रविवार, ८ ऑगस्ट, २०१०

येडा बनून पेढा खाणे !

एका गावात एक नावाजलेला गणिती रहात असतो. गणिताबरोबरच अर्थशास्त्राचाही त्याचा दांडगा व्यासंग असतो. लवकरच त्याची ख्याती सर्वदूर पसरते. आपल्या राज्याची अर्थव्यवस्था रूळावर यावी म्हणून विविध देशांचे राजे सुद्धा त्याचा सल्ला घेत. या ओसाड गावात निव्वळ त्याला भेटण्यासाठी मोठी मोठी माणसे येतात, आपल्याला कोणी सुद्धा विचारीत नाही याचा राग त्या गावच्या मुखिया व त्याच्या बगलबच्च्यांच्या मनात अगदी खोलवर भिनला होता. बड्या लोकांची त्या विद्वानावर मेहेरनजर असल्याने त्याच्याशी थेट वैर पत्करण्याची त्या कोणाचीच शामत नव्हती. पण त्या भल्या माणसाला खिजवायला त्यांना एक मस्त कारण मिळाले होते. जेव्हा जेव्हा मुखिया व त्याचे चमचे भल्या माणसाच्या समोर येत तेव्हा ते त्याला हिणवत असत. तू एवढा विद्वान पण तुझा मुलगा मात्र अगदीच ढ कसा ? अगदीच येडच्याप ! त्या मुर्खाला जरा विचार, सोने की चांदी यात अधिक मौल्यवान काय ? तुझा दिवटा चांदी असे सांगतो ! हे सतत कानावर पडू लागल्याने, अवहेलना सहन न होऊन एकदा त्या भल्या माणसाने आपल्या मुलाला विचारलेच की सोने व चांदी यात अधिक मौल्यवान काय ? मुलगा क्षणाचाही विलंब न लावता सोने असे म्हणाला ! “अरे मग बाहेर असे विचारल्यावर चांदी असे का सांगतोस ?” बुचकळ्यात पडलेल्या बापाने मुलाला विचारले.

मुलाच्या लक्षात सगळा प्रकार येतो. तो सांगतो की आपण शाळेत जाताना मुखिया व त्याचे बगलबच्चे पाराखाली बसलेलेच असतात. मुखिया रोज खिषातुन सोन्याचे व चांदीचे नाणे काढतो व यातले अधिक मौल्यवन जे असेल ते घ्यायला सांगतो. मी चांदीचे नाणे घेतले की ते हसून हसून अगदी लोटपोट होतात ! खिदळतात काय , टाळ्या काय वाजवितात, उड्या सुद्धा मारतात ! “विद्वान बापाचा दिवटा पोर” अशी माझी निर्भत्सना सुद्धा करतात. मी मान खाली घालून शाळेची वाट धरतो. हे असे अनेक वर्षे चालले आहे.” “…. अरे मग तु हे सगळे सहन तरी कशाला करतोस ? तुला सोने अधिक मौल्यवान आहे हे ठाऊक असताना सुद्धा ?” बाप हैराण ! मुलगा शांतपणे बापाला आतल्या खोलीत घेवून जातो. एक मोठी पेटी त्याला उघडून दाखवतो. ती पेटी शेकडो चांदीच्या नाण्यांनी गच्च भरलेली असते ! डोळे विस्फारून तो खजिना बघत असलेल्या बापाला मुलगा म्हणतो “ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलून घेईन त्या दिवशी हा खेळ संपेल ! त्यांना आसूरी आनंद मिळणार नाही व मला चांदीचे नाणे सुद्धा मिळणार नाही ! एरवी ते आपले काय वाकडे करू शकणार आहेत ? पण त्यांना मिळणारा आनंद थांबला तर मात्र आपल्याला छळायचे दूसरे मार्ग ते शोधतील. तेव्हा जे चालले आहे ते काय वाईट आहे ?
तात्पर्य – आयुष्याच्या खेळात कधी कधी आपण मुर्ख असल्याचे सोंग वठविण्यात खरा शहाणपणा असतो कारण हे नाटक आपल्या वरिष्ठांना, आपल्या जवळच्या गोतावळ्याला आवडते. याचा अर्थ आपण हार पत्करली असा होत नाही. खेळात हारजीत ही असतेच , खेळात दूसर्याला जिंकण्याचे खोटे समाधान मिळून आपण हार पत्करण्यात जर फायदा असेल तर ?
मूळ इंग्रजी गोष्टीचे भाषांतर करत असतानाच मला वपुंची एक लघुकथा आठवली. त्यात सुद्धा महापालिकेतला एक भोळसट कारकून रेखाटला आहे. भोळसटाचे मित्र त्याची नेहमीच टवाळी करून मजा लूटत असतात. त्याला बकरा बनविणे हा त्यांचा अगदी दिनक्रमच बनलेला असतो. एकदा असेच ते त्याला रविवारचे सिनेमा बघायला एका थिएटरात बोलावितात. त्याचे तिकिट काढले आहे असे खोटेच सांगतात. तो तिकडे आल्यावर हे सगळे लपून राहून त्याची मजा बघणार असतात. दूसर्या दिवशी लेखक त्या भोळसटाला काल तिकडे येवून परत स्वत:चे हसे करून घेतलेस ना असे विचारतो. त्यावर तो भोळसट म्हणतो की ते मला फसवत आहेत हे का मला ठावूक नाही ! मी तिकडे फिरकलो सुद्धा नाही पण हे मात्र रविवारची सकाळ माझी फजिती बघण्यासाठी त्या सिनेमागृहाच्या आसपास दडी मारून बसलेले असणार ! मी रविवार माझ्या कुटुंबाबरोबर एंजॉय करत असताना हे मात्र उन्हातान्हात उभे असणार ! मी आपल्या शिपायाला वीस रूपये देवून त्यांची खबरबात काढायला तिकडे पाठविले होते. कोण किती वेळ ताटकळले ते आता आपल्याला कळेलच ! आता तुम्हीच सांगा कोण मामा बनले ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: