प्रसंग आला तेव्हा त्या व्यक्तीने काय केले हे बघितले गेले पाहिजे. शारजामधील क्रिकेटच्या फडात भाग न घेता राष्ट्रकूल स्पर्धेत खेळावे लागल्यावर सचिनने काय केले होते ? तळतळाट व थयथयाट ! इतर क्रिडापटूंसारखा तो खेलग्राम मध्ये राहीला होता का ? पंच तारांकित हॉटेलात त्याची (व संघाची सुद्धा ) सोय करायला लागली होती ! त्या स्पर्धेत त्याची कामगिरी काय होती ? सुमार ! मानधन काय घेतले होते ? शारजात न खेळल्याने होणारे त्याचे नुकसान त्याला भरून दिले गेले होते, रोखीने ! फेरारीचा कर त्याला का भरायचा नव्हता, क्रिकेटमधल्या सट्टेबाजीला सचिन कर्णधार असताना ऊत आला होता तेव्हा सचिनने मुकनायकाची भूमिका का निभावली ? त्यासाठी नेमलेल्या चंद्रचूड आयोगाला त्याने उडवा-उडवीची उत्तरे का दिली ? कारगिल संकटात त्याने खिषात (स्वत:च्या !) हात घातला होता का ? (अर्थात बाळासाहेबांना त्यासाठी सचिनला बोल लावण्याचा काहीही अधिकार नाही, त्यांनी असा कोणता दानधर्म केला आहे ?)

खेळाडू पैसा कमविणे हे एकमेव उद्दीष्ट समोर धरून जेव्हा हातात बॅट घेतो तेव्हा भारत-रत्न पुरस्कारावर त्याचा काहीही अधिकार रहात नाही. क्रिडा नैपुण्यासाठी असलेला अर्जुन व खेल रत्न पुरस्कार सचिनला या आधीच दिला गेला आहे. दॅटस ऑल ! अर्थात क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर स्टार व ईएसपीएन वर न जाता ( किंवा अगदी तसे करूनही ! ) भारतातल्या प्रत्येक खेड्यात क्रिडा संस्कृति जोपासण्यासाठी , रूजण्यासाठी सर्व सुविधांनी युक्त असे मैदान बनविण्यासाठी तो जर खस्ता खाणार असेल तर मात्र -------- !

६ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

> राजीव गांधी व एम.जी. रामचंद्रन ही दोन नावे वगळली तर हा सन्मान ज्यांना दिला गेला त्याच्या योग्यतेबद्द्ल कोणताही वाद नाही.
>----

गिरी, कामराज, गुलज़ारीलाल नन्दा, अरुणा असफ़ अली (रशिया पैसे देऊन बाईंचे पेपर/मासिकं विकत घेत असे) यांनी इन्दिराबाईंची चमचेगिरी केली, ही त्यांची मुख्य कर्तबगारी. हिंदुत्वाचा द्‌वेष ही अमर्त्य सेन यांची कामगिरी. रवि शंकर, भीमसेन, बिस्मिलाह खान, लता या सगळ्यांच्या किताबावर टीका करणारे लोक आहेत. बिस्मिलाहजींनी तर 'रवि शंकर हिंदु आहेत म्हणून' अशी चाल खेळून पुरस्कार पदरात पाडला. माझ्या मते एका लताला तो पुरस्कार देऊन चालण्यासारखं होतं. संधी मिळेल तेव्हा पाकिस्तानशी चुंबाचुंबी करणे हा गफार खानांचा आवडता खेळ होता. सत्यजित रे, मोरारजी यांना पुरस्कार देण्याची काय गरज़ होती? भगवान दास, बिधान चन्द्र रॉय यांच्याबद्‌दल मला काहीच माहिती नाही, आणि तुम्हालाही ती असेल असं मला वाटत नाही.

अनामित म्हणाले...

शिवाय आंबेडकर, जयप्रकाश नारायण, वल्लभभाई पटेल यांनाही भारत-रत्न मिळालं ते राजकीय कारणांसाठी. हेडगेवारांना पुरस्कार द्‌या अशी हास्यास्पद मागणी अगदी दत्तोपन्त ठेंगडींसारख्या आदरणीय माणसानी केली होती. मग ज्ञानेश्वर, कबीर, अक्का महादेवी, राणा प्रताप, शिवाजी यांनीच काय घोडं मारलंय की त्यांना तो पुरस्कार मिळू नये?

