रविवार, २९ मे, २०११

बायपास !

दहा वर्षे बिनतक्रार सेवा देणारा फूड प्रोसेसर “ऑन ड्यूटी” बंद पडल्याने घरातले वातावरण चांगलेच तापले होते. प्रत्येकाने आपापल्या परीने त्याला सुरू करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्याने “पुढे काय ?” या प्रश्नाचे उत्तर आता मलाच द्यावे लागणार होते. मी ताबडतोब “आजच नवा प्रोसेसर विकत आणूया” असा तोडगा सूचवल्यावर सौ. कडाडली. काही नवा-बिवा आणायचा नाही, आहे हाच मला दुरूस्त करून हवा, तो सुद्धा आजच्या आज. आपल्या नव्या संसाराची सुरवात आपण याच प्रोसेसरने केली होती----- आज जुना म्हणून प्रोसेसर फेकाल, उद्या मला सुद्धा ---“ लगेच डोळ्याला पदर सॉरी ओढणी ! हीच्या भावनांचा उद्रेक त्सुनामी सारखा असतो ! नक्की कशाने (कशा कशाने )ही सेन्टी होते हे काही अजून मला कळलेले नाही. लगेच तिच्या सुरात सूर मिसळून प्रियांकाने “ते काही नाही बाबा, आई म्हणते आहे तर हाच (मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला’च’ पाहिजे मधला ’च’ बरे का ! ) प्रोसेसर दुरूस्त झालाच पाहिजे” असा हेका धरला. मातोश्रींची आज्ञा प्रमाण मानून लगेच चि. प्रसादने गुगल करून त्या कंपनीची वेब साइट शोधून, आमच्या भागातल्या सेवा केंद्राचा फोन नंबर मला दिला. सेवा केंद्राने माणूस घरी पाठवायचे २५० रूपये होतील त्या पेक्षा तुम्ही तो आमच्या दूकानातच आणा असे सूचविले.

लगेचच माझी पिटाळणी त्या पत्त्यावर झाली. दहा वर्षे जुने असलेले आपल्याच कंपनीचे मॉडेल बघून सेवा केंद्रावरचे कर्मचारी चांगलेच हैराण झाले. ते मॉडेल केव्हाच बंद पडले होते व त्याचा कोणाताच पार्ट मिळायची कोणतीही शक्यता नव्हती. हा फूड प्रोसेसर एक्सचेंज मध्ये सुद्धा कोणी आता घेणार नाही. तुम्ही नवाच घ्या हा सल्ला मात्र जाताना त्यांनी मला फूकट दिला. दहा वर्षे सेवा बजावणार्या त्या यंत्राचा आता मला सुद्धा कळवळा आला. नवीन संसार थाटल्यापासून तो आमचा सोबती होता व त्याला अशी सक्तीची व्ही.आर.एस. देणे माझ्या सुद्धा जीवावर आले. निदान त्याला चालता बोलता करूनच निरोप द्यायला हवा. वाटेत जेवढी दुरूस्तीची दूकाने लागली त्या सर्वाना मी बंद पडलेला फूड प्रोसेसर दाखविला पण त्याला हात सुद्धा लावायची तयारी कोणा यंत्रज्ञाने दाखविली नाही. भंगारात सुद्धा आता त्याला कोणी विचारणार नाही असे प्ररखड मत अनेकांनी मला ऐकविले.

शेवटची आशा म्हणून ज्याने माझा पंखा दुरूस्त करून दिला होता त्याच्या दूकानात मी शिरलो. दूकानाचा मालक मिक्सर दुरूस्त करत होता तेव्हा माझ्याकडे बघायला त्याने एका १०-१२ वर्षाच्या पोराला खुणावले. पोरगा चुणचुणीत दिसत होता. एखाद्या लहान बाळाला जसे हातात घेतात तसे त्याने माझ्या फूड प्रोसेसरला आपल्या ताब्यात घेतले. पॉवर केबल व टेस्टर घेवून त्याने वेगवेगळे प्रयोग चालू केले. अर्थात या क्षेत्रातले माझे ज्ञान अगदीच बेताचे आहे. वीजेचा दिवा बदलता आला तरी मला कृतार्थ झाल्यासारखे वाटते. इथे हा १२ वर्षाचा , या क्षेत्रातले कोणतेही औपचारीक शिक्षण न घेतलेला मुलगा, नुसत्या निरीक्षणाने अनेक चाचण्या पार पाडत होता. एका विशिष्ट प्रकारे वायरची जोडणी करून हवा तसा रीझल्ट मिळाल्यावर त्याने विजयी हास्य केले. “साब, ये फूड प्रोसेसर मे दो ब्लेड है, एक मिक्सर का, एक प्रोसेसर का, लेकिन दोनो ब्लेड एकसाथ चालू होते है, इससे हात कट्ने का रीक्स था, कंपनीने सेफ्टी के लिये ऐसा सिस्टीम बनाया की दोनो बर्तन आपको लगानेही पडते है, प्रोसेसर का बर्तन जबतक ये लॉक के जरीये फिट नही बैठता आपका मिक्सर चालू होंगा ही नही ! दस साल इस्तेमाल करने के बाद ये स्विच ढीला पड गया है और वो फिट नही बैठनेसे आपका मशीन चालू नही हो रहा है” रोगाचे निदान त्याने अचूक केले होते. फूड प्रोसेसर विकत घेताना ही सर्व माहिती आम्हाला दिली गेली होतीच. “अभी ये स्वीच का पार्ट कंपनीवालोंके पास भी नही मिलेगा. “ --- म्हणजे पुन्हा पहिले पाढे पंचावन्न ! मी प्रोसेसर परत माझ्या ताब्यात घ्यायला हात पुढे केला तेव्हा त्याने “क्यो न इसकी बायपास करले ?” असा पर्याय ठेवताच मी उडालोच ! माणसाची बायपास माहिती होती पण मशीनची बायपास कशी असते ? माझ्या चेहर्यावरचे प्रश्न चिन्ह त्याला वाचता आले व “वत्सा ---“ च्या स्टाइलमध्ये त्याने मला समजाविले की फूड पोसेसरचे भांडे घट्ट बसले आहे असा सिग्नल मोटरला ज्या खटक्याने जातो तो झिजला आहे व तो भाग नवा मिळणार नाही तेव्हा ती प्रोसेस बायपास केली तर सगळाच प्रश्न मिटेल ! आता माझ्याही डोस्क्यात हजार वोल्ट्चा प्रकाश पडला ! कमाल आहे, जो उपाय या क्षेत्रातल्या पदव्या घेतलेल्या अनेकांना सूचला नाही तो विचार १२ वर्षाच्या मुलाला सूचला होता. मी ओके सिग्नल दिल्यावर मिनिटात त्याने प्रोसेसर सुरू करून दिला ! त्याच्या पात्यांची घरघर ऐकून मला धन्य झाल्यासारखे वाटले ! जन्माला आलेल्या मुलाचा ट्या ऐकला की कसे आनंदाचे भरते येते तसे झाले अगदी !

राजा असतो तर त्याला अर्धे राज्य सुद्धा द्यायची माझी तयारी होती ! त्याच जोशात “बोलो, कितना रूपया देने का ?” असे विचारताच त्याने “मामुली बायपास तो किया है, खाली एक वायर यहासे निकालके वहा डाला, दस रूपया दो” असे म्हणून मला चांगलेच खजिल केले. कंपनीचा माणूस नुसते घरी यायचेच २५० रूपये घेणार होता. मशीनवर एक फटका मारून जेव्हा ट्र्क चालू होतो तेव्हा सरदारजी १०० रूपयाचे बिल बघून करवादतो ! तेव्हा त्याला मेकॅनिक सांगतो की एक रूपया फटका मारायचा व ९९ रूपये फटका कोठे मारायचा त्याची अक्क्ल असल्याचे आहेत ! एरवी माणसावरच्या बायपासचा खर्च काही लाखात जातो, इथे मात्र या १२ वर्षाच्या मुलाला फक्त दहा रूपये हवे होते ! मी आधी फूड प्रोसेसर ताब्यात घेतला व त्याच्या हातावर शंभरची करकरीत नोट ठेवून तिकडून त्वरेने निसटलो , “साब , आपका बचा पैसा लो” असा आवाज अगदी पार ऐकेनासा होई पर्यंत !

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

श्री मराठे

तुम्हाला आला तसाच अनुभव मला देखील आला .ब्लोग वरच्या प्रतिसादाच्या खिडकीत देण्यापेक्षा
स्वतंत्र दिल्यास व्यवस्थित लिहिता येईल म्हणून मेल करत आहे .


आम्ही सुमित चा एस पी १६ हा प्रोसेसर विकत घेतला होता बाजारात आल्या आल्या .
अत्यंत उत्तम प्रोसेसर .परंतु त्याचे सुटे भाग मिळण्याचा प्रश्न आला त्यामुळे १२ वर्षांनंतर आम्ही तो
बदलून ग्रीन लाईन चा घेतला हा देखील अत्यंत उत्तम प्रोसेसर आहे .
यात फक्त एकच समस्या आहे ती म्हणजे याचा interlock चा प्लास्टिक लग हा फारच
नाजूक आहे तो तुटला !!!
या एका लग करता संपूर्ण भांडे विकत घ्यावे लागणार होते आणि त्याची किमत ५०० रुपये !!!
हा दोन -तीन दुकानात दाखवला पण कोणी दुरुस्त करेना .
एक दिवस पायी फिरून येताना एका टपरी समोर गर्दी दिसली ,एक राजस्थानी मुलगा
गिऱ्हाइका समोरच मिक्सर दुरुस्त करून देत होता .
मी माझा पण मिक्सर घेऊन गेलो .
मी त्याला सांगितले कि तू interlock ऐवजी एक स्वीच घालून दे .
त्यावर तो म्हणाला ड्राय मिक्सर आणि फूड प्रोसेसर हे दोन्ही चालू राहणार च आहेत
त्यामुळे या interlock चा किंवा स्वीच चा कांही उपयोग नाही ,मी तुम्हाला हे बाय पास
करून देतो दहा रुपये होतील !!!
हा फूड प्रोसेसर असणाऱ्या सर्वांना हा प्रोब्लेम येईल किंवा आला असेल
त्यांना या माहितीचा निश्चित उपयोग होईल
धन्यवाद
विजय बुद्धिसागर