दर ५-१० वर्षांत एखाद्‌यालाच काय तो हा पुरस्कार दिल्यास, आणि त्यात राजकारण न घुसडल्यास या सर्वोच्च सन्मानाला अर्थ राहिला असता. राष्ट्रपती, पन्तप्रधान यांना तर त्या पदाच्या रूपानी एक मोठा मान आधीच मिळाला असतो. त्यांना 'भारत रत्न' अजिबात देऊ नये.

- नानिवडेकर

हेरंब म्हणाले...

तुम्ही भारतरत्न ची यादी नजरेखालून घटली आहेत काय? राजीव गांधी आणि अजूनही अशीच अनेक भुक्कड नावं त्यात आहेत. ते सोडा.. सैफ आली खान नावाच्या विदूषकाला पद्मश्री मिळाला आहे. या न्यायाने सचिनला नक्कीच भारतरत्न काय त्याच्याही पुढचा पुरस्कार मिळायला हवा. बेटिंगचे एवढे आरोप होऊनही लाखो लोक अजूनही त्यावर विश्वास न ठेवता क्रिकेट बघतात याचं एकमेव कारण म्हणजे त्यांचा सचिनवर असलेला विश्वास...

असो. तात्पर्य आधीच काढली असली की चर्चेला काही अर्थ उरत नाहीच म्हणा !! चालूद्या..

Naniwadekar म्हणाले...

> भारतातल्या प्रत्येक खेड्यात क्रिडा संस्कृति जोपासण्यासाठी , रूजण्यासाठी सर्व सुविधांनी युक्त असे मैदान बनविण्यासाठी तो जर खस्ता खाणार असेल तर मात्र ...
>---

क्रिकेटमधे बर्‍यापैकी प्राविण्य यापलिकडे कुठलीही ज़मेची बाज़ू नसलेल्या पोरट्याला भारतरत्नचा प्रस्ताव हास्यास्पदच आहे. 'पुरस्कारयोग्य व्यक्तीचे दुधाचे दात पडलेले असावेत' ही मागणीही हा वीर पूर्ण करत नाही. पण लतानी स्वत: कशासाठी काय खस्ता खाल्ल्या? १९४२ ते ४७ तिच्यावर ओढवलेली गरीबी, ही एक वेगळी बाब आहे.

हा सन्मान अत्यन्त कंजूषीनी दिला ज़ावा, ती व्यक्ती चांगल्या क्षेत्रात (क्रिकेटबिकेट नाही) उच्चतम पातळीवर पोचलेली असावी, आणि शक्यतो एकूण वर्तन आदर्शवत असावे, असे काही निकष लावता येतील. खस्ता खाल्ल्या तर तीही नक्कीच ज़मेची बाज़ू ठरेल. ब्रॅडमनसारख्या अगदी क्रिकेटद्‌वारे चांगला आदर्श, आणि निवृत्तीनन्तर त्या क्षेत्रात भरीव कामगिरी, एखाद्‌या अपवादाला त्याचा देश सर्वोच्च सन्मान देता झाला तरी ते ठीक. पण ऑस्ट्रेलियात इतर क्षेत्रांत आपल्या देशासारखे दिग्गज झालेले नाहीत, ही बाबही इथे महत्त्वाची ठरते. बेब रूथ, पेले, गावस्कर-तेंडुलकर-ध्यानचन्द, बोर्ग यांना त्यांच्या देशातला असला सन्मान देण्याची मला आवश्यकता वाटत नाही. तुमच्या लेखाशी मी सहमत आहे.

Santosh म्हणाले...

Masta!!!!!!!!!!!!!! :)

अनामित म्हणाले...

Naniwadekar kaka aani Eknath kaka Sachin jeva cricket khelayala lagala teva cricket madhe aajachyaevadha paisa navata.. tyamule sachin paishansathi khelato he mhanae chukiche tharel.

Kharatar tyachya uttam khelamule anek lokanchya cheharyavar khup vela samadhan pahavayas milale aahe (Tumhi sudha tyachi kheli kadhi tari enjoy keli aselach).. aapan ekhadi gosht ka karato ..kinva ti ka pahato ? karan aapalyala tyatun samadhan milat asate .. aapale tension halake hot asate.

Sachinane cricket vyatirikt kay kele ase sarv jan mhanatat, pan tyane kititari lahan mulana aadhar dila aahe , kiti tari thikani denagi dili aahe aani det aahe .. farak etakach ki to itaransarakha mediala sobat gheun he sarv karat nahi ..

Sachinla Bharat ratn dene n dene hi nantarachi gosht aahe pan tyachyavar chukiche aarop karane barobar nahi